सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 120/2014
तक्रार दाखल दि.14-05-2014.
तक्रार निकाली दि.20-08-2015.
श्री. महेश शंकरसा झाड,
रा. 467/7 अ/1/46,प्लॉट नं. 32,
कल्पक रेसिडेन्सी, फ्लॅट नं. एफ-5,
सदर बझार, सातारा – 411 101. .... तक्रारदार.
विरुध्द
1. मे.वास्तुश्री डेव्हलपर्स,
पत्ता- 467/7 अ/1/46,प्लॉट नं. 32,
कल्पक रेसिडेन्सी, फ्लॅट नं. एफ-5,
सदर बझार, सातारा
तर्फे भागीदार
2. सुर्याजी बाळकृष्ण पाटील,
रा. 467/7 अ/1/46,प्लॉट नं. 32,
कल्पक रेसिडेन्सी, फ्लॅट नं. एफ-5,
सदर बझार, सातारा.
3. बाजीराव काळकृष्ण येसुगडे,
रा.137, यादोगोपाळ पेठ,सातारा
4. शुभंकर तुकाराम नरसे,
रा. दशरथ निवास, हॉटेल त्रिवेणी शेजारी,
कोटकुवा रोड, मालाड पूर्व, मुंबई – 97. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.एस.एच.शेख.
जाबदारातर्फे – अँड.के.एम.पिसाळ.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
जाबदाराने सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील पेठ सदर बझार येथील सि.स.नं.467/7अ/1/46, प्लॉट नं.32 याचे क्षेत्र 275.00 चौ.मी. ही मिळकत विकसीत करुन सदर मिळकतीत एकूण 5 सदनिका असलेली ‘कल्पक रेसिडेन्सी’ ही इमारत बांधली आहे. या इमारतीचा प्लॅन सातारा नगरपरिषदेने मंजूर केला असून तक्रारदार हे या कल्पक रेसिडेन्सी या इमारतीतील सदनिकाधारक आहेत. जाबदाराने सदर मिळकतीतील स्टील्ट फ्लोअर व फर्स्ट फ्लोअरवरील फ्लॅट नं. एफ-5 त्याचे क्षेत्र 107.95 चौ. मी. मॅझनीन एरिया 29.75 चौ.मी., गार्डन क्षेत्र 32.87 चौ.मी. व कव्हर्ड पार्कींग 57.52 चौ.मी. ही मिळकत दि.10/12/2008 रोजी रजिस्टर्ड साठेखत दस्त क्रमांक 6378/2008 ने दुय्यम निबंधक,सातारा यांच्यासमोर विक्री करण्याचे मान्य व कबूल केले आहे. प्रस्तुत साठेखतात नमूद केलेप्रमाणे प्रस्तुत मिळकत रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) या किंमतीस विक्री करण्याचे मान्य व कबूल केले आहे. सदरची रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) तक्रारदाराने जाबदार यांना चेकने व रोख वेळोवेळी अदा केली आहे. त्यानंतर जाबदाराने तक्रारदाराला जानेवारी 2011 मध्ये प्रस्तुत फ्लॅटचा ताबाही दिलेला आहे. प्रस्तुत ताबा देताना सदर फ्लॅटचे काही बांधकाम अपूर्ण ठेवले होते. अशाप्रकारे तक्रारदार यांनी जाबदारांकडून खरेदी केले निवासी सदनिकेचा मालक या नात्याने तक्रारदार उपभोग घेत आहेत. व नगरपालीका घरपट्टी, वीजबील, व पाणीबील तक्रारदार भरत आहेत. सदर इमारत बांधताना जाबदाराने दुर्लक्ष केलेमुळे सदर इमारतीच्या बांधकामाबाबत व सोयीसुविधांबाबत काही त्रुटी राहीलेल्या आहेत, तसेच काही कामे अद्याप अपूरी आहेत तसेच जाबदाराने मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम केलेले नाही. व जाबदाराने तक्रारदाराला अद्यापपर्यंत सदनिकेचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. ही सर्व जबाबदारी जाबदारांची असतानाही जाबदाराने इमारतीच्या बांधाकामात त्रुटी व उणीवा ठेवलेल्या आहेत. ती अर्धवट ठेवलेली कामे पुढीलप्रमाणे,-
i. पार्कींगच्या टाईल्स, गार्डनचे पोडियम, टेरेस वॉटर प्रुफींग, किचन वॉटर गॅलरी वगैरे कामे केलेली नाहीत. तक्रारदाराचे घराचे स्लॅबला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे भितींना व स्लॅबला आतून बाहेरुन ओल येते, टेरेसला योग्य व दर्जेदार वॉटर प्रुफींग करणेची गरज आहे.
ii. तक्रारदार यांचेकडून दि.10/12/2008 रोजी दस्त क्रमांक 6378/2008 ने रजिस्टर्ड साठेखत करुन खरेदीपत्राची फी घेवूनही खरेदीपत्र करुन दिलेली नाही.
iii. सदनिकाधारकाला सोसायटी स्थापक करुन देणे व सभासद म्हणून जमा केली रक्कम तक्रारदाराचे ताब्यात देणे अशाप्रकारे वर नमूद त्रुटी जाबदाराने ठेवलेल्या असून तक्रारदाराला मोठया प्रमाणात मानसिकत्रास सहन करावा लागत आहे. प्रस्तुत तक्रारदाराने खरेदी केले सदनिकेची सर्व पूर्तता झालेनंतर त्याचे खरेदीपत्र करुन देण्याची जबाबदारी जाबदार यांचेवर असतानाही जाबदाराने खरेदीपत्र करुन दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे नावाची सदर मिळकतीचे सिटी सर्व्हे रेकॉर्डवरती नोंद झालेली नाही. त्यामुळे तक्रारदारास वारस नोंदी, खरेदी-विक्री, तारण गहाण खत, वगैरे काहीच करता येत नाही व अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सबब जाबदार यांचेकडून सदर सदनिकेची उर्वरीत कामे करुन मिळावीत, जाबदाराने प्रस्तुत सदनिकेचे खरेदीपत्र तक्रारदाराला करुन द्यावे, सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करुन द्यावी यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/6 कडे अनुक्रमे रजिस्टर्ड साठेखत दस्ताची नक्कल, तक्रारदाराने जाबदाराला पाठविले नोटीसीची स्थळप्रत, जाबदाराना नोटीस मिळाल्याच्या पोहोचपावत्या, मिळकतीचे मालमत्तापत्रक, तक्रारदाराचे नावचे लाईट बील, नगरपालीका कराची पावती, नि. 13 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 14 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 14 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 15 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहेत.
3. जाबदाराने प्रस्तुत कामी नि. 8 कडे म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांचे कैफीयत तक्रार अर्जावर पुढील आक्षेप नोंदवलेले आहेत. तक्रारदाराचा अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. जाबदाराने दि. 10/12/2008 रोजी तक्रारदाराला नोंदणीकृत साठेखत करुन दिले आहे. प्रस्तुत साठेखतातील अटी उभयपक्षकारांना बंधनकारक आहेत. तक्रारदाराचे सांगण्यावरुनच प्रस्तुत सदनिकेमध्ये अंतर्गत सजावट करणेत आली. परंतु त्याचा असणारा वेगळा खर्च देण्याचे तक्रारदाराने मान्य केले होते. परंतू जाबदाराने तक्रारदारबरोबर असले चांगले संबंधांमुळे सदनिकेचा ताबा तक्रारदाराला दिला व अंतर्गत सजावटीसाठी झाले जादा खर्चाचे बील तक्रारदाराला दिलेनंतर तक्रारदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू तक्रारदाराने प्रस्तुत बीलाची रक्कम अद्यापपर्यंत जाबदारांना अदा केलेली नाही. सदर सदनिकेची घरपट्टी व पाणीपट्टी जाबदार भरत आहेत. तसेच तक्रार अर्जात नमूद पार्कींग टाईल्स, गार्डनचे पोडियम, किचनमध्ये वॉशिंग गॅलरीही कामे जाबदाराने करुन देण्याचे ठरलेले नव्हते व नाही. उलटपक्षी जाबदाराने स्वखर्चाने पार्कींगला सिमेंट क्रॉंकीटचा थर दिलेला आहे. गार्डन पोडियम, किचन वॉशिंग गॅलरीचा खर्च तक्रारदारास द्यावा लागेल असे जाबदाराने सांगीतल्यावर तक्रारदाराने जाबदार यांचेबरोबर वादावादी करुन सदर तक्रार दाखल केली आहे. तसेच टेरेसवर जाबदार यांनी दर्जेदार वॉटर प्रुफींग केले आहे. तक्रारदाराने सदर तक्रार लबाडीची व खोटी दाखल केली आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले कागदपत्रांवरुन तसेच पुराव्याचे शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने जाबदार यांचे कडून सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील पेठ सदरबझार सि.स.नं. 467/7अ/1/46 प्लॉट नं.32 याचे एकूण क्षेत्र 275.00 चौ.मी. ही मिळकत विकसीत करुन सदर मिळकतीवर जाबदाराने बांधलेल्या ‘कल्पक रेसिडेन्सी’ या इमारतीमधील स्टील्ट फ्लोअर व फर्स्ट फ्लोअरवरील फ्लॅट नं एफ-5 क्षेत्र 107.95 चौ.मी. मॅझनीन एरिया 29.75 चौ.मी. गार्डन क्षेत्र,32.87 चौ.मी. कव्हर्ड पार्कींग, 57.52 चौ.मी. ही मिळकत दि.10/12/2008 रोजी रजिस्टर्ड साठेखत करुन दिले आहे व तक्रारदाराने जाबदाराला सदर सदनिका खरेदीपोटी रक्कम अदा केली आहे. म्हणजेच तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्विवाद सिध्द होते. तसेच प्रस्तुत जाबदाराला तक्रारदाराने पाठवलेली नोटीस नि. 5/2 कडे दाखल केलेप्रमाणे नोटीस दाखल केली आहे. प्रस्तुत नोटीस जाबदाराना मिळालेल्या पोहोचपावत्या, नि. 5/3 कडे दाखल आहेत. प्रस्तुत तक्रारदाराची नोटीस जाबदार यांना मिळूनही जाबदाराने प्रस्तुत नोटीसला उत्तरी नोटीस दिलेली नाही असे दिसते. कारण जाबदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा या मे. मंचात दाखल केलेला नाही. तसेच प्रस्तुत कामी लाईट बील व घरपट्टी तक्रारदार स्वतः भरतो हे त्याने नि.5/5 व 5/6 कडे दाखल केले पावतीवरुन सिध्द होते. जाबदाराने तक्रारदाराला दि.21/12/2011 रोजी क्रमांक 7084 ने प्रस्तुत अपार्टमेंटचे घोषणापत्र करुन दिले आहे. तरी सिटी सर्व्हे रेकॉर्डसदरी घोषणापत्राची नोंदही झाली आहे. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि. 8 कडे दाखल केले म्हणणे/कैफियतवर जाबदार यांची सही नाही. तसेच विधीज्ञांचीही सही नाही. त्याचप्रमाणे तर्फे विधिज्ञांचीही सही नाही. तसेच म्हणण्यास व्हेरिफिकेशन नाही. सहीच नसल्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी दाखल केलेले म्हणणे याकामी पुराव्यात वाचता येणार नाही. सबब तक्रारदाराने याकामी दाखल केलेले तक्रार अर्जातील, पुराव्याचे शपथपत्र व युक्तीवादातील केलेली कथने योग्य आहेत असे गृहीत धरणे न्यायोचित होईल. तसेच तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीसलाही जाबदाराने नोटीस मिळूनही कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब जाबदाराने तक्रारदाराचे अर्जात कथन केलेली सेवात्रुटी तक्रारदार यांना दिलेली आहे असे म्हणणे न्यायोचीत होईल. तरीसुध्दा प्रस्तुत तक्रारदार यांनी तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे गार्डनचे पोडियम व किचनमध्ये वॉशिंग गॅलरी ही कामे जाबदाराने करण्याचे करारपत्रात नमूद नसलेने, ती कामे जाबदाराने करुन दिली नाही म्हणून सेवात्रुटी केली असे म्हणता येणार नाही. परंतू टेरेसवरील वॉटर प्रुफींग जाबदाराने करारपत्राप्रमाणे करुन देणेचे होते व ते योग्य दर्जाचे करुन देणे ही जाबदाराची जबाबदारी असलेने प्रस्तुत बाबतीत जाबदाराने सेवात्रुटी केली आहे. तसेच बांधकाम पूर्ण होऊनही तसेच तक्रारदाराने करारात ठरलेप्रमाणे रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) जाबदारांना अदा केली असूनही जाबदाराने खरेदीपत्र करुन न देणे ही सेवात्रुटीच आहे. तक्रारदाराने रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) जाबदाराला अदा केलेचे तक्रारदाराने नि. 5/2 कडे दाखल जाबदाराला पाठवणे नोटीसमध्ये नमूद आहे. परंतू सदर नोटीस जाबदाराला मिळूनही (पोहोच पावत्या नि. 5/3 कडे) जाबदाराने सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिलेले नाही. म्हणेच जाबदाराला प्रस्तुत नोटीसमधील मजकूर मान्य आहे असे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराने रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) जाबदार यांना वादादीत सदनिकेच्या खरेदीसाठी अदा केली असूनही जाबदाराने प्रस्तुत सदनिकेचे खुषखरेदीपत्र तक्रारदाराला अद्यापपर्यंत करुन दिले नाही ही सेवात्रुटीच आहे. तक्रारदाराने रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) जाबदाराला अदा केलेचे तक्रारदाराने नि.5/2 कडे दाखल केले आहे व जाबदाराला पाठविले नोटीसमध्येही तसे नमूद केले आहे. परंतू सदर नोटीस जाबदाराला मिळूनही (पोहोचपावती नि. 5/3 कडे) जाबदाराने सदर नोटीसला उत्तर दिलेले नाही. म्हणजेच जाबदाराला प्रस्तुत नोटीसमधील मजकूर मान्य आहे असे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराने रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) जाबदार यांना वादादीत सदनिकेच्या खरेदीपोटी अदा केली असूनही जाबदाराने प्रस्तुत सदनिकेचे खूषखरेदीपत्र तक्रारदाराला अद्यापपर्यंत करुन दिले नाही ही सेवात्रुटीच आहे. जाबदाराने तक्रारदाराचे सदनिकेमध्ये अंतर्गत सजावटीचे केले कामाबद्दल कोणताही पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. सबब सदर बाब विचारात घेता येणार नाही. सबब तक्रारदार यांना खुषखरेदीपत्र करुन न दिलेने, तसेच सोसायटी स्थापन करुन न दिलेने, जाबदार यांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदार यांना सदनिकेचे टेरेसवरील वॉटर प्रुफींग करुन देणे व सर्व सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करुन देणे व प्रस्तुत सदनिकेचे खूषखरेदीपत्र तक्रारदार यांना जाबदाराने विनाविलंब करुन देणे न्यायोचित होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
9. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना टेरेसवरील वॉटर प्रुफींग करुन द्यावे.
3. जाबदाराने तक्रारदाराला सर्व सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करुन द्यावी.
4. प्रस्तुत तक्रार अर्जात नमूद सदनिकेचे खुषखरेदीपत्र तक्रारदाराला जाबदाराने
तात्काळ/विनाविलंब करुन द्यावे.
5. तक्रारदाराला झाले मानसीक व शारिरीक त्रासासाठी जाबदाराने रक्कम
रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) तक्रारदाराला द्यावेत.
6. अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
7. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत
करावे.
8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
9. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
10. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 20-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.