जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 619/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 09/05/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 06/06/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2009
1. श्री.पांडुरंग हिरामण पाटील,
उ.व.60 वर्षे, धंदाः शेती,
2. निलेश (शाम) पांडुरंग पाटील,
उ.व.31 वर्षे, धंदाः शेती,
दोघे रा.कुरवेल, ता.चोपडा,जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.,
निमगव्हाण कक्ष चोपडा-2, उपविभाग चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री बहादूरसिंह भिमसिंह जमादार वकील हजर
सामनेवाला तर्फे श्री.जी.के.पाटील वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार क्र. 1 हा सामनेवाला कंपनीचा विज ग्राहक असुन तक्रारदार क्र. 2 हा तक्रारदार क्र. 1 चा मुलगा आहे. तक्रारदार क्र. 1 व 2 यांची एकत्रीत शेतजमीन तामसे बु. शिवारात गट नं.471 बागायती असुन सदर शेतजमीनीची देखभाल तक्रारदार क्र. 2 हा करतो. तक्रारदाराचे गट क्र.471 या जमीनीत असलेल्या बोअरवेल मधुन पाणी उपसा करणेसाठी सामनेवाला यांनी विज पुरवठयाची जोडणी नियमाप्रमाणे करुन दिलेली आहे. तक्रारदार हे सदर शेत जमीनीमध्ये ऊसाची लागवड करुन त्याव्दारे उत्पन्न घेत असतो. तक्रारदाराचे सदर नमुद शेत जमीनीवर तोडणी लायक उत्तम प्रकारे खोडवा वाढविलेला असतांना दि.14/09/2007 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन घेतलेल्या विज पुरवठा करणा-या तारांमधील कमी अंतरामुळे तसेच विजेचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे शॉर्ट सर्कीट होऊन स्पार्क होऊन आगीच्या ठिणग्या पडुन सदर ऊसाचे पिक 100 टक्के जळुन गेले आहे. तक्रारदाराने त्याबाबत सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी तक्रार करुनही सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही. सामनेवाला कंपनीचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार क्र. 1 व2 यांचे जमीनीतील पिकाचे 100 टक्के जळुन नुकसान झालेले आहे. तक्रारदारास सदर पिकास वेळोवेळी खते वगैरे चे मात्रा देणेकामी रु.25,000/- खर्च आला तसेच अपेक्षीत 90 ते 100 टन ऊसाचे 1,000/- रु.प्रती टनाप्रमाणे रु.90,000/- इतके नुकसान झाले आहे. सबब रक्कम रु.1,15,000/- 18 टक्के व्याजासह नुकसान भरपाईपोटी मिळावेत, अर्जाचा खर्च रु.10,000/- व मानसिक शारिरिक नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
2. सामनेवाला विज वितरण कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. सन 2007-08 साली चोपडा तालुक्यातील चहार्डी साखर कारखाना जवळ जवळ 1 ते दिड महीने उशिराने सुरु झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीस उशीर झाला आहे. तसेच चालु वर्षी चोपडा साखर कारखान्याने प्रती टन रु.500/- प्रमाणे भाव ठरवुन दिलेला असल्याने व त्यामुळे ऊस लागवड परवडण्यासारखी नसल्याचे उद्येशाने काही शेतक-यांनी त्यांचे शेतातील ऊस स्वतः तोडुन शेत मिळकत मोकळी करुन घेतली व त्यावर अन्य दुसरे पिक लावुन घेतले. तसेच काही शेतक-यांनी त्यांचे शेतातील ऊस तोडण्यास उशीर होईल व कारखाना ऊस तोड पूर्ण करु शकणार नाही यासाठी शेतातील ऊस स्वतः जाळुन टाकून शेती तयार करुन घेतली आहे. याप्रमाणे तक्रारदारांनी देखील त्यांचे शेतातील ऊस कारखान्याचे मजुर लवकर न मिळाल्याने स्वतःचा ऊस स्वतः जाळुन टाकलेला आहे. सामनेवाला यांचा सदर प्रकरणाशी काहीएक संबंध नाही कारण तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन घेतलेल्या विद्युत पुरवठयाचे तारांमधील अंतर योग्य होते तसेच विजेचा प्रवाह दाब हा आवश्यक तेवढाच होता त्यामुळे तक्रारदाराच्या शेतातील तारा हया अगदी सुस्थितीत होत्या. सबब तक्रारदाराचे कथनाप्रमाणे शॉर्ट सर्कीट होऊ ऊस पिक जळण्याचा काहीएक संबंध येत नाही. ऊस जळाल्याने तक्रारदाराचे कोणतेही नुकसान होत नाही त्यामुळे तक्रारदाराचे उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही. तक्रारदारांना साखर कारखान्याकडुन ऊसाचे संपुर्ण पैसे मिळालेले आहेत. सामनेवाला कंपनीकडुन देखील पैसे मिळतील या हेतुने तक्रारदारांनी प्रस्तुतचा खोटा अर्ज सामनेवाला विरुध्द दाखल केलेला आहे. तक्रारदारांना प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्यात यावा व तक्रारदाराकडुन नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... नाही
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार उस खरोखर शॉर्ट सर्कीट होऊन जळाला किंवा अन्य कोणत्या मार्गाने जळाला हे ठरविण्याचा अधिकार केवळ इलेक्ट्रीक इन्सपेक्टर यांनाच आहे. परंतु तक्रारदार त्यांचे उसाचे नुकसान सामनेवाला यांचे विज तारातील ठि णगीमुळे पडला किंवा नाही हे शाबीत करण्याकरीता इलेक्ट्रीक इन्सपेक्टर यांना लेखी कळविलेले नाही व त्यांचे जळीत उसाचा पंचनामा त्यांचेकडून करवुन घेतलानाही. सबब इलेक्ट्रीक इन्सपेक्टर यांचे अभिप्रायाव्यवतिरिक्त उस कशामुळे जळाला हे ठरविता येणार नाही.
तक्रारदार यांनी त्यांचा उस जळाला याबाबत मंडळ कृषी अधिकारी व तलाठी तावखेडा यांचे उपस्थित त्यांचे जळीत उसाचा पंचनामा करवून घेतलेला आहे. त्यात संदरील अधिकारी यांनी सदरील पंचनामा यात फक्त जळीत उसाचा पंचनामा असे म्हटले आहे. सदरील पंचनामा दिनांक 15.09.2007 रोजी केलेला आहे व तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे त्यांचा उस 14.09.2007 रोजी जळालेला आहे. तक्रारदार यांनी त्यांचा उस जळाल्यानंतर सामनेवाला यांना लगेच कळवीणे भाग होत. परंतु तक्रारदार यांनी तसे केल्याचे दिसत नाही. जेणेकरुन सामनेवाला हे इलेक्ट्रीक इन्सपेक्टर यांना प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी कळवू शकले असते. परंतु तक्रारदार यांनी सदरील जळीत उसाची भरपाई मागणेसाठी त्यांचे वकीलामार्फत नोटीस दिनांक 1 जानेवारी 2008 रोजी सामनेवाला यांना पाठविलेली आहे.
सबब वरील कारणांचा विचार करता, तक्रारदार यांचा उस सामनेवाला यांचे चुकीमुळेच जळाला हे इलेक्ट्रीक इन्सपेक्टरचे अहवलाअभावी सिध्द होऊ शकलेले नाही. तसेच तक्रारदार यांनीही त्यांचे उसास आग लागल्यानंतर सामनेवाला यांना वेळीच त्यांचे उसाचा पंचनामा करणसाठी बोलावलेले नाही. अशा परिस्थीतीत सामनेवाला यांचा कोणताही दोष सिध्द होऊ शकलेला नाही. सबब तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणेस हक्कदार नाही. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज नामंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारदार यांनी मीटर बदलवीणेबाबत योग्य ती फी भरल्यास त्यांचे मीटर बदलवून द्यावे. उभयपक्षकारांच्या इतर प्रार्थनेबाबत कोणतेही आदेश नाहीत.
( क ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव