(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 23 डिसेंबर, 2015)
विरूध्द पक्ष यांनी प्रचलित मासिक रिडींगप्रमाणे विद्युत बिलाची आकारणी न करता सुधारित दराप्रमाणे विद्युत आकारणी करून जास्त रकमेचे विद्युत देयक दिल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळण्यात यावी म्हणून तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने 1983 मध्ये स्वतःच्या उपजिविकेकरिता मौजे रावणवाडी, जिल्हा गोंदीया येथे विरूध्द पक्ष यांचेकडून 30 एच.पी. मंजूर भारासह ग्राहक क्रमांक 430060000268 नुसार भात गिरणी सुरू केली. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे.
3. विरूध्द पक्ष यांनी पाठविलेल्या विद्युत देयकांचा भरणा तक्रारकर्ता हा नियमितपणे करीत होता. दिनांक 15/01/2015 रोजी विरूध्द पक्ष यांचे चंद्रपूर येथील फिरते पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. व्ही. एस. वाशीमकर यांनी तक्रारकर्त्याच्या भात गिरणीला भेट देऊन गिरणीमधील उपकरणांची तपासणी करून नोव्हेंबर 2006 ते डिसेंबर 2014 या कालावधीकरिता रू. 3,62,980/- रकमेचे अतिरिक्त देयक तक्रारकर्त्याला दिले. विरूध्द पक्ष यांच्या पथकाने MF-2 च्या दरानुसार विद्युत बिलाची आकारणी न करता MF-1 च्या दराप्रमाणे बिलाची आकारणी केली. त्यामुळे सदरहू तांत्रिक कारणास्तव तक्रारकर्त्याला रू. 3,62,980/- चे बिल पाठविण्यात आले व त्या बिलाचा भरणा करण्याची तारीख 23/01/2015 दिली.
4. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना सदरहू अतिरिक्त रकमेचे देयक कमी करून देण्याची मागणी केली असता विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 15/01/2015 रोजीचे रू. 3,62,980/- रकमेचे विद्युत देयक रद्द करण्यात यावे व मानसिक त्रासापोटी रू. 20,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- मिळावे म्हणून सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
5. तक्रारीची कार्यवाही सुरू असतांनाच्या कालावधीतच मूळ तक्रारकर्ता नारायण जीवनलाल बिसेन यांचा दिनांक 22/04/2015 रोजी मृत्यु झाल्यामुळे सदरहू तक्रारीमध्ये वारसानाचे नाव जोडण्याबाबतचा अर्ज निशाणी-7 वर दाखल करण्यात आला. सदरहू अर्ज मंजूर करण्यात आला व त्याप्रमाणे तक्रारीमध्ये मूळ तक्रारकर्त्याचे वारस रेकॉर्डवर घेण्यात आले.
6. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 27/02/2015 रोजी मंचात दाखल करून घेण्यात आल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत दिनांक 07/03/2015 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दाखल केला असून त्यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये असे म्हटले आहे की, सदरहू भात गिरणी ही व्यापारी कारणाकरिता लावलेली असल्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत बसू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात पुढे असेही म्हटले आहे की, विरूध्द पक्ष यांचे चंद्रपूर येथील फिरते पथकाचे उप कार्यकारी अभियंता श्री. एस. व्ही. वाशीमकर यांनी तक्रारकर्त्याच्या भात गिरणीमधील विद्युत मीटरची तपासणी केली असता स्पॉट पंचनाम्यानुसार तक्रारकर्त्याकडील विद्युत मीटरचा Multiplying Factor हा 2 आढळून आला. परंतु अर्जदारास नोव्हेंबर 2006 ते डिसेंबर 2014 पर्यंत 68523 युनिटकरिता MF-1 प्रमाणे विद्युत बिलाची आकारणी करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्त्याला थकित बिलापोटी रू. 3,62,980/- भरण्याकरिता असेसमेंट शीटनुसार बिल देण्यात आले. विरूध्द पक्ष यांनी तपासणी करून तक्रारकर्त्याला दिलेले बिल हे कायदेशीर असल्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दिनांक 15/01/2015 रोजीच्या स्पॉट पंचनाम्याची प्रत पृष्ठ क्र. 9 वर दाखल केली असून फिरते पथक, चंद्रपूर यांच्या असेसमेंट शीटची प्रत पृष्ठ क्र. 12 वर, विद्युत देयकांच्या प्रती पृष्ठ क्र. 13 ते 15, खास मुखत्यार लेखाची प्रत पृष्ठ क्र. 16 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
9. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. हरिणखेडे यांनी युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याकडून 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे थकित बिल वसूल करण्याचा अधिकार नाही. विद्युत कायद्याच्या कलम 126 पोटकलम 3 प्रमाणे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून हरकत मागवून तक्रारकर्त्याला Provisional Bill द्यावयास पाहिजे होते. Multiplying Factor बाबतचा उल्लेख Electricity Act मध्ये केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने कुठल्याही प्रकारे विद्युत चोरी केलेली नसून कुठल्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर केलेला नाही. त्याचप्रमाणे स्पॉट पंचनाम्यावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी नसल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तयार केलेला पंचनामा व लावण्यात आलेले वाढीव बिल खोटे असल्यामुळे ते रद्द करून तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
10. विरूध्द पक्ष यांच्यातर्फे त्यांचे वकील ऍड. राजनकर यांनी असा युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांचे चंद्रपूर येथील फिरते पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. वाशीमकर यांनी Electricity Act नुसार तक्रारकर्त्याच्या भात गिरणीमधील विद्युत मीटरची तपासणी केली असता तक्रारकर्त्याला नोव्हेंबर 2006 ते डिसेंबर 2014 या कालावधीकरिता लावण्यात आलेल्या बिलाचा Multiplying Factor हा 2 ऐवजी 1 लावण्यात आल्यामुळे तक्रारकर्त्याला difference Charges ची रक्कम रू. 3,62,980/- आकारण्यात आली. माननीय राष्ट्रीय आयोग यांच्या III (1996) CPJ 71 (NC) – MAHARASHTRA STATE ELECTRICITY BOARD versus M/S. SWASTIK INDUSTRIES या न्यायनिवाड्यानुसार Unit recording faulty असल्यास Indian Electricity Act नुसार वीज कंपनीला कोणत्याही कालावधीकरिता असलेली थकित रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. करिता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
11. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे लेखी जबाब व दोन्ही बाजूचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | नाही |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. Indian Electricity Act नुसार विद्युत मीटरचे निरीक्षण करून चौकशी करण्याच्या असलेल्या अधिकारान्वये विरूध्द पक्ष यांच्या चंद्रपूर येथील फिरते पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी तक्रारकर्त्याकडे चौकशी केली. सदरहू चौकशीमध्ये त्यांना आढळून आलेले Multiplying Factor नोव्हेंबर 2006 ते डिसेंबर 2014 या कालावधीकरिता चुकीचे वापरले गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे देण्यात आलेले व पृष्ठ क्र. 1 वर दाखल केलेले सुधारित मागील कालावधीचे देयक रू. 3,62,980/- हे Flying Squad Unit चंद्रपूर यांच्या Spot Inspection नुसार दिलेले असल्यामुळे ते योग्य पध्दतीने दिले असल्याचे सिध्द होते.
13. तक्रारकर्त्याला विद्युत देयकामध्ये वापरण्यात आलेला Multiplying Factor हा डिसेंबर 2014 नंतर 2 असून त्यापूर्वी Multiplying Factor 1 प्रमाणे देण्यात आलेला होता हे असेसमेंट शीट जी पृष्ठ क्र. 12 वर दाखल केलेली आहे त्यावरून सिध्द होते.
14. विरूध्द पक्ष यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या माननीय राष्ट्रीय आयोग यांच्या III (1996) CPJ 71 (NC) – MAHARASHTRA STATE ELECTRICITY BOARD versus M/S. SWASTIK INDUSTRIES या न्यायनिवाड्यामध्ये, “In any case, raising of a bill for the electricity consumed, howsoever belated, cannot be termed as a deficiency in service”. असे नमूद करण्यात आलेले अहे. त्यामुळे विरूध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याने वापरलेल्या विद्युत देयकाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे व विरूध्द पक्ष यांचेकडून तांत्रिक चुकीमुळे Multiplying Factor नुसार कमी आकारण्यात आलेली रक्कम सुध्दा वसूल करण्याचा निश्चितच अधिकार आहे. विद्युत मीटरचे Reading करिता Multiplying Factor 1 लावण्याचा विरूध्द पक्षास अधिकार आहे हे म्हणणे तक्रारकर्ता हा सिध्द करू शकलेला नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिलेले रू. 3,62,980/- चे विद्युत देयक कायदेशीर असून विरूध्द पक्ष यांची सदरहू प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे सेवेतील त्रुटी नाही असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.