निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यांनी प्रमोद मोहनराव सोनटक्के व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.यांचेविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराचे तक्रारीतील मागणी खालील प्रमाणे आहेः-
2. ग्राहक तक्रार क्रमांक 150/2014 ज्यात दिनांक 03.02.2015 रोजी
अंतरीम निकाल झालेला आहे, तो नामंजूर करण्यात यावा.
3. तसेच मयत मोहनराव बाबाराव सोनटक्के यांचे नावावर असलेले मिटर
ग्राहक कमांक 55310000724 चा फक्त गैरअर्जदार क्र. 1 यांच्या नावाने
झालेला फेरफार रद्य करुन, अर्जदारासह, मयत- मोहनराव सोनटक्के यांचे
इतर सर्व कायदेशीर वारसांच्या नावे मयत-मोहनराव बाबराव सोनटक्के
यांचे नावावर असलेले मिटर ग्राहक कमांक 55310000724 चा फेरफार
करण्यात यावा.
4. गैरअर्जदार यांच्या चुकीच्या कृत्यामुळे व त्रुटीच्या सेवेमुळे अर्जदारास
झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, तसेच सदर अनुचित कृत्य
केल्याने अर्जदाराची समाजात मानहानी झाल्यामुळे रक्कम
रु.4,00,000/- अर्जदारास देण्याचे गैरअर्जदार यांना आदेश देण्यात
यावेत. तसेच दावा खर्च रु.10,000/- अर्जदारासदेण्याचे आदेश
गैरअर्जदार यांच्या विरुध्द पारित करावेत.
5. त्याशिवाय अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व त्यांचे सर्व संबंधीत यांचेकडून
येत असलेल्या धमक्याबाबत सर्वांना प्रतिबंधीत करण्यात यावे. अन्यथा
त्यांचे भांडणातून अर्जदार व त्यांचे कुटूंबीयाच्या जिवीतास धोका होईल.
6. गैरअर्जदार क्र. 2 यांचेविरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
कंपनीच्या वरिष्ठांनी त्यांचे कार्यालयाची दिशाभूल करुन केलेल्या
गैरकृत्याबाबत संबंधीताविरुध्द खातेनिहाय चौकशी करावी असा आदेश
पारित करण्यात यावा.
7. तसेच इतर योग्य वाटतील असे आदेश अर्जदाराच्या हक्कात पारित
करण्यात यावेत.
अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदाराची मागणी क्रमांक 2 मान्य करता येत नाही. कारण ग्राहक तक्रार क्रमांक 150/2014 या तक्रारीचा अंतीम निकाल दिनांक 03.02.2014 रोजी झालेला आहे. सदरील निकालाची प्रमाणित प्रत अर्जदाराने त्यांचे वकीलामार्फत वकीलपत्र व शपथपत्र देऊन मंचातून काढून घेतलेली आहे. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे की, तक्रार क्रमांक 150/2014 ही प्रलंबित असल्याने ती नामंजूर करण्यात यावी हे पुर्णतः खोटे व चुकीचे आहे. कारण अर्जदारास व त्याच्या वकीलास तक्रारीमध्ये अंतीम आदेश होऊन निकाली निघाली असल्याची संपूर्ण माहिती आहे. तक्रार क्रमांक 150/2014 ची प्रमाणित प्रत मागतांना अर्जदाराने शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रार निकाली निघाली असतांनाही प्रलंबित आहे असे खोटे शपथपत्र या तक्रारीसोबत अर्जदाराने दिलेले आहे. तक्रारीसोबत दाखल केलेल्या अर्जदाराच्या शपथपत्रामधील परिच्छेद क्र. 15 मध्ये ही बाब नमूद आहे. मा. राष्ट्रीय आयोगाने प्रकरण क्रमांक 2027/2014, मे.क्रीश सिद्ध् विरुध्द लक्ष्मी गर्ग 2015( I ) C.P.R. 395 N.C. दिलेल्या निर्णयामधील filing of false affidavit before Consumer Forum is very serious matter. त्यामुळे अर्जदाराची मागणी क्रमांक 2 मंच मान्य करु शकत नाही. मागणी क्रमांक 3 कायदेशीर वारसाचे नावे मयत प्रमोद मोहनराव सोनटक्के यांचे नावावर असलेले मीटरची फेरफार करावी असा आदेश देण्याचा अधिकार मंचाला नसल्यामुळे सदरील मागणी मंच मान्य करु शकत नाही. अर्जदाराची समाजात मानहानी झाल्यामुळे रक्कम देण्याचा आदेश अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ग्राहक संरक्षण कायदयानुसार नसल्यामुळे सदरील मागणी मान्य करता येत नाही. मागणी क्रमांक 4 अर्जदाराला गैरअर्जदार यांचेकडून धमक्या येत असल्याने धमक्याबाबत प्रतिबंधीत करण्यात यावे असा आदेश देण्याचा अधिकार ग्राहक मंचाला नाही. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अर्जदाराने तक्रारीमध्ये केलेली आहे. मुळातच कोणत्याही अधिका-यांची खातेनिहाय चौकशीचा आदेश पारीत करणेचा अधिकार ग्राहक मंचाला नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांचेतील वाद बघता सदरील वाद हा दिवाणी स्वरुपाचा आहे. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 चे ग्राहक नाहीत. अर्जदाराने तक्रार क्रमांक 150/2014 ही अंतिम निकाली निघाली असतांनाही प्रलंबित आहे असे खोटे व चुकीचे कथन शपथपत्राव्दारे केलेले असल्याने अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 26 नुसार खोटी तक्रार दाखल केलेली आहे. मा. राष्ट्रीय आयोगाचे वरील निकालानुसार अर्जदाराने खोटे शपथपत्र देऊन गंभीर चुक केलेली आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार प्राथमिक अवस्थेत फेटाळण्यात येते.