जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/220 प्रकरण दाखल तारीख - 01/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 10/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य नारायण गोविंदराव दावलबाजे, वय वर्षे सज्ञान धंदा नौकरी, अर्जदार. रा.सहयाद्रीनगर, प्लॉट नं.7, तरोडा बु ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. विज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि, नांदेड मार्फत अध्यक्ष,विद्युत भवन, नविन मोंढा, गैरअर्जदार. ता.जि.नांदेड. 2. जी.सी.थळंगे,अध्यक्ष,विज कामगार को-ऑपरेटिव्ह,सोसायटी लि, विद्युत भवन,नविन मोंढा, नांदेड. 3. पी.एन.तेलंग, उपाध्यक्ष, विज कामगार को-ऑपरेटिव्ह,सोसायटी लि, विद्युत भवन,नविन मोंढा, नांदेड. 4. एस.एस.तारु,सह सचिव, विज कामगार,को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि, विद्युत भवन,नविन मोंढा, ता.जि.नांदेड. 5. एस.डी.सरसर,सचिव,विज कामगार को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि, विद्युत भवन,नविन मोंढा,ता.जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.एम.पवार. गैरअर्जदार 1 ते 5 - अड. राजा विर. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदा यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 चा भाग धारक सभासद असून गैरअर्जदार क्र. 1 ही विज खात्यातील कर्मचा-यांची पगारदार सहकारी संस्था आहे व ती महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार नोंदलेली सहकारी संस्था आहे व गैरअर्जदार अर्जदार क्र. 2 हे संस्थेचे अध्यक्ष आहेत व गैरअर्जदार क्र. 3 हे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. गैरअर्जदार क्र. 4 हे संस्थेचे सह सचिव व गेरअर्जदार क्र. 5 हे संस्थेचे सचिव असुन 2 ते 5 हे वरील संस्थेचे पदाधिकारी असून ते संस्थेचा दैनंदिन व्यवहार पाहतात व संस्थेच्या आर्थीक व्यवहारा संबंधीचे सर्व निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाच्या सल्याने घेण्याचा अधिकार गैरअर्जदार क्र. 2 ते 5 यांना असल्यामुळे त्यांना सदरील दाव्यात पार्टी करण्यात आले आहे. गैरअर्जदार क्रे. 1 सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत पोट नियमातील तरतुदी नुसार व संस्थेच्या उद्यिष्टानुसार सभासदांना बँकेकडुन कर्ज घेवुन सभासदांना त्यांच्या हिताच्या दृष्टिने व फायद्यासाठी प्रतिवादी क्र.1 तर्फे कर्ज वाटप करणे व संस्थच्या उद्यीष्टानुसार संस्थेचे भाग भांडवल व आर्थीक व्यवहार वाढविण्याच्या दृष्टिने सभासदाकडुन भाग व मुद्यत ठेवीच्या स्वरुपात सभासदाकडुन रक्कमा स्विकारुन व्याजासह त्या मुदतीनंतर सभासदांना/ठेवीदारांना बिना र्शत वा कुठल्याही इतर आर्थीक व्यवहाराशी संबंध न ठेवता परत करणे हे संस्थेचे उदिष्ट असल्यामुळे ते संस्थेवर व सभासदावर बंधनकारक आहे. अर्जदार यांनी एक वर्षाच्या मुदतीसाठी रक्कमा ठेवल्या, अनुक्रमे पावती क्र.3972 व 3973 व पावती दि.02/05/2005 पावतीची रक्कम रु.1,00,000/- व रु.32,000/- ठेव परतीचीचा दि.02/05/2006 व पावती क्र. 4651 दि.12/01/2006 रु.1,50,000/- ठेव परतीची दि.12/01/2007 व्याज दर 10 टक्के प्रमाणे वरीलप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जमा केल्यानंतर संस्थेने अर्जदारास वरील तिन्ही ठेवी रक्कमेचे प्रमाणपत्र दिलेले आहेत. अर्जदाराने वरील ठेव पावतीवर कसलेही कर्ज उचलले नाही अथवा कोणत्याही कारणांस्तव संस्थेकडे गहाण ठेवले नाहीत. अर्जदारास वरील रक्कमेची अत्यंत आवश्यकता असल्याने दि.11/04/2009 व 28/04/2009 रोजी गैरअर्जदाराकडे मुदतठेव पावत्याची रक्कम मिळणे बाबत अर्ज केली तरीही त्यांनी रक्कमा परत दिल्या नाहीत. अर्जदाराने दि.11/05/2009 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे अर्ज देवून मुदत ठेवीच्या रक्कमा देणे बाबत संस्थेला आदेश करावा या करीता विनंती केली. त्या अर्जावर उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड यांनी गैरअर्जदार यांना दि.04/06/2009 रोजीच्या लेखी पत्राद्वारे कळविले की, अर्जदाराची मुदत ठेव रक्कम कोणत्याही कारणासाठी रोखून ठेवता येणार नाही व तात्काळ कार्यवाही करुन अहवाल सादर करण्यास कळविले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वेळोवेळी भेटुन ठेवीची रक्कम देण्याची विनंती करुनही रक्कम न दिल्यामुळे वकीला मार्फत नोटिस दिली तरीही अर्जदारास रक्कम मिळाली नाही. अर्जदारास अडचणीच्या वेळी मुदत ठेवीच्या रक्कमा न मिळाल्यामुळे व अर्जदाराच्या कामासाठी सदरील ठेवीचे पैसे उपयोगात न आल्यामुळे अर्जदारास मानसिक व आर्थीक त्रास सोसावा लागला म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, त्यांची मुदत ठेव रक्कम रु.1,00,000/-, रु.32,000/-, रु.1,50,000/- ही रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. सदरील प्रकरणात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली ते हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हे संस्थेचे माजी सचीव असुन त्यांचे कार्यकाळामध्ये त्यांनी वेगवेगळया हेडवर संचालक मंडळाची दीशाभुल करुन संस्थेच्या रक्कमेचा अपहार केला आहे या अनुषंगाने संस्थेने माजी अध्यक्ष, माजी रोखपाल व अर्जदार यांचे विरोधात सहकार न्यायालय नांदेड येथे दावा क्र.99/08, 100/08,46/08 अन्वये लवाद दावे दाखल केले असून सदर लवाद दावे न्याय प्रविष्ठ आहेत. तसेच सभासद श्री.आर.एस.डोखळे यांचे कर्ज प्रकरणाच्या अनुषंगाने रु.1,50,000/- ची अफरातफर करुन संस्थेची फसवणुक केलेली आहे. या अनुषंगाने संस्थेने वेळोवेळी ठराव पारीत केलेले आहेत. अर्जदार यांनी संस्थेच्या संचालक मंडळावर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव परेशान करणे किंवा न्यायालयात तक्रार करणे या उद्येशाने सदर तक्रार दाखल केलेली आहे कारण अर्जदार यांची मुदत ठेव परत करणेसाठी संस्था तयार होती व आहे. अर्जदार यांनी मुदतठेव रक्कमेचे धनादेश नेण्यासाठी टाळाटाळ केली. दि.01/10/2009 रोजी अर्जदार यांना मुदत ठेवीच्या रक्कमेचा चेक क्र.436379 रु.2,20,000/- दि.01/10/2009 चेक क्र.436380 रु.2,03,478/- दि.01/10/2009 अर्जदार यांना देणेसाठी गेले असता त्यांनी घेण्यास नकार दिल्यामुळे सदरील चेक मंचामध्ये दाखल केले आहे. अर्जदाराचा अर्ज खोटा आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात क्लार्क या पदावर नोकरीस असुन ते गैरअर्जदार नं. 1 संस्थेवर सचिव या पदावर कार्यरत होते. तसेच अर्जदार यांनी दि.02/05/2005 व 02/05/2005 एकाच दिवशी रु.1,32,000/- रक्कमेची मुदतठेवी संस्थेमध्ये ठेवल्या व मुदत ठेव प्रमाणपत्रावर त्यांची सचिव म्हणुन व माजी अध्यक्ष यांनी सही केलेली आहे. प्रत्यक्षात एक लिपीक जवळपास सहा महिन्यामध्ये एकुण रु.28,200/- ची गुंतवणुक मुदत ठेवीमध्ये करु शकेल असे वाटत नाही व त्या अनुषंगाने संबंधीत अर्जदाराने आयकर रिटर्नमध्ये दाखवीणे जरुरीचे आहे. त्या अनुषंगोन अर्जदाराने आयकर विभागाची पर्यायाने शासनाची उत्पन्नाच्या अनुषंगाने दिशाभुल केलेली आहे. त्यामुळे पगारीतुन काटकसर करुन सदर रक्कम मुदत ठेवीत जमा केले हे म्हणने खरे नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण उदभवले नाही. संस्था मुदतठेवीची रक्कम परत देण्यास तयार असुन ती अर्जदाराने स्विकारली नाही व सुडबुध्दीने संचालक व संस्थेच्या विरोधात सदरची तक्रार दाखल केली आहे. म्हणुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली उजर घेतला की, अर्जदाराची तक्रार ही रु.5,000/- नुकसान भरपाईसह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व दोन्ही पक्षकार यांचा युक्तीवाद याचा विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जराचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार को-आपरेटिव्ह क्रेडिट सोसयटीमध्ये अनुक्रमे रक्कम रु.1,00,000/- व रु.32,000/- ,रु.1,50,000/- अशी रक्कम मुदतठेव म्हणुन गैरअर्जदार यांचेकडे ठेवलेली होती. अर्जदार यांनी अर्जासोबत सदर मुदतठेव पावतीच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावत्या याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - गैरअर्जदार हे सदर अर्जाचे कामी नेमलेल्या पहिल्या तारखेला हजर झालेले आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जबाब या अर्जाचे कामी दाखल केलेला आहे. अर्जदार हे संस्थेचे माजी सचिव असुन त्यांचे कार्यकाळामध्ये अर्जदार यांनी वेगवेगळया हेडवर संचालक मंडळाचे दीशाभुल करुन संस्थेच्या रक्कमेचा अपहार केला त्यामुळे संस्थेने त्यांसंबंधी माजी अध्यक्ष माजी रोखापाल व अर्जदार यांचे विरोधात नांदेड येथील मा.सहकार न्यायालय येथे दावा क्र.99/08, 100/08 व 46/08 असे लवाद दावे दाखल केलेले असून ते सध्या न्यायप्रविष्ठ आहेत, असे गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नमुद केले आहे. अर्जदार यांनी संस्थेकडे मुदतठेव रक्कम परत मिळणेसाठी अर्ज दिला. परंतु प्रत्यक्षात संस्थेकडुन धनादेश देण्याचे टाळाटाळ केलेले आहे असेही गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये नमुद केले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद यांचे चेक क्र.436380 चा दि.01/10/2009 चा रक्कम रु.2,03,478/- आणि चेक क्र.436379 चा दि.01/10/2009 चा रक्कम रु.2,20,439/- असे दोन चेक या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेले आहेत. अर्जदार यांनी सदरचे दोन्ही चेक त्याच दिवशी स्विकारलेले आहेत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या म्हणण्यामधील मजकुर नाकारलेले नाही. रक्कम स्विकारल्यानंतर किती रक्कम येणे बाकी होती व गैरअर्जदार यांनी प्रत्यक्षात दिलेली रक्कम बरोबर आहे. याबाबत कोणतेही कथन केलेले नाही अगर त्यांचे प्रतीउत्तर दिलेले नाही. अर्जदार यांचे विरुध्द संस्थेच्या रक्कमेच्या अपहाराबाबत दावे न्यायप्रविष्ट आहेत व अर्जदार यांना दि.01/10/2009 चे चेक गैरअर्जदार यांनी देणेसाठी काढलेले आहेत व अर्जदार हे प्रस्तुतची तक्रार घेऊन या न्यायमंचामध्ये दि.01/10/2009 रोजी आलेले आहेत, याचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेले शपथपत्र व दोन्ही पक्षाचा युक्तीवाद यांचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश. 1. अर्जदार यांचा अर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधी पक्षकार यांना निकाल करण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |