सौ. मंजुश्री खनके, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 03 डिसेंबर, 2015)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात असे की, वि.प. ह्यांचा मॉं दुर्गा रीएल ईस्टेट अँड लँड डेव्हलपर्स या नावाने व्यापार करीत असून ते प्लॉट्स विकण्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचेकडून तक्रारकर्त्याने मौजा वाकेश्वर, प.ह.क्र.75, ख.क्र. 78, मधील प्लॉट क्र. 44, 45, 54 व 55 एकूण क्षेत्रफळ 3336.84 चौ.फु. चा रु.5,43,474/- मध्ये घेण्याचा करार दि.09.02.2009 रोजी केला. त्यादाखल एकूण रु.5,30,000/- चे क्र. 224373 द्वारे दिले. तसेच उर्वरित रक्कम विक्रीपत्र रजिस्टर्ड करतेवेळी देण्याचे ठरले. तसेच प्लॉट्स एन ए टी पी करुन देण्याची जबाबदारी वि.प. यांची राहील असे करारात नमूद करण्यात आले व करुन दिल्यास विहित कालावधीत घेतलेली रक्कम परत करण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते. तसेच विक्रीपत्र हे 08.02.2014 पर्यंत करण्याचे ठरलेले होते.
परंतू वि.प.ने लेआऊटचे एन ए टी पी करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही आणि नंतर दि.09.12.2002 रोजी पत्र पाठवून कळविले की, जमिन अकृषक करण्याकरीता रु.50/- प्रतीफुटप्रमाणे विकास खर्च भरवा यावा. वि.प.च्या विक्रीपत्र करुन न देण्याच्या अशा धोरणामुळे कंटाळून तक्रारकर्त्याने शेवटी नोटीस पाठवून वि.प.ला तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम रु.5,30,000/- परत मागितले. ती नोटीस वि.पने स्विकारली नाही.
परंतू त्यानंतर आजपावेतो वि.प.ने तक्रारकर्त्यास भरणा केलेली रक्कम ही परत केली नाही किंवा विक्रीपत्र करुन देण्यासाठी कुठलीही कायदेशीर कार्यवाही करुन विक्रीपत्र करुन दिले नाही, म्हणून ही वि.प.चे सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्याने मंचासमोर तक्रार दाखल केली व उपरोक्त वादातील प्लॉटचे कायदेशीर बाबींची पूर्तता करुन विक्रीपत्र करुन द्यावे किंवा ते शक्य नसल्यास रु.5,30,000/- ही रक्कम 18 टक्क्े व्याज दराने परत करावी. तसेच झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
तसेच तक्रारीसोबत नि.क्र. 4 नुसार कागदपत्रांच्या यादीप्रमाणे एकूण 15 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. वि.प.ला नोटीस बजावण्यात आली असता ते मंचामध्ये उपस्थित न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाईचा आदेश पारित करण्यात आला.
3. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष, मुद्दे व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.चे सेवेतील त्रुटी दिसून येते काय
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय
3) आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
- का र ण मि मां सा-
4. मुद्दा क्र. 1 नुसार - वास्तविकतः तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केल्याप्रमाणे की, त्याने वि.प. ह्यांचेकडे सदर वादातीत प्लॉट क्र. 44, 45 (नविन प्रमाणे 28, 29) व 54, 55 (नविन प्रमाणे 37, 38) साठी रु.5,30,000/- चा भरणा केलेला होता, ह्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली असून त्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ वि.प.ने दिलेले बयान असलेल्या कागदपत्रात कबूल व मान्य केलेले आहे की, तक्रारकर्त्याने उपरोक्त चार प्लॉटसाठी रु.5,30,000/- चा भरणा केलेला आहे. तसेच लवकरात लवकर कायदेशीर बाबींची पूर्तता करुन रजिस्ट्री करुन देऊ. परंतू प्रत्यक्षात आजपावेतो वि.प.ने विक्रीपत्र करुन देण्यासाठी कुठलीही कार्यवाही केल्याचे अभिलेखावरील दस्तऐवजावरुन दिसून येत नाही आणि म्हणूनच हीच वि.प.चे सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. करिता मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे नोंदविले आहे.
5. मुद्दा क्र. 2 नुसार – मुद्दा क्र. 1 चे अनुषंगाने वि.प.चे सेवेतील त्रुटी दिसून येत असल्यामुळे तक्रारकर्ता हा निश्चितच मागणीप्रमाणे अशंतः स्वरुपात दाद मिळण्यास पात्र आहे करिता मंच असा आदेश पारित करीत आहे की, तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम रु.5,30,000/- ही दि.17.12.2008 कराराचे दिनांकापासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत 12 टक्के व्याज दराने देण्यात यावी. तसेच यासाठी तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्यात यावा.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येत आहे. वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याने भरणा केलेली रक्कम रु.5,30,000/- ही दि.17.12.2008 कराराचे दिनांकापासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत 12 टक्के व्याज दराने तक्रारकर्त्याला देण्यात यावी.
2) वि.प.ने तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- द्यावा.
3) वि.प.ने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.