(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 29 जुलै, 2011) यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदाराची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते गैरअर्जदार संस्थेचे नियमित कर्मचारी आहेत. त्यांनी संस्थेकडून केवळ रुपये 72,000/- एवढे कर्ज सन 2000 मध्ये घेतले होते. गैरअर्जदार संस्थेने कर्जाच्या परतफेडीकरीता म्हणुन रुपये 3,74,182/- एवढी रक्कम त्यांचे वेतनातून कपात करुन घेतली होती. यासाठी ज्याठिकाणी तो काम करतो त्या अधिका-याशी संगनमत केले. तक्रारदाराने वेळोवेळी विनंती करुन सदर रकमेचा हिशेब मागीतला व कपात बंद करण्याबाबत कळविले, मात्र त्यास हिशेब देण्यात आला नाही. म्हणुन शेवटी तक्रारदार यांनी ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तीद्वारे तक्रारदाराकडून जास्तीची वसूल केलेली रक्कम रुपये 2,26,783/- तीवरील 18% व्याजासह परत मिळावी, तक्रारदारास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 50,000/- नुकसान भरपाई द्यावी आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 10,000/- मिळावे अशा मागण्या केल्या आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार हा संस्थेचा कर्मचारी असल्यामुळे त्याला ही तक्रार न्यायमंचासमक्ष दाखल करता येत नाही, यासाठी त्यांनी सहकार न्यायालयात जावे. तक्रारदाराने रुपये 72,000/- एवढे कर्ज घेतले ही बाब त्यांनी पूर्णतः नाकारलेली असून त्यांचेविरुध्दची सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. तक्रारदाराने रुपये 72,000/- एवढ्याच कर्जाची उचल केली व त्यासाठी रुपये 3,74,182/- पेक्षा जास्त रकमेची वसूली झाली हे म्हणणे चूकीचे आहे व तक्रारदार यांनी वेळोवेळी निरनिराळ्या कारणांवरुन एकूण रुपये 2,17,240/- चे कर्ज उचलले आहे. पुढे त्यांचे असेही म्हणणे आहे की, रुपये 3,89,182/- ची वसूली झालेली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या हिशेबात अनेक चूका आहेत. थोडक्यात तक्रारदाराची सदर तक्रार ही चूकीची व गैरकायदेशिर आहे, म्हणुन ती खारीज व्हावी असा उजर घेतला. यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत तक्रारदाराचे वेतनातून वसूल केलेल्या रकमांचा तपशिल, नोटीस, पोचपावती, अतिरिक्त वसूल केलेल्या रकमेचा तपशिल इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराने वेळोवळी उचल केलेल्या कर्ज रकमेचा तपशिल, तफावतीचा तपशिल, नोटीसचे उत्तर, त्यांचेतील इतर पत्रव्यवहार याप्रमाणे दस्तऐवज मंचासमक्ष दस्तऐवज दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा तोंडी युक्तीवाद मंचाने ऐकला. यातील गैरअर्जदार यांनी त्यांचे जबाबासोबत विविध दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत व त्यावर तक्रारदाराच्या सह्या आहेत आणि तक्रारदारास त्या मान्य आहेत. सदरचे दस्तऐवजावर सह्या लबाडीने घेतल्या आहेत आणि त्याचा ते गैरवापर करीत आहेत. तक्रारदाराचे विधान असे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून केवळ रुपये 72,000/- एवढे कर्ज घेतले आणि उलट गैरअर्जदार यांनी जवळपास रुपये 2,17,240/- एवढी कर्ज रक्कम घेतली असे विधान केले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराने घेतलेले कर्ज रक्कमेचे दस्तऐवज दाखल केले त्यावर तक्रारदाराच्या सह्या आहेत, मात्र त्यावर तक्रारदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार यांनी त्यावर लबाडीने सह्या घेतल्या व ते दस्तऐवज खोटे आहेत या बाबी ग्राहक मंचाच्या मर्यादित अधिकारक्षेत्रात (Summary Jurisdication) सिध्द होणे कठीण आहे. यासाठी इतर साक्षीपुरावा घेणे व त्यावर उलटतपासणी होणे गरजेचे आहे. म्हणुन सदर तक्रार निकाली काढणे योग्य होईल असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -000 अं ती म आ दे श 000- 1) तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते. 2) तक्रारदाराने सहकार न्यायालयात आपला विवाद उपस्थित करावा व त्यासंबंधी न्याय मागावा, त्याबाबतचे तक्रारदाराचे हक्क अबादित ठेवण्यात येतात. 3) या निकालात व्यक्त केलेली मते सहकार न्यायालयात विचारात घेतल्या जाऊ नयेत. दोन्ही पक्षांनी आपापला खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |