Final Order / Judgement | विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,अमरावती यांचे समोर तक्रार दाखल दिनांकः 06/05/2019 आदेश पारित दिनांकः 31/12/2020 तक्रार क्रमांक. : 121/2019 तक्रारकर्ता : श्री अक्षित हितेशकुमार शाह (Kadhi), वय – 25 वर्षे, व्यवसाय – व्यापार, दुकान नं.278, विंग नं. 34, सिव्हील लाईन, परतवाडा, ता. अचलपुर, जि. अमरावती -: विरुद्ध :- विरुध्द पक्ष : 1. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी तर्फे क्षेत्रीय मॅनेजर, सिव्हील लाईन, परतवाडा ता. अचलपुर, जि. अमरावती 2. मुख्य अभियंता, कॉमर्स, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी सिव्हील लाईन, परतवाडा ता. अचलपुर, जि. अमरावती तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. डी.के. वाधवानी वि.प. 1 व 2 तर्फे : अॅड. एस.एल. अळसपुरकर गणपूर्ती : श्री. एस. पी. देशमुख - मा. अध्यक्ष श्रीमती शुभांगी कोंडे - मा. सदस्य न्यायनिर्णय घोषित करणार श्रीमती शुभांगी कोंडे, मा. सदस्या -// आ दे श //- (दिनांक 31 डिसेंबर, 2020) तक्रारदाराने तत्कालिन उपभोक्ता संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे. - तक्रारदाराचे कथन आहे की, त्याने त्याच्या दुकानाकरीता सन 2017 मध्ये विरुध्द पक्ष 1 म.रा.वि.वि. कंपनीकडून विदयुत पुरवठा घेतला होता व त्याचा ग्राहक क्र.3529214142962 आहे. विरुध्द पक्ष 2 हे विरुध्द पक्ष 1 चे मुख्य अभियंता असुन ग्राहकांना विदयुत देयक पुरविण्याचे काम करतात. तक्रारदाराने विदयुत देयकाचा भरणा नियमितपणे न चुकता केला आहे, त्याचेकडे विदयुत देयकाची कोणतीही थकबाकी नाही.
- तक्रारदाराच्या विदयुत मिटरची स्थिती व्यवस्थित असतांना त्याला एप्रील 2019 मध्ये विरुध्द पक्ष 2 ने विजेचे देयक मागील मीटर वाचन 18214 आणि चालु मीटर वाचन 18549 असे एकुण 335 युनीटचे रक्कम रुपये 4243.94/- दिले. सदर देयकामध्ये तक्रारदाराकडे विजेची थकबाकी रक्कम रुपये 4,08,696.87/- आणि तडजोडी नंतरची रक्कम रुपये 2,00,590.80/- वजा जाता रक्कम रुपये 2,08,279.29/- थकबाकी दर्शविली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून एकुण देयकाची रक्कम रुपये 2,12,520 मागणी केली आहे व ते दिनांक 29/4/2019 नंतर भरल्यास रक्कम रुपये 2,12,580/- भरावे लागतील असे बिलात नमुद आहे.
- तक्रारदाराचे कथन आहे की विरुध्द पक्षाने दिलेल्या अवाजवी विदयुत देयकाची चौकशी करण्या अगोदरच व ते समजुन घेण्या अगोदरच विरुध्द पक्षाने त्यांच्या अधिका-यामार्फत दिनांक 3/5/2019 रोजी तक्रारदाराची विदयुत जोडणी कापून घेतली. विरुध्द पक्षाची ही कृती बेकायदेशीर असून त्यांना कोणताही तसे करण्याचा अधिकार नाही. जेव्हा की चालु देयक रुपये 4,243.94 भरण्यास तक्रारदार तयार आहे. तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याने, विरुध्द पक्षाने त्याची विदयुत जोडणी कापुन घेवून तसेच त्याला अवाजवी विदयुत देयक पाठवून सेवेत त्रृटी व अनुचित व्यापारी पध्दती केली आहे. ज्यामुळे तक्रारदाराला त्याच्या व्यवसायात नुकसानी होत आहे. करीता विरुध्द पक्षा विरुध्द दाद मागावयास त्याला आयोगात तक्रार दाखल करावी लागली.
- तक्रारदाराची प्रार्थना आहे की, त्याची तक्रार मंजुर करुन विरुध्द पक्षाने त्याचा जो विदयुत पुरवठा खंडीत केला व तो परत जोडणी न करता दिनांक 15/4/2019 च्या देयकामध्ये नमुद असलेली थकबाकी भरण्याची मागणी विरुध्द पक्षाने केली, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे, असे आयोगाने घोषित करावे. तक्राराकडून चालु बिलाची रक्कम रुपये 4,243.94/- विरुध्द पक्षाने स्विकारुन त्याची विदयुत जोडणी पुर्ववत करुन देण्याचे निर्देश आयोगाने विरुध्द पक्षाला दयावे. विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रास व व्यापारातील नुकसानी करीता रक्कम रुपये 5,00,000/- देय व्हावी.
- तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत एकुण 04 दस्तं दाखल केले आहेत. तक्रारदाराची कथनं सदर दस्तांवर आधारित असल्याचे दिसून येते.
- विरुध्द पक्षाने आपला प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीतील मुद्दयांवर सखोल चौकशी व पुरावे होणे आवश्यक आहे. त्याबाबत हया आयोगाला चौकशीचा अधिकार नाही. याशिवाय लेखी कथनांत नमुद आहे की, विरुध्द पक्ष 2 यांचे नावाचे कार्यालय हे परतवाडा अथवा अमरावती येथे अस्त्तीत्वात नसतांना त्यांना पक्षकार केले आहे व त्यांना योग्य ते सुचनापत्र बजावणी झाली नाही. विरुध्द पक्षाने तक्रारदाराला पाठविलेले वादातीत विदयुत देयक हे घटनास्थळ पंचनाम्याच्या दिवशी आढळून आलेल्या मीटर वाचनानुसार व तक्रारदाराच्या प्रत्यक्ष विदयुत वापरानुसार दिले आहे. विदयुत मीटरच्या चाचणीवेळेस तक्रारदार स्वतः हजर होता, त्याला त्याबाबत कोणतीही हरकत असती तर त्याने इलेक्ट्रीक इन्स्पेक्टर कडे जे योग्य अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जायला पाहिजे होते.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराच्या तक्रारीच्या परिच्छेद निहाय जबाब देतांना तक्रारदाराला सन 2017 ला विदयुत पुरवठा दिला होता, व वादातीत विज देयक त्यांनीच दिले होते तसेच तक्रारदाराची केस वीज चोरी संदर्भात नाही, हया बाबी मान्य करुन तक्रारदाराचे तक्रारीतील उर्वरीत संपुर्ण कथनं अमान्य केली आहेत.
- विरुध्द पक्षाने आपल्या अतिरीक्त जबाबात नमुद केले की, तक्रारदाराचे तक्रारीत विदयुत देयक नियमित भरत असल्याची बाब खोटी आहे, हे त्याच्या दाखल दस्तांवरुन दिसून येते. त्याने सन 2019 एप्रिल चे दाखल केलेले विदयुत देयकास त्याने सर्वात शेवटी भरलेल्या विदयुत देयकाचा भरणा दिनांक 17/10/2018 नमुद आहे, ज्यावरुन त्याचेकडे विदयुत देयक थकबाकी असल्याचे दिसून येते. तक्रारदाराचे मिटर वाचकाशी संगनमत असल्याने त्याला कमी मिटर वाचनाचे विदयुत देयक देण्यात येत होते. ज्यावेळी दिनांक 30/11/2018 रोजी विरुध्द पक्षाच्या भरारी पथकाने तक्रारदाराच्या जागेला भेट दिली, तेव्हा तक्रारदाराच्या समक्ष खरे मीटर वाचन 16539 आढळले होते व ते विभागीय कार्यालय यांना पाठवून त्यांच्या संमतीनुसार विरुध्द पक्षाने फेब्रुवारी 2019 चे विदयुत देयक चालु महिन्याचे देयक व मागील राहिलेल्या युनीटचे मिळून रक्कम रुपये 1,78,729.46 पैसेचे दिले होते. त्यानंतर मार्च 2019 चे मीटर वाचन घेण्यात आले व ते संगणकामध्ये समाविष्ट करण्यात आले, परंतु भरारी पथकाने अगोदर घेतलेले मीटर वाचन संगणकामध्ये समाविष्ट न झाल्याने परत तक्रारदाराच्या मीटर वाचनाची प्रक्रिया जानेवारी 2019 ते मार्च 2019 पर्यंत म्हणजे मीटर वाचन 16589 ते 18214 पर्यंत करण्यात आली व तक्रारदारााल रक्कम रुपये 2,00,590/- चे विदयुत देयक रक्कम रुपये 2,12,402 चे क्रेडीट दिल्यानंतर देण्यात आले. तक्रारदाराने सदर देयकाचा भरणा विभागणी करुन देण्याची विनंती विरुध्द पक्षाला केली होती, ती त्यांनी मान्य केली परंतु तक्रारदाराने देयक न भरता विरुध्द पक्षा विरुध्द खोटी तक्रार दाखल केली.
- विरुध्द पक्षाने प्रकरणात आपल्या पुराव्या पृष्टर्थ्य श्री भारत गुलाब सिडाम, सहायक अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी लिमीटेड परतवाडा यांचे शपथपत्र दाखल केले. सेाबत एकुण 07 दस्त दाखल केले. त्यांनतर परत दिनांक 1/10/2019 रोजी श्री भारत गुलाब सिडाम यांचा शपथेवर पुरावा व सोबत 07 दस्त दाखल केलेत.
- सदर प्रकरणी तक्रारदार व त्याचे वकील अनेक तारखा देवूनही युक्तीवादाकरीता हजर झाले नाही करीता विरुध्द पक्षाच्या युक्तीवादाअंती दाखल दस्तं व कथनांचे आधारे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
- तक्रारदाराची तक्रार, त्याने अभिलेखावर दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, त्याचे दाखल पुरावे व दस्तं तसेच तोंडी युक्तीवाद विचारात घेता आयोगाने न्यायनिर्णया करीता खालील मुद्दे विचारात घेतलेत. प्रत्येक मुद्दयाच्या विरुध्द बाजुस आमचे निष्कर्ष त्या खालील कारणांच्या आधारे नोंदलेत.
मुद्दे निष्कर्ष 1. | तक्रारदाराने हे सिध्द् केले काय की, विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून तक्रारदाराला सेवा देण्यात कसुर केल्यामुळे त्याला हानी झाली ? | नाही. | 2. | तक्रारदार मागतो त्या अनुतोषास पात्र आहे, हे त्याने सिध्द केले का? | नाही. | 3. | अंतीम आदेश व हुकूम काय ? | तक्रार नामंजुर. |
कारणमिमांसा - कारणे मुद्दा क्र. 1 व 2 करीता – सदर प्रकरणाचे अवलोकन केले असता असे आढळून येते की, तक्रारदाराने सदरची तक्रार विरुध्द पक्षाने त्याला मागील थकबाकी दर्शवून अवाजवी विदयुत देयक दिनांक 15/4/2019 चे दिले व ते न भरल्याने त्याचा विदयुंत पुरवठा खंडीत केला, ही विरुध्द पक्षाची अनुचित व्यापारी पध्दती व सेवेतील तृटी विरुध्द दाखल केली.
- तक्रारदाराने आपल्या तक्रारी सेाबत दाखल केलेल्या दस्तांमध्ये दस्तं क्र.1 दिनांक 15/4/2019 चे वादातीत देयक आहे. त्याचे अवलोकन केले असता मागील मीटर वाचन 18549 व चालु चालु मीटर वाचन 18214 व 335 युनीट, देयक रक्कम रुपये 2,12,520/- दर्शविली आहे. त्याच्याच मागील बाजुस 14 नं पानावर चालु देयक रक्कम रुपये 4,243.94/- थकबाकी रक्कम रुपये 200590.80 एकुण थकबाकी देयक रक्कम रुपये 2,12,520/- दिसून येते. व त्याच बिलामध्ये तक्रारदाराने सर्वात शेवटी विज देयक दिनांक 17/10/2018 रोजी रक्कम रुपये 6620.00/- भरल्याचे नमुद आहे. सोबत दस्त क्र. 2,3,4 मध्ये विरुध्द पक्षाने त्याला दिलेले दिनांक 15/01/2019, 14/12/2018 चे देयक आहे.
- विरुध्द पक्ष वकीलांचा युक्तीवाद आहे की, तक्रारदाराला विदयुत पुरवठा दिल्यापासून त्याला कमी विज वापराची देयकं मीटर वाचकाशी तक्रारदाराने संगनमत केल्याने देण्यात आली व दिलेली देयकही तक्रारदाराने भरलेली नाही. त्याच्या पुराव्या पृष्टर्थ्य दस्तं क्र.4 विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे ग्राहक (Consumer Personal Ledger) दाखल केले. ज्याचे अवलोकन केले असता फेब्रुवारी 2017 पासून नोव्हेंबर 2018 पर्यंत समान 75 युनीटचा विज वापर दर्शविला आहे. याचाच अर्थ प्रत्येक महिन्यात तक्रारदाराला समान विज वापराचे बिल येत होते. तसेच फे्ब्रुवारी 2017 पासून ते सप्टेंबर 2017 पर्यंत तक्रारदाराने विदयुत देयकाचा भरणा केलेला नाही व ऑक्टोबर 2018 ला विज देयक भरणा केला, म्हणजेच तक्रारदाराने विरुध्द पक्षाने दिलेल्या विदयुत देयकाचा भरणा पुर्ण तर केलाच नाही पण नियमित ही केला नाही असे स्पष्ट दिसून येते. विरुध्द पक्षाचा युक्तीवाद आहे की, तक्रारदाराला योग्य विज वापराचे देयक देण्यात येत नसल्याचे त्याच्या निदर्शनास दिनांक 22/11/2018 रोजी आले, ज्यावेळी प्रत्यक्ष मीटरची पाहणी भरारी पथकाने केली. सदरचा दस्तं क्र.1 विरुध्द पक्षाने दाखल केला, ज्याचे अवलोकन केले असता मीटर मंजुर भार 0.5kw दर्शविला आहे व जोडलेला भार 4.5kw दिसून येतो तसेच मीटर वाचन 16589 दर्शवीले आहे व मिटर व्यवस्थित आहे, असे नमुद आहे. सदर मीटर तपासणी अहवालावर तक्रारदाराची सही दिसून येते. त्यानुसार चुकीच्या वीजवापरामुळे विरुध्द पक्षाने दिनांक 5/1/2019 रोजी व दिनांक 25/3/2019 चे बिल, रिवीजन रिपोर्ट दिला, जो दस्तं क्र.2,3 विरुध्द पक्षाने दाखल केला. ज्यामध्ये 2018 पर्यंत 23 महिन्याचे देयकाचे रक्कम रुपये 178766.91/- तक्रारदाराची देयक थकबाकी दर्शवीली आहे. विरुध्द पक्षाने दिनांक 25/3/2019 रोजी स्थळ निरीक्षण अहवाल दिलेला आहे, ज्यावर तक्रारदाराची सही आहे.
- विरुध्द पक्षाने निशानी क्र.16 वर श्री भारत गुलाब सिडाम, सहायक अभियंता, म.रा.वि.वि.कं. यांचे शपथपत्र दाखल केले. ज्यामध्ये त्यांनी तक्रारदाराच्या मीटरची पाहणी प्रत्यक्ष त्याच्या समक्ष केल्याचे व अहवाल दिल्याचे नमुद केले. तसेच निशानी क्र.18 वर परत श्री भारत गुलाब सिडाम यांचा पुरावा दाखल केला, ज्यामध्ये तक्रारदाराची तक्रार आयोगासमोर दाखल असतांना व तक्रारदाराचा विदयुत पुरवठा खंडीत असतांना त्याच्या दुकानास भेट दिली असता तक्रारदाराने विदयुत चोरी दुसरीकडून केलेली दिसून आली. त्यानुसार तक्रारदारा विरुध्द पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला आहे.
- विरुध्द पक्षाने पुराव्या पृष्टर्थ्य निशानी क्र.20 वरील दस्तांमध्ये दस्त क्र.1 दुकानाचे फोटो, दस्तं क्र.2 स्थळ निरीक्षण अहवाल, दस्तं क्र.3 घटनास्थळ पंचनामा, दस्तं क्र.4 पोलीस फिर्याद, दस्तं क्र.5 वीज चोरी असेसमेंट बील, दस्तं क्र.6 Compounding load bill व दस्तं क्र.7 तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे केलेले अर्ज आहे.
- विरुध्द पक्षाने प्रकरणात दाखल केलेले सर्व दस्तांचे अवलोकन केले असता तक्रारदार हा विदयुत देयक नियमीत व संपुर्ण भरणारा ग्राहक नव्हता व त्याच्या ग्राहक या नात्याने स्वतःच्या वर्तणुकीमध्ये त्रृटी होत्या, हे सिध्द होते. तक्रारदाराने आपली तक्रार सिध्द करण्याकरीता कोणताही पुरावा दाखल केला नाही व विरुध्द पक्षाने दाखल केलेले दस्तंही प्रतिउत्तराद्वारे नाकारले नाही किंवा पुराव्याद्वारे खोटे असल्याचे सिध्द केले नाही. करीता तक्रारदाराने विरुध्द पक्षाची अनुचित व्यापारी पध्दती व सेवेतील त्रृटी सिध्द केली नाही, असा आयोगाचा निष्कर्श आहे, म्हणून मुद्दयांना नकारार्थी निष्कर्श नोंदवून आदेश देण्यात येत आहे.
- अंतीम आदेश – तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात आली. | |