तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री. वाघचौरे हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(07/05/2013)
प्रस्तुतची तक्रार ही ग्राहकाने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार सेवेतील त्रुटी केल्यामुळे दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालील प्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे लोहगांव येथील रहिवासी असून त्यांच्याकडे निवासी विद्युत पुरवठा आहे. जाबदेणार यांचेकडून दि. 13/3/2007 रोजी तक्रारदार यांना रक्कम रु. 33,940/- चे बील आले. बील चुकीचे आल्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे तक्रार केली असता, जाबदेणार यांनी बीलामध्ये दुरुस्ती करुन रक्कम रु. 13,667/- भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदरचे बील जाबदेणार यांच्या कार्यालयामध्ये भरले. त्यानंतर दि. 26/4/2009 रोजी तक्रारदार यांना रक्कम रु. 1,88,740/- चे बील आले. त्यासंदर्भातही जाबदेणार यांनी तक्रारदार यांना बील कमी करुन देऊन रक्कम रु. 1,00,000/- भरण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदरची रक्कम जाबदेणार यांच्या कार्यालयामध्ये भरली. त्यानंतर दि. 11/7/2007 रोजी तक्रारदार यांना रक्कम रु. 40,160/- चे बील आले. तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर जाबदेणार यांनी सदरचे बील
दुरुस्त करुन दिले आणि रक्कम रु. 14,070/- भरण्यास सांगितले. सप्टे. 2009 मध्ये तक्रारदार यांना रक्कम रु. 1,29,760/- चे बील आले, सदरचे बील हे तक्रारदार यांना मान्य नाही. जाबदेणार वरचे वर जास्त रकमेची बीले देत आहेत, सदरची बीले ही बेकायदेशिर आहेत, म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
2] प्रस्तुतच्या तक्रारीस उत्तर देण्यासाठी जाबदेणार यांनी लेखी कैफियत दाखल केली. सदरच्या लेखी कैफियतीमध्ये जाबदेणार यांनी तक्रारीतील कथने स्पष्टपणे नाकारली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांना बीले भरण्यासाठी वेळोवेळी सवलती दिलेल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार यांनी दिलेली बीले चुकीची नाहीत, परंतु वेळेत बीलाची रक्कम भरण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्यामुळे
त्यांना सवलत देण्यात आलेली होती. जाबदेणार यांच्यावतीने असेही प्रतिपादन करण्यात आले की, प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकार या मंचास नाही, कारण यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्डाने स्वतंत्र ग्राहक मंच स्थापन केलेले आहेत. तक्रारदार यांची तक्रार चुकीच्या कथनांवर आधारलेली आहे, म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
3] दोन्ही पक्षकारांची लेखी कथने, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेतले असता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणारांनी चुकीची बीले देऊन सेवेमध्ये कमतराता केली आहे, हे सिद्ध होते का? | नाही |
2. | तक्रारदार यांची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे का? | नाही |
3. | आदेश काय? | तक्रार नामंजूर |
कारणे
4] प्रस्तुतच्या तक्रारीतील शपथपत्र आणि कथने विचारात घेतली असता असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी, त्यांना सप्टे. 2009 मध्ये आलेले रक्कम रु. 1,29,760/- चे बीलबेकायदेशिर ठरविण्यात यावे अशी विनंती केली आहे. यामध्ये जाबदेणार यांनी सेवेमध्ये कमतरता केली आहे, असे कोणतेही कथन तक्रारदार यांनी केलेले नाही. एखादी बाब ही
कायदेशर किंवा बेकायदेशिर आहे, हे ठरविण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयास आहेत. सदरचा वाद हा दिवाणी स्वरुपाचा आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी दाखल केलेले निवाडे विचारात घेतले असता, असे स्पष्ट होते की, विद्युत वाद निवारणासंबंधी जर स्वतंत्र यंत्रणा असेल तर सदरचा वाद चालविण्याचे अधिकार त्या यंत्रणेला आहेत. जाबदेणार यांनी पश्चिम बंगाल राज्य आयोग यांच्याकडील II (2009) CPJ 228, “वेस्ट बेंगाल स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड विरुद्ध गीता रॉय” आणि उत्तराखंड राज्य आयोगाचा III (2009) CPJ 471, “उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशन विरुद्ध इकबाल आईस फॅक्टरी” या निवाड्याकडे लक्ष वेधले. या प्रकरणांतील कथनानुसार असे स्पष्ट होते की, विद्युत बीलासंबंधी जर तक्रारदार व वीजमंडळ यांच्यामध्ये वाद असेल, तो वाद निवारण करण्यासाठी जर स्वतंत्र यंत्रणा असेल, तर त्या वादाचे निराकरण करण्याचे अधिकार त्या यंत्रणेस आहेत. या प्रकरणातील कथने विचारात घेतली असता, या मंचास प्रस्तुतच्या वादाचे निराकरण करण्याचे अधिकार नाहीत, हे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी सदरचा वाद दिवाणी न्यायालयामध्ये अथवा वीज मंडळाच्या ग्राहक निवारण मंचामध्ये दाखल करणे आवश्यक आहे, असे दिसून येते. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारदार व जाबदेणार यांनी आपापला खर्च सोसावा.