जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1255/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 15/09/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 18/09/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 12/10/2009
अग्रोसन इंडीया,
तर्फे शामसुंदर वासुदेव अग्रवाल,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
रा.122, नवी पेठ, गणेश बिल्डींग, जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.जळगांव.
2. अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.,
विद्युत भवन, अजिंठा रोड, एम.आय.डी.सी.जळगांव.
3. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या.,
जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 12/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.आनंद एस.मुजूमदार वकील हजर
सामनेवाला क्र. 1 ते 3 तर्फे श्री.संजय जी.शर्मा वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदार ही एक भागीदारी फर्म असुन खादय बियावर प्रक्रिया करणेचा व्यवसाय सदर फर्म मार्फत चालविला जातो. दि.20/2/2007 रोजी श्री.वासुदेव जगन्नाथ अग्रवाल यांचेकडुन सदर फर्मच्या व्यवसायासाठी महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या मालकीच्या भुखंड क्रमांक सी-16 वरील इमारतीमधील एका इमारतीमधील काही भाग महाराष्ट्र औद्योगीक विकास मंडळाच्या दि.24/3/2006 रोजीच्या परवानगीने भाडेकरु म्हणुन घेतला त्यानंतर तक्रारदाराने वरील जागी विज जोडणी मिळणेबाबत योग्य त्या कागदपत्रांसह सामनेवाला यांचेकडे दि.20/2/2007 रोजी अर्ज केला. त्यानंतर सामनेवाला यांचे अधिका-याने तक्रारदाराचे तथाकथीत जागेस भेट दिली असता तक्रारदाराने ज्याचेकडुन म्हणजे श्री.वासुदेव अग्रवाल यांचेकडुन जागा घेतली त्यांचेकडुन सामनेवाला विज कंपनीस विज देयकांची थकबाकी असल्याचे सांगुन विज कनेक्शन देण्यास असमर्थता व्यक्त केली. तथापी तक्रारदाराने त्याबाबत जागा मालक श्री.वासुदेव अग्रवाल यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सामनेवाला विज कंपनीचे वादातील विज देयकांचे विरोधात जळगांव येथील मे.सि.ज.सि.डी.यांचे कोर्टात स्पेशल दावा क्र.100/98 दाखल केला असुन सदर दाव्यात सामनेवाला कंपनीच्या विज देयकांची रक्कम भरणेबाबत दि.5/3/98 रोजी स्टेटस को ची ऑर्डर मिळवली आहे. सदर आदेश लागु असुनही सामनेवाला विज कंपनीने सदरील व्यक्तीच्या मालकीच्या प्रतिष्ठांनांचा विज पुरवठा बेकायदेशीररित्या खंडीत केल्यामुळे सामनेवाला कंपनी व त्यांचे अधिका-यांविरुध्द जळगांव येथील मे.सि.जे.एम.कोर्टात फौ.ख.क्र.14/07 दाखल केला आहे. तसेच श्री.वासुदेव अग्रवाल यांनी मे.सि.ज.सि.डी.यांच्या कोर्टात न्यायालयाचा अवमान केल्याबद्यल एक अर्ज क्र.14/07 व 1/07 दाखल केला आहे. तसेच श्री.वासुदेव अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सामनेवाला कंपनी व त्यांचे अधिका-याविरुध्द ब्रीच ऑफ इंजेक्शन केल्याबद्यल एक याचीका क्र.डब्ल्यू पी नं.5028/06 दाखल आहे. वरील बाबतीचा खुलासा तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.31/5/2008 व दि.28/7/2008 रोजीचे पत्रान्वये केलेला आहे. त्यानंतर सामनेवाला यांनी त्यांचे वकीलांचा अभिप्राय मागविला असता त्यांनी विज कनेक्शन देण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिलेवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास डिमांड नोट पाठविली त्यानुसार तक्रारदाराने दि.30/5/2007 रोजी रक्कम रु.2,715/- भरणा करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास विज कनेक्शन दिले त्याचा ग्राहक क्रमांक 110018368781 असा आहे. तक्रारदाराने भागीदारी फर्मचा व्यवसायासाठी मशिनरी मागवुन ती नमुद जागेत बसवुन खाद्यबियांवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. त्यासाठी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन दि.27/3/2008 रोजी विज भार वाढवुन थ्री फेज कनेक्शन मागण्यासाठी अर्ज केला परंतू यावेळी देखील सामनेवाला यांनी पुर्वीचेच म्हणजे श्री.वासुदेव अग्रवाल यांचे थकीत बिलाचे कारण दाखवुन विज भार वाढवुन देण्यास नकार दिला त्यावेळी तक्रारदाराने पुन्हा सामनेवाला यांचेकडे वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिलेनंतर सामनेवाला यांनी त्यांचे वकीलांचा अभिप्राय मागविला असता त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता असल्यास थ्री फेज कनेक्शन देण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला. परंतु तरीही सामनेवाला क्रमांक 2 यांनी दि.1/9/2008 रोजी श्री.वासुदेव अग्रवाल यांचे शाम ऑईल इंडस्ट्रीज बाबत असलेला वाद न्यायालयात सुरु आहे त्यामुळे त्याजागी पुन्हा विज कनेक्शन देणे न्यायालयाचा अंतीम आदेश येईपर्यंत शक्य नाही असे पत्राने तक्रारदारास कळविले. अशा त-हेने सामनेवाला यांनी प्लॉट क्र. सी 16 मध्ये शाम ऑईल मीलसाठी म्हणजेच श्री.वासुदेव अग्रवाल यांना देण्यात आलेल्या उच्च दाबाचे कनेक्शन थकबाकीमुळे बंद करण्यात आलेले आहे. सदरचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने दि.1/9/2008 रोजी तक्रारदारास वाढीव विज भार देणे नामंजुर केले. अशा त-हेने कुठलेही सबळ कारण नसतांना तक्रारदारास वाढीव विज भार देणे नाकारुन सेवेत कसुर केली आहे तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब तक्रारदारास त्वरीत विज कनेक्शन देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत, तक्रारदारास नुकसान भरपाई दाखल रु.10,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराची तक्रार कायदेशीर नाही. तक्रारदार हा कनेक्शनची मागणी व्यापारी कारणासाठी करीत आहे त्यामुळे तो ग्राहक या संज्ञेत येत नाही या कारणास्तव प्रथमदर्शनीय तक्रार रद्य होणेस पात्र आहे. तक्रारदार यांनी सिंगल फेज कनेक्शन करिता दि.20/2/2007 रोजी अर्ज केला होता हे म्हणणे बरोबर आहे. तक्रारदाराने मागणी केलेंल्या जागेवर वासुदेव अग्रवाल हे मुळ भुखंड धारक असल्याने व त्यांचेकडे विज बिल रक्कम रु.3033707/- थकबाकी होती. विद्युत वितरण कंपनीचे नियम व विद्युत कायदयाचे तरतुदीनुसार अशा ठिकाणी विद्युत बाकी बिल भरल्याशिवाय कनेक्शन देता येत नाही. वासुदेव अग्रवाल व विज वितरण कंपनी यांच्यात थकबाकी बिलाबाबत दावे फाटे सुरु आहेत. सामनेवाला विज वितरण कंपनीचे वकीलांचे अभिप्रायावरुन तक्रारदारास टयुब व फॅन करिता सिंगल फेज कनेक्शन देण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी कनेक्शन घेतांना फक्त 500 वॅट पर्यंत कनेक्शनची मागणी केली होती त्यामुळे विद्युत कनेक्शन दिले. तक्रारदाराने उद्योग सुरु करणेसाठी कनेक्शन मागणी अर्ज केला नव्हता. तसेच तक्रारदार हे पुर्वीचे कनेक्शन धारक यांचे नातेवाईक असल्यामुळे व ते कनेक्शन त्याच ठिकाणी नवीन कनेक्शन मागत असल्यामुळे कंपनीचे दि.7/5/2007 चे परिपत्रक क्र. 53 नुसार देता येत नाही असा अभिप्राय दिला त्यानुसार अधिक्षक अभियंता, जळगांव यांना मागणी केलेले एच.टी.कनेक्शन देण्याबाबत निर्णय देण्याचे अधिकार नसल्यामुळे सदरचे प्रकरण मुख्य अभियंता, नाशिक यांचेकडे दि.2/8/2008 रोजी पत्र देऊन निर्णयासाठी पाठविण्यात आले होते. तसेच याबाबत अंदाजपत्रक मंजुर करता येत नसल्याबाबत देखील तक्रारदारास लेखी कळविले होते. तसेच तक्रारदार यास मागणी केलेले कनेक्शन मागील थकबाकीदार वासुदेव अग्रवाल यांच्यात व कंपनीत मे.कोर्टात वादग्रस्त असल्यामुळे कनेक्शन देता येत नसल्याचे देखील कळविण्यात आले होते. यात कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब अथवा ग्राहक सेवेत कसुर केल्याचे होत नाही. प्रस्तुतकामी तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाला यांना त्रास देण्याचे हेतुने केलेला प्रस्तुतचा अर्ज खर्चासहीत रद्य करण्यात यावा व तक्रारदार यांचेकडुन कॉम्पेनसेटरी कॉस्ट रु.5,000/- वसुल करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी केलेली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1) तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत किंवा कसे ? नाही.
2) काय आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
निष्कर्षाची कारणेः
4. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीत तक्रारदार हे अग्रोसन इंडीया या नावाने व्यवसाय करतात हे प्रामुख्याने दिसुन येते. तसेच तक्रारदाराने स्वतःहुन तक्रारीत ते एक भागीदारी फर्म चालवित असल्याचे कथन केलेले आहे व सदर फर्मच्या व्यवसायासाठी औद्योगीक विकास महामंडळाच्या मालकीच्या भुखंड क्रमांक सी-16 वरील इमारतीमध्ये काही भाग भाडे तत्वावर घेऊन सदर जागेवर विज जोडणी मिळणेकामी सामनेवाला यांचेकडे अर्ज केला असता सामनेवाला यांनी तक्रारदाराने मागणी केलेल्या जागेवर वासुदेव अग्रवाल हे मुळ भुखंड धारक असल्याने त्यांचेकडे विज बिल रक्कम रु.3033707/- थकबाकी असल्याचे कारणावरुन विज वितरण कंपनीचे नियमानुसार व कायदयातील तरतुदीनुसार थकबाकी भरल्याशिवाय विज कनेक्शन देता येणार नाही असा निर्णय घेतला तसेच वासुदेव अग्रवाल व विज वितरण कंपनी यांचेत थकबाकी बिलाबाबत दावे फाटे सुरु असल्याचे सामनेवाला विज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. सामनेवाला विज वितरण कंपनीने देखील त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदाराने मागणी केलेले विज कनेक्शन हे व्यापारी कारणासाठी असल्याने तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नसल्याने तक्रार रद्य करण्याची विनंती केली आहे. तक्रारदाराची तक्रार व सामनेवाला यांचे म्हणणे यांचे अवलोकन केले असता तक्रारदार हे व्यापारी कारणासाठी विजेच्या कनेक्शनची मागणी करीत असल्याचे कागदपत्रांवरुन तसेच तक्रारीवरुन प्रथमदर्शनी स्पष्ट होते. सबब तक्रारीतील इतर मुद्यांबाबत अधिक उहापोह न करता तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 2(1)(डी) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नसल्याने तक्रारदाराची तक्रार फेटाळण्याचे निर्णयाप्रत हा मंच आलेला आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होत नसल्याने यापुर्वी मा.मंचाचे तत्कालीन अध्यक्ष यांनी प्रस्तुत तक्रारीकामी दिलेले तुर्तातुर्त आदेश देखील रद्य करण्यात येतात. सबब आदेश.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात येतो.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाही.
( क ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 12/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव