जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 633/2009. तक्रार दाखल दिनांक : 21/11/2009. तक्रार आदेश दिनांक : 27/04/2011. सौ. लक्ष्मीबाई केदारनाथ वजीरकर, वय 70 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. सर्व्हे नं.136, प्लॉट नं.185, अभिषेक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी करिता :- मुख्य अभियंता (वाणिज्य), जुनी मील कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.बी. गायकवाड विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एस.एस. कालेकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी घरगुती वापरासाठी दि.7/9/2006 पासून विरुध्द पक्ष यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे आणि त्यांचा ग्राहक क्र.330241892077 आहे. त्यांना सुरुवातीपासून 100 ते 130 युनीट वापराचे वीज देयक येत होते आणि त्याचा भरणा त्यांनी वेळोवेळी केला आहे. परंतु त्यांना माहे मे चे रु.1,700/- व जून 2008 चे रु.10,730/- चे देयक अवास्तव व चुकीचे देण्यात आले. त्याबाबत तक्रारदार यांनी तक्रार केली असता त्याची दखल न घेता त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे त्यांना प्रत्यक्ष वापर युनीटप्रमाणे वीज बील मिळावे आणि त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत चालू करण्याचा विद्युत वितरण कंपनीस आदेश करावा, अशी विनंती केली आहे. तसेच त्यांनी मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- ची मागणी केलेली आहे. 2. विद्युत वितरण कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांचे घर बंद असल्यामुळे त्यांना ऑक्टोंबर 2007 पासून सरासरी वापर तत्वावर बिले देण्यात आलेली आहेत. तसेच तक्रारदार यांच्या तक्रारीमुळे दि.6/4/2008 रोजी त्यांची मीटर बदलण्यात येऊन नवीन मीटर बसविण्यात आले. मीटर बदलताना शेवटीची रिडींग 3141 होती. तक्रारदार यांना ऑक्टोंबर 2007 ते जून 2008 पर्यंत 9 महिन्याच्या कालावधीचे 3174 युनीट वापराचे रु.10,725/- देण्यात आले. तक्रारदार यांनी बिलाचा भरणा न केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून वीज पुरवठयाची सेवा घेत होते आणि त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांना मे व जून 2008 चे देयक अवास्तव व चुकीचे देण्यात आले आणि त्याबाबत तक्रारदार यांनी तक्रार करुनही त्याची दखल न घेता त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. उलटपक्षी, तक्रारदार यांचे घर बंद असल्यामुळे त्यांना ऑक्टोंबर 2007 पासून सरासरी वापर तत्वावर बिले देण्यात आलेली होती आणि तक्रारदार यांचे नवीन मीटर बदलताना शेवटीची रिडींग 3141 असल्यामुळे ऑक्टोंबर 2007 ते जून 2008 पर्यंत 9 महिन्याच्या कालावधीचे 3174 युनीट वापराचे रु.10,725/- देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 5. विरुध्द पक्ष यांनी मीटर बदलताना तयार केलेला रिपोर्ट दाखल केलेला आहे. त्यामध्ये तक्रारदार यांचे मीटर बदलून नवीन मीटर बसविताना जुन्या मीटरवर नोंदलेले मागील रिडींग 4254 दर्शवते. तसेच त्या रिपोर्टवर ‘सौ.अनुराधा’ असे नांव दर्शविणारी स्वाक्षरी आहे. तक्रारदार यांनी रि-जॉईंडरद्वारे सदर स्वाक्षरी त्यांची किंवा त्यांच्या नातेवाईकाची नसल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी मीटर बदलताना रिडींग वापर 3141 असल्याचे नमूद केलेले करुन त्याप्रमाणे देयक दिल्याचे नमूद केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ज्या रिपोर्टवर तक्रारदार यांची स्वाक्षरी नाही, त्या रिपोर्टवर नोंदलेले अंतीम रिडींग पुराव्याच्या दृष्टीने महत्व देता येणार नाही. निर्विवादपणे, तक्रारदार यांना त्यांच्या वीज वापराप्रमाणे व मीटरवर नोंद केलेल्या युनीटप्रमाणे वीज देयकाची आकारणी झालेली नाही, हे स्पष्ट आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. मीटर बदलताना तयार केलेल्या रिपोर्टवर नोंदलेल्या रिडींगचा आधार घेऊन तक्रारदार यांना दिलेले देयक रद्द करणे उचित ठरते. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दि.23/6/2008 रोजी दिलेले रु.10,730/- चे देयक रद्द करण्यात येते. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा वीज पुरवठा या आदेशाच्या प्राप्तीपासून दोन दिवसाचे आत पूर्ववत जोडून द्यावा. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |