निकालपत्र
( दिनांक 16-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार द्वारकादास पिता चतुर्भुज माहेश्वरी, हा माहेश्वरी असोसिएट्स’ या फर्मचे प्रोप्रायटर आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांच्या तारासिंह मार्केट मधील दुकान क्र. 63 चा 1988 पासून भाडेकरु आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 यांच्यामध्ये वेळोवेळी करारनामे करण्यात आलेले आहेत. दिनांक 21.6.2012 पूवीचे सर्व मुळ करारनामे हे गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे आहेत. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास प्रतिमहा रु.14,000/- भाडे व रक्कम रु. 6,00,000/- डिपॉझीटची मागणी केली. सदर व्यवहाराप्रमाणे मागणीची पूर्तता केली नाही तर दुकान खाली करा किंवा लाईट कनेक्शन तोडून टाकू अशी धमकी दिली. सदर दुकानामध्ये अर्जदाराच्या पूर्वी श्री गोविंद एम. प्रसाद हे किरायदार होते. त्यांनी सदर दुकानात स्वतःच्या नावाने लाईटचे मिटर घेतलेले होते. ज्याचा मिटर क्र. 8000455221 असा आहे. सदर दुकानातील लाईटचे मिटर त्याच नावाने होते. अर्जदार हा सदर मिटरचा वापर करीत असून त्याने बिल नियमितपणे भरलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी 2 ते 3 महिन्यापूर्वी सदरील मिटर बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावाने करुन घेतले व त्यानंतर त्यांनी सदरील लाईट कनेक्शन कायमचे बंद करण्यासाठी गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांच्या कार्यालयात अर्ज दिला व गैरअर्जदार 2 ते 4 यांनी अर्जदारास कोणतीही सुचना न देता नोटीस न देता दिनांक 01.10.2014 रोजी अर्जदाराच्या दुकानाचा विदयुत पुरवठा बेकायदेशीररित्या खंडीत केला. सदरील दुकान क्र. 63 मध्ये लावलेले लाईटचे मिटर आजही दुकानात आहे व गैरअर्जदाराने सदरील लाईट कनेक्शन पोलवरुन बंद केलेले आहे. अर्जदार हे गैरअर्जदार 2 ते 4 यांच्या कार्यालयात दिनांक 04.10.2014 रोजी जावून विज पुरवठा पूर्ववत करण्यासंबंधी विनंती केली असता उडवाउडवीची उत्तरे देवून अर्जदारास कार्यालयाबाहेर काढले व गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र आणने आवश्यक आहे असे सांगितले. गैरअर्जदाराचा हा बर्ताव इलेक्ट्रीसिटी अॅक्टच्या विरुध्द आहे. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांना भेटून दुकानास विदयुत पुरवठा नियमित करण्याची विनंती केली असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी किराया व डिपॉझीट वाढवून दिले नाही तर लाईटची जोडणी करुन देणार नाही व दुकान खाली करा असे सांगितले म्हणून अर्जदाराने दिनांक 01.10.2014 पासून 1200/- रुपये प्रती दिवस देवून जनरेटर बसवले. अर्जदारास गैरअर्जदाराच्या सदर कृत्यामुळे व्यवसायात न भरुन निघणारे नुकसान होत आहे व मानसिक त्रास होत आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द दिनांक 09.10.2014 रोजी पोलीस अधिक्षक यांच्याकडे देखील तक्रार नोंदवलेली आहे. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदाराचा बेकायदेशीररित्या खंडीत केलेला विदयुत पुरवठा तात्काळ सुरु करण्याचे आदेशीत करावे किंवा गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांनी अर्जदाराच्या नावाचे नवीन मिटर अर्जदाराच्या खर्चाने बसवून देण्याचा आदेश करावा. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 5 लाख व जनरेटरचा खर्च 1200/- रुपये प्रतिदिन दिनांक 01.10.2014 पासून विज पुरवठा सुरु करेपर्यंत देण्याचे आदेशीत करावे तसेच मानसिक त्रास रु.25,000/- व दावा खर्च रु.20,000/- देण्याचा आदेशीत करावे.
2. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी मंचात हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही त्यामुळे त्यांच्याविरुध्द नो-सेचा आदेश पारीत करण्यात आला.
3. अर्जदार यांनी मुळ तक्रार अर्ज सोबत अंतरीम मनाई हुकूमासाठीचा अर्ज दिलेला होता. अर्जदाराचा सदर अर्ज दिनांक 09.10.2014 रोजी मंजूर करुन मंचाने गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांना अर्जदाराचा विदयुत पुरवठा पूर्ववत चालू करावा असे आदेशीत केलेले होते. त्यामुळे अर्जदाराच्या विनंतीनुसार मुख्य मागणीची पूर्तता झालेली आहे. अर्जदारानी त्याच्या तक्रार अर्जात केलेल्या मागणी क्र. 1 ते 7 हया गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांच्याकडून मागितलेल्या आहेत.
4. अर्जदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र. 5 मध्ये असे नमूद केलेले आहे की, गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदरील मिटर अंदाजे 2 ते 3 महिन्यापूर्वी गैरकायदेशीररित्या स्वतःच्या नावाने करुन घेतले असे कळाले व त्यानंतर त्यांनी सदरील लाईट कनेक्शन कायमचे बंद करण्यासाठी गैरअर्जदार यांच्या कार्यालयात अर्ज दिला व गैरअर्जदार 2 ते 4 यांनी अर्जदारास कोणतीही सुचना न देता दिनांक 01.10.2014 रोजी अर्जदाराचा विदयुत पुरवठा बेकायदेशीररित्या खंडीत केला’. यावरुन हे स्पष्ट आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांनी पुरवठा केलेल्या विदयुत मिटरचा उपभोग घेत आहे. परंतू गैरअर्जदार क्र. 1 यानी अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत करण्याचे गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांना सांगितल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांनी अर्जदारास म्हणजेच उपभोगकर्त्यास त्याची सुचना देणे क्रमप्राप्त होते परंतू गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांनी कोणतीही शहानिशा न करता केवळ गैरअर्जदार क्र. 1 च्या सांगण्यावरुन अर्जदारास सुचना न करता विदयुत पुरवठा खंडीत केला. अर्जदाराने ही बाब गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांच्या निदर्शनास आणून देखील गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यासाठी अर्जदारास तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. अर्जदाराचा विदयुत पुरवठा मंचाने अंतरिम आदेशानुसार पूर्ववत केलेला असल्याने पुन्हा विदयुत पुरवठा संदर्भात आदेश करणे उचित ठरणार नाही. परंतू गैरअर्जदार यांच्या कृत्यामुळे अर्जदारास तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे त्याला निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. अर्जदाराने दाखल केलेले जनरेटर वापराचे बिल विश्वासहार्य नाही.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
3. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात