जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 395/2007
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-12/07/2007.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/09/2013.
श्री.तुकाराम अर्जुन पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.गुढे, ता.भडगांव, जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीत,
विभागीय कार्यालय, पाचोरा,
ता.पाचोरा,जि.जळगांव.( नोटीस म.कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि.कंपनी मर्या.पाचोरा यांचेवर बजवावी.) ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
श्री.चंद्रकांत मो.येशीराव, सदस्यः प्रस्तुत प्रकरणी तत्कालीन मंचाने दि.17/01/2008 रोजी अंतिम निकाल पारीत करुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य केला होता. सदर आदेशाविरुध्द तक्रारदार यांनी नाराज होऊन मा.राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य,मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेले फस्ट अपिल क्र.194/2008 मध्ये मध्ये दि.06/03/2009 रोजी अंतिम आदेश पारीत करुन तत्कालीन मंचाने पारीत केलेले आदेश रद्य करुन सदर प्रकरणी दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकुन घेऊन तक्रार अर्ज नव्याने निकाली काढण्याबाबत आदेश पारीत केले.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हा वर नमुन पत्यावरील कायमस्वरुपी रहीवाशी असुन मौजे गुढे शिवारात शेत गट नंबर 284/1 क्षेत्र 2 हे 03 आर शेतमिळकत तक्रारदाराचे मालकीची व कब्जेवहीवाटीची आहे. सदर शेतजमीनीमध्ये तक्रारदाराने सन 2006-07 या कालावधीत 1 हे 63 आर क्षेत्रामध्ये ऊस, 40 आर क्षेत्रात लिंबुची 200 झाडे तर गट नंबर 289/2 क्षेत्र 00 हे 81 आर क्षेत्रात संपूर्ण ऊसाची लागवड केलेली होती. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाकडुन दि.01/12/1986 रोजी शेती प्रयोजनासाठी 5 एच.पी.क्षमतेचा विज पुरवठा ग्राहक क्र.128237046869 नुसार घेतलेला असुन तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. मौजे गुढे शिवारातील शेत गट क्र.285/1 या गटातून विद्युत प्रवाहाच्या तारा गेलेल्या आहेत. सदरच्या तारा लोंबकळत असल्याने तक्रारदार व परिसरातील इतर शेतक-यांनी विरुध्द पक्षाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या होत्या तथापी विरुध्द पक्षाने त्यांचेकडे दुर्लक्ष केले. दि.13/05/2007 रोजी सदर लोंबकळत असलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्कीट होऊन आग लागुन बाजुबाजूची सुमारे 40 एकर जमीनीतील पिकांचे जळुन नुकसान झाले. त्यात तक्रारदाराचे शेत मिळकत गट क्र.285/1 च्या शेतजमीनीत आग पसरत येऊन तक्रारदाराच्या शेतातील तोडणी योग्य उत्कृष्ट प्रतीचा ऊस व लिंबुची व आंब्याची झाडे पुर्णपणे जळून तक्रारदाराचे आगीत रु.3,40,000/- चे नुकसान झाले व त्यानुसार महसुलचे अधिका-यांनी घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारदाराचे शेती मिळकतीवर उत्पन्नाचे साधन अवलंबुन असल्याने विरुध्द पक्षाचे निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसान झाले. सबब तक्रारदारास विरुध्द पक्षाकडुन ऊस, लिंबु व आंब्याच्या झाडांची नुकसान भरपाई रु.3,40,000/- व्याजासह वसुल होईपावेतो देण्याचे आदेश व्हावेत, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्षाने तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने त्याचे शेजमीनीमध्ये ऊसाचे पिक, लिंबाची तसेच आंब्याची झाडे लावलेली होती ही बाब विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदारास विद्युत कनेक्शन त्यांचे शेतीसाठी दिलेले आहे त्यास सेवा देतांना सदरची घटना घडलेली नाही त्यामुळे तक्रारदार याला विरुध्द पक्षाचा ग्राहक म्हणुन नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले महसुल अधिका-यांचे दाखले विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदाराने खोटे दाखले दिलेले आहेत. शेती तज्ञ व्हॅल्युअरचा दाखला देणे गरजेचे होते तसा तो दिलेला नाही. तक्रारदाराची कोणतीही झाडे अगर पिके जळालेली नाहीत. तलाठी व पंच हे नुकसानीसंबंधीचे तज्ञ नाहीत. विजेच्या तारा लोंबकळत होत्या व त्यामुळे शॉर्ट सर्कीट झाले व त्यामुळे झाडे जळाली ही बाब विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदाराचे शेत 285/1 चे पुर्वेस बांधास बांध लागुन नाही तसेच आगीचा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच लिंब आंबा व नारळ ही झाडे असल्याने जळण्याचा प्रश्नच येत नाही. ग्राहक या संज्ञेत तक्रारदाराची तक्रार बसत नाही. सदरची बाब ही दिवाणी न्यायालयाचे कक्षेतील आहे. या मंचास तक्रारीचा निवाडा करण्याचा कोणताही अधिकार नाही. तक्रारदाराने कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विरुध्द पक्षाकडे अर्ज केलेला नाही. ज्या शेतात आग लागली त्या शेतातील तारा हया ढिल्या नसुन त्या ताईट केलेल्या आहेत त्यामुळे वाहीनीमध्ये घर्षण होऊन स्पार्क होण्याचा काहीएक संबंध येत नाही. विरुध्द पक्षाकडुन विद्युत वाहीन्यांची देखभाल वेळोवेळी केली जाते त्यात कोणताही दोष नाही. ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रारदार हा ग्राहक नाही सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करण्यात यावी व तक्रारीचे खर्चादाखल रु.3,000/- तक्रारदाराकडुन विरुध्द पक्षास मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्षाने केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे तसेच उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे काय? होय.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
3) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 - तक्रारदाराने गुढे शिवारात गट क्र.284/1 मध्ये विद्युत पुरवठा घेतलेला आहे. त्याचा ग्राहक क्र.128237046869 असा आहे. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 व 3 - विरुध्द पक्षाने त्यांचे म्हणण्याचे पुष्ठयर्थ विद्युत निरिक्षक यांचा दाखला जोडलेला आहे. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, युक्तीवाद, प्रतिज्ञापत्रे, विरुध्द पक्षाचा खुलासा, कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांचे अवलोकन केले असता खालील बाबी निदर्शनास येतात.
1) तक्रारदाराने त्यांचे शेतात ऊस पिक, लिंबुची व आंब्याची झाडे लावलेली होती याबाबत नैसर्गीक आपत्ती पंचनामा, सरपंच, पोलीस पाटील यांचे दाखले जोडलेले आहेत व सदरचे ऊसाचे पिक व झाडे जळालेली आहेत ही बाब प्राथमीक स्तरावर सिध्द होते. तक्रारदाराने त्याचे शेतीचे रंगीत फोटोग्राफही दाखल केलेले आहेत त्यात पिके जळाल्याबाबत स्पष्टपणे दिसुन येते. सदरचे दाखले विरुध्द पक्ष यांनी नाकारलेले आहेत. मात्र सदरचे दाखले चुकीचे आहेत, बोगस आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. याउलट सरपंच, पोलीस पाटील हे समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत, पोलीस पाटील हे शासनाचे प्रतिनिधी आहेत ही बाब पाहता त्यांचे दाखले प्रस्तुत तक्रारीकामी नाकारणे योग्य होणार नाही असे या मंचाचे मत आहे. याकामी विरुध्द पक्षाने विद्युत निरिक्षकाचा अहवाल जोडलेला आहे. विद्युत निरिक्षक हे विद्युत संबंधी तक्रारींमध्ये त्रयस्थ व्यक्ती असते त्याच बरोबर या क्षेत्रातील ते तज्ञ व्यक्ती मानली जाते. या अहवालात विद्युत निरिक्षकांनी सदर जळीत शेतावरुन जाणा-या एल.टी लाईनची संच मांडणी सुस्थितीत होती व एल.टी.वाहकावर कुठल्याही प्रकारच्या स्पार्कींगच्या खुणा आढळल्या नाहीत त्यामुळे आग अन्य कारणाने लागली असावी असे नमुद केलेले आहे. सदर अहवालाची झेरॉक्स कॉपी मंचासमोर हजर आहे. सदर कॉपी प्रमाणीत नाही व कॉपी सोबत विद्युत निरिक्षकाचे प्रतिज्ञापत्रही दाखल नाही ही बाब नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे. प्रस्तुतच्या तक्रारीत दि.13/05/2007 रोजी घटना घडलेली आहे. कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता कार्यालय,जळगांव यांनी दि.10/01/2008 रोजी विद्युत निरिक्षक यांना पत्र देऊन अभिप्रायाची मागणी केलेली आहे व विद्युत निरिक्षकांचे अहवालावर दि.10/01/2008 तारीख नमुद आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, विद्युत निरिक्षक यांनी दि.10/01/2008 रोजीच सदर घटनास्थळाचे निरिक्षण केलेले आहे. म्हणजेच घटना घडल्यानंतर जवळपास आठ महीन्यानंतर विद्युत निरिक्षकाने घटनास्थळाचे निरिक्षण केलेले आहे. घटना घडल्यानंतर सुमारे आठ महीने घटनास्थळाची परिस्थिती जैसे थे किंवा घटनेच्या वेळेप्रमाणेच होती किंवा आहे असे म्हणण्याचे धारिष्ठय आम्ही दाखवु शकत नाही त्यामुळे विद्युत निरिक्षकाचा अहवाल हा घटना घडल्यानंतर ब-याच कालावधीनंतरचा आहे ही बाब सिध्द होते. भारतीय पुराव्याचा कायदा,1872 मधील कलम 45 मध्ये Opinions of experts – When the Court has to form an opinion upon a point of foreign law, or science or art, or as to identity of handwriting or the opinions that point of persons specially skilled in such foreign law, science or art are relevant facts. Such persons are called experts. असे नमुद केलेले आहे. त्यातच कलम 46 मध्ये Facts bearing upon opinions of experts – Facts, not otherwise relevant, are relevant if they support or are inconsistent with the opinions of experts, when such opinions are relevant. असे नमुद आहे. सदर बाबींचे अवलोकन करता, विद्युत निरिक्षकांचा अहवाल हा तक्रारीतील घटना व त्यानंतर गेलेला कालावधी यांचेत सुसंगती नाही त्यामुळे सदर अहवाल या तक्रारीकामी वाचता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे. प्रस्तुतच्या तक्रारीत विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराची शेत जमीन ही गट क्र.285/1 पासुन लांब अंतरावर आहे. मंध्यतरी 5/6 शेतजमीन आहे इतर शेतक-यांच्या तक्रारी नाहीत त्यांचे शेताला आग लागली नाही. प्रस्तुतच्या तक्रारीतील घटना पाहता, विरुध्द पक्ष यांनी शेतातुन विद्युत तारा गेलेल्या आहेत हे मान्य केलेले आहे मात्र तारांचे घर्षण होऊन शॉर्ट सर्कीट झाले ही बाब नाकारलेली आहे. घटना या ठरवुन होत नसतांत म्हणुन त्याला अपघात म्हणतात व अपघात हे सांगुन होत नसतात म्हणुनच त्याला अपघात म्हणतात. तक्रारदाराची तक्रार तारांचे घर्षण झाले, व त्यामुळे शेतीतील पिके जळाली या कथनाचा विचार करता, घर्षणामुळे ठिणगी उडाली असेल व त्यावेळेस हवेचा रोख ज्या दिशेने असेल त्या शेतात ती पडली असेल व पिके जळाली असतील असे म्हणण्यास, समजण्यास पुरेसा वाव आहे असे या मंचाचे मत आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदाराने त्यांची तक्रार शाबीत केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. याकामी तक्रारदाराने खालील मा.वरीष्ठ न्यायालयांचे निकाल-पत्रे दाखल केलेली आहेत.
1) मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली, सर्कीट बेंच बैंगलोर 2006 एन सी जे 617 (एन सी) कर्नाटका पॉवर ट्रान्समीशन कॉर्पो लि // विरुध्द // मणी थॉमस यात खालील न्यायीक तत्व विषद केलेले आहे.
Electricity—Entire plant got burnt—Sought compensation—Appreciation of evidence—Hanging electric lines—Apprehension of short circuit—No evidence to substantiate otherwise—Consideration of –Held—Clear deficiency in service—Compensation is payable.
2) मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी रिव्हीजन पिटीशन क्र.37/2002 द.असिस्टंट एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर सब-डिव्हीजन नं.11, कर्नाटका स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड आणि इतर // विरुध्द // निलकांता गोयुडा सिध्दगौडा पाटील यामध्ये खालीलप्रमाणे न्यायीक तत्व विषद केलेले आहे.
Electricity negligence—Crop damage—Complainant claiming damages for loss of sugarcane crops, coconut trees and chikku trees which were burnt because of sparking from the electric wires passing over the field of the complainant—Distance between the poles was too much and the wires were hanging loose due to distance-Authorities of the Electricity Board were informed to rectify the defect but no action was taken- Forums below rightly held that there was deficiency in service on the part of the petitioners-OP.
3) मा.राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, चंदीगढ यांनी एच.व्ही.पी.एन // विरुध्द // बग राम यामध्ये खालीलप्रमाणे न्यायीक तत्व विषद केलेले आहे.
(ii) Consumer Protection Act, 1986—Section 2 (1)(g) –Electricity-Sparking cables—Damage to crop – Over-handing cables passed through field – fire caused due to sparking from cables of electricity department – Agriculture Development Officer visited spot and prepared inspection report—Evidence that crop of complainant burnt and he sustained loss of Rs.25,000—There was indeed such damage – OP liable to pay said sum.
8. उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयांनी व्यक्त केलेले वरील न्यायीक तत्वे या तक्रारीस लागु होतात. सबब वरील एकंदर विवेचनावरुन तक्रारदार यांनी विरुध्द पक्षास सदोष सेवा दिली या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे सबब मुद्या क्र. 2 चे उत्तर आम्ही होकरार्थी देत आहोत. विरुध्द पक्षाचे कृतीमुळे तक्रारदाराचे पिकाचे नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाकडुन नुकसान भरपाईपोटी रु.3,40,000/- ची मागणी केलेली आहे तसेच तहसिलदार, भडगांव यांनी केलेल्या नैसर्गीक आपत्ती पंचनाम्याची प्रत दाखल केलेली असुन त्यातुन एकंदर रु.1,35,000/- चे नुकसान झाल्याचे नमुद केलेले आहे मात्र रक्कम रु.1,35,000/- चे नुकसान कसे झाले याबाबत स्पष्टीकरण नाही. त्यामुळे आमचे मते उपलब्ध कागदपत्रे, झाडांचे वय, झाडांची संख्या, एकंदर जमीनीचे क्षेत्रफळ इत्यादी परिस्थितीचा विचार करता सरासरी नुकसान भरपाई देणे उचित ठरेल असे मंचाचे मत आहे., त्यानुसार पिकांचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.60,000/-, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- देणे उचित होईल या निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास नुकसानी दाखल रक्कम रु.60,000/-(अक्षरी रक्कम रु.साठ हजार मात्र ) या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 5,000/- (अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/-(अक्षरी रक्कम रु.दोन हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/09/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.