Maharashtra

Gondia

CC/15/127

ASHOK BHANDARKAR - Complainant(s)

Versus

M.S.E.D.C.L. THROUGH THE ADDL.EXECUTIVE ENGINEER - Opp.Party(s)

MR.SUDHIR RATHOD

21 Oct 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/15/127
 
1. ASHOK BHANDARKAR
R/O.VIJAY ARUN SAWANT, NEAR DR.GUJAR HOSPITAL, CIVIL LINES, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M.S.E.D.C.L. THROUGH THE ADDL.EXECUTIVE ENGINEER
R/O.GONDIA URBAN SUB-DIVISION, SURYATOLA, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
2. M.S.E.D.C.L. THROUGH JUNIOR ENGINEER SHRI. SUMIT PANDE
R/O.MANOHAR CHOWK DISTRIBUTION CENTRE, SHASTRI WARD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. G. CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. H. M. PATERIYA MEMBER
 
For the Complainant:MR.SUDHIR RATHOD, Advocate
For the Opp. Party: MR.S. B. RAJANKAR, Advocate
Dated : 21 Oct 2016
Final Order / Judgement

आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले

        तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-

2.    श्री. विजय अरूण सावंत यांच्या नावाने ग्राहक क्रमांक 430017325447 अन्वये विद्युत पुरवठा असून सदर विद्युत पुरवठा असलेले घर हे तक्रारकर्त्याच्या वहिवाटीत (Occupation) आहे.  

3.    विरूध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांचेकडून तक्रारकर्त्यास माहे सप्टेंबर 2014 चे 2155 युनिट विद्युत वापराचे रू. 22,290/- चे बिल प्राप्त झाले.  तक्रारकर्त्याचा मासिक विद्युत वापर साधारणतः 200 ते 250 युनिट इतकाच आहे.  परंतु विरूध्द पक्षाच्या सदोष मीटरमुळे सप्टेंबर 2014 मध्ये चुकीचा 2155 युनिट विद्युत वापर दर्शविण्यात आला आणि चुकीचे बिल पाठविण्यांत आले.

4.    तक्रारकर्त्याने सदर चुकीच्या बिलाबाबत विरूध्द पक्ष यांच्याकडे दिनांक 07/10/2014, 21/10/2014, 07/11/2014, 18/03/2015, 22/06/2015 आणि 01/07/2015 रोजी लेखी तसेच तोंडी तक्रार केली.  विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 11/11/2014 रोजी वरील सदोष मीटर बदलवून नवीन मीटर लावले आणि सदोष मीटरची तपासणी करण्याबाबतचा सल्ला दिला.  त्याप्रमाणे दिनांक 22/11/2014 रोजी तक्रारकर्त्याने रू. 150/- मीटर तपासणी फी विरूध्द पक्षाकडे भरणा केली.  परंतु तक्रारकर्त्याने लेखी व तोंडी विनंती करूनही विरूध्द पक्षाने सदोष मीटरची तपासणी केली नाही.  शेवटी तक्रारकर्त्याने दिनांक 24/09/2015 रोजी विरूध्द पक्षाकडे सदोष मीटर तपासणीबाबतची माहिती मिळण्याकरिता माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला.  त्यानंतर विरूध्द पक्षाने दिनांक 19/10/2015 रोजी सदोष मीटरची तपासणी केली.  सदर तपासणीप्रमाणे मीटर सदोष असल्याचे निष्पन्न झाले. 

5.    विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून मीटर तपासणी फी घेऊनही सप्टेंबर 2014 पासून ऑक्टोबर 2015 पर्यंत मीटरची तपासणी न करणे ही सेवेतील न्यूनता आहे.  तक्रारकर्त्याने दिनांक 23/10/2015 रोजी चुकीचे विद्युत बिल दुरूस्त करण्याबाबत अर्ज दिला, परंतु तक्रार दाखल करेपर्यंत विरूध्द पक्षाने सदर बिलात कोणतीही दुरूस्ती केली नाही.  याउलट विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सप्टेंबर 2014 ते ऑक्टोबर 2015 या काळात दिनांक 04/03/2015, 07/07/2015 आणि 07/08/2015 रोजी नोटीस पाठवून चुकीच्या विद्युत बिलाचा भरणा करण्याबाबत आणि तो न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल अशी नोटीस पाठविली.  विरूध्द पक्षाने सदोष विद्युत मीटर प्रमाणे विद्युत बिल पाठविले आणि तक्रारकर्त्याकडून तपासणी फी घेऊन देखील विद्युत मीटरची तपासणी न केल्यामुळे आणि विद्युत बिलात दुरूस्ती न केल्याने तक्रारकर्त्याने बिलाचा भरणा केला नव्हता.  त्यास विरूध्द पक्ष स्वतः जबाबदार असून तक्रारकर्त्याचा कोणताही दोष नाही.

6.    मार्च 2015 मध्ये विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा बेकायदेशीरपणे खंडित केला आणि दिनांक 30/03/2015 रोजी M. R. No. 8082871 अन्वये रू. 50/- चा भरणा केल्यानंतर तो पूर्ववत केला.  सदरची बाब देखील सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.  तक्रारकर्त्याने त्याचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून दिनांक 06/11/2014 रोजी आणि दिनांक 28/03/2015 रोजी प्रत्येकी रू. 10,000/- चा हरकतीसह (Under Protest) भरणा केला.  विरूध्द पक्षाने सदोष मीटर रिडींगवर आधारलेल्या बिलाचा भरणा केला नाही म्हणून रू. 1,785.27 थकबाकी वर व्याज आणि रू. 802.92 D.P.C. Charges ची आकारणी केली.  सदरची आकारणी बेकायदेशीर असून त्याचा परतावा मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे.

      वरील कारणामुळे तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.      

      1.     विरूध्द पक्षाने सदोष मीटरची तपासणी न करून आणि चुकीच्या विद्युत बिलात दुरूस्ती न करून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केल्याचे जाहीर करण्यात यावे.

      2.    विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिलेले सप्टेंबर 2014 चे चुकीचे विद्युत बिल 3 महिन्याच्या सरासरी वापरावर आधारित 243 युनिट विद्युत वापर समजून आकारणी करावी.        

      3.    तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल विरूध्द पक्ष 1 व 2  यांनी रू. 50,000/- नुकसानभरपाई देण्याचा आदेश व्हावा.

      4.    विरूध्द पक्षाने तक्रारीचा खर्च रू. 15,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.

 

      5.    विरूध्द पक्ष 1 यांनी वेळेत मीटर तपासणी न केल्यामुळे एकूण तक्रार खर्चाच्या 50% खर्च त्यांच्यावर वैयक्तिकरित्या बसविण्यात यावा.  

7.    तक्रारीचे पुष्‍ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांनी पाठविलेली विद्युत बिले, माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीचे विरूध्द पक्ष यांनी दिलेले उत्तर, मीटर टेस्टींग रिपोर्ट, तक्रारकर्त्याचे पत्र, सी. पी. एल., तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना पाठविलेली पत्रे, मीटर तपासणी फी ची पावती, विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत विरूध्द पक्षाने पाठविलेली नोटीस, विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याकरिता भरणा केलेल्या रकमेची पावती तसेच विरूध्द पक्ष यांनी दिनांक 07 जुलै, 2015 व 07 ऑगस्ट, 2015 रोजी पाठविलेली नोटीस इत्यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत.

8.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे.  तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता विरूध्द पक्ष यांचा ग्राहक असल्याचे त्यांनी नाकबूल केले आहे.  तसेच तक्रारकर्ता हा विजय अरूण सावंत यांच्या मालकीच्या घरात वहिवाटदार म्हणून राहात असल्याचे देखील माहिती अभावी नाकबूल केले आहे.  तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक नसल्यामुळे मंचाला सदरची तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा नाही असा विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी प्राथमिक आक्षेप घेतला आहे.

      विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारीत नमूद केलेले विद्युत मीटर दिनांक 11/11/2014 रोजी बदलविले आणि त्याची दिनांक 19/10/2015 रोजी तपासणी केली असता ते सदोष असल्याचे आढळून आले हे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी मान्य केले आहे.  सप्टेंबर 2014 ते ऑक्टोबर 2015 या काळात विरूध्द पक्ष यांना सदोष मीटरची तपासणी करता आली नाही कारण त्यांच्याकडे मीटर तपासणीकरिता पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नव्हता.  त्यामुळे मीटर तपासणीस झालेला विलंब हा सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याचे विरूध्द पक्ष यांनी नाकबूल केले आहे.

      त्यांचे म्हणणे असे की, दिनांक 11/11/2014 रोजी जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्यात आले असून त्याबाबत घरमालकाची कोणतीही तक्रार नाही.  सदर मीटर तपासणी अहवाल ऑक्टोबर 2015 मध्ये प्राप्त होताच विरूध्द पक्ष यांनी बिलामध्ये दुरूस्ती केलेली आहे. मार्च 2015 मध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याबाबत तसेच ग्राहकाने दिनांक 28/03/2015 रोजी रू. 10,000/- जमा केल्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची बाब देखील विरूध्द पक्ष यांनी मान्य केली आहे.  मात्र सदरची बाब सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याचे नाकबूल केले आहे.

      त्यांचे पुढे म्हणणे असे की, मीटर तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर चुकीच्या बिलापोटी रू. 20,188/- चे Credit देऊन योग्य समायोजन करण्यात आलेले आहे.  तक्रारकर्त्याला सदरची तक्रर दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडल्याचे विरूध्द पक्ष यांनी नाकबूल केले आहे.  सदरची तक्रार दाखल करण्यापूर्वीच दुरूस्त बिल ग्राहकास देण्यात आलेले आहे.  तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक नसल्यामुळे त्यास तक्रार दाखल करण्याचा अधिकार (Locus Standi) नसल्यामुळे तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विरूध्द पक्ष यांनी विनंती केलेली आहे.       

9.    तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी  खालील  मुद्दे  विचारार्थ  घेण्यात  आले.   त्यावरील  निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? व सदर तक्रार चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा आहे काय?

नाही

2.

विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय?

निष्कर्ष नोंदविण्याची आवश्यकता नाही.

3.

तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय?

नाही

4.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे

- कारणमिमांसा

10.   मुद्दा क्रमांक 1 बाबतः-          सदरच्या प्रकरणात ग्राहक क्रमांक 430017325447 अन्वये विरूध्द पक्षाकडून देण्यात आलेला विद्युत पुरवठा हा विजय अरूण सावंत यांच्या नांवाने त्‍यांच्या मालकीच्या घरात देण्यांत आल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे.  तसेच सदर ग्राहक क्रमांकाच्या विद्युत वापराचे बिल देखील विजय अरूण सावंत यांच्या नावानेच विरूध्द पक्ष निर्गमित करीत असून त्यांचा भरणा देखील विजय अरूण सावंत यांच्या नावानेच करण्यात येत असल्याचे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या माहे सप्टेंबर 2014, डिसेंबर 2014, फेब्रुवारी 2015, सप्टेंबर 2015 च्या विद्युत बिलावरून स्पष्ट होते.  तसेच दिनांक 19/08/2014 ते 19/09/2014 या कालावधीतील वीज वापर 2155 युनिट दर्शवून विरूध्द पक्ष यांनी विजय अरूण सावंत यांना दिनांक 02/10/2014 रोजी रू. 22,290.20 चे बिल दिले त्याची प्रत तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 1 वर दाखल केली आहे.  सदर बिलापोटी विजय सावंत यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये रू. 10,000/- चा हरकतीसह (Under Protest) भरणा केलेला आहे.   मार्च 2014 मध्ये विरूध्द पक्ष यांनी मागील थकबाकी रू. 16,535.43 दर्शवून रू. 18,190.00 चे बिल दस्त क्रमांक 3 अन्वये विजय सावंत यांना पाठविले.  त्यापैकी रू. 10,000/- विजय सावंत यांनी हरकतीसह भरणा केले आहेत.  2015 ची थकबाकी रू. 19,515.74 आणि त्यावर रू. 1518.05 व्याज दर्शवून रू. 21,033.79 चे बिल विरूध्द पक्ष यांनी दस्त क्रमांक 4 प्रमाणे विजय सावंत यांच्या नांवाने दिले.  विजय सावंत यांनी सदोष मीटरची तपासणी करण्याकरिता विरूध्द पक्षाकडे दिलेल्या अर्जाप्रमाणे दिनांक 21/10/2015 रोजी तपासणी केली असता मीटर सदोष असून “Abnormal consumption shown” असा अहवाल दिला आहे तो तक्रारकर्त्याने दस्त क्रमांक 6 वर दाखल केला आहे.  तसेच माहितीच्या अधिकारात तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे विजय सावंत यांच्या मीटरच्या तपासणीबाबतची माहिती मागितली ती विरूध्द पक्षाने दस्त क्रमांक 5 प्रमाणे तक्रारकर्त्यास पुरविली आहे.  तक्रारकर्त्याने दिनांक 23/10/2015 रोजी विरूध्द पक्ष यांना दस्त क्रमांक 7 अन्वये पत्र पाठवून विजय सावंत यांच्या नांवाने असलेल्या ग्राहक क्रमांक 430017325447 चे विद्युत बिलात दुरूस्ती करण्यचा अर्ज दिला होता.  मीटर सदोष असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर विरूध्द पक्ष यांनी दिनांक 28/10/2015 रोजी चुकीच्या बिलापोटी विजय सावंत यांच्याकडून भरणा करण्यत आलेल्या रकमेचे समायोजन केले असल्याने बिलाच्या रकमेबाबत उभय पक्षांत कोणताही वाद नसल्याचे युक्तिवादाचे वेळी तक्रारकर्त्याचे अधिवक्त्यांनी सांगितले.

      सदोष मीटर रिडींगबाबत केलेल्या तक्रारीच्या ज्या प्रती दस्त क्रमांक 9 ते 14 वर दाखल केल्या आहेत त्या सर्व तक्रारी ज्यांच्या नांवाने विद्युत जोडणी आहे त्या विजय सावंत यांनीच स्वतःच्या सहीने केलेल्या आहेत.  तसेच दस्त क्रमांक 15 वर असलेली दिनांक 04 मार्च, 2015 ची विद्युत देयकाची थकित रक्कम भरणा न केल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत विरूध्द पक्ष यांनी दिलेली नोटीस देखील नोंदणीकृत ग्राहक विजय सावंत यांनाच पाठविलेली आहे. 

      विरूध्द पक्षांच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या नावाने विद्युत पुरवठा मंजूर केलेला नाही, त्याच्या नावाने कोणतेही बिल काढलेले नाही किंवा बिलाची रक्कम त्याच्याकडून वसूल केलेली नाही किंवा त्याला विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत कधीही नोटीस दिली नसल्याने तक्रारकर्ता विरूध्द पक्ष यांचा ग्राहक नाही व त्याने विरूध्द पक्ष यांची कोणतीही सेवा विकत घेतली नसल्याने विरूध्द पक्षाकडून त्याच्या सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसल्याने सदरची तक्रार ग्राहक तक्रार नाही व ती चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.

      याउलट तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, जरी विद्युत पुरवठा घरमालक विजय सावंत यांच्या नावाने असला आणि बिल त्यांच्या नावाने पाठविण्यांत आले असले आणि बिलाचा भरणा घरमालकाचे नावाने करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात तक्रारकर्ता सदर घरात राहात असून विद्युत बिलाचा भरणा करीत आहे.  तक्रारकर्त्याने घरमालक विजय अरूण सावंत यांचे शपथपत्र दखल केले आहे, त्यांत त्यांनी म्हटले आहे की, तक्रारकर्ता अशोक भांडारकर यांस त्यांनी ग्राहक क्रमांक 430017325447 अन्वये विरूध्द पक्षाकडून विद्युत पुरवठा घेतलेले घर दोन वर्षापासून खाजगी वापरासाठी दिले असून तेच विद्युत बिलाचा भरणा करीत आहेत आणि घराची देखभाल करीत आहेत.  म्हणून तक्रारकर्ता हाच विद्युत वापरासंबंधाने विरूध्द पक्ष यांचा ग्राहक आहे.  विरूध्द पक्षाने चुकीच्या मीटर रिडींगवर आधारित जे विद्युत बिल पाठविले त्यापोटी हरकतीसह भरलेली रक्कम तक्रारकर्त्यानेच भरलेली असून चुकीच्या विद्युत बिलाची रक्कम भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसने तक्रारकर्त्याचा हक्क प्रभावित झाला आणि त्यास शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने विरूध्द पक्षाची चुकीच्या मीटर रिडींग प्रमाणे बिलाची मागणी व ते न दिल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी यामुळे प्रत्यक्ष वहिवाटदार असलेल्या तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.  म्हणून त्यापोटी विरूध्द पक्षाकडून नुकसानभरपाई मागण्याचा तक्रारकर्त्यास कायदेशीर हक्क असल्याने सदरची तक्रार ग्राहक तक्रार म्हणून चालविण्याचा मंचाला अधिकार आहे.

      उभय पक्षाच्या अधिवक्त्यांच्या युक्तिवादावरून ही बाब स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याच्या नावाने विद्युत पुरवठ्याचा कोणताही करार विरूध्द पक्षाने केलेला नाही.  घरमालक विजय सावंत यांच्या नांवानेच विद्युत पुरवठ्याचा करार असल्याने तेच विरूध्द पक्षाचे विद्युत ग्राहक असून सदर तक्रारीत त्यांनी विरूध्द पक्ष यांचेविरूध्द कोणतीही तक्रार केलेली नाही.  तक्रारकर्त्याने घरमालकाकडून घर वहिवाटीसाठी घेतले असेल तर त्याबाबतचा करार घरमालक व तक्रारकर्ता यांच्यातील असून त्याचा विरूध्द पक्षाशी कोणताही संबंध नसल्याने घरमालकाच्या नावाने असलेल्या विद्युत जोडणीमधून जर तक्रारकर्ता विद्युत वापर करीत असेल तरी तक्रारकर्ता आणि विरूध्द पक्ष यांच्यामध्ये विद्युत पुरवठा करण्याबाबत कोणताही करार नसल्याने तो विरूध्द पक्ष यांचा विद्युत ग्राहक ठरत नाही.  सदर मुद्दयावर माननीय महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी Keshav Babu Tare versus Executive Engineer, M.S.E.B. & Anr. – I (2004) CPJ 262  मध्ये खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

      “5.    Since the meter of the Electricity Board did not stand in the name of the complainant he could not held to be a consumer of the Electricity Board under the Rules”.

            माननीय राज्य आयोगाच्या वरील न्यायनिर्णयाप्रमाणे तक्रारकर्त्याच्या नावाने मीटर नसल्याने आणि तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्यामध्ये विद्युत पुरवठ्याचा कोणताही करार नसल्याने तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 2 (1) (d) प्रमाणे विरूध्द पक्ष 1 व 2 चा ग्राहक ठरत नाही. वरीलप्रमाणे तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक नसल्याने सदरची तक्रार ही ग्राहक तक्रार होत नाही व ती चालविण्याची मंचाला अधिकारकक्षा नाही.  म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.   

11.   मुद्दा क्रमांक 2 बाबत– मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे मंचाला सदरची तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा नसल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला किंवा काय या मुद्दयावर विवेचन करून निष्कर्ष नोंदविण्याची आवश्यकता नाही.  म्हणून मुद्दा क्रमांक 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.

12.   मुद्दा क्रमांक 3 व 4 बाबत– मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे मंचाला सदरची तक्रार चालविण्याची अधिकारकक्षा नसल्यामुळे तक्रारकर्ता मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही.  म्हणून मुद्दा क्रमांक 3 व 4 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.

      वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.

-// अंतिम आदेश //-

             1.     तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 खाली    दाखल करण्यात आलेली तक्रार खारीज करण्यात येते.

2.    तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.

3.    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.

4.    प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.  

 
 
[HON'BLE MR. M. G. CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. H. M. PATERIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.