निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यांचे सोमठाणा येथे चार रुमचे घर आहे. सदर घरात गैरअर्जदार कंपनीचा विद्युत मीटर असून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. सदरचे मीटर हे अर्जदाराचे वडीलांचे नावे आहे. अर्जदाराचे वडील मयत झालेले असल्याने त्यांचे पश्चात अर्जदार हा त्याचा कायदेशीर वारस आहे. गैरअर्जदार यांनी दिलेले विद्युत बील अर्जदाराने वेळोवेळी नियमीतपणे भरणा केलेले आहे. अर्जदाराचा सरासरी विद्युत वापर हा प्रतिमहा 100 ते 250 युनीट इतकाच होता. परंतु सन 2011 ते 2012 मध्ये अर्जदाराना मिळणारी नियमित बीले ही जास्तीची,अवाजवी व चुकीची असल्याचे अर्जदाराचे लक्षात आले. कारण अर्जदाराने सदरची बीले पाहिल्यानंतर अर्जदाराचा विद्युत वापर तेवढा जास्त प्रमाणात नसल्याचे दिसून आले. सन 2011 मध्ये जुन,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्याची बीले पाहता कधी 241 तर कधी 9449 तर कधी 300, 200 व 300 इतका अवाजवी युनीटचा वापर गैरअर्जदार यांनी चुकीने दाखविलेला आहे. सन 2011-2012 मध्ये आलेली जास्तीची बीले ही चुकीची वाटल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे तक्रार दिली. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने दिनांक 18.10.2011 रोजी गैरअर्जदार यांचकेडे लेखी तक्रार केली. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या दिलेल्या अर्जावर त्यांचे मिटर तपासणीसाठी नेऊन मीटरमध्ये कुठलाही फॉल्ट नाही, मीटर बरोबर आहे असा अहवाल दिला व दिलेले बील भरावे अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे पत्र दिनांक 13.12.2011 रोजी दिले. यावर अर्जदाराने दिनांक 17.12.2011 रोजी दुसरा अर्ज देऊन मीटर फॉल्टी असल्याबाबतचे कळवून दिनांक 18.10.2011 चा अहवाल अमान्य असल्याचे गैरअर्जदारास सांगितले. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मीटरची दुस-यांदा तपासणी करुन दिनांक 26.03.2012 रोजी मीटर ओके असल्याबाबतचा अहवाल दिला. परंतु सदर अहवाल हा अर्जदाराच्या पश्चात मीटर तपासणी करुन अहवाल दिलेला आहे. सदरील अहवाल अर्जदारावर बंधनकारक नाही. अर्जदार हा त्याच्या छोटया कुटूंबियांसह 4 रुम असलेल्या घरामध्ये राहतो. सदरील घरातील उपकरणांचा वापर पाहता 100 ते 150 युनीट वापर होणे साहजिक आहे. परंतु ऑक्टोबर,2011 मधील वापर पाहिला असता 9450 युनीट एवढा प्रचंड युनीट वापर दाखविलेला आहे, जेकी, मान्य होण्यासारखे नाही. सन 2012 साली अर्जदाराचे मीटरवर त्यांनी केलेल्या युनीटचा वापर पाहिला असता तो 50 ते 150 युनीटच्या दरम्यानचा आहे. परंतु सन 2012 मध्ये दिलेले जानेवारी ते ऑगस्ट महिन्याची बीले पाहता 470 युनीट व 302 युनीटचा वापर दाखविलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे वारंवार विनंती करुनही गैरअर्जदार यांनी बीले दुरुस्त करुन दिलेली नाही. उलट नोव्हेंबर,2012 मध्ये अचानक कुठलीही सुचना माहिती न देता अर्जदाराचा विद्युत पुरवठा बेकायदेशीररीत्या खंडीत करण्यात आला. त्यामुळे अर्जदार व त्याचे कुटूबीय मागील 4 महिन्यापासून अंधारात राहात आहे. दिनांक 03.03.2013 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास कायदेशीर नोटीस पाठविली,ज्यामध्ये अर्जदाराने 30 दिवसाचे आत रु.1,27,675/- न भरल्यास अर्जदारावर कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली. त्यामुळे अर्जदारास मंचासमोर येण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना आदेश देण्यात यावा की, त्यांनी अर्जदाराचे मीटर ग्राहक क्रमांक 553760128332 वरील दिलेले बीले चुकीची,अवाजवी व जास्तीची रक्कम रु.1,27,680/- दिनांक 27.11.2012 दुरुस्त करुन देण्याचा आदेश द्यावा. तसेच सन 2011-2012 मधील दिलेली काही चुकीची,अवाजवी व जास्तीच्या रक्कमेचे बीले दुरुस्त करुन देण्याचा आदेश गैरअर्जदार यांना द्यावा. गैरअर्जदार यांनी नोव्हेंबर 2012 मध्ये खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुर्ववत करुन देण्याचा आदेश गैरअर्जदारास देण्यात यावा. तसेच गैरअर्जदार यांनी दिनांक 02.03.2013 रोजी अर्जदारास बिलाच्या वसुलीपोटी दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथन अमान्य केलेले असून गैरअर्जदार यांचे असे म्हणणे आहे की, ज्याठिकाणी विजेची जोडणी देण्यात आली ती जोडणी बजरंगसिंघ दशरथसिंघ चंदेल यांना देण्यात आली होती. विजेच्या एककाची नोंद करण्याचे मीटर घराच्या आत लावण्यात आले जेकी, वितरण कंपनीच्या नियमानुसार घराच्या बाह्य भागावर मीटर लावावयाचे असते. विज वाचकाला प्रत्येक महिन्यात विज युनीट वाचन करणेसाठी गेले असता त्यांना विजेचे वाचन कधीही करु दिले नाही. त्यामुळे नोव्हेंबर,2008 ते ऑगस्ट,2011 या कालावधीत सरासरी विजेचे बील देण्यात आले होते. ऑगस्ट,2011 मध्ये महत्प्रयासाने वाचन करणा-या कर्मचा-याने मीटरजवळ जाऊन तेथे प्रत्यक्ष वापरण्यात आलेले युनीट 12608 इतके नोंदविलेले आढळले. यापुर्वी प्रत्यक्ष नोंदविलेले युनीट हे नोव्हेंबर,2008 मध्ये 3159 युनीट इतके होते. त्यामुळे या दोन्ही मधील फरक हे 9449 युनीट हे प्रत्यक्ष वापराचे युनीट होते. त्या युनीटचे रक्कम रु.98,198/- चे बील सप्टेंबर,2011 मध्ये देण्यात आले. अर्जदाराने दिलेल्या अर्जास अनुसरुन संबंधीत मीटर तपासणी कक्षामध्ये अर्जदारास पुर्वकल्पना देऊन मीटरची तपासणी करण्यात आली व तेथे मीटर योग्य प्रकारे काम करीत असल्याचे आढळले. अर्जदाराने या सर्व बाबींची माहिती न घेता केवळ विजेची बीले भरणे टाळावे या दुष्ट हेतूने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. दिनांक 14.12.2012 रोजी अर्जदाराने तथाकथीत विज बीलाची रक्कम न भरल्या कारणाने त्याचा विद्युत पुरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला. ज्यावेळेस विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला त्या वेळेस डिसेंबर,2011 मध्ये बदललेल्या विज मिटरवर म्हणजे नवीन मिटरवर 2301 युनीटची नोंदण् करण्यात आली होती. हे युनीट अर्जदाराने जुन्या मीटरवर नोंदविलेल्या युनीटच्या व्यतिरिक्त जास्तीची वापर केलेली विज असून जुने मिटरवर उल्लेख केल्याप्रमाणे 9449 युनीट अधिक नवीन मिटरमधील2301 युनीट अशा सर्व युनीटची रक्कम अर्जदाराने भरणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अर्जदाराला याबाबत कोणताही विशेष अधिकार मागता येणार नाही. विज बीलाची प्रत्यक्ष रक्कम भरणे टाळावे या एकमेव उद्यीष्टापायी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6 अर्जदाराने तक्रारीमध्ये मीटर ग्राहक क्रमांक 553760128332 वरील दिलेले चुकीचे,अवाजवी व जास्तीचे रक्कम रु.1,27,680/-असलेले दिनांक 27.11.2012 चे बील दुरुस्त करुन द्यावे तसेच सन 2011 व सन 2012 मधील दिलेली काही चुकीचे,अवाजवी रक्कमेची बीले दुरुस्त करुन द्यावेत,नोव्हेंबर,2012 मध्ये बेकायदेशीररीत्या अर्जदाराचा खंडीत केलेला विद्युत पुरवठा सुरु करुन मिळावा. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 02.03.2013 रोजी बीलाच्या वसूलीपोटी दिलेली नोटीस रद्य करणेबाबत तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीच्या पुराव्याकामी गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 13.12.2011 रोजी दिलेले पत्र,मीटर तपासणी अहवाल , अर्जदाराने दिनांक 17.12.2011 रोजी गैरअर्जदार यांना दिलेले पत्र दिनांक 27.11.2012 रोजी गैरअर्जदार विद्युत देयक, दिनांक 01.12.2011 रोजीचे विद्युत देयके, गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 28.09.2012 रोजी दिलेले पत्र , दिनांक 26.03.2012 रोजी मीटर तपासणी अहवाल ,दिनांक 02.03.2013 रोजीची कायदेशीर नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी फेब्रवारी,2011 पासूनचे सी.पी.एल. दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या दिनांक 01.12.2011 रोजीचे देयकाचे अवलोकन केले असता त्यामध्ये अर्जदाराचा सप्टेंबर,2011 या महिन्याचा युनीट वापर 9449 युनीट झालेला असल्याचे दिसते. अर्जदाराने याबद्दलची तक्रार केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचे मीटर तपासलेले असून त्याचा अहवाल दिनांक 13.12.2011 रोजी पत्रासोबत अर्जदारास दिलेला आहे. सदर अहवालामध्ये अर्जदाराचे मीटर योग्यरीत्या चालत असल्याचे नमुद केलेले आहे. त्यानंतरही गैरअर्जदाराने अर्जदाराचे मीटर बदलले आहे. मीटर बदलल्यानंतरही अर्जदाराने मीटर सदोष असल्याबद्दल तक्रार केलेली होती. बदलले मीटरही गैरअर्जदार यांनी तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला आहे. त्यामध्येही मीटरमध्ये कोणताही दोष नसल्याचे दिसून आलेले आहे. दाखल सी.पी.एल.चे अवलोकन केले असता अर्जदाराचे मीटर योग्यरीत्या चालत असल्याचे दिसून येते. मीटर बदलल्यानंतर अर्जदाराचा सरासरी युनीट वापर 400 ते 500 युनीट प्रतीमाह असल्याचे सी.पी.एल. वरुन दिसून येते. अर्जदार यांनी दाखल केलेले दिनांक 21.12.2011 चे बील बघीतले असता डिसेंबर,2010 ते ऑगस्ट,2011 मध्ये अर्जदाराचा वापर 50 ते 200 युनीट असल्याचे दिसते यावरुन अर्जदाराचा वापर जास्त असतांना अर्जदारास कमी युनीट वापराचे बीले दिलेली होती. त्यामुळे सप्टेंबर,2011 मध्ये गैरअर्जदार यांनी 9449 युनीट वापराचे दिलेले बील योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराने तक्रार केल्यानंतर त्वरीत अर्जदाराच्या मीटरची तपासणी केलेली आहे व त्यामध्ये अर्जदाराचे मीटर दोषमुक्त असल्याचे आढळलेले आहे. यावरुन अर्जदाराचे मीटर योग्यरीत्या काम करीत असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले देयक योग्य आहेत. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.