( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 29 सप्टेंबर, 2015)
विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास Faulty Meter चे जास्त रकमेचे रू.10,050/- चे बिल दिले व तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करूनही त्याचे Faulty Meter बदलून न देता विद्युत बिलाची बेकायदेशीर आकारणी केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा व्यवसायाने शेतकरी असून त्याच्या घरी 3 खोल्यांमध्ये 15 वॅटचे C.F.L. बल्ब व 1 सिलींग फॅन आहे. तक्रारकर्ता हा दिनांक 07/03/1986 पासून विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे.
3. तक्रारकर्त्याला दिनांक 04/10/2012 रोजी विद्युत मीटर Faulty असल्याचे लक्षात आले व ते बदलून मिळण्यासाठी त्याने उप अभियंता, विद्युत कार्यालय, गोरेगाव येथे अर्ज केला. परंतु विद्युत मीटर उपलब्ध नसल्यामुळे विरूध्द पक्ष हे तक्रारकर्त्याकडील Faulty Meter बदलून देऊ शकले नाही. दिनांक 06/08/2014 रोजी तक्रारकर्त्याला रू.10,050/- चे एकूण सरासरी बिल जास्त रकमेचे देण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याला देण्यात आलेले बिल हे कोणत्याही आधारावर देण्यात आलेले नसून जास्तीचे लावण्यात आलेले असल्यामुळे ते रद्द करावे तसेच नवीन विद्युत मीटर लावून द्यावे याकरिता सदरहू प्रकरण तक्रारकर्त्याने दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 17/09/2014 रोजी मंचात दाखल करून घेण्यात आल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत दिनांक 24/09/2014 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या.
5. विरूध्द पक्ष यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 21/01/2015 रोजी दाखल केला असून विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक असल्याचे मान्य केले आहे. विरूध्द पक्ष यांच्या दामिनी पथकाने दिनांक 19/06/2014 रोजी विद्युत मीटरची तपासणी केली असता तक्रारकर्त्याला शुन्य मीटर वापराची विद्युत बिल आकारणी येत असल्यामुळे नियमाप्रमाणे सरासरी 264 युनिट दरमहा विद्युत वापराची आकारणी गृहित धरून एकूण 1582 युनिटचे रू. 9,971.46 रकमेचे विद्युत बिल तक्रारकर्त्याला देण्यात आले. तक्रारकर्त्याने दिनांक 04/10/2012 रोजी विद्युत मीटर बदलण्याबाबतचा अर्ज विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला होता. परंतु त्यावेळेस विद्युत मीटर उपलब्ध नसल्यामुळे विद्युत मीटर उपलब्ध झाल्यावर दिनांक 03/10/2014 रोजी विद्युत मीटर बदलून देण्यात आले. तसेच विद्युत आकारणी केलेले रू.10,050/- चे योग्य बिल सरासरी काढून देण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विरूध्द पक्ष यांना दिलेला दिनांक 04/10/2012 रोजीचा अर्ज पृष्ठ क्र. 8 वर दाखल केला असून जुलै 2014 चे बिल पृष्ठ क्र. 9 वर व मे 2014 चे बिल पृष्ठ क्र. 10 वर दाखल केले आहे.
7. तक्रारकर्त्यातर्फे ऍड. एस. जी. पटले यांनी असा युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिलेले सरासरी विद्युत देयक हे चुकीच्या पध्दतीने आकारणी करून रू. 10,050/- इतक्या जास्त रकमेचे दिलेले आहे. तक्रारकर्त्याने विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे Faulty Meter 2 वर्षानंतर बदलण्यात आले. तक्रारकर्ता हा गरीब शेतकरी असून त्याला आकारण्यात आलेले बिल हे कुठल्याही आधारावर नसल्यामुळे ते रद्द करण्यात यावे व तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई देण्यात यावी.
8. विरूध्द पक्षातर्फे त्यांच्या वकील ऍड. सुजाता तिवारी यांनी असा युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांच्याकडे नवीन विद्युत मीटर उपलब्ध नसल्यामुळे ते उपलब्ध झाल्यावर म्हणजेच दिनांक 03/10/2014 रोजी तक्रारकर्त्याकडील Faulty Meter बदलून नवीन विद्युत मीटर बसविण्यात आले. मीटर बंद असलेल्या 2 वर्षाच्या कालावधीकरिता 264 युनिट दरमहा याप्रमाणे सरासरी एकूण 1582 युनिट विद्युत वापराबद्दल रू. 9,971.46 इतक्या रकमेचे विद्युत देयक तक्रारकर्त्याला देण्यात आले. तक्रारकर्त्याकडे जुलै 2014 ते ऑगस्ट 2014 व सप्टेंबर 2014 ची विद्युत आकारणी जोडून रू. 10,379.59 एवढी थकबाकी आहे. तक्रारकर्त्याला आता नवीन मीटर लावून दिलेले असल्यामुळे व मागील बंद मीटरची सरासरी विद्युत देयके देण्यात आल्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेत त्रुटी नाही. करिता तक्रारकर्त्याचे सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे.
9. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब व दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | नाही |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक असल्याचे मान्य केल्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे व त्याचा ग्राहक क्रमांक 431440700404 असा आहे हे म्हणणे सिध्द होते.
11. तक्रारकर्त्याने त्याचेकडील विद्युत मीटर Faulty असल्यामुळे ते बदलून मिळण्याबद्दलचा अर्ज दिनांक 04/10/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे दिला होता हे विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात मान्य केल्यामुळे तक्रारकर्त्याने Faulty मीटरचा अर्ज दिला होता हे म्हणणे देखील सिध्द होते. विरूध्द पक्ष यांनी दिनांक 04/10/2012 ते 04/10/2014 या कालावधीचे सरासरी विद्युत देयक तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत मार्च-2014, जुलै-2014 व मे-2014 चे विद्युत बिल दाखल केले आहे. सदरहू बिलामध्ये विद्युत रिडींग शुन्य दाखविलेली आहे. तक्रारकर्त्याने विद्युत मीटर Faulty होण्यापूर्वीचे व नवीन मीटर बदलून दिल्यानंतरचे बिल सदरहू प्रकरणात दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याने दरमहा वापरलेल्या युनिटचा बोध होत नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास Electricity Act प्रमाणे 6 महिन्याच्या थकबाकीचे सरासरी देयक रू. 9,971.46 हे नियमाप्रमाणे दिलेले असून विद्युत मीटर उपलब्ध झाल्यानंतर नवीन मीटर तक्रारकर्त्याला देण्यात आले. त्यामुळे विरूध्द पक्ष यांची सेवेतील कुठलीही त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खालील आदेशाप्रमाणे खारीज करण्यात येते.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.