निकालपत्र
( दिनांक 28-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार सौ. सुनिता भ्र. सुधाकरराव गादेवार ही संभाजी चौक, सिडको, नांदेड येथील रहिवाशी असून गैरअर्जदार यांची ग्राहक आहे. तिचा ग्राहक क्र. 550012000189 असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द तक्रार क्र. 365/2011 दाखल केलेली होती. सदर तक्रारीत विज चोरीचा मुद्दा असल्यामुळे दिनांक 28.8.2013 रोजी मंचाने सदर तक्रार नामंजूर केली. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या दिनांक 29.7.2013 च्या नोटीस नुसार माहे डिसेंबर 2011 ते जुन 2013 या कालावधीचे 19 महिन्याचे विज देयक रु.20,147/- व त्यावरील व्याज रु.656/- असे एकूण रु.20,903/- भरावयाचे होते व त्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. अर्जदाराने सदर दिनांक 29.4.2013 च्या नोटीसनुसार संपूर्ण रक्कम रु. 20,903/- गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जमा केले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास देयक क्र. 249, 248, 272, 278, 193, 189 चे दिले. प्रत्यक्षात अर्जदाराने जुन 2013 पर्यंतचे बिल रक्कम रु. 20,903/- भरल्यानंतर अर्जदाराचा विज वापर जुलै 2013 90 युनिट रु.496/-, ऑगस्ट-2013, 65 युनिट, रु.299/-, सप्टेंबर-2013 61 युनिट रु. 348/-, ऑक्टोबर-2013 93 युनिट, रु.421/-, नोव्हेंबर-2013, 69 युनिट, 477/-, डिसेंबर-2013, 24 युनिट, रु.191/-, जाने-2014 43 युनिट, रु.261/- असे एकूण रु.2495/- एवढया रक्कमेची विज वापर केला व वापरलेल्या युनिटसनुसार देयके येणे आवश्यक होते परंतू गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास जास्तीचे बिल देवून सेवेत कमतरता, त्रुटी दिलेली आहे. अर्जदार ही गैरअर्जदार विज कंपनीकडून अर्जदाराने वापरलेल्या युनिटसनुसार बिल देण्यास तयार आहे परंतू गैरअर्जदाराने अर्जदाराने भरलेल्या युनिटच्या बिलाची रक्कम परत पुढील बिलात समाविष्ट केलेली आहे. अर्जदाराने दिनांक 12.2.2014 रोजी वापरलेले युनिटबद्दलचे बिल देण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही व शेवटी दिनांक 24.2.2014 रोजी अर्जदारास कोणतीही सुचना न देता विदयुत परवठा खंडीत केला जे की, पूर्णतः बेकायदेशीर आहे. म्हणून अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली विदयुत देयके क्रमांक 249, 248, 272, 278, 193, 189 ही सर्व बिले रद्दबातल करण्यात यावीत व अर्जदाराने वापरलेल्या युनिटसनुसार म्हणजेच जुलै-2013 90 युनिट, ऑगस्ट-2013 65 युनिट, सप्टेंबर-2013 61 युनिट, ऑक्टोबर 2013 93 युनिट, नोव्हेंबर 2013 69 युनिट, डिसेंबर 2013 24 युनिट, जानेवारी-2014 43 युनिट असे एकूण युनिटची रक्कम रु. 2,495/- एवढे बिल अर्जदार यांच्याकडून घेण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेश करावा.
2. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचात हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
3. अर्जदार यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज हा निव्वळ गैरसमजूतीवर दाखल केलेला आहे. अर्जदारास अशाप्रकारचा अर्ज व त्यात नमूद केलेली मागणी मागण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून तो खारीज करण्या योग्यतेचा आहे. दिनांक 28.9.2011 रोजी अर्जदाराच्या मिटरची व संचाची पाहणी केली असता मिटरमध्ये एक अवरोध टाकून विज चोरी होतांना आढळून आले होते. सदर बाब विज कायदा कलम 135 अन्वये विज चोरी होते. सदर विज चोरीमधील विज चोरी केल्या गेलेल्या विजेच्या एककांचे मुल्य काढले असता तेथे 14,590/- रुपयाची विज चोरी झालेली आढळली. तडजोडीची रक्कम 8000/- इतकी निघाली. एकीकडे अर्जदाराने सदर रक्कम भरण्याचे कबूल केले व विज बिलाबाबत मंचात प्रकरण दाखल केले व विज चोरीचे देयक सोडून उर्वरीत रक्कम भरण्याबाबत आदेश प्राप्त केले. परंतू ती रक्कम भरली नाही. सदरील रक्कम न भरल्यामुळे दिनांक 29.7.2013 रोजी पत्र क्र. 717/- अन्वये डिसेंबर 2011 ते जुन 2013 या कालावधीचे विज बिल अर्जदाराने भरले नव्हते. या कालावधीत दिनांक 16.7.2012 रोजी केवळ 395/- रुपये भरलेले होते. विज चोरी व्यतिरिक्त उपभोग घेतलेल्या व नोंदविलेल्या विज बिलाची एकूण रक्कम रु. 20,903/- एवढी रक्कम भरणे अर्जदाराने प्रकरण मंचात पेन्डींग आहे याचा फायदा घेवून भरलेली नाही. अर्जदाराने या कालावधीत वापरलेल्या विज बिलाची रक्कम सरतेशेवटी नंतर भरणा केली. अर्जदाराकडून विज बिल स्विकारतांना थकीत विज बिलाची रक्कम वजा करुन उर्वरीत बिल मंचाच्या आदेशानुसा भरुन घेण्यात आलेले होते. दिनांक 28.08.2013 रोजी मंचाने सदर तक्रार रद्द केली. अर्जदाराला थकीत विज चोरीच्या बिलाची रक्कम रु. 14,590/- भरणे बाकी असतांना देखील दाखल केलेली तक्रार क्र. 365/2011 हिचा आधार घेवून अर्जदाराने रक्कम भरलेली नाही. नंतर तक्रार खारीज झाल्यामुळे अर्जदाराला ही रक्कम भरणे क्रमप्राप्त होते परंतू अर्जदाराने सदरची रक्कम भरलेली नाही. विज बिलाच्या चोरीची रक्कम व त्यावरील व्याज अशी रक्कम अनुक्रमे 14,590/- व 4,810/- इतकी होते. त्यामुळे ही रक्कम भरणे अर्जदारावर बंधनकारक आहे. अर्जदाराने दाखल केलेले प्रकरण या बिलाबाबतचे म्हणजे विज चोरीच्या बिला बाबतचे दाखल केलेले दुसरे प्रकरण असल्याकारणाने रेस ज्युडीकेटा अर्थात प्रांगनिर्णय या तत्वानुसार अर्जदाराचे प्रकरण चालू शकत नाही व ते खारीज करावे अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे. अर्जदाराने ऐनकेन प्रकारे विज चोरीच्या बिलाची रक्कम भरावी लागू नये यासाठी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे व मंचाची दिशाभूल केलेली आहे व सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना बचाव करण्यास भाग पाडलेले आहे त्यामुळे सदरचे प्रकरण विशेष अशा रु.25,000/- च्या खर्चासहीत खारीज करावे.
4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
5. अर्जदार यांची प्रमुख तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या दिनांक 29.7.2013 च्या थकबाकीच्या नोटीसनंतर अर्जदाराने थकबाकीची संपूर्ण रक्कम भरुनही गैरअर्जदाराने अर्जदारास पुढील बिलामध्ये थकबाकी दर्शवीत असून वापरलेल्या युनिटची रक्कम स्वीकारत नाहीत व आवाजवी बिले दिलेली आहेत, जी की रद्द करण्यात यावीत.
6. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 29.7.2013 रोजी थकबाकी भरण्याबद्दल नोटीस पाठवलेली आहे. सदर नोटीसचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, गैरअर्जदाराने अर्जदाराकडे माहे डिसेंबर-2011 ते जुन 2013 या कालावधीचे 19 महिन्याचे विज देयक त्यावरील व्याजासहीत 20,903/- रुपये असल्याचे दर्शवलेले आहे व ते भरण्यास सांगितलेले आहे. सदरील नोटीसीत दर्शविलेली रक्कम रु. 20,903/- अर्जदाराने दिनांक 30.9.2015, 11.10.2015, 26.10.2015 व 29.10.2015 रोजी अनुक्रमे 5000, 5000, 5000, व 5903/- रुपये भरलेली आहेत. असे असतांना देखील गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 14.8.2013 च्या देयकात 39,552.85 पैसे थकबाकी दाखवून सदर देयकाच्या कालावधीसहीत 40,400/- रुपयाचे बिल दिले आहे. सदर बिलाबाबत गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे की, अर्जदार यांनी विज चोरी बाबतची रक्कम रु.14,590/- भरलेले नाही. तसेच त्यावरील व्याज रु.4,810/- हे देखील भरलेले नाही.
7. अर्जदार यांनी माहे डिसेंबर 2011 ते जुन 2013 या कालावधीच्या बिलापोटी देणे असलेली रक्कम रु. 20,903/- हे माहे सप्टेंबर 2013 व माहे ऑक्टोबर 2013 मध्ये भरलेले आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पावत्यावरुन दिसून येते. परंतू अर्जदार यांनी विज चोरीबद्दल गैरअर्जदारास देणे असलेली रक्कम व त्यावरील व्याज ई गैरअर्जदार यांच्याकडे भरल्याचा पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही म्हणून गैरअर्जदार यांचे म्हणणे की अर्जदाराने विज चोरी बाबत गैरअर्जदारास देणे असलेली रक्कम भरली नाही हे मान्य करणे क्रमप्राप्त आहे. अर्जदार हे त्यांचे म्हणणे पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.