(घोषित दि. 31.12.2010 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीने चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून त्याच्या राहत्या घरी ग्राहक क्रमांक 510090394701 द्वारे वीज जोडणी घेतलेली आहे. दिनांक 13.06.2010 रोजी वादळी पावसामुळे विद्युत कंपनीने उभे केलेले सर्व खांब पडल्यामुळे त्याच्या गावाकडे येणारा वीज पुरवठा विस्कळीत झाला. दिनांक 28.07.2010 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्याच्या घरी कंत्राटदारा मार्फत मीटर बसविले. परंतू त्याचा वीज पुरवठा सुरु केला नाही. त्याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असता त्यांनी पावसाळा संपल्यानंतर खांब उभारण्याचे काम होईल असे सांगितले. परंतू वीज पुरवठा सुरु नसतांना देखील वीज वितरण कंपनीने त्यास वीज वापराची देयके दिली. देयकामध्ये वीज वितरण कंपनीने खोटी रिडींग नोंदविली. त्याने वीज वितरण कंपनीकडून प्राप्त झालेल्या देयकामधील रिडींग चुकीची असल्याचे लाईनमनच्या निदर्शनास आणून दिले. तरी देखील वीज वितरण कंपनीने पुन्हा चुकीची देयके दिली. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरु न करता चुकीची व खोटी देयके देऊन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास देण्यात आलेली बेकायदेशीर व खोटी देयके रद्द करावीत आणि त्याचा वीज पुरवठा सुरु करण्याबाबत वीज वितरण कंपनीला आदेश देण्यात यावा तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराला वीज पुरवठा सुरु केल्यानंतर त्याने वापर केलेल्या युनिटचेच देयक देण्यात आलेले आहे. तक्रारदाराला देण्यात आलेल्या देयकावर तांत्रीक कारणांमुळे फोटो आला नाही किंवा रिडींग आली नाही तरी त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. तांत्रीक कारणांमुळे रिडींग उपलब्ध झाली नाही तर नियमाप्रमाणे सरासरी देयक दिले जाते आणि रिडींग उपलब्ध झाल्यानंतर समायोजन केले जाते. तक्रारदाराला त्याने जेवढी वीज वापरली तेवढयाच वापराबद्दल देयक देण्यात आलेले आहे. परंतू देयकाची रक्कम न भरता वीज पुरवठा सुरु रहावा म्हणून तक्रारदाराने ही काल्पनीक तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराला देण्यात आलेली देयके योग्य असून, त्याला त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.एम.आर.वाघुंडे आणि वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांनी युक्तीवाद केला. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 10.08.2010 रोजी दिनांक 30.06.2010 ते 31.07.2010 या कालावधीसाठी 44 युनिट वीज वापराचे देयक (नि.7) दिलेले असुन, सदर देयकामधे मागील रिडींग 51 आणि चालू रिडींग 95 दर्शविलेली आहे. या देयकामधे तक्रारदाराचा मागील वीज वापर देखील दर्शविलेला असुन एप्रिल 2010 मधील वीज वापर 65 युनिट, तसेच मे आणि जुन 2010 मधील वीज वापर प्रत्येकी 50 युनिट दर्शविलेला आहे. तसेच तक्रारदाराला दिनांक 10.12.2010 रोजी दिनांक 31.10.2010 ते 30.11.2010 या कालावधीसाठी दिलेले देयक पाहता त्यामध्ये मागील रिडींग 200 आणि चालू रिडींग 235 अशी दर्शवून या कालावधीतील तक्रारदाराचा वीज वापर 35 युनिट दर्शविलेला आहे. आणि याच देयकामध्ये मागील वीज वापर दर्शविला असून जुलै 2010 मधील वापर 44 युनिट, ऑगष्ट 2010 मधील वीज वापर 32 युनिट आणि सप्टेंबर व ऑक्टोबर 2010 मधील वीज वापर अनुक्रमे 40 व 33 युनिट दर्शविलेला आहे. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे मीटर प्रत्यक्षात न पाहता रिडींग नोंदविल्याचे कोर्ट कमीशनर श्री.बी.एम.वाघमारे यांचा अहवाल नि.22 वरुन दिसुन येते. तक्रारदाराच्या मीटरमधील रिडींग व मीटरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तक्रारदाराच्या विनंतीवरुन कोर्ट कमीशनरची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार कोर्ट कमीशनर श्री.बी.एम.वाघमारे यांनी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत दिनांक 11.12.2010 रोजी तक्रारदाराच्या मीटरची पाहणी केली त्यावेळी कोर्ट कमीशनर श्री.वाघमारे यांना तक्रारदाराच्या मीटरमधील रिडींग 00004 असल्याचे दिसुन आले. कोर्ट कमीशनर यांनी नोंदविलेले सदर निरीक्षण वीज वितरण कंपनीने देखील मान्य केले आहे. दिनांक 11.12.2010 रोजी तक्रारदाराच्या मीटर मधील रिडींग केवळ 04 अशी असतांना वीज वितरण कंपनीने दिनांक 30.11.2010 रोजी त्याच्या मीटर मधील रिडींग 235 अशी दर्शविलेली आहे. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा सुरु नसुनही त्यास वीज वापराची देयके दिल्याच्या तक्रारदाराच्या म्हणण्यास या मंचासमोर तक्रारदाराच्याच गावातील इतर पाच व्यक्तींनी दाखल केलेल्या तक्रारींवरुन पुष्टी मिळते. वीज वितरण कंपनीने तक्रार क्रमांक 108/10, 109/10, 110/10, 111/10 आणि 112/10 मधील तक्रारदारांना दिलेल्या देयकामधे सर्वांचाच मे व जुन 2010 मधील वीज वापर प्रत्येकी 50 युनिट दर्शविलेला आहे. यावरुन वीज वितरण कंपनीने प्रत्यक्ष मीटर रिडींग न नोंदविता खोटया व चुकीच्या नोंदी घेवून तक्रारदारासह उपरोल्लेखीत पाच प्रकरणातील तक्रारदारांना अंदाजानेच मीटर रिडींग नोंदवून देयके दिल्याचे स्पष्ट दिसुन येते. यावरुन हेच दिसून येते की, वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला एप्रिल 2010 पासुन आतापर्यंत वेळोवेळी दिलेल्या देयकांमध्ये नोंदविलेली मागील व चालू रिडींग निश्चितपणे चुकीची व खोटी आहे आणि तक्रारदाराचा एप्रिल 2010 पासून दर्शविलेला वीज वापर देखील चुकीचा आहे. तक्रारदाराच्या मीटरमधील दिनांक 11.12.2010 रोजीची रिडींग 04 असुन सदर रिडींग हेच दर्शविते की, वीज वितरण कंपनीने त्याचा वीज पुरवठा सुरु नसतांनाही त्यास वेळोवेळी चुकीची मीटर रिडींग नोंदवून खोटी देयके दिलेली आहेत. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला खोटी देयके देऊन त्यास केवळ त्रुटीची सेवा दिलेली नसून वीज वितरण कंपनीने अनुचित व्यापार देखील केलेला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तक्रारदारास (ग्राहक क्रमांक 510090394701) एप्रिल 2010 पासुन दिनांक 30.11.2010 पर्यंत दिलेली सर्व देयके रद्द करण्यात येतात. 3 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तक्रारदारास (ग्राहक क्रमांक 510090394701) एप्रिल 2010 पासुन दिनांक 11.12.2010 पर्यंत केवळ 04 युनिट वीज वापराचे देयक द्यावे आणि सदर देयक देत असतांना एप्रिल 2010 ते 11.12.2010 या कालावधीसाठी स्थिर आकार, इंधन समायोजन आकार आणि अतिरिक्त पुरवठा आकार तसेच व्याज लावू नये. 4 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तक्रारदारास (ग्राहक क्रमांक 510090394701) मानसिक त्रासापोटी रुपये 500/- (रुपये पाचशे फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावेत. 5 दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा.
| HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |