न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे कोरेगांव, ता. जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. तर जाबदार क्र. 1 ते 3 यांचा विमल रियालीटीज प्रमोटर्स अँण्ड बिल्डर्स नावाचा भागीदारी स्वरुपाचा व्यवसाय असून सातारा शहर व परिसरातील खुल्या जागा विकत घेवून त्यावर निवासी, व्यावसायीक संकूले बाधणेचा व त्याची विक्री करणेचा व्यवसाय आहे.
मौजे पिरवाडी ता.जि.सातारा येथील सर्व्हे क्र. 9 अ/17 क्षेत्र हे.00.17 आर व सव्हे नं. 9 अ/18/6/क्षेत्र हे 00.03 आर असे एकूण 20 आर क्षेत्रामध्ये रहिवाशी वगैरे कारणासाठी जाबदार यांनी निवासी संकुले बांधणेचे ठरवून त्यानुसार सक्षम अधिका-यांच्या योग्य त्या परवानगी घेवून त्याठिकाणी ‘विमल होम्स’ नावाचो संकूल बांधणेसाठी व त्याची बांधकाम करुन विक्री करणेची जाहीरात जाबदाराने दिलेली होती. तक्रारदार यांनी त्याप्रमाणे सदर निवासी संकुलातील बि विंग मधील पहिल्या मजल्यावरील बी-6 नावाने ओळखला जाणारा 95.41 चौ. मी. म्हणजे 1027.06 चौ.फूट हा फ्लॅट रहिवासासाठी खरेदी घेणेचे ठरविले व त्यादृष्टीने जाबदारांशी चर्चा करुन सदर फ्लॅटची किंमत रक्कम रु.18,40,000/- (रुपये अठरा लाख चाळीस हजार मात्र) ठरलेली होती व आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने जाबदार यांना दि.20/11/2011 रोजी सदर फ्लॅटचे बुकींगसाठी अनामत म्हणून रक्कम रु.10,000/- दिले असून त्याची पावती जाबदाराने तक्रारदाराला दिली आहे. तसेच त्यावेळी तक्रारदाराने सदर फ्लॅटमध्ये किचन व फ्लॅटमधील चौकटी व दारे संपूर्ण फ्लॅटमध्ये उच्च प्रतीच्या स्लायडिंग खिडक्या ग्रिलसह, किचनमध्ये ग्रेनाईड, तसेच संपूर्ण फ्लॅटमध्ये उच्च प्रतीच्या मार्बोनेट टाईल्स, किचनमध्ये उच्च प्रतीच्या ट्रॉलीज, तसेच बाथरुम व किचन मध्ये उच्च प्रतीचे नळ, प्लंबींग साहित्य, इलेक्ट्रीक साहित्य, शॉवर, हिटर, गिझर, कमोड, वॉश बेसीन, तसेच चागल्या प्रतीचे इलेक्ट्रीक साहित्य, सोलर सिस्टिम, फॅन, टयूब, पी.ओ.पी., संपूर्ण फ्लॅटला लस्टर कलर, वगैरे जादा सुविधा करुन देणेची जाबदाराला तक्रारदाराने विनंती केली होती. त्यावेळी जादा सुविधांसाठी रक्कम रु.12 ते रु.13 लाख जादा अँडव्हान्स द्यावा असे सांगितलेने तक्रारदाराने फ्लॅटची रक्कम रु.18,40,000/- (रुपये अठरा लाख चाळीस हजार मात्र) तसेच जादा सुविधांसाठी 12 ते 13 लाख रुपये जाबदारांकडे जमा केलेस फलॅटचा ताबा लवकरात लवकर देता येईल असे जाबदाराने तक्रारदाराला सांगितले. जाबदारांचे शब्दांवर विश्वास ठेवून तक्रारदाराने ता.20/7/2012 रोजी एकूण रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) जाबदार यांना अदा केली असून त्याची पावती जाबदाराने तक्रारदाराला दिलेली आहे. त्यानंतर जाबदाराने तक्रारदाराबरोबर प्रस्तुत फ्लॅटचे खरेदीबाबत नोंदणीकृत करारनामा (Article of Agreement) केले असून तो दि.21/7/2012 रोजी सातारा येथील सह दुय्यम निबंधक, सातारा यांचेकडे नोंदविला असून तक्रारदाराने सदर कराराचेवेळी फ्लॅटचे खरेदी रकमेपैकी रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) दिलेले आहेत. प्रस्तुत करारपत्रानुसार तक्रारदार यांना जाबदार यांनी सदरचा तक्रारदाराचे मागणीपत्राने सर्व सुविधा व जादा सुविधांसह फ्लॅटचे करारामध्ये ठरलेप्रमाणे फ्लॅटचा ताबा दि.31/12/2012 पर्यंत देणेचे ठरलेले होते व खरेदीपत्र करुन देणेचे ठरलेले होते.
त्यामुळे तक्रारदाराने वर नमूद केलेप्रमाणे फ्लॅटची किंमतीपोटी रक्कम रु.18,40,000/-, व जादा सुविधांपोटी रक्कम रु.11,70,000/- अशी एकूण रक्कम रु.30,10,000/- (रुपये तीस लाख दहा हजार मात्र) जाबदाराला अदा केली आहे. सदर रकमेपैकी जाबदाराने तक्रारदाराला फक्त रकम रुपये 6,50,000/- (रुपये सहा लाख पन्नास हजार मात्र) परत अदा केले आहेत. म्हणजे तक्रारदार यांचे जाबदार यांचेकडून एकूण रक्कम रु.23,60,000/- (रुपये तेवीस लाख साठ हजार मात्र) जमा आहेत असे असतानाही जाबदाराने ता.21/7/2012 चे करारपत्रात ठरलेप्रमाणे तक्रारदार यांना सदर फ्लॅटचे जादा सुविधासह बांधकाम पूर्ण करुन खरेदीपत्रासह दि. 31/12/2012 रोजीपर्यंत ताबा देणे जरुरीचे होते. तथापी, जाबदार यांनी त्याविषयी तक्रारदाराने मागणी करुनही मुदतीमध्ये सदर फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.9/3/2013 व दि.18/3/2013 रोजी जाबदार क्र. 1 यांना रजिस्टर पोष्टाने पत्र पाठविले असून मार्च,2013 अखेर सर्व सुविधांसह फ्लॅटचे बांधकाम करुन ताबा देणेविषयी कळविले होते. सदर पत्रास जाबदाराने दि.22/3/2013 रोजी खोटया मजकूराचे उत्तर दिले. त्याचा खुलासा तक्रारदाराने दि.2/4/2013 व दि.6/4/2012 रोजी करुन एप्रील 2013 अखेरपर्यंत सदर फ्लॅटचा ताबा देणेबाबत विनंती केली होती. परंतू प्रस्तुत पत्रांना जाबदाराने कोणतेही उत्तर दिलेले नाही अगर सदर वादातीत फलॅटचे बांधकाम सर्व सुविधांसह पूर्ण करुन खरेदीपत्रासह ताबा अद्यापपर्यंत तक्रारदाराला दिलेला नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला द्यायचे त्रुटी/कमतरता केलेली आहे. सबब तक्रारदाराने दि.16/6/2014 रोजी जाबदाराला वकीलांमार्फत वादातीत फ्लॅटचे सर्व सुविधांसह खरेदीपत्र करुन देऊन ताबा देणेविषयी नोटीस पाठवली. प्रस्तुत नोटीस जाबदाराने दि.1/7/2014 रोजी खोटया मजकूराचे उत्तर देवून सदर फ्लॅटचे खरेदीपत्र करुन देण्यास व कब्जा देणेस टाळाटाळ केली आहे. तसेच सदर उत्तरी नोटीसमध्ये स्टँम्प डयूटी, रजिस्ट्रेशन, एम.एस.ई.बी., व्हॅट, व सर्व्हीस टॅक्स असे एकूण रक्कम रु. 2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) खर्च केलेबाबत खोटे कथन केले आहे. वास्तविक हा सर्व खर्च तक्रारदाराने केलेला आहे. तर व्हॅट, सर्व्हीस टॅक्स वगैरेची रक्कम खरेदीपत्रात समाविष्ट असून ती भरणेची जबाबदारी जाबदाराची आहे. तसेच जाबदाराने प्रस्तुत नोटीसमध्ये रक्कम रु.6,50,000/- व्यतिरिक्त रक्कम रु.3,00,000/- तक्रारदाराला परत अदा केलेचे खोटे कथन केले आहे. जाबदाराने कोणतीही जादा सुविधा प्रस्तुत फ्लॅटमध्ये दिलेली नाही. तक्रारदाराने जादा सुविधासाठी जाबदाराला एकूण रक्कम रु.11,70,000/- अदा केले होते. पैकी जाबदाराने फक्त रक्कम रु.6,50,000/- तक्रारदाराला परत अदा केले आहेत. मात्र रक्कम रु.5,20,000/- (रुपये पाच लाख वीस हजार मात्र) जादा सुविधांसाठी तक्रारदाराकडून तक्रारदाराला मिळाले असतानाही कोणतीही जादा सुविधा जाबदाराने वादातीत फ्लॅटमध्ये पुरविलेली नाही. सबब प्रस्तुत जादा सुविधांसाठी तक्रारदाराकडून जाबदाराने घेतलेली रक्कम रु.5,20,000/- जाबदारांकडून परत मिळणेसाठी व जादा सुविधा पुरविण्यात केलेल्या सेवात्रुटीसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडे सदर फ्लॅटचे जादा सुविधांसाठी जमा केलेली रक्कम रु.5,20,000/- तक्रारदाराला परत देणेबाबत जाबदाराला आदेश व्हावेत, प्रस्तुत रकमेवर रक्कम जमा तारखेपासून हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज तक्रारदार यांना देणेबाबत जाबदाराला आदेश व्हावेत, तसेच तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- जाबदारांकडून मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत कामी केली आहे.
3. तक्रारदाराने याकामी नि.2,3 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 6 चे कागदयादीसोबत नि. 6/1 ते नि.6/12 कडे अनुक्रमे तक्रारदार व जाबदार यांचेमधील वादातीत फ्लॅटचे करारनाम्याची व्हेरीफाईड प्रत, वादातीत फ्लॅटच्या रकमा जाबदार यांना दिलेबाबतच्या पावत्या, तक्रारदाराने जाबदाराला दिले पत्राची स्थळप्रतची झेरॉक्स तक्रारदाराने जाबदाराला रजिस्टर पोष्टाने पाठवले पत्राची स्थळप्रतीची झेरॉक्स, पोष्टाच्या पोचपावत्या, जाबदाराने तक्रारदार यांना रजि. पोष्टाने पाठवलेल्या दि.18/3/2013 चे पत्राचे उत्तर, तक्रारदाराने जाबदार यांना रजि. पोष्टाने पाठविले पत्राची स्थळप्रतीची झेरॉक्स, पोहोचपावती, तक्रारदाराने जाबदाराला वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, पोहोचपावत्यांच्या झेरॉक्स, जाबदाराने दिले उत्तराची झेरॉक्स, नि.21 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 22 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 25 कडे लेखी युक्तीवाद, वगैरे कागदत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदाराने नि.18 कडे म्हणणे/कैफियत, नि.18/अ कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 23 कडे जाबदारांचे म्हणण्याचे अँफीडेव्हीट हाच जाबदारांचा पुरावा समजणेत यावा अशी जाबदाराची पुरसिस, नि. 24 चे कागदयादीसोबत नि. 24/1 ते नि.24/6 कडे अनुक्रमे तहशिलदार यांनी जाबदाराला दिलेले पत्र, तहशिलदार यांनी जाबदाराला दिलेले पत्र, जाबदाराने तहशिलदार यांना दिलेले पत्र, जाबदार यांनी तहशिलदार, सातारा यांचे पत्र व आदेश, जाबदार यांनी तक्रारदार यांच्या पत्राचे दिलेले उत्तर व त्याची पोहोच पावती, दैनिक लोकमत वर्तमानपत्र, नि. 26 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी म्हणण्यामध्ये पुढीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत.
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही.
ii तक्रारदाराचे कथनानुसार जाबदार यांनी विकसीत केले विमलहोम्स या निवासी संकुलातील बी-विंगमधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका बी-6 ही कराराप्रमाणे व जादा सुविधांप्रमाणे रक्कम रु.30,00,000/- ला घेणयाचे ठरले व त्याप्रमाणे तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.3,10,000/- दिलेले आहेत. रक्कम रु.30,00,000/- चे कराराचे पूर्तीसाठी किंवा करारातील अपूर्तीसाठी तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज क्र. 127/2014 व 128/2014 हे दोन्ही तक्रार अर्ज एकाच करारपत्रावर आधारीत असून केवळ सदरच्या दोन्ही तक्रारी मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल व्हाव्यात या एकमेव दुष्ट हेतूने दोन वेगवेगळे तक्रार अर्ज जाणीवपूर्वक तक्रारदाराने सादर केले आहेत. सदर दोन्ही तक्रार अर्ज व त्यातील मजकूर तसेच करारातील मजकूर पाहता करारातील मिळकत ही तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून रक्कम रु.30 लाख मात्र इतक्या रकमेस खरेदी करण्याचे मान्य व कबूल केले होते व त्यापोटी तक्रारदाराने जाबदाराला रक्कम रु.30 लाख अदा केले आहे. अशा परिस्थितीत ज्या निवासी सदनिकेचा कब्जा तक्रारदार मागत आहेत त्या मे मंचाचे पिक्युनियरी ज्यूरिसडिक्शनच्या बाहेरच्या असलेने प्रस्तुतचे दोन्ही तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र नाहीत ते खर्चासह रद्द करणेत यावेत.
iii तक्रारदाराच्या दोन्ही तक्रारी बेकायदेशीर अनाघिकाराच्या असून जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी व कमतरता केली नाही. तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु.30,10,000/- इतकी रक्कम अदा केली आहे. हा मजकूर खरा व बरोबर आहे. तथापी, याबाबत तक्रारदाराने तक्रार अर्जात घेतलेली हरकत मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने जादा कामासाठी दिले रक्कम रु.11,70,000/- या रकमेतून जादा कामाचा अंदाजीत हिशोब वजा करुन ऊर्वरीत रक्कम परत मागीतली त्यावेळी जाबदाराने तक्रारदार यांना रक्कम रु.6,50,000/- परत अदा केले आहेत.
वास्तविक तक्रारदारास रक्कम रु.9,50,000/- जाबदाराने परत अदा केले आहेत. रक्कम रु.6,00,000/- चेकने व रक्कम रु.50,000/- रोख स्वरुपात दि. 3/8/2012 रोजी रक्कम रु.3,00,000/- अशी एकूण रक्कम रु.9,50,000/- जाबदाराने तक्रारदारांना परत केली आहे व दि. 29/7/2012 चे पावतीची रक्कम परत मिळाली असेही तक्रारदाराने जाबदाराला लिहून दिले आहे. तसेच रक्कम रु.3,00,000/- ची मूळ पावतीही तक्रारदाराने जाबदाराला परत दिली आहे. अशाप्रकारे पैशाचा लोभ सुटल्याने तक्रारदाराने प्रस्तुत रक्कम रु.3,00,000/- परत मिळालेचा उल्लेख जाणीवपूर्वक तक्रार अर्जात दिलेला नाही. म्हणजेच एकंदरीत रक्कम रु.30,10,000/- पैकी रक्कम रु.9,50,000/- वजा जाता जाबदारांकडे रक्कम रु. 20,60,000/- एवढीच रक्कम तक्रारदाराची शिल्लक राहते. त्यापैकी फ्लॅटची किंमत रक्कम रु.18,40,000/- वजा जाता दस्त नोंदणीसाठी खर्च, रजिस्ट्रेशन चार्जेस, एम.एस.ई.बी., व्हॅट, सर्व्हीस टॅक्स अशी एकंदरीत रक्कम रु.2,20,000/- जाबदाराने तक्रारदाराचे ऊर्वरीत रकमेतून खर्च केली आहे. सदर रकमेचा ताळमेळ लागल्याने व जादा कामाची सर्व रक्कम खर्च झालेने तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये कोणतेही जादा काम करायचे नाही असे तक्रारदार व जाबदार यांचे ठरल्याने व जादा कामाची रक्कम तक्रारदाराला परत अदा केल्याने तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये जाबदाराने कोणतेही जादा काम केलेले नाही. तक्रारदाराला सर्व घटनांची माहीती असलेनेच तक्रारदाराने मूळ पावत्या याकामी जोडलेल्या नाहीत.
iv तक्रारदार यांची वादातीत सदनिका ही दि.31/12/2012 रोजीपर्यंत ताबा देणेचा होता याची कल्पना जाबदारांना आहे. परंतू प्रस्तुत सदनिका या मौजे पिरवाडी या भागामध्ये आहेत. तेथे बिल्डरना धमकावून खंडणी उकळणे, केलेले बांधकाम पाडणे, अशी समाज विघातक कृत्ये स्थानिक गुंड दत्ता जाधव व त्यांचे हस्तक यांनी केलेले प्रस्तुत सदनिकेचे बांधकाम पूर्ण करणेस उशिर झाला आहे याची स्पष्ट कल्पना तक्रारदार यांना दिली होती व आहे. तसेच दरम्यानच्या कालावधीत जाबदाराने केलेल्या प्रकल्पस्थळी केलेल्या वाळू साठयावर तहशिलदारने छापा घातलेने वेळेवर वाळू उपलब्ध झाली नसलेने ‘विमल होम्स’ या प्रकल्पातील सदनिकांचे बांधकाम पूर्ण करणेस उशिर झालेला आहे.
तक्रारदाराची कोणतीही जादा कामासाठी दिलेली रक्कम जाबदारांकडे शिल्लक नाही त्यामुळे तक्रार अर्ज बेकायदेशीर असा आहे व तक्रारदार प्रस्तुत रक्कम रु.5,20,000/- मागणेस पात्र नाहीत व प्रस्तुत रकमेवरील व्याजही मिळणेस पात्र नाहीत तसेच मानसिक त्रास व अर्जाचा खर्चही मिळणेस पात्र नाहीत. तसेच जाणीवपूर्वक दोन तक्रार अर्ज दाखल केले आहेत. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द होणेस पात्र आहे. अशा स्वरुपाची कैफीयत जाबदाराने याकामी दाखल केली आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. तक्रारदाराचा प्रस्तुत तक्रार अर्ज या मे मंचाचे आर्थिक
अधिकारक्षेत्रात येतो काय? होय.
3. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांनी विकसीत केलेल्या ‘विमल होम्स’ या निवासी संकुलातील बी विंगमधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका बी-6 ही करारात ठरलेप्रमाणे रक्कम रु.18,40,000/- (रक्कम रुपये अठरा लाख चाळीस हजार मात्र) या किंमतीस खरेदी घेणेचे ठरवून तसे खरेदीकरारपत्र तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान दि.21/7/2012 रोजी झाले आहे. सदर करारपत्र व्हेरीफाईड प्रत नि.6/1 कडे दाखल आहे. तसेच करारपत्राप्रमाणे सर्व रक्कम तक्रारदाराने जाबदाराला अदा केली आहे. सदरची बाब जाबदारानेही मान्य व कबूल केली आहे. सबब तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान ग्राहक व सेवापुरवठादार हे नाते आहे ही बाब निर्विवाद सत्य आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने सादर केले तक्रार अर्जातील विनंती कलमामध्ये तक्रारदाराने जाबदारांकडून रक्कम रु.5,20,000/- जादा सुविधांची तक्रारदाराने जाबदारांकडे जमा केलेली रक्कम वसूल होऊन मिळावी, प्रस्तुत रकमेवर 18 टक्के व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- जाबदारांकडून मिळावेत तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- जाबदारांकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केलेली आहे. प्रस्तुत कामी जाबदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज हा मे मंचाचे आर्थिक अधिकारक्षेत्रात येत नाही त्यामुळे रद्द होणेस पात्र आहे असा आक्षेप नोंदविला आहे.
प्रस्तुत तक्रारदाराने तक्रार अर्जाचे विनंती कलमामध्ये जाबदारांकडून जादा सुविधांसाठी तक्रारदाराने जमा केलेली रक्कम रु.5,20,000/- परत मिळावेत सदर रकमेवर 18 टक्के व्याज मिळावे व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- वसूल होवून मिळावेत अशी विनंती केली आहे. त्यामुळे सदरची मागणी ही रक्कम रु.20,00,000/- चे आतील असलेने याकामी मे मंचाचे आर्थिक अधिकारकक्षेत सदर तक्रार अर्ज असलेचे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदाराने जाबदार यांना वादातीत फ्लॅटमध्ये तक्रारदाराला हव्या तशा जादा सुविधास पुरविणेसाठी रक्कम रु.11,70,000/- (रुपये अकरा लाख सत्तर हजार मात्र) अदा केले होते. प्रस्तुत रकमेपैकी रक्कम रु.6,50,000/- (रुपये सहा लाख पन्नास हजार मात्र) जाबदाराने तक्रारदाराला परत अदा केली आहे. म्हणजे रक्कम रु.5,20,000/- (रुपये पाच लाख वीस हजार मात्र) जाबदाराकडे शिल्लक आहे. जाबदाराने रक्कम शिल्लक असतानाही तक्रारदाराचे वादातीत फ्लॅटमध्ये तक्रारदाराने जाबदाराला सांगितलेप्रमाणे व उभयतांमध्ये ठरलेप्रमाणे कोणतीही जादा सुविधा तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पुरविलेली नाही. उलट तक्रारदाराकडून मिळालेली जादा सुविधासाठीची रक्कम बेकायदेशीपणे बिनव्याजी जाबदार वापरत आहेत व प्रस्तुत रक्कम तक्रारदाराने परत मागणी केली असता ती देणेस टाळाटाळ करुन नकार देत आहेत. तसेच दि.21/7/2012 रोजीचे करारपत्रानुसार सदर जाबदाराने तक्रारदाराला वादातीत फ्लॅटचे जादा सुविधांसह बांधकाम पूर्ण करुन खरेदीपत्रासह तारीख 31/12/2012 रोजीपर्यंत ताबा देणे जरुरीचे होते. तथापी, तक्रारदाराने जाबदाराला वारंवार विनंती करुनही जाबदाराने वर नमूद कोणतीही पूर्तता केली नाही म्हणून तक्रारदाराने दि.9/3/2013 व दि. 18/3/2013 रोजी जाबदार क्र. 1 ला रजिस्टर पोष्टाने पत्र पाठविले व सदर जाबदाराने प्रस्तुत वादातीत फ्लॅटचे काम पूर्ण करुन ताबा देणेबाबत कळविले होते. परंतू जाबदाराने सदर पत्रास खोटे उत्तर देऊन दि.22/3/2013 रोजी प्रस्तुत बाब नाकारली. त्यानंतरही तक्रारदाराने दि.2/4/2013 व दि.6/4/2013 रोजी जाबदाराला रजि. पोष्टाने पत्र पाठवून एप्रील,2013 पर्यंत फ्लॅटचा ताबा देणेबाबत जाबदाराला कळविले. परंतू प्रस्तुत पत्रांना जाबदाराने कोणतेही उत्तर दिले नाही व नमूद फ्लॅटचा ताबाही तक्रारदाराला दिलेला नाही. तसेच कोणतीही जादा सुविधा तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पुरविली नाही. प्रस्तुत बाब नि. 6 चे कागदयादीसोबत दाखल नि.6/1 ते नि. 6/12 कडे दाखल केले कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तसेच जाबदाराने ताबा दिला नसलेची बाब व कोणत्याही जादा सुविधा तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये पुरविलेचे नसलेची बाब, तसेच रजिस्ट्रेशन चार्जेस, एम.एस.ई.बी. चार्जेस, व्हॅट, सर्व्हीस टॅक्सची रक्कम रु.2,20,000/- जाबदाराने तक्रारदाराचे शिल्लक पैशातून केली आहे असे जाबदाराने म्हटले आहे. परंतू करार पत्रातील अटी व शर्थीप्रमाणे प्रस्तुतच्या रकमा म्हणजेच रजिस्ट्रेशन चार्जेस, एम.एस.ई.बी. चार्जेस, सर्व्हीस टॅक्स, व्हॅट वगैरे सर्व रक्कम जाबदार यांनीच भरणेची होती असे करारपत्र नि.6/1 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे सदरची रक्कम ही तक्रारदाराचे रकमेतून खर्च करणे किंवा तक्रारदार यांचेवर लादणे न्यायोचीत होणार नाही. परंतू जाबदाराने बेकायदेशीरपणे तक्रारदाराची जादा सुविधासाठीची ऊर्वरीत रक्कम रु.5,20,000/- तक्रारदार यांना परत अदा न केलेने तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी व कमतरता केली असून जाबदाराने रक्कम रु.6,50,000/- व्यतिरिक्त रक्कम रु.3,00,000/- तक्रारदाराला परत केलेचे कागदोपत्री पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. सबब रक्कम रु.5,20,000/- जाबदाराने तक्रारदाराला अदा करणे गरजेचे व न्यायोचीत होणार आहे. सबब जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे निर्विवाद स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
9. वर नमूद केले मुद्दयांचे विवेचनावरुन तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद या सर्वांचा ऊहापोह करता, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज हा जाबदाराने जादा सुविधा वादातीत फ्लॅटमध्ये देणेसाठीची रक्कम तक्रारदारकडून स्विकारुनही तक्रारदाराचे फ्लॅटमध्ये कोणतीही जादा सुविधा पुरविली नाही व त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत रकमेची मागणी जाबदारांकडे केली असता जाबदाराने प्रस्तुत रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही. तक्रारदाराने पाठविले पत्रांना व नोटीसला खोटीनाटी उत्तरे देऊन टाळाटाळ केली आहे म्हणून जाबदाराने दिले सेवात्रुटीसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे. दोन्ही तक्रार अर्जातील मागणी विनंती ही वेगवेगळी आहे हे स्पष्ट होते. तसेच सदरची रक्कम रु.5,20,000/- जाबदारकडून वसूल होऊन मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे मंचात दाखल करणेस तक्रारदार पात्र आहेत असे या न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
10. सबब याकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांची जादा सुविधांसाठी जाबदारांकडे जमा/शिल्लक असलेली रक्कम रु.5,20,000/- (रुपये पाच लाख वीस हजार मात्र) तक्रारदाराला परत अदा करावेत.
3. प्रस्तुत रक्कम रु.5,20,000/- (रुपये पाच लाख वीस हजार मात्र) यावर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज जाबदाराने तक्रारदाराला अदा करावे.
4. जाबदाराने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) अदा करावेत.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदाराने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत करावी.
6. विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता जाबदाराने न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 12-04-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा