(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून रक्कम रु.1,00,000/- मिळावेत व त्यावर दि.03/10/09 पासून सदरची रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज द्यावे, मानसिक,आर्थिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. या कामी सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.24 लगत इग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.25 लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे तसेच पान क्र.26 लगत इग्रजी भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र व पान क्र.27 लगत मराठी भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.31 लगत लेखी म्हणणे सादर केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय 2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-होय. सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे. 3. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत. 4. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय. अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत. 5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 यांचे विरुध्द नामंजूर करण्यात येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.33 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे व सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.35 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला क्र.2 हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. अर्जदार यांचे पती दत्तात्रय कचरु काळे हे सामनेवाला क्र.2 चे खातेदार सभासद होते व सामनेवाला क्र.2 यांनी खातेदार व सभासदांचा एकत्रीतरित्या अपघाती विमा सामनेवाला क्र.1 यांचेकडे उतरविलेला होता ही बाब सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये स्पष्टपणे नाकारलेली नाही. याउलट सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे कलम 2(9) नुसार सामनेवाला क्र.1 यांनी विमा पॉलिसी मान्य केलेली आहे. अर्जदार यांचे पती दत्तात्रय कचरु काळे हे सामनेवाला क्र.2 चे सभासद होते व सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे सभासदांचा एकत्रीत अपघाती विमा उतरविलेला होता ही बाब सामनेवाला क्र.2 यांनी मान्य केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सभासदांचेकरीता सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत विमा पॉलिसी घेतलेली आहे. विमा पॉलिसीची रक्कम देण्याची संपुर्ण जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांचेवर आहे. विमा पॉलिसीचा व त्यामधील जबाबदारीचा सामनेवाला क्र.2 यांचा कोणताही संबंध नाही. यामुळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अपघाताची घटना ही दि.03/10/2009 रोजी घडलेली आहे, परंतु त्यांनी सदरची माहिती दि.16/02/2010 रोजी कळवली आहे. सदर क्लेममध्ये घटनेची माहिती देण्यास जवळपास 137 दिवस उशीर झालेला आहे. त्यामुळे विमापॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. सामनेवाला यांनी संपुर्ण ते सहकार्य व सेवा दिलेली आहे. सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे. या कामी सामनेवाला यांनी पान क्र.30 लगत विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत. त्यामधील अट क्र.9 मध्ये “30 दिवसांचे आत जरी क्लेम दाखल झाला नाही तरीसुध्दा काही विशिष्ट कारणामुळे उशिरा क्लेम दाखल केल्यास सुमारे 1 वर्षापर्यंत कागदपत्र दाखल करुन घेण्यात यावेत.”असा उल्लेख आहे. अर्जदार या विधवा अशिक्षीत व अडाणी, घरकाम करणा-या स्त्री आहेत. निश्चीतपणे अर्जदार यांना विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीमधील कोणतीही माहिती असणार नाही. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती सामनेवाला क्र.2 यांनाच माहिती असणार आहेत. याचा विचार होता अर्जदार यांनी क्लेम फॉर्म व कागदपत्रांची पुर्तता करण्यास मुद्दाम किंवा जाणीवपुर्वक कोणताही उशीर केलेला नाही असे दिसून येत आहे. अर्जदार यांचेकडून कोणत्याही महत्वाच्या अटीचा भंग झालेला नाही (Fundamental breach). विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीमधील अट क्र.9 प्रमाणे सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम मंजूर करणे गरजेचे होते. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सभासदाकरीता वैयक्तीक एक लाख रुपयांकरीता विमा जोखीम घेतलेली आहे ही बाब सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 9(2) मध्ये मान्य केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांना सामनेवाला क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची एक लाख रुपये इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे. अर्जदार यांनी दि.03/10/2009 पासून 18% दराने व्याज मिळावे अशी मागणी केलेली आहे. परंतु अर्जदार यांनी उशीरा क्लेम दाखल केलेला आहे, यामुळे अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून मंजूर रक्कम रुपये एक लाख या रकमेवरती आर्थीक नुकसान भरपाई म्हणून तक्रार अर्ज दाखल तारीख दि.21/07/2011 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.1 यांचेकडून विमाक्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.7500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. या कामी अर्जदार यांनी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र सादर केलेले आहे. 1(2009) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 147. नॅशनल इन्शुरन्स कं.लि. विरुध्द आशा जामदार प्रसाद वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे यामुळे वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार यांकामी घेतलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, सामनेवाला क्र.1 यांचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व वर उल्लेख केलेले व आधार घेतलेले वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श 1)अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. 2)अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 3)आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः 3(अ) विमाक्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दयावेत व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रुपये एक लाख या रकमेवरती दि.21/7/2011 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याज दयावे. 3(ब) मानसिक त्रासापोटी रु.7500/- दयावेत. 3(क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- दयावेत. |