तक्रार क्र. CC/ 13/ 2 दाखल दि. 01.03.2013
MA/13/1 आदेश दि. 09.09.2014
तक्रारकर्ता :- श्री अजय रामचंद्र बोरकर
वय – 30 वर्षे, धंदा - मजुरी
रा.अंबाडी, पो.सिल्ली
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी
डिव्हीजन भंडारा, ता.जि.भंडारा
2. सहायक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी
सब डिव्हीजन भंडारा, ता.जि.भंडारा
3. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी
मानेगांव,डी.सी.पो.मानेगांव,
ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.भोयर
वि.प. तर्फे अॅड.निला नशीने
(आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा.बडवाईक )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 09 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्द पक्षाने सेवेतील केलेल्या त्रृटीबाबत दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता हा अंबाडी येथील रहिवाशी असून त्याने त्याच्या घरगुती वापरासाठी विरुध्द पक्षाकडून वीज सेवा घेतली होती. तक्रारकर्त्याचा ग्राहक क्र.437630330709 व मीटर क्र.1600421596 असा आहे. तक्रारकर्ता हा विजेच्या बिलाचा नियमित भरणा करीत असून त्याला एप्रील 2012 पासून जास्तीच्या युनीटचे बील यायला लागले. एप्रील 2012 ला 347 युनिटचे, मे 2012 ला 510 युनिटचे, जुन 2012 ला 242 चे युनिटचे बील आले. तसेच नोव्हेबर 2011 ते मार्च 2012 या कालावधीत कमी बील आले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे याबाबत तक्रार केली. परंतु विरुध्द पक्षाने आधी बील भरा, नंतर तक्रारीचा विचार करतो, असे सांगितले. तक्रारकर्त्याने एप्रील,मे,व जुन या महिन्याच्या विदयुत बिलाचा भरणा केला. परंतु विरुध्द पक्षाने त्याच्या जास्तीच्या बिलाच्या तक्रारीवर कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्त्याने मीटर चेकींग साठी रुपये 100/- ही फी दिनांक 23/7/2012 ला भरुन दिनांक 26/7/2012 ला तक्रार अर्ज दिला. तक्रारकर्त्याने मीटर चेकींग संबंधी फीचा भरणा करुनही विरुध्द पक्षाने कुठलीही कार्यवाही केली नाही तसेच त्यावर काय कार्यवाही केली हया संबंधी तक्रारकर्त्यास कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने जुलै, ऑगस्ट, सप्टे., ऑक्टो, नोव्हे या महिन्याच्या विदयुत बिलांचा भरणा केला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने दिनांक 27/11/2012 ला तक्रारकर्त्याला दिनांक 21/11/2012 च्या विदयुत देयकाची रक्कम 2178.33/- ही भरली नसल्यामुळे ती भरण्यासाठी नोटीस दिली व नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांत रक्कम न भरल्यास विदयुत पुरवठा बंद करण्यात येईल, असे कळविले व दिनांक 20/12/2012 ला तक्रारकर्त्याने रक्कम न भरल्यामुळे तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा खंडीत केला. विरुध्द पक्षाच्या विदयुत पुरवठा खंडीत करण्याच्या नोटीसवर तक्रारकर्त्याने दिनांक 28/12/2012 ला वकीलामार्फत नोटीस पाठविली व माहे एप्रील 2012 पासून केलेल्या वीज बिलाची मागणी ही अॅव्हरेज रिडींग नुसार करुन दयावी व त्यानुसार तक्रारकर्ता रक्कम भरण्यास तयार आहे अशी विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा दिनांक 20/12/2012 ला खंडीत केला. त्यानंतर दिनांक 23/12/2012 ला शुन्य रिडींगचे नवीन मीटर तक्रारकर्त्याच्या घरी लावले. परंतु वीज जोडणी करुन दिली नाही. तक्रारकर्ता व त्याचा परिवार दिनांक 20/12/2012 पासून अंधारात राहत आहे. या विरुध्द पक्षाच्या कृतीबाबत तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये विरुध्द पक्षाने खंडीत केलेला वीज पुरवठा पुर्ववत जोडून दयावा, मीटर टेस्टींग प्रमाणे मीटरमध्ये बिघाड असेल तर ते बदलून दयावे तसेच एप्रील 2012 ते जुन 2012 पर्यंतच्या वीज बिलाची रक्कम तक्रारकर्त्याला अॅव्हरेज बिलातून वजा करुन परत करण्यात यावी. शारीरिक, मानसिक नुकसान भरपाई तसेच तक्रारीच्या खर्चाच्या मागणीसाठी तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकुण 19 दस्त तक्रारीच्या पृष्ठ क्र. 20 ते 48 वर दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याने मंचामध्ये तक्रारीसोबत ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 13(3)B नुसार विदयुत पुरवठा जोडून मिळण्यासाठी अंतरिम अर्ज किरकोळ प्रकरण क्रमांक 13(1) दाखल केले आहे. या अर्जावर मंचाने कोणताही आदेश पारित न करता तो अर्ज मुळ प्रकरणासोबत विचारार्थ ठेवावा असा आदेश पारित केला. मंचाने विरुध्द पक्षाला नोटीस पाठविल्यानंतर ते हजर झाले व त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. लेखी उत्तर हे विरुध्द पक्षाने मुळ तक्रार व किरकोळ अर्ज या दोन्हीवर दाखल केले. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की तक्रारकर्त्यास वीज वापराप्रमाणे मीटर मध्ये नोंद झालेल्या युनिट प्रमाणे बील देण्यात आले. वीज वापराचे रिडींग घेतांना मीटरमध्ये बिघाड झाल्याची नोंद असून मीटर नॉर्मल आहे असे म्हटले आहे. वीज देयक रुपये 2178.33/- हे तक्रारकर्त्याने भरणा करणे आवश्यक होते व बील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्याचा नियम आहे. तक्रारकर्त्याला वीज बील भरण्याची सुचना करुनही त्याने वीज बील भरले नाही त्यामुळे त्याचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर कायमस्वरुपी वीज जोडणी बंद करण्यात आली. अर्जदाराकडून मीटर टेस्टींगचा अर्ज प्राप्त झाल्यावर दिनांक 28/12/2012 ला ग्राहकाचे उपस्थितीत मीटर लावून देवून मीटर टेस्टींग करण्यात आले. मीटर टेस्टींग रिपोर्ट उत्तरासोबत जोडला आहे. त्या रिपोर्टवर ग्राहक सही करण्यास तयार नव्हता. विरुध्द पक्ष 3 यांनी जे मीटर काढून नेले, ते नवीन मीटर नव्हते. तक्रारकर्त्याने जुर्ल 2012 पासून विदयुत देयक भरणा केला नाही तरीही वीज पुरवठा सुरु होता. या नंतर 28 डिसेंबरला मीटर टेस्टींग करुन दिले व नोव्हेबर मध्ये वीज बील भरणा करणेबाबत नोटीस जारी केली. तरी सुध्दा तक्रारकर्त्याने वीज बील भरणा केले नाही त्यामुळे दिनांक 12/1/2013 ला तक्रारकर्त्याची वीज जोडणी कायमस्वरुपी बंद करण्यात आली. विरुध्द पक्षाने आपले कर्तव्य व सेवा पुरविण्यात कोणतीही त्रृटी केलेली नाही. तक्रारकर्त्याने वीज जोडणी करीता नेमुन दिलेले शुल्क भरले असते व वीज बिलाचा भरणा केला असता तर त्याचा वीज पुरवठा जोडून देण्याची व सेवा देण्याची विरुध्द पक्षाची तयारी आहे. विरुध्द पक्षाच्या सेवेमध्ये त्रृटी नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
5. तक्रारकर्त्याकडे विरुध्द पक्षाकडून वीज पुरवठा करण्यात येत होता, ही बाब विरुध्द पक्षाने मान्य केली आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 23/6/2012 रोजी मीटर टेस्टी्ंग साठी रुपये 100/- चा भरणा केला व तक्रारअर्ज दिला, ही बाब सुध्दा विरुध्द पक्षास मान्य आहे. तक्रारकर्त्यास एप्रील 2012 ला 347 युनिटचे, मे ला 510 युनिटचे, जुनला 242 युनिटचे अवास्त बील आले. ते बील जास्तीचे आहे,याबाबत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे तक्रार केली. परंतु विरुध्द पक्षाने आधी विजेचे बील भरणा करा व त्यानंतरच तक्रारीची दखल घेण्यात येईल, असे सांगितल्यावर तक्रारकर्त्याने बिलाचा भरणा केला. जुलै 2012 ला 102 युनिटचे, ऑगस्ट ला 67 युनिटचे व स्प्टेंबरला 131 युनिटचे, ऑक्टोबरला 106 युनिटचे तर नोव्हेंबरला 3 युनिटचे बील तक्रारकर्त्यास प्राप्त झाले. या बाबतचे विदयुत बील तक्रारकर्त्याने दाखल केले आहे. तर ऑक्टोबर 2011 ते मार्च 2012 पर्यंत तक्रारकर्त्यास अनुक्रमे ऑक्टोबर 2011 चे 40, नोव्हेंबर 2011 चे 20, डिसेंबर 2011 चे 12 युनिटचे, तर जानेवार 2012 चे 18 युनिटचे, फेब्रुवारी 2012 चे 32 तर मार्च 2012 चे 26 युनिटचे विदयुत बील येत होते. तक्रारकर्त्याने जुन 2012 पर्यंतच्या बीलाचा भरणा केल्यानंतर मीटर टेस्टींग साठी विरुध्द पक्षाकडे रुपये 100/- भरणा करुन देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे मीटर टेस्टींग करुन दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने उर्वरित कालावधीतील बिलाचा भरणा न केल्यामुळे विरुध्द पक्षाने 27 नोव्हेबर 2012 ला तक्रारकर्त्याने वीज देयकाची रक्कम न भरल्यामुळे विदयुत पुरवठा खंडीत करण्याची नोटीस दिली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 1/12/2012 ला विरुध्द पक्षाकडे अर्ज करुन दिनांक 26/7/2012 ला दिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याची विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही व दिनांक 20/12/2012 ला अर्जदाराच्या घरचा वीज पुरवठा खंडीत केला. तेव्हा पासून तक्रारकर्त्याच्या घरी विरुध्द पुरवठा बंद आहे व त्यानंतर दिनांक 12/1/2013 रोजी तक्रारकर्त्याचा घरचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला.
तक्रारकर्त्याने मीटर तपासणीसाठी आवश्यक फीचा भरणा केला आहे व तक्रार करुन देखील विरुध्द पक्षाने त्याच्या मीटरची तपासणी केली नाही. तक्रारकर्त्याच्या घरचा विदयुत पुरवठा बंद केल्यानंतर विरुध्द पक्षाने मीटरची तपासणी केली व तपासणी अहवाल नॉर्मल आहे, असे विरुध्द पक्षाने लेखी उत्तरात नमुद केले आहे. तसेच लेखी उत्तरासोबत तपासणी अहवाल दाखल केलेला आहे असे म्हटले आहे. परंतु तपासणी अहवालाची प्रत उत्तरासोबत दाखल केलेली नव्हती तसेच अहवालाची प्रत तक्रारकर्त्याला देखील दिलेली नाही. सदर प्रकरणामध्ये युक्तीवाद झाल्यानंतर विरुध्द पक्षाच्या वकीलांनी दिनांक 4/8/2014 रोजी मीटर टेस्टींग रिपोर्टची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने मीटर टेस्टींग साठी पैसे भरुनही विहीत मुदतीत त्याच्या मीटरची तपासणी न करणे व त्यास मीटर टेस्टींग रिपोर्ट न देणे ही विरुध्द पक्षाची कृती निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रृटी ठरते. तसेच शपथपत्रावर मीटर टेस्टींग रिपोर्ट दाखल केला असे लेखी उत्तरात लिहून देखील ते दाखल न करणे ही विरुध्द पक्षाची कृती निश्चितच समर्थनीय नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्त्यास निश्चितच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला व मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारकर्ता शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
तसेच मुळ तक्रारीवर आदेश पारित केल्यामुळे किरकोळ प्रकरण निकाली काढण्यात येते.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 5,000/-(पाच हजार) नुकसान भरपाईपोटी दयावेत. सदर रक्कम तक्रारकर्त्याच्या बिलातून समायोजित करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चासाठी रुपये 2,000/-(दोन हजार) दयावेत.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.