निकालपत्र
( दिनांक 14-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. त्याचा ग्राहक क्र.559790001050 असा आहे. अर्जदाराचे मौजे किनाळा येथे गट नं. 123 मध्ये 3 हे 24 आर जमीन आहे. ज्यामध्ये 1 हेक्टर ऊस लावलेला आहे. अर्जदाराच्या सदर शेतजमीनीत गैरअर्जदार यांनी डी.पी. लावलेली आहे. त्याची निगरानी व्यवस्थीतपणे होत नसल्यामुळे त्यांत नेहमी शॉर्टसर्कीट होत असते. दिनांक 19.11.2014 रोजी अंदाजे दिनांक 2.00 ते 2.30 वाजता सदर डी.पी.त शॉर्ट सर्कीट होवून त्यातून निघालेल्या फुलंग्यामुळे अर्जदाराच्या शेतात कापणीस आलेल्या ऊसाला आग लागली व अर्जदाराच्या 1 हेक्टर शेतातील ऊस पूर्णतः जळून खाक झाला व त्यामुळे अर्जदाराचे रक्कम रु. 4,00,000/- चे नुकसान झाले. यापूर्वी देखील दिनांक 28.9.2014 रोजी अर्जदाराचा 1 एकर ऊस जळाला होता. त्याची गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार करुन देखील त्यांनी दखल घेतलेली नाही. दिनांक 21.11.2014 रोजी पोलीस स्टेान हदगांव येथे तक्रार केली असता जळीत प्रकरण क्र. 02/2014 अशी नोंद केली व जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला. अर्जदाराने तहसीलदार हदगांव, उप विभागीय अधिकारी हदगांव व गैरअर्जदार क्र. 1 यांना तक्रार दिली. दिनांक 20/11/2014 रोजी मंडळ अधिकारी हदगांव यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. अर्जदार यांनी विदयुत निरीक्षक नांदेड यांना दिनांक 21.11.2014 रोजी ऊस जळीत प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची तोंडी विनंती केली पण त्याचा उपयोग झाला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी विनंती केली आणि तहसीलदार हदगांव, पोलीस स्टेशन हदगांव, जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी अर्ज देखील दिले परंतू त्याचा उपयोग झाला नाही म्हणून मंचात तक्रार दाखल केलेली आहे व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा. अर्जदार यांना ऊस जळाल्याबद्दल नुकसान म्हणून रक्कम रु. 4,00,000/- 18 % व्याजासह घटनेच्या तारखेपासून ते रक्कम वसूल होईपर्यंत गैरअर्जदार यांच्याकडून देण्याचा आदेश व्हावा. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- ची मागणी अर्जदार यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदारास प्रस्तुत प्रकरण दाखल करण्याचा अधिकार नाही व तथाकथीत प्रसंगाचा विज जोडणीशी कोणाताही संबंध नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा. अर्जदाराने गैरअर्जदारांकडे कोणत्याही डी.पी. संदर्भात लेखी स्वरुपात अर्ज केलेला नाही त्यामुळे गैरअर्जदार अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. सदर डी.पी.त फॉल्ट होता व त्यामुळे शॉर्ट सर्कीट झाले हे म्हणणे चुकीचे व सपशेल खोटे आहे. अर्जदाराने वेळोवेळी सदरील भागातील लाईनमन जुनीअर इंजिनिअर, महावितरण कार्यालय हदगांव यांना सदर डी.पी. बद्दल तोंडी सांगितले व त्यांनी निष्काळजीपणास दाखवला व गंभीर दखल घेतली नाही त्यामुळे अर्जदाराचे 4 लक्ष रुपयाचे नुकसान झाले हे म्हणणे सपशेल खोटे व चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासहीत खारीज करावा.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदाराच्या शेतात ओहरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन त्याची ठिणगी पडून ऊस जळाला आहे. त्याची नुकसान भरपाईची मागणी करुन देखील गैरअर्जदाराने नुकसान भरपाई दिलेली नाही असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
4. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या बिलावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराच्या शेतातील ऊस जळाला होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पंचनामा, गैरअर्जदाराच्या अधिका-याने केलेला पंचनामा, तसेच महसूल अधिका-याने केलेल्या पंचनाम्यावरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदाराचे अधिकारी सहायक अभियंता यांनी केलेल्या पंचनाम्यात जळालेल्या ऊसाचे क्षेत्राचे मोजमाप दिलेले आहे. त्यावरुन अंदाजे 1.5 एकर शेतातील (250x230) ऊस जळालेला स्पष्ट आहे. पोलीस पंचनाम्यात, महसुल अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्यात आणि गैरअर्जदार यांच्या अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्यात अर्जदाराचे 2,00,000/- रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद केलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे. अर्जदार यांनी सदर जळालेला ऊस कारखान्यात दिल्याबद्दल व त्यास त्याचा किती मोबदला मिळाला त्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. गैरअर्जदाराने देखील याबद्दल काहीही भाष्य केलेले नाही म्हणून अर्जदार हा एकत्रीत नुकसान भरपाई रुपये 40,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास धोकादायक सेवा देवून सेवेत त्रुटी व मानसिक त्रास दिलेला आहे व त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऊस जळीताची नुकसान भरपाई म्हणून रु.40,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व दावा खर्चापोटी रु.1,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.