जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 174/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 31/01/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 12/02/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 12/10/2009
श्री.अनिल भाऊराव पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः नोकरी,
रा.प्लॉट नं.14, म्हाडा कॉलनी,
संत मुक्ताबाई कॉलेज जवळ, जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,
विभागीय कार्यालय, ग्रामीण विभाग,
जुने विद्युत गृह, जिल्हापेठ, जळगांव.
तर्फे उप कार्यकारी अभियंता. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 12/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.आर.डी.बर्डे वकील हजर
सामनेवाला तर्फे श्री.कैलास एन.पाटील वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार हा जळगांव येथील कायमचा रहीवाशी असुन तक्रारदाराचे घराचे परिसरात श्री.सखाराम बनसोडे ही व्यक्ती राहते. त्यांचे जागेत सामनेवाला विद्युत वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा करणारा खांब होता. सदरचा खांब हा अनधिकृत होता म्हणुन सामनेवाला यांचे अधिका-याने सदरचा खांब सदर ठिकाणाहुन काढुन त्याची बांधणी सार्वजनीक रस्त्यावर केली त्यामुळे सदर परिसरातील विज तारा शिथील झाल्यात. तक्रारदाराने वारंवार सदरच्या तारा शिथील असल्याने सुरक्षीत अशा करणेबाबत सांगीतले असता सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदारास नवीन मिटर घरी लावण्याचे असल्याने त्यासाठी सामनेवाला यांनी तक्रारदारास रु.4,700/- भरण्यास सांगीतले व ती रक्कम देखील तक्रारदाराने भरली तथापी सामनेवाला यांनी इतर लोकांना 4000/- चे आंत मिटर कनेक्शन दिले मात्र तक्रारदाराकडुन जादा रक्कम आकारणी केली. त्यानंतर तक्रारदाराचे रहाते घरातील मिटर दि.20/10/2007 रोजी रात्री 7.45 वाजता जळाले असता तक्रारदाराने सामनेवाला यांचे कार्यालयात जाऊन तक्रार दिली असता सकाळी लाईटचे काम होईल असे सांगुन तक्रारदारास रात्रभर अंधारात ठेवले. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदाराचे मिटर पाहुन तक्रारदारास रक्कम रु.750/- भरावयास सांगुन तक्रारदाराचे जुने मिटर काढुन घेऊन नवीन मिटर लावले. त्यानंतर सामनेवाला यांचे कर्मचारी तक्रारदाराचे घरी येऊन नवीन मिटर काढुन त्या ठिकाणी जुने मिटर लावले व जुन्या जळालेल्या मिटरचे सिल तुटले असल्याचे सांगीतले. त्यानंतर तक्रारदार हे सामनेवाला यांचे कार्यालयात गेले असता तक्रारदाराचे मिटर टेस्टींगला पाठविण्यात येईल असे सांगुन तक्रारदाराचे घरातील विज पुरवठा ग्राहक क्र.110012264038 चे रक्कमरु.19,345/- चे आकारणी करुन विज चोरीचे बिल देय तारखेच्या आंत न दिल्यास पोलीस केस करण्यात येईल असे नोंद करुन दिले. तक्रारदाराने विजेची चोरी केलेली नसतांना सामनेवाला यांचे अधिका-यांनी व्यक्तीगत आकसापोटी तक्रारदारास खोटया केस मध्ये अटकवण्याचा प्रयत्न करुन सदोष सेवा दिलेली आहे. सबब सामनेवाला यांचे दि.25/1/2008 रोजीचे रक्कम रु.19,345/- चे देयक बेकायदेशीर असल्याचे ठरवुन ते रद्य करण्यात यावे. नियमानुसार तक्रारदारास नवीन बिल देण्याचे आदेश व्हावेत. तसेच तक्रारदारास नियमानुसार दोषपुर्ण मिटर रद्य करुन नवीन दोषरहीत मिटर बसवुन तक्रारदाराचा विज पुरवठा निरंतर अखंडीत सुरु ठेवण्याचे सामनेवाला यांना आदेश व्हावेत, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.25/1/2008 रोजीचे दिलेले विज बिल हे चोरीचे असल्याने विद्युत कायदा,2003 चे कलम 145 नुसार सदरचा अर्ज या मंचास चालविणेचा अधिकार नाही. तक्रारदाराने तत्कालीन मंडळाकडुन दि.9/11/2001 रोजी 0.60 के.डब्ल्यु चा विज पुरवठा घरगुती प्रयोजनासाठी मंजुर केलेला असुन तक्रारदाराचा ग्राहक क्रमांक 110012264038 असा असुन मिटर सिरियल क्रमांक 406987, टेस्टींग क्र.जेसीइ 9159, एलीमर कंपनीचे बसविण्यात आले होते सदरचे मिटर जळाल्याबद्यल तक्रारदाराने दि.29/10/2007 रोजी सामनेवाला यांचेकडे तक्रार केली होती. सदर मिटरची सिले संशयास्पद असल्यामुळे तक्रारदारास मिटरची किंमत रु.700/- चे विज बिल देण्यात आलेले होते. सदरचे विज बिल तक्रारदाराने दि.1/11/2007 रोजी बँकेत भरणा केले आहे. त्यानुसार दि.1/11/2007 रोजी सदर विज मिटरची तपासणी केली असता त्यावेळी मिटरवर 02667 असे रिडींग होते. सदर मिटरला विज कंपनीचे दोन निळया रंगाचे दोन प्लॅस्टीक सिल क्र.098427 व 098428 लावलेले होते. त्यापैकी सिल क्र.098428 ची वायर तुटलेली होती तसेच मिटरला दोन स्टीकर सिल नंबर 26009 व 26010 असे लावलेले होते त्यापैकी 26009 हे फाटलेले होते म्हणुन तक्रारदारासमक्ष स्थळ परिक्षण अहवाल तयार करुन सदरचे विज मिटर पंचासमक्ष सिलबंद करुन जप्त करण्यात आले होते त्यावेळी सदरचे मिटर तपासणीअंती येणारे दंडात्मक विज बिल भरण्यास तक्रारदाराने पंचासमक्ष लेखी जबाब लिहुन दिलेला होता. दि.21/12/2007 रोजी सदरचे विज मिटरची चाचणी कक्षात तपासणी केली असता मिटरची सिले संशयास्पद आढळुन आली होती. निळया रंगाचे प्लॅस्टीक सिल क्र.098428 ची वायर तुटलेली होती, स्टिकर सिल क्र.26009 फाटलेले आढळुन आले होते तसेच मिटरचे टर्मिनल उघडून आत पाहीले असता आऊटपुट फेजची वायर कट केल्याचे आढळुन आले होते त्यामुळे सदरचे मिटर विज प्रवाहाची नोंद करीत नव्हते म्हणुन महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता विनिमय,2005) चे नियम 8.6 नुसार आकारणी करुन तक्रारदारास एकुण रक्कम रु.19,345/- चे विद्युत कायदा 2003 चे कलम 152 नुसार गुन्हा तडजोड रक्कमेसहीत विज बिल देण्यात आलेले होते. सदरचे विज बिल भरण्याची अंतीम मुदत दि.31/1/2008 देण्यात आली होती. तक्रारदाराने सदरचे विज बिल भरण्याचे मान्य करुनही विज बिल अदा न करता सामनेवाला विरुध्द प्रस्तुतचा खोटा व बनावट अर्ज करुन सामनेवाला यास नाहक खर्चात टाकलेले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी, तक्रारदाराने सामनेवाला विरुध्द खोटी व बनावट तक्रार दाखल करुन खर्चात टाकलेबद्यल ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 26 नुसार रक्कम रु.10,000/- नुकसान भरपाई देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1) सामनेवाला यांनी तक्रारदारास अवास्तव विज देयक देऊन
सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिली आहे अगर कसे ? होय.
2) असल्यास काय आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
निष्कर्षाची कारणेः
4. तक्रारदार हा सामनेवाला यांचा विज ग्राहक क्रमांक 110012264038 अन्वये ग्राहक आहे. तक्रारदाराने त्याबाबत नि.क्र.1 लगत संबंधीत ग्राहक क्रमांकाअन्वये सामनेवाला यांनी दिलेले विज देयकही दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला यांनीही तक्रारदार हा त्यांचा ग्राहक असल्याचे कोठेही नाकारलेले नाही. सबब तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे.
5. प्रस्तुत तक्रारीचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराने त्याचे तक्रारीत त्याचे घरातील विज मिटर दि.20/10/2007 रोजी रात्री 7.45 वाजता जळाले व त्याची पिंप्राळा येथील सामनेवाला यांचे कार्यालयात तक्रार दिली असल्याचे प्रतिपादन केले आहे. तक्रारदाराचे तक्रारीनंतर रक्कम रु.750/- ची पावती करुन सदरची रक्कम तक्रारदाराकडुन भरुन घेऊन तक्रारदाराचे घरी दुसरे मिटर सामनेवाला यांचेकडुन लावण्यात आले. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराने विज चोरी केली असल्याचे प्रतिपादन करुन सदरची तक्रार या मंचासमोर चालण्यास पात्र नसल्याचे कथन केले आहे. तक्रारदाराचे घरातील विज मिटर दि.20/10/2007 रोजी जळाल्यानंतर सामनेवाला यांनी दि.1/11/2007 रोजी परिक्षण अहवाल करुन मिटर परिक्षणासाठी पाठविले असता त्यात फेरफार झाल्याचे नमुद करुन तक्रारदारास विज चोरीचे देयक दिलेले असल्याचे दिसुन येते. तथापी तक्रारदाराचे मिटर दि.20/10/2007 रोजी जळाले त्याचवेळी सामनेवाला यांना सदरची परिक्षण कारवाई करुन योग्य ती पाऊले उचलता आली असती. सामनेवाला यांनी असे न करता 10 ते 12 दिवसानंतर विज मिटर परिक्षणाबाबतची केलेली कारवाई ही या मंचास योग्य वाटत नाही. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेला फॉर्म नंबर एम.आर 3 वरील क्रमांक 4 चा शेरा खालीलप्रमाणे नमुद आहे.
मीटरचे Lead seal बरोबर असल्याचे आढळले. मीटर उघडुन पाहीले असता आऊटपुट फेजची वायर कट असल्यामुळे बंद असल्याचे आढळले.
वरील शे-याचे अवलोकन केले असता मिटरचे Lead seal हे बरोबर असल्याचे नमुद असुन आऊटपुट फेजची वायर कट असल्याचे नमुद आहे. तथापी आऊटपुट फेजची वायर नेमकी कशामुळे कट झाली वगैरे बाबतीत त्यात काहीएक उहापोह केलेला नाही. आऊटपुट फेजची वायर ही अनेक कारणामुळे कट होऊन मिटर बंद होऊ शकते. याकामी नाहक तक्रारदाराने मिटर मध्ये फेरफार केल्याचा निष्कर्ष काढुन त्यास विज चोरीचे देयक देऊन सामनेवाला यांनी सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले दि.25/01/2008 रोजीचे रक्कम रु.19,345/- चे देयक रद्य करुन तक्रारदारास दि.25/1/2008 पासुन तक्रारदाराने मागील सहा महीन्यात वापर केलेल्या विज युनीटची सरासरी काढुन त्यानुसार सरासरी वापराचे देयक तक्रारदारास देण्यात यावे या मतास हे मंच आले आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.25/01/2008 रोजीचे दिलेले रक्कम रु.19,345/- चे देयक रद्य करण्यात येते. सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याने दि.25/1/2008 पुर्वी वापर केलेल्या मागील सहा महीन्यातील सरासरी विज वापरानुसार सरासरी काढुन त्यानुसार सरासरी वापराचे विज देयक द्यावे.
( क ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदोष व दोषरहीत मिटर बसवुन द्यावे व तक्रारदाराचा विज पुरवठा अखंडीत निरंतर सुरु ठेवावा.
( ड ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 500/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील आदेशाची पुर्तता सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत करावी.
( ई ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( फ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 12/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव