निकालपत्र :- (दि.19.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, मौजे मल्लवाडी, ता.राधानगरी येथील तक्रारदारांची सर्व्हे नं.14/1 व 14/2 या वडिलार्जित मालकी वहिवाटीची शेतजमिन आहेत. सदर शेतजमिनीत तक्रारदारांच्या मालकीची विहीर आहे. सदर विहीरीवर तक्रारदारांचे वडिलांनी 5 एच्.पी.ची इलेक्ट्रिक मोटर पंप बसविला आहे. त्यासाठी सामनेवाला विद्युत कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे, त्याचा ग्राहक क्र.265410244334 असा आहे. तक्रारदारांचे वडिल महादेव शंकर पाटील हे मयत झाले आहेत व तक्रारदार हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. जुलै 2007 पर्यन्त तक्रारदारांनी वेळोवेळी विद्युत देयके भरणा केलेली आहेत. तक्रारदार त्यांच्या शेतात ऊस, भात, भुईमुग अशी पिके घेत असतात. दि. 11.07.2007 रोजी तक्रारदारांचे इलेक्ट्रिक मोटरपंपासाठी विद्युत पुरवठयासाठी असणारा सिमेंटचा डांब मोडून पडलेला आहे व विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सामनेवाला कंपनीचे कार्यालयात असणा-या तक्रार निवारण नोंदवहीमध्ये त्याचदिवशी तक्रार नोंदविली आहे. त्यानंतर वेळावेळी समक्ष भेटूनही तक्रार निवारण न झालेने तक्रारदारांनी परत दि.06.08.2007, दि.06.09.2008, 30.11.2008, 10.05.2009 अशा लेखी तक्रारी नोंदविलेल्या आहेत. तरीही सामनेवाला विद्युत कंपनीने डांब बसवून तक्रारदारांचा विद्युत पुरवठा चालू करुन दिलेला नाही. त्यामुळे एकरी 40 टन ऊस असे एकूण क्षेत्रामध्ये 80 टन ऊसाचे नुकसान झाले आहे व अंदाजे 1,50,000/- चे नुकसान झाले आहे. तसेच, विद्युत पुरवठा बंद काळातही सामनेवाला यांनी तक्रारदारांना बेकायदेशीरपणे बिल पाठविले आहे व तक्रारदारांना मानसिक त्रास दिलेला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर करुन रुपये 1,50,000/- नुकसान भरपाई, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाला क्र.3 यांची उत्तरी नोटीस, दि.20.07.07 रोजीचा पंचनामा, ग्रामपंचायत-मल्लेवाडीने केलेला पंचनामा, विद्युत देयके, विहीरीचे छायाचित्र, सिमेंट पोल पडलेबाबतचे छायाचित्र, सामनेवाला यांचेकडील तक्रार नोंदवहीची प्रत, सामनेवाला क्र.3 यांचेकडे दिलेला तक्रार अर्ज, ज्या पोलवरुन तक्रारदारांचे मोटरपंपास विद्युत पुरवठा होतो त्या पोलची छायाचित्रे, भिकाजी भिमराव पाटील यांचे नांवे असले कनेक्शनचे बिल, महादेव पाटील यांचा मृत्यूचा दाखला, ग्रामपंचायत मल्लेवाडी यांचा दाखला, सामनेवाला क्र.3 यांचेकडे केलेला अर्ज, दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याची टनेज पावती, सर्व्हे नं.14/1 व 14/2 चे 7/।2 उतारे, दि.30.06.07 चे देयक, रेशनकार्डस् इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विद्युत कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, महादेव शंकर पाटील यांचे नांवे मार्च 2007 अखेर रुपये 5,970/- इतकी बाकी असून त्यानंतरही त्यांचे नांवे पुढील वीज बिलांची बाकी आहे. सन 2007 च्या पावसाळयामध्ये राधानगरी तालुक्यात ब-याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे, वादळवा-यामुळे वीजेच्या तारा, पोल व वीज साहित्यांची बरीच पडझड झाली होती. त्यामुळे या भागतील सर्व गांवामध्ये घरगुती लाईट व दळप कांडप गिरणी, पिकाच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही काम सर्वप्रथम करणेसाठी वीज पुरवठा चालू करणेसाठी वीज तारा, इलेक्ट्रिक पोल यांची जोड दुरुस्ती शक्यतोपरीने करुन दिली. तसेच, जुलै 2007 मध्ये अतिवृष्टी झाल्याने व शेतात पाणी व उभे पिक असल्याने नविन पोल व साहित्य नेणे अवघड काम होते. परंतु, ज्या-ज्या ठिकाणी शक्य होते त्या-त्या ठिकाणी वीज पुरवठा चालू केला आहे. तसेच, तक्रारदारांच्या इलेक्ट्रिक मोटरपंपासाठी विद्युत पुरवठा चालू केला आहे व त्यानंतर तक्रारदारांना विद्युत देयके दिली आहेत. तक्रारदारांचे कोणतेही नुकसान झालेले नसून तक्ररदारांनी त्यांच्या शेतामधील ऊस दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याकडे फेब्रुवारी 2008 मध्ये पाठविलेला आहे. तक्रारदारांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व नुकसानीदाखल रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदारांचे सन 2005-06 या कालावधीतील ऊस बिलाचा तपशील, सन 06-07 ऊसाची पावती, सन 06-07 ऊस बिलाचा तपशील, गट नं.14/1 व 14/2 चे 7/12 उतारे, 8-अ चा उतारा, सन 07-08 ऊस वजन पावती, सन 05 ऊस वजन पावती, भिकाजी भिमराव पाटील यांचे देयक इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतले आहेत. दि.11.07.2007 रोजी तक्रारदारांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंपास विद्युत पुरवठा करणारा विद्युत पोल वा-याने पडून तारा तुटल्याने तक्रारदारांचा विद्युत पुरवठा बंद झालेला आहे ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूंना मान्य आहे. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करुन दिलेला आहे असे त्यांच्या म्हणण्यात कथन केले आहे. तक्रारदारांनी सदरची वस्तुस्थिती नाकारली आहे व अद्यापपर्यन्त विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करुन दिला नसलेबाबत प्रतिपादन केले आहे. सामनेवाला विद्युत कपंनीने तक्रारदार हा विद्युत पुरवठा सुरु करुन घेणेबाबत अडथळा करीत असलेबाबत युक्तिवादाचेवेळेस प्रतिपादन केले आहे. परंतु, तक्रारदार हे शेतकरी आहे, त्यांनी त्यांच्या शेतात विहीर काढली व इलेक्ट्रिक मोटरपंप बसविला आहे ही वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदार हा विद्युत पुरवठा सुरु करुन देणेस अडथळा करीत आहे हे सामनेवला यांन युक्तिवादाचेवेळेस केलेले प्रतिपादन विसंगत आहे. तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीला वेळोवेळी लेखी तक्रारी दिलेल्या आहे व वकिलामार्फत नोटीसही पाठविलेली आहे. सदर पत्रव्यवहाराच्या प्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. याचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या इलेक्ट्रिक मोटरपंपासाठीचा विद्युत पुरवठा अद्याप सुरु करुन दिलेला नाही ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. (7) प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला विद्युत कपंनीने तक्रारदारांच्या शेतजमिनीचे 7/12 उतारे दाखल केले आहे. तसेच, तक्रारदारांनी दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला ऊस पाठविलेबाबतची माहिती घेवून ती प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी दाखल केली आहे. याचा विचार करता तक्रारदारांच्या शेतीचे नुकसान झाले नसल्याचे दिसून येत. परंतु, अद्याप इलेक्ट्रिक मोटरपंपासाठी विद्युत पुरवठा केला नसल्याने सामनेवाला विद्युत कंपनीने त्यांच्या सेवेत त्रुटी ठेवल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सबब, तक्रारदार हे आर्थिक व मानसिक त्रासापोटी भरपाई मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आदेश 1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांचा ग्राहक क्र. 265410244334 चा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करुन द्यावा. 3) सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना आर्थिक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावे. 4) सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |