- आ दे श –
(पारित दिनांक – 27 जुलै, 2018)
श्री. शेखर प्र. मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार वि.प.ने, त्याने घेतलेल्या भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणून म्हणून दाखल केलेली आहे.
2. वि.प.क्र. 1 हा बांधकाम व्यावसायिक असून वि.प.क्र. 2 हा जमिन मालक आहे. सदरहू जमिन नागपूर जिल्ह्यातील वाकेश्वर भागात येथे आहे. त्या जमिनीवर लेआऊट टाकून भुखंड विक्रीस काढण्यात आले. तक्रारकर्त्याने त्यातील भुखंड क्र. 32 हा रु.2,63,744/- विकत घेण्याचा करार केला. त्या भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ 2421.90 चौ.फु. एवढे आहे. त्यानुसार वि.प. आणि तक्रारकर्त्यामध्ये दि.31.03.2007 करारनामा करण्यात आला. त्याचदिवशी तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ला रु.1,00,000/- ईसार म्हणून दिले. उर्वरित रक्कम रु.1,63,744/- दोन वर्षामध्ये देण्याचे ठरविले. परंतू त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ला पुन्हा रु.30,000/- चा धनादेश दिला होता. वि.प.ने तक्रारकर्त्याला आश्वासन दिले की, तो जमिन अकृषक करण्याचा आदेश आणि नगर रचना विभागाकडून ले-आऊटला मंजूरी आणि विक्रीपत्राकरीता लागणा-या इतर मंजूरी प्राप्त करेल. परंतू त्यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्याला विक्रीपत्र करुन दिलेले नाही किंवा तक्रारकर्त्याने दिलेल्या रकमासुध्दा परत केल्या नाहीत. म्हणून या तक्रारीद्वारे तक्रारकर्त्याची अशी विनंती आहे की, वि.प.ने त्याच्याकडून उर्वरित रक्कम स्विकारुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा त्यांना दिलेली रक्कम व्याजासह परत करावी. तसेच झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च द्यावा.
3. वि.प.क्र. 1 व 2 यांना मंचाने पाठविलेला नोटीस प्राप्त झाल्याचे पोस्टाचे अहवालावरुन दिसून येते. परंतू दोन्ही वि.प.तर्फे कोणीही हजर झाले नाही. सबब हे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्यात आले.
4. तक्रारकर्त्याचे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
4. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्ट्यर्थ अभिलेखावर करारनाम्याची प्रत, लेआऊटचा नकाशा, त्याच्या बँकेचे स्टेटमेंट, कायदेशीर नोटीस आणि जमिनीच्या 7/12 उतारा दाखल केला आहे. करारनामा दोन्ही वि.प.ने करुन दिला आहे. करारनाम्यात असे लिहिले आहे की, तक्रारकर्त्याने मौजा-वाकेश्वर, प.ह.क्र. 74, ख.क्र. 78 मधील भुखंड क्र. 32 हा रु.2,63,744/- मध्ये विकत घेण्याचा करार केला. करारनामा केला त्यादिवशी रु.1,00,000/- वि.प.ला मिळाल्याची स्विकृती करारनाम्यात आले. उर्वरित रक्कम 31.03.2009 पर्यंत किंवा त्यापूर्वी देण्याचे ठरले होते. तसेच या करारनाम्याद्वारे वि.प.ने हे मान्य केले आहे की, ते जमिनीचे अकृषीकरण करण्याचा आदेश, लेआऊटला नगर रचना विभागाकडून मंजूरी प्राप्त करतील आणि जर काही कारणास्तव तसा आदेश किंवा मंजूरी मिळाली नाही तर ते स्विकारलेली रक्कम तक्रारकर्त्याला परत करतील. विक्रीपत्र हे एन.ए.टी.पी. आदेश झाल्यानंतर करण्याचे ठरले होते. तक्रारकर्त्याचे बँक स्टेटमेंटवरुन हे दिसून येते की, त्याने 25.03.2008 ला रु.30,000/- चा धनादेश वि.प.क्र. 1 ला दिला होता आणि तेवढी रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यातून वजा करण्यात आली होती. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने भुखंड क्र. 32 विकत घेण्याकरीता वि.प.क्र. 1 ला एकूण रु.1,30,000/- आगाऊ रक्कम दिल्याचे स्पष्ट होते.
5. दोन्ही वि.प. मंचाची नोटीस मिळूनही हजर न झाल्याने त्यांचेतर्फे या तक्रारीला कुठल्याही प्रकारचे आव्हान देण्यात आलेले नाही. एकाप्रकारे त्यांनी तक्रारीतील मजकूर मान्य केल्यासारखे आहे. सदरहू जमिन वि.प.ने अकृषक केल्यासंबंधी, तसेच लेआऊटला मंजूरी प्राप्त केल्यासंबंधी कुठलाही पुरावा अभिलेखावर नाही. याशिवाय, भुखंडाचे विक्रीपत्र होणे शक्य नाही. जमिनीचा 7/12 उता-यावरुन असे दिसते की, ती जमिन अजून शेत जमिन आहे आणि ती वि.प.क्र. 2 आणि इतर लोकांच्या नावाने आहे, जे वि.प.क्र. 2 च्या कुटूंबातील सदस्य दिसतात. अशा परिस्थितीत असे अपेक्षित नाही की, तक्रारकर्त्याने भुखंडाची पूर्ण रक्कम एकत्र द्यावी आणि वि.प.ने एन.ए.टी.पी. आदेश प्राप्त करण्याची वाट पाहावी. विक्रीपत्र करुन देण्यासाठी वि.प. आवश्यक त्या मंजूरी किंवा कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही जी त्यांच्या सेवेतील कमतरता ठरते. यासंबंधी वि.प.ने काय पावले उचलली आहे हे दाखविण्यासाठी त्यांच्यातर्फे कुठलाही पुरावा नाही. सबब ही तक्रार मंजूर होण्यालायक आहे, म्हणून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1. वि.प.क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी मौजा-वाकेश्वर, प.ह.क्र.74, ख.क्र. 78 या जमिनीचा अकृषक वापराचा आदेश, तसेच त्यावरील ले- आऊटला नगर रचना विभागाकडून आवश्यक ती मंजूर प्राप्त करुन आणि
तक्रारकर्त्याकडून भुखंड क्र. 32 ची उर्वरित रक्कम स्विकारुन त्या भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे व प्रत्यक्ष मोजमाप करुन ताबा द्यावा. जर काही कायदेशीर अडचणीमुळे विक्रीपत्र करणे शक्य होत नसल्यास वि.प.क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे तक्रारकर्त्याला रु.1,30,000/- ही रक्कम दि.25.03.2008 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजाने परत करावी.
2. वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नूकसान भरपाईदाखल रु.15,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.
3. सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 3 महिन्याचे आत करावे.
4. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.