जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 237/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-14/09/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 26/09/2013.
कल्पना शालीक पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.मु.पो.कु-हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर,
जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. भारतीय जीवन बीमा निगम तर्फे
1.शाखाप्रबंधक, भुसावळ,
1.ता.भुसावळ,जि.जळगांव.
2. भारतीय जिवन बिमा निगम,
जीवन प्रकाश, गडकरी चौक जवळ,
गोल्फ ग्राऊंड, जुना आग्रा रोड, नाशिक. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.आर.के.पन्हाळे वकील.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 तर्फे पी.जी.मुधडा वकील.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः नैसर्गीक मृत्युबाबत ची नुकसान भरपाई विमा क्लेम रक्कम देण्याचे नाकारुन दिलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे पती शालीक सिताराम पाटील यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनीकडुन नैसर्गीक मृत्युबाबत रु.1,25,000/- व अपघाती मृत्युबाबत रक्कम रु.2,50,000/- ची पॉलीसी विमा पॉलीसी क्र.961856172 अन्वये काढलेली होती. सदर पॉलीसीचा नियमितपणे नेमलेला मासिक हप्ता रु.510/- तक्रारदाराचे पती भरणा करीत होते. दरम्यान श्री.शालीक सिताराम पाटील यांचे दि.9/8/2011 रोजी कु-हा काकोडा येथे विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाले. तक्रारदाराचे पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे रक्कम रु.2,50,000/- नियमाप्रमाणे / कराराप्रमाणे मिळणे आवश्यक होते. तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील विरुध्द पक्षाने तक्रारदारास विमा क्लेम रक्कम देण्यास टाळाटाळ करुन मानसिक शारिरिक व आर्थिक त्रास दिलेला आहे. सबब अपघाती निधनामुळे मिळणारी विमा रक्कम रु.2,50,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अशी एकुण रक्कम द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी म्हणणे दाखल केलेले असुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. अद्याप पावेतो तक्रारदार हिने क्लेम मिळण्याकरिता विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे द्यावी लागणारी आवश्यक ती माहिती व त्यास लागणारी सर्व कागदपत्रे जमा केलेली नाहीत. विमेदार शालीक सिताराम पाटील यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा उतरवितांना त्यांचे प्रकृतीविषयीची अचूक माहिती विमा प्रस्तावात उघड केलेली नाही. शालीक पाटील यांनी विमा प्रस्ताव करण्यापूर्वी म्हणजे दि.21/01/2008 रोजी नशिराबाद जवळ जळगांव भुसावळ रोडवर झालेल्या रोड अपघातात शालीक पाटील यांना कायमस्वरुपी अपंगत्व आलेले होते. यासंबंधीची माहिती विमा प्रस्तावात नमुद केलेली नाही त्यामुळे विमा कराराचा भंग झाल्याने विमा कंपनी तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम देण्यास जबाबदार नाही. मयत विमेदाराने आपल्या प्रकृती बाबत विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे ही खोटी दिलेली असल्याने विमा कंपनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारीत आहे. सबब वरील सर्व कारणांचा विचार होउन तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी व तक्रारदार हिने खोटी तक्रार केली म्हणुन नुकसानी दाखल तक्रारदाराकडुन रु.25,000/- नुकसान भरपाई दाखल व रु.10,000/- तक्रार अर्जाचे खर्चादाखल मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, व विरुध्द पक्षाचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
2. विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? नाही.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे कोणताही नाही.
6. मुद्या क्र. 1 व 2 - विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी हजर होऊन विमेदार शालीक सिताराम पाटील यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा उतरवितांना त्यांचे प्रकृतीविषयीची अचूक माहिती विमा प्रस्तावात उघड केलेली नाही. शालीक पाटील यांनी विमा प्रस्ताव करण्यापूर्वी म्हणजे दि.21/01/2008 रोजी नशिराबाद जवळ जळगांव भुसावळ रोडवर झालेल्या रोड अपघातात शालीक पाटील यांना कायमस्वरुपी अपंगत्व आलेले होते. यासंबंधीची माहिती विमा प्रस्तावात नमुद केलेली नाही त्यामुळे विमा कराराचा भंग झाल्याने विमा कंपनी तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम देण्यास जबाबदार नाही असे प्रतिपादन त्यांचे लेखी म्हणण्यातुन व युक्तीवादातुन केलेले असुन लेखी म्हणण्यासोबत विमा पॉलीसी क्र.963694263 चे प्रपोजल फॉर्मची सत्यप्रत, विमा पॉलीसी स्टेटस रिपोर्टची मुळ प्रत, मोटार अपघात न्यायाधिकरण, जळगांव यांचेकडे दि.9/1/2009 रोजी केलेल्या क्लेम बाबतची सत्यप्रत, शालीक सिताराम पाटील यांचे दि.12/12/2008 रोजीचे अपघातात अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, शालीक सिताराम पाटील यांचे दि.09/01/2009 रोजीचे शपथपत्र इत्यादी कागदपत्र दाखल केलेले आहेत. सदरचे कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदाराचे मयत पती शालीक पाटील हे हयात असतांना त्यांना अपघातामुळे अपंगत्व आलेले होते व सदरची बाब त्यांनी पॉलीसी प्रपोजल फॉर्म भरतांना विरुध्द पक्ष विमा कंपनीपासुन लपवुन ठेवली होती हे विरुध्द पक्ष विमा कंपनीने दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होत आहे.
7. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे वकीलांनी याकामी मा.वरिष्ठ न्यायालयाने पारीत केलेल्या निकालातील न्यायीक तत्वाचा आधार घेतला, तो खालीलप्रमाणेः-
मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी रिव्हीजन पिटीशन क्र.1585/2011 लाईफ इंन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया // विरुध्द // कुसूम पात्रो यामध्ये खालीलप्रमाणे न्यायीक तत्व विषद केलेले आहे.
By not disclosing the facts of his prior accident and subscequent in patient treatment, at the time of proposal on a later date, to the Corporation or his Medical Examiner, the deceased life assured was guilty of knowingly withholding correct information about the status of his health. Repudiation is in order even though the cause of death had no medical nexus with the accident that he suffered or the consequential disability.
8. वर नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाने नमुद केलेले न्यायीक तत्व प्रस्तुत तक्रारीस तंतोतंत लागु पडते या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. तक्रारदाराचे पतीने विमा पॉलीसी उतरविण्यापुर्वी त्याला असलेल्या अपघातातील अपंगत्वाबाबतची माहिती लपवुन ठेवुन विमा पॉलीसी लाभ घेण्याचे हेतुने उतरविली असल्याचे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कागदोपत्री पुराव्याव्दारे सिध्द केलेले आहे. यास्तव विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विमा कंपनीकडुन तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही सेवा त्रृटी झालेली नसल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही मुद्या क्र. 2 चे उत्तरादाखल खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 26/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.