तक्रारदार स्वत:
जाबदेणार क्र 1 एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 25/जून/2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार बार्कले इन्व्हेस्टमेंट आणि लोन इंडिया लि. - फायनान्स कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे काळेपडळ, हडपसर येथील रहिवासी असून त्यांना पैशाची गरज असल्यामुळे जाबदेणार यांच्याकडून डिसेंबर 2008 मध्ये त्यांनी कर्ज घेतले. त्यांच्या कथनानुसार त्यांनी रुपये 1,02,885/- कर्ज घेतले. परंतू प्रत्यक्षात त्यांना रुपये 85,277/- कर्ज मिळाले. त्यापैकी रक्कम रुपये 10,000/- त्यांनी एका कर्मचा-यास कमिशन म्हणून दिले. त्याचे नाव, पत्ता त्यांनी तक्रारीत नमूद केलेले नाही. तक्रारदार यांनी सन 2008 ते 2009 या कालावधीत विठ्ठल पंपाची उधारी देण्याकरिता दिनांक 20/9/2009 व दिनांक 23/9/2009 रोजी रुपये 20,000/- व रुपये 10,000/- देण्याकरिता क्रेडिट कार्डाचा उपयोग केला होता. त्यावेळी त्यांच्या खात्यावर रुपये 31,247/- म्हणजे रुपये 1247/- जादा नावे टाकले. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत जाबदेणार यांनी दिलेली कागदपत्रे, त्याचप्रमाणे आय.सी.आय.सी.आय बँकेतील खात्याचा उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार त्यांना मानसिक त्रास झाल्यामुळे व जाबदेणार यांनी जादा रक्कम वसूल केल्यामुळे त्यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन रक्कम रुपये 45,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- त्याचप्रमाणे तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 5,000/- मागितले आहेत.
2. या प्रकरणात जाबदेणार क्र 1 यांना नोटीस बजावली परंतू ते हजर झाले नाहीत. तक्रारदार यांच्या विनंतीनुसार जाबदेणार क्र 2 व 3 यांना या प्रकरणातून वगळण्यात आले आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीतील कथनांच्या पुष्टयर्थ्य प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी दिलेली कागदपत्रे व आय.सी.आय.सी.आय बँकेची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या तक्रारीतील कथने व दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोघम स्वरुपाची विधाने केलेली आहेत. तक्रारदार यांनी निश्चितपणे किती कर्ज घेतले होते, त्यावर व्याजदर काय होता, त्याचप्रमाणे इतर अटी व शर्ती काय होत्या यांचा उल्लेख तक्रारदारांनी केलेला नाही. तक्रारदार यांनी क्रेडिट कार्ड वापरुन देणी दिलेली आहेत. त्यासाठी जाबदेणार यांनी त्यावर व्याजाची आकारणी केलेली आहे असे दिसून येते. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून जादा रक्कम वसूल केलेली आहे. परंतू तक्रारदार यांनी निश्चितपणे किती रक्कम वापरली, त्यावर व्याजदर काय होता याचा स्पष्ट उल्लेख तक्रारीत केलेला नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांना निश्चित किती रक्क्म भरावी लागली याचा उल्लेख तक्रारीमध्ये नाही. तक्रारीत लिहीलेली कथने अत्यंत मोघम स्वरुपाची आहेत. त्याविषयी ठोस पुरावा दाखल केलेला नाही. जाबदेणार यांनी सेवा देतांना त्रुटी केल्या यासंबंधी तक्रारदारांनी पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रार फेटाळण्यास पात्र आहे.
वर उल्लेख केलेल्या कथनांनुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार फेटाळण्यात येत आहे.
2. दोन्ही पक्षकारांना आपआपला खर्च सोसावयाचा आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी मा. मंचाच्या सदस्यांसाठी दाखल केलेले संच
आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत परत न्यावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 25 जून 2013