(घोषित दि. 22.06.2011 व्दारा सौ.माधूरी विश्वरुपे, सदस्या) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी तक्रारदार क्रमांक 1 व 2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे 1989 पासून ग्राहक असुन, गैरअर्जदार 3 ते 5 हे गैरअर्जदार 1 व 2 यांचे कर्मचारी आहेत. तक्रारदार क्रमांक 1 व 2 हे नियमितपणे विद्युत देयके भरणा करणारे ग्राहक असुन, अद्यापपर्यंत त्यांचे कोणत्याही प्रकारचे विद्युत देयक थकीत झालेले नाही. तक्रारदारांनी दिनांक 30.08.2010 व 23.08.2010 रोजी विद्युत देयकाचा भरणा केला आहे. गैरअर्जदार 3 ते 5 यांनी गावातील राजकारणाच्या दबावाखाली येवून तक्रारदारांचा विद्युत पुरवठा दिनांक 27.08.2010 रोजी पूर्व सुचना न देता खंडीत केला. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याबाबत लेखी पत्र दिनांक 31.08.2010 रोजी दिले. तसेच दिनांक 04.10.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतू गैरअर्जदारांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 ते 5 हजर झालेले असुन, लेखी म्हणणे दिनांक 21.03.2011 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांनी तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला मजकूर अमान्य केला असुन तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडीत केला नसल्याचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी दिनांक 18.04.2010 रोजी दाखल केलेल्या ग्रामपंचायत भार्डी ता.अंबड जि.जालना यांच्या दिनांक 06.03.2011 रोजीच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार तक्रारदारांच्या पिठाच्या गिरण्या चालू करण्याबाबत ठराव घेतल्याचे दिसुन येते. म्हणजेच तक्रारदारांचा विद्युत पुरवठा गैरअर्जदार यांनी खंडीत केल्याची बाब स्पष्ट होते. सदरचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे कोणतेही कारण गैरअर्जदार यांनी दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांचा विद्युत पुरवठा कोणत्याही कारणाशिवाय खंडीत केल्याची बाब स्पष्ट होते. गैरअर्जदार 1 व 2 यांनी खुलाशात तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला नसल्याबाबत नमूद केले आहे. परंतू तक्रारदरांनी दिनांक 31.08.2010 रोजी गैरअर्जदारास त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याबाबत दिलेली तक्रार तसेच तक्रारदारांनी अड.आर.टी.गायके यांच्या मार्फत दिनांक 07.10.2010 रोजी दिलेली नोटीस पाहता वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडीत केला होता ही बाब स्पष्ट दिसुन येते. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा जर खंडीत केला नसता तर तक्रारदारांनी दिनांक 31.08.2010 रोजी वीज वितरण कंपनीला त्यांचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्याबाबत वीज वितरण कंपनीकडे अर्ज देण्याचा प्रश्न उदभवला नसता. वीज पुरवठा खंडीत केलेला नसतांना तक्रारदार विनाकारण या मंचाकडे तक्रार दाखल करणार नाही. तक्रारदाराला खोटी तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचा विद्युत पुरवठा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी कोणत्याही कारणाशिवाय खंडीत केला आहे. गैरअर्जदार यांची सदरची कृती सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. विद्युत पुरवठा बराच काळ खंडीत झाल्यामुळे तक्रारदारांना निश्चितपणे मानसिक त्रास झाला आहे व सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. या कारणास्तव गैरअर्जदार 1 व 2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 1,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- देणे उचित होईल. असे न्यामंचाचे मत आहे. सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे. आदेश - तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना आदेश कळाल्यापासून 1 महिन्याचे आत मानसिक त्रासाची रक्कम रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) देण्यात यावी.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना आदेश कळाल्यापासून 1 महिन्याचे आत तक्रारीचा खर्च रुपये 500/- (रुपये पाचशे फक्त) देण्यात यावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |