( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 01 नोव्हेबर, 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्यांचे घरी गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा केलेला आहे. त्यांचा एकंदरीत विजेचा वापर हा कमी आहे. त्यांचेकडे “ श्री राम सामाजिक शैक्षणीक संस्था ” स्थापन केल्यानंतर त्याकरिता तिस-या माळयावरील दोन खोल्या संस्थेचा कारभार चालविण्याकरिता दिल्या. तेथे एकुण चार संगणक आहे व ते बंद आहेत. तक्रारदाराने दिनांक 22/8/2008 रोजी गैरअर्जदाराकडे अर्ज करुन सदरील खोल्या विजेच्या उपयोगाबाबत व्यावसाईक दराचे मिटर लावावे यासाठी अर्ज केला. स्वतः प्रत्यक्षात भेट घेतली मात्र गैरअर्जदारातर्फे अशी सेवा पुरविण्यात आली नाही व देयकाचे रुपांतर सुध्दा वेगवेगळे करण्यात आले नाही. मात्र गैरअर्जदाराकडुन आता 24,222/- व रक्कमेची मागणी देयकापोटी धाड टाकुन करण्यात आली ती चुकीची आहे असे त्यांचे म्हणणे आहे म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल केली व ती द्वारे गैरअर्जदाराने दोन खोल्यांकरिता व्यावसाईक मिटर लावुन मिळावे म्हणुन अर्ज दिला जो मंजूर करुन तशी सेवा पुरवावी आणि चुकीची व खोटी देयकांची मागणी त्यांना करण्यात येऊ नये. तक्रार खर्चापोटी रुपये 20,000/- मिळावे अशी मागणी केली.
यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार आपले जवाबात नमुद करतात की, तक्रारदाराचे 3-या माळयावरील 2 खोल्या संस्थेच्या कार्याकरिता दिल्या यासंबंधी माहिती नाही असा उजर घेतला. सन 2007 पासुन तक्रारदार हा अनाधिकृतपणे विजेचा वापर करतो आहे यासंबंधी भरारी पथकाने तपासणी केली आणि 22/8/2008 रोजी तक्रारदाराने व्यावसाईक मिटरकरिता अर्ज केला होता. मात्र त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना व्यावसाईक मिटर दिले नाही. दिनांक 9/6/2011 रोजी पुन्हा तक्रारदारावर कारवाई करण्यात आली व रुपये 24,222/-ची डिमांड देण्यात आली. हया कारवाईची पुर्तता केली आहे. तक्रारदाराची तक्रार चुकीची व गैरकायदेशीर आहे म्हणुन खारीज करावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 8 कागदपत्रे दाखल केलीत. उभयपक्षकारांचा युक्तिवाद ऐकला.
-: का र ण मि मां सा :-
यातील तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 22/8/2008 रोजी व्यावसाईक मिटर त्वरीत लावण्यासंबंधी मागणी अर्ज केला ही बाब गैरअर्जदाराने मान्य केलेली आहे. मात्र शेवट पर्यत त्यांनी व्यावसाईक मिटर लावुन दिले नाही ही बाब स्पष्ट आहे. दिनांक 22/8/2008 चे अर्जास कोणतेही उत्तर कधीही दिले नाही. गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांना जर काही दस्तऐवजाची गरज होती तर त्यासंबंधी मागणी करणे त्यांचे प्राथमिक कर्तव्य होते. परंतु त्यांनी तसे केले नाही व आपल्या सेवेत त्रुटी ठेवली. आता त्यांनी अचानकपणे जास्त रक्कमेची देयके दिलेली आहे व असा आरोप केलेले आहे की, तक्रारदाराने विजेचा वापर गैरकायदेशीरपणे केलेला आहे. त्यांनी यासाठी दिनांक 9/6/2011 चा तपासणीचा आधार घेतलेला आहे आणि तक्रारदाराला विजेच्या देयकाची आकारणी ही व्यावसाईक दराने केलेली आहे. ही संपुर्ण आकारणी व्यावसाईक दराने करणे हे सुध्दा गैरअर्जदाराचे चुकीचे कृत्य आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश करित आहोत.
// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
2. गैरअर्जदाराने तक्रारदारास दिनांक 9/6/2011 चे तपासणीचे आधारे दिलेले व त्यापुढील संपुर्ण देयके रद्द करण्यात येत आहे.
3. तक्रारदाराने व्यावसायीक स्वरुपासाठी केलेला विजेचा उपयोग विचारात न घेऊन तक्रारदाराचे संस्थेच्या वापरात असलेल्या विजेचे वापरासंबंधी व्यावसायीक स्वरुपाची आकारणी व उर्वरित आकारणी घरगुती वापराचे समजुन त्याबद्दलची देयके तक्रारदारास द्यावी व भविष्यात ती त्याप्रमाणे देत राहावी.
4. गैरअर्जदारास गरजेचे वाटल्यास अशा आकारणी संबंधी तक्रारदारास व्यावसायीक वापरासाठी वेगळे मिटर लावुन त्याबाबत तक्रारदाराकडुन शुल्क भरुन घ्यावे. तक्रारदाराची कमी केलेली रक्कम हिशोबात घ्यावी व तक्रारदाराकडे जास्त रक्कम निघत असल्यास ती रक्कम भविष्यात येणा-या देयकात समायोजीत करावी.
5. गैरअर्जदाराने तक्रारीचे खर्चापोटी रुपये 1,000/-(केवळ एक हजार) तक्रारदारास द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 3 महिन्याचे आत करावे.