जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 98/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-22/01/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 11/10/2013.
डॉ.कपूरचंद गंगाबीसन बिर्ला,
रा.बिर्ला हॉस्पीटल, मारवाडी गल्ली,
मेन रोड, एरंडोल,ता.एरंडोल,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
धरणगांव, ता.धरणगांव,जि.जळगांव.
(तक्रारीची नोटीस कार्यकारी अभियंता,धरणगांव
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत
यांचेवर बजावण्यात यावी.)
2. सहायक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
टेलिफोन ऑफीस जवळ, एरंडोल,ता.एरंडोल,
जि.जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.संग्राम बी.चव्हाण वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे श्री.कैलास एन.पाटील वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः अवास्तव विज देयकाबाबत तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन ग्राहक क्रमांक 137521042279 अन्वये विज कनेक्शन डोमेस्टीक वापरासाठी घेतलेले असुन तक्रारदार हे नियमाप्रमाणे आलेले बिले भरणा करीत होते. दरम्यान तक्रारदाराचे जुने मिटर क्रमांक 9001575938 काढुन त्या ठिकाणी नवीन इलेक्ट्रॉनीक मिटर क्र.9010150135 बसविण्यात आले. तक्रारदारास दि.31/03/2008 ते दि.30/04/2008 पर्यंत 0 युनीटचे बिल सरासरी रु.890/- चे दिले. त्यानंतर दि.30/04/2008 ते दि.31/05/2008 पर्यंत 0 युनीटचे बिल रु.840/- चे सरासरी दिले. त्यानंतर पुन्हा दि.31/05/2008 ते दि.30/06/2008 पर्यंत 0 युनीटचे बिल सरासरी रु.2220/- चे दिले. सदर बिलाबाबत तक्रारदाराने तक्रार केली असता त्यास सदरचे बिल कमी करुन रु.1,370/- चे देण्यात आले ते तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे भरणा केले. त्यानंतर तक्रारदारास दि.30/06/2008 ते दि.31/07/2008 या कालावधीचे 0 युनीटचे बिल रु.850/- चे सरासरी वापर म्हणुन देण्यात आले. तक्रारदारास दि.31/07/2008 ते दि.31/08/2008 पर्यंत 2002 युनीट दाखवुन विज बिल सरासरी रु.5,690/- देण्यात आले. सदर बिलाची तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे तक्रार करुन ते भरणा केले. तक्रारदारास दि.31/08/2008 ते दि.30/09/2008 या कालावधीचे 0 युनीट चे बिल सरासरी 383 युनीट विज वापर दाखवुन रु.7,580/- चे दिले त्याबाबत तक्रारदाराने तक्रार केली असता तक्रारदाराने रु.1,820/- पुर्वीच भरणा केले असल्याने त्यास रु .5,870/- चे बिल दिले. अशा पध्दतीने विरुध्द पक्षाने तक्रारदारास वेळोवेळी 0 युनीट वापर दर्शवुन सरासरी देयके देऊन त्रृटीयुक्त सेवा दिली. सबब तक्रारदार यांना देण्यात आलेले दि.30/09/2008 ते दि.31/10/2008 यामध्ये दाखविलेले समायोजीत युनीट 1312 चुकीचे असल्याचे ठरवुन सदर बिल रद्य करण्यात यावे व पुन्हा नियमानुसार कायदेशीर बिल देण्याचे आदेश व्हावेत, विरुध्द पक्ष यांनी दि.31/03/2008 ते दि.30/09/2008 पर्यंत बेकायदा सरासरी दाखविलेले युनीट व त्यानुसार घेतलेल्या रक्कमा परत करण्याचे आदेश व्हावेत, मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने दि.10/01/2001 रोजी तत्कालीन मंडळाकडुन घरगुती वापरासाठी 0.50 के.डब्ल्यु चा विज पुरवठा ग्राहक क्र.137521042279 अन्वये घेतला असुन त्याचेकडे विज वापराची नोंद घेण्यासाठी मिटर क्र.1575938 सप्टेंबर,2007 पासुन बसविण्यात आलेले होते. मार्च,2008 पावेतो तक्रारदारास रिडींगप्रमाणे बिले दिलेले असुन त्याबाबत काहीएक वाद नाही. दि.31/03/2008 ते दि.31/07/2008 या कालावधीत तक्रारदाराचे मिटर वाचन उपलब्ध न झाल्याने त्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग विनिमय,2005 चे विनिमय 15.3 नुसार अंदाजीत सरासरी 238 युनीट प्रमाणे आकारणी करुन विज बिले देण्यात आली. दि.31/07/2008 ते दि.31/08/2008 या कालावधीत तक्रारदाराचे मिटरचे मागील वाचन 1477 व चालु वाचन 3479 असे आले म्हणुन 3479- 1477 = 2002 युनीटचे मिटर रिडींगपमाणे विज बिल आकारणी करुन त्यातून तक्रारदाराने मागील काळात म्हणजे दि.31/03/2008 ते दि.31/07/2008 या काळात सरासरी 238 युनीट प्रमाणे आकारणी करुन जी बिले भरली होती त्याची रक्कम रु.3,285.83 वजावट करुन रक्कम रु.5,690/- चे देण्यात आले. सदरचे विज बिल भरण्याची शेवटची मुदत दि.29/09/2008 असतांना ते तक्रारदाराने मुदतीत अदा न करता दि.10/10/2008 रोजी अदा केले म्हणुन पुढील बिलात थकबाकी दाखविण्यात आली. तक्रारदाराने मिटर बाबत शंका उपस्थित केल्याने मिटर तपासणी बाबत दि.15/09/2008 रोजी तपासणी फी भरल्यानंतर मिटर टेस्टींग युनीट धरणगांव येथे तपासणीअंती दि.1/10/2008 रोजी त्यात काहीही दोष आढळुन आला नाही. त्याबाबत तक्रारदारास पत्र क्र.1875 नुसार दि.6/12/2008 रोजी कळविले आहे. दि.31/08/2008 ते दि.30/09/2008 या काळात तक्रारदाराचे मिटर मागील वाचन 3479 व चालु वाचन मिटर चेंज असा शेरा असल्याने व संगणकास मिटर बदल अहवाल प्राप्त न झाल्याने विद्युत पुरवठा संहिता विनिमय,2005 चे विनिमय 15.3 नुसार सरासरी 383 युनीटचे मागील थकबाकीसहचे विज बिल देण्यात आले. ऑगष्ट,2008 चे विज बिल भरण्याची मुदत दि.29/09/2008 होती तथापी तक्रारदाराने सदरचे विज बिल दि.10/10/2008 रोजी मुदतीनंतर अदा केल्याने सप्टेंबर,2008 चे बिलात थकबाकी दर्शविली होती. तक्रारदाराने भरणा केलेले बिल दाखविल्यानंतर त्यास थकबाकी कमी करुन रक्कम रु.1,710.99 चे दुरुस्त देयक दिले. दि.30/09/2008 ते दि.31/10/2008 या कालावधीत नवीन मिटरचे मागील वाचन 0002 व चालु वाचन 375 असे आले म्हणुन 375-2 =373 युनीट नवीन मिटरचे व जुने मिटर काढले त्यावेळी त्याचे शेवटचे वाचन 4791 असे होते. तक्रारदारास जुन्या मिटरचे वाचन 3479 या पर्यंत बिलांची आकारणी करण्यात आलेली होती म्हणुन 4791- 3479=1312 युनीट जुन्या मिटरचे अधिक 373 युनीट नवीन मिटरचे असे एकुण 1685 युनीटचे मिटर वाचनानुसार विज बिल देण्यात आले होते व सदर विज बिलातून तक्रारदारास सप्टेंबर,2008 या कालावधीत मिटर बदल केल्यामुळे सरासरी 383 युनीटची रक्कम रु.1,677.39 वजावट करुन देण्यात आली होती अशा प्रकारे विरुध्द पक्षाची काहीएक चुक नसतांना तक्रारदाराने केलेला बनावट अर्ज खर्चासह रद्य करुन विरुध्द पक्षास ग्राहक संरक्षण कायदा कलम 26 नुसार नुकसानी दाखल रु.10,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तसेच उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? असल्यास कोणी ? नाही.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र. 1 व 2 - तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन ग्राहक क्र.137521042279 नुसार विज कनेक्शन घेतले आहे ही बाब वादातीत नाही. तसेच तक्रारदारास मार्च,2008 पावेतो रिडींगप्रमाणे योग्य त्या वापराची देयके दिली ही बाबही वादातीत नाही. तक्रारदारास दिलेले दि.30/09/2008 ते दि.31/10/2008 यात दाखविलेले समायोजीत युनीट 1312 चुकीचे व बेकादेशीर असल्याचे ठरवुन मिळावे व पुन्हा कायदेशीर देयक देण्यात यावे तसेच दि.31/03/2008 ते दि.30/09/2008 पर्यंत दाखविलेले सरासरी युनीट व त्यानुसार घेतलेल्या रक्कमा परत कराव्यात अशी तक्रारदाराची प्रमुख मागणी आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी हजर होऊन तक्रारदारास दिलेले देयके कशी योग्य व कायदेशीर आहेत याचे पुष्ठयर्थ तक्रारदाराचे सी.पी.एल.दाखल केलेले असुन तक्रारदारास दिलेले 1312 युनीट बाबत समर्पक खुलासा लेखी म्हणण्यातुन केलेला आहे. याकामी तक्रारदाराचे सी.पी.एल.चे बारकाईने अवलोकन करता तक्रारदारास एकुण दोन बिलांची वजावट विरुध्द पक्षाने करुन दिलेली असल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदाराने वेळेवर बिलांचा भरणा केल्याचे दिसुन येत नाही त्यामुळे मागील थकबाकी पुढील बिलात लागुन बिल मोठया रक्कमांचे आल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदाराने विज मिटर बाबत शंका उपस्थित केल्यानंतर त्याचेच विनंतीनुसार सदरचे मिटरची तपासणी केली असता सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी एरंडोल यांचेकडील पत्र जा.क्र.सअ/एरंडोल/महसुल/1785, दि.6/12/2008 नुसार तक्रारदाराचे मिटरची टेस्टींग केली असता ते ओ.के. म्हणजेच सुस्थीतीत असल्याचे आढळुन आले आहे व तसा रिपोर्ट आला असुन त्यानुसार तक्रारदारास दिलेली बिले ही योग्य व बरोबर असल्याने त्यात दुरुस्ती करता येणार नाही असे तक्रारदारास कळविल्याचे पत्राच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी तक्रारदारास दिलेले वेळोवेळीचे देयके ही कशी योग्य होती हे लेखी म्हणण्यातुन योग्य ते स्पष्टीकरण देऊन तसेच त्यादाखल संबंधीत ग्राहकाचे सी.पी.एल.देऊन तक्रारदारास दिलेली बिले कायदेशीर व योग्य होती हे पटवुन दिलेले आहे. वरील एकंदर विवेचन, विरुध्द पक्षाचे लेखी म्हणणे, ग्राहकाचे सी.पी.एल इत्यादी विचारात घेता विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास योग्य त्या विज वापराची देयके दिल्याचे व त्यांचे सेवेत कोणतीही सेवा त्रृटी झाली नसल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्या क्र. 2 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 11/10/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.