::: आ दे श प त्र :::-
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
1. तक्रारकर्त्याने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सादर केला.
2. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष वीज कंपनीचा ग्राहक आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 3664710443901 हा आहे. तक्रारकर्ता यांनी ऑगस्ट 2015 पर्यंतचे सर्व विदयुत देयकांचा भरणा नियमितपणे केलेला आहे. या कालावधीतील कोणतेही विदयुत देयक तक्रारकर्ता यांचेवर थकित नाही. विरुध्दपक्षाने ऑक्टोबर 2016 या कालावधीत 59,850/- रुपयाची देयक तक्रारकर्त्याला दिली. ते देयक कोणत्या आधारावर दिले हे तक्रारकर्ता समजू शकला नाही. म्हणून याची तोंडी तक्रार वारंवार विरुध्दपक्षाचे कार्यालयात जावून दिली. त्या तक्रारीवर विरुध्दपक्षाने असे उत्तर दिेले की, आम्ही दिलेल्या देयकाऐवजी तुम्ही 15,000/- रुपये भरुन दया, नंतर आम्ही पाहू आणि सदर देयक तुमच्या वीज वापरानुसार दुरुस्त करुन देऊ. विरुध्दपक्षाने म्हणण्यानुसार रु. 15,000/- विरुध्दपक्षाच्या कार्यालयात जावून दि. 28-12-2015 रोजी भरुन दिले. हे देयक भरल्यानंतर तक्रारकर्त्याला आजपर्यंत कोणतेही दुरुस्ती देयक पाठविण्यात आलेले नाही. म्हणून तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांच्या कार्यालयात जावून दिनांक 27-01-2016 रोजी लेखी तक्रार दिली. तक्रारकर्त्याच्या घरी एकूण चार रुम असून त्या रुम मध्ये चार पंखे, चार सी.एफ. बल्ब, एक टी.व्ही. याशिवाय कोणतेही दुसरे वीज वापराचे उपकरण नाही आणि तक्रारकर्त्याच्या कुटूंबात फक्त पाच सदस्य आहेत. तक्रारकर्त्या हयाचा वीज वापर दरमहाप्रमाणे 70 ते 80 युनिट पेक्षा जास्त नाही तसेच तक्रारकर्त्याचे विदयुत मिटर हे घराच्या बाहेरच्या भिंतीवर लावण्यात आलेले आहे. यावरही तक्रारकर्त्याला सन 1014 पासून अंदाजे वीज युनिटचे देयक देवून गैरअर्जदाराने जास्त रक्कम वसूल केलेली आहे.
विरुध्दपक्षाने माहे ऑक्टोबर 2015 रोजीचे देयक रु. 8,380/- आणि त्याच्यात सप्टेंबर महिन्याचे 8736 युनिटचे देयक रु. 51,472/- जोडून असे एकूण देयक रु. 59,850/- दिले. सदर देयक पाहून तक्रारकर्त्याला धक्का बसला. सदर देयक तक्रारकर्त्याला मान्य नाही. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिलेले माहे ऑक्टोबर 2015 चे 59,850/- चे देयक रद्द करण्यात यावे.
3. सबब, तक्रारकर्त्याची विनंती की, 1) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिलेले ऑक्टोबर 2015 चे वीज देयक रु. 59,850/- चुकीचे आहे. ते कायमस्वरुपी रद्द करण्यात यावे तसेच तक्रारकर्त्याकडून सन 2014 पासून अंदाजे देयक देवून जी जास्त रक्कम वसूल करण्यात आली आहे ती रक्क्म परत करण्याचे आदेश दयावे. 2) सदरच्या चुकीच्या वीज देयकामुळे तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला त्याकरिता तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून विरुध्दपक्षाकडून रु. 20,000/- देण्याचे आदेश करावे. 3) तसेच विरुध्दपक्षाचे कार्यालयाने जे चुकीचे वीज देयक दिलेले आहे हे मान्य केलेले आहे, त्याचे चुकीमुळे तक्रारकर्त्याला न्यायिक खर्च रु. 10,000/- देण्याचे आदेश विदयमान मंचाने दयावे तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा खंडित करु नये.
4. सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 08 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्षाचा लेखी जवाब :-
5. विरुध्दपक्ष यांनी प्रस्तुत प्रकरणात जवाब दाखल केला असून त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल करीत लेखी जवाबात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता यांनी बीज बिलाचा भरणा नियमितपणे केला नाही व त्यांच्याकडे वीज देयक थकित आहे. तक्रारकर्ता यांना देयक दिनांक 04-11-2015 देयक कालावधी दिनांक 26-09-2015 ते 26-10-2015 या कालावधीचे देयक रु. 59,850/- देण्यात आले. या बिलामध्ये निव्वळ थकबाकी रु. 51,562.95 दाखविण्यात आली. सदरचे देयक या तक्रार केस मध्ये आव्हाणीत केले आहे. प्रतिवादी वीज कंपनीने तक्रारकर्ता यांस समजावून सांगितले की, तुमच्या मिटरचे रिडींग मागील 20 महिन्यापासून प्राप्त झाले नाही, त्यामुळे तुम्हाला मागील वाचन 2293 ते 2293 असे डिसेंबर 2013 ते ऑगस्ट 2015 पर्यंत देण्यात आले. सप्टेंबर 2015 च्या बिलींग कालावधीमध्ये सदरहू मिटरचे रिडींग हे 11029 असे आले. त्यामुळे, तक्रारकर्ता यांना सप्टेंबर 2015 मध्ये एकूण 22 महिन्याचे एकूण वाचन 8736 युनिट 2293 ते 11029 असे रु. 50,453.86 चे देण्यात आले. या अगोदर 20 महिन्याचे कालावधीचे सरासरी आकारणीचे 15,451/- रुपये वजा करण्यात आले व या कालावधीमध्ये सरासरी बिलापोटी केलेला सर्व भरणा हा वजा देवून तुम्हाला रु. 50,453/- चे देयक देण्यात आले. वीज कंपनीने तक्रारकर्ता यांचे बिलींग लेजर रेकॉर्डवर दाखल केलेले आहे. तक्रारकर्ता यांनी विदयमान कोर्टाची दिशाभूल करण्याकरिता सदरचे सप्टेंबर 2015 चे देयक रेकॉर्डवर दाखल केले नाही. प्रतिवादी यांचे जवाबामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदरचे देयक तक्रारकर्ता यांनी दाखल करावे जेणेकरुन तक्रारकर्ता यांना सप्टेंबर 2015 मध्ये जे आव्हाणीत देयक दिले, त्याचा उलगडा होईल व बिलींग लेजर वरील तपशील माहे 2015 व तक्रारकर्ता यांना देण्यात आलेले देयक हे तंतोतंत जसेच्या तसेच असतात. तक्रारकर्ता यांचेकडील ऑक्टोबर 2015 मध्ये तक्रारकर्ता यांचे पुन्हा घर बंद असल्याने मिटर वाचन मिळू शकले नाही. त्यामुळे, मागील वीज वापराची सरासरी विचारात घेता संगणकाद्वारे 728/- रुपयाचे देयक हे मागील वीज वापराची सरासरी विचारात घेता संगणकाद्वारे 728/- रुपयाचे देयक हे मागील थकबाकीसह 59,850/- रुपये देण्यात आले. सदरचे देयक हे मागील थकबाकीसह असल्यामुळे तक्रारकर्ता यांस समजावून दिल्यानंतर तक्रारकर्ता यांनी रु.15,000/- ची किस्त पाडून मागितल्याप्रमाणे तक्रारकर्ता यांस या बिलापोटी रु. 15,000/- किस्तीने भरण्याची अनुमती देण्यात आली. परंतु, तक्रारकर्ता यांनी हेतूपुरस्सर सदरहू केसमध्ये मिटर वाचनानुसार सप्टेंबर 2015 चे जे मिटर वाचनाप्रमाणे वर नमूद केल्याप्रमाणे दिले आहे, ते विदयमान ग्राहक मंचात दाखल केले नाही. तक्रारकर्ता यांना लेखी तक्रारीच्या अगोदरच संपूर्ण बिलींग समजावून दिले होते व त्यावर तक्रारकर्ता समाधानी होवून त्यांनी किस्तीने बिल भरतो, असे सांगितल्यानुसार तक्रारकर्ता यांस त्याप्रमाणे रु. 15,000/- ची किस्त सुध्दा करुन देण्यात आली होती. परंतु, तक्रारकर्ता यांनी सदरची तक्रार दाखल केली.
6. हे म्हणणे संयुक्तिक नाही की, तक्रारकर्ता यांचा वीज वापर हा 70 ते 80 युनिट पेक्षा जास्त नाही. तक्रारकर्ता यांचेकडे आजही मिटर लागलेले आहे, त्यामध्ये रिडींग उपलब्ध आहे. तक्रारकर्ता यांनी वीज वापर केलेला आहे. त्यामुळे त्यांना वापरलेल्या विजेचे मिटर रिडींगनुसार देयक भरणे बंधनकारक आहे. तक्रारकर्ता यांनी हेतुपुरस्सर त्यांचे घरामध्ये लागलेल्या मिटरचे रिडींग लपवून तक्रारीमध्ये नमूद केलेले नाही.
7. तक्रारकर्ता यांना माहे सप्टेंबर 2015 मध्ये मिटर वाचनानुसार 22 महिन्याचे देयक दुरुस्त करुन देण्यात आले आहे. परंतु, सदरचे देयक तक्रारकर्ता यांनी भरले नाही व सदरचे देयक रेकॉर्डवर सुध्दा दाखल केले नाही. माहे ऑक्टोबर 2015 मध्ये तक्रारकर्ता यांस माहे सप्टेंबर 2015 पर्यंतचे थकबाकीसह मिटर वाचन न मिळाल्यामुळे सरासरी आकारणी वीज वापर 728 युनिट दर्शवून तक्रारकर्ता यांस 59,850/- रुपयाचे देयक देण्यात आलेले आहे. संगणकीय पध्द्तीनुसार ग्राहकाचे पुढील वाचन न मिळाल्यास ग्राहकाचे संगणकामध्ये त्याचा वीज वापर जो आलेला असतो, त्यानुसार सरासरी आकारणीचे बिल देण्यात येते व पुढील बिलींग मध्ये तक्रारकर्ता यांचेकडील मिटरचे वाचन प्राप्त झाल्यानंतर ग्राहकास मिटर वाचनानुसार देयक देण्यात येते व सरासरी आकारणीचे बिल वजा करुन देण्यात येते व सदरहू देयकामधून सरासरी आकारणीचा ग्राहकाने भरणा केला असल्यास तो सुध्दा वजा करुन देण्यात येतो. तक्रारकर्ता यांना दिलेले देयक हे बरोबर आहे. सबब, तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती विरुध्दपक्ष यांनी केली आहे.
:: कारणे व निष्कर्ष ::
8. प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व उभयपक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला.
9. या प्रकरणात तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहे, ही बाब विरुध्दपक्षाला मान्य आहे.
10. तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी ऑगस्ट 2015 पर्यंतचे सर्व विदयुत देयक नियमितपणे भरले आहे. मात्र विरुध्दपक्षाने ऑक्टोबर 2015 या कालावधीत एकदम रु. 59,850/- या रकमेचे विदयुत देयक दिले. ज्यामध्ये सप्टेंबर 2015 चे देयकापोटी रक्कम रु. 51,472/- दाखविली आहे, हे देयक अयोग्य आहे. कारण विरुध्दपक्षाने रिडींग न घेता हे देयक दिले आहे. त्याबद्दल लेखी तक्रार केली असता, विरुध्दपक्षाने या बिलापोटी रु. 15,000/- भरा व त्यानंतर देयक दुरुस्त करु, असे म्हटल्यामुळे, तक्रारकर्त्याने रु. 15,000/- भरले. मात्र, विरुध्दपक्षाने सदर देयक दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे वादातील देयक रद्द व्हावे व सन 2014 पासून विरुध्दपक्षाने देयके देवून, जी जास्त रक्कम वसूल केली, ती परत मिळावी तसेच या सेवेतील न्युनतेपोटी नुकसान भरपाई मिळावी व प्रकरण खर्च मिळावा, अशी विनंती तक्रारकर्त्याने मंचाला केली आहे.
11. यावर विरुध्दपक्षाने हे कबूल केले की, तक्रारकर्त्याकडील मिटरचे रिडींग मागील 20 महिन्यापासून प्राप्त झाले नाही. त्यामुळे सप्टेंबर 2015 च्या बिलींग कालावधीमध्ये सदरहू मिटरचे रिडींग हे 11029 असे आले. त्यामुळे तक्रारकर्त्यास सप्टेंबर 2015 मध्ये एकूण 22 महिन्याचे एकूण वाचन 8736 युनिट 2293 ( डिसेंबर 2013 ते ऑगस्ट 2015 पर्यंत ) ते 11029 असे 50453.86 चे देण्यात आले. 20 महिन्याचे कालावधीचे सरासरी आकारणीचे 15451.57 रुपये वजा करण्यात आले व या कालावधीमध्ये सरासरी बिलापोटी केलेला सर्व भरणा हा वजा देवून तक्रारकर्त्यास रु. 50,453.86 चे देयक दिले. परंतु, तक्रारकर्त्याने जाणूनबुजून सप्टेंबर 2015 चे विदयुत देयक दाखल केले नाही. त्यामुळे, पुन्हा बिल दुरुस्त करुन देण्याची गरज नाही, म्हणून तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्षाच्या या युक्तीवादात मंचाला तथ्य वाटत नाही, कारण विरुध्दपक्षाला हे कबूल आहे की, तक्रारकर्त्याकडील मिटरचे रिडींग मागील 20 महिन्यापासून विरुध्दपक्षाने प्राप्त करुन घेतले नाही व विरुध्दपक्षाच्या मते याला कारण की, तक्रारकर्त्याचे घर बंद होते. परंतु, आजकाल मिटर हे घराच्या बाहेरच्या भिंतीवर लावलेले असते, विरुध्दपक्षाने त्यांचा हा बचाव पुरावा देवून सिध्द् केला नाही. त्यामुळे मिटर रिडींग नियमित न घेता सप्टेंबर 2015 च्या बिलात कोणत्या सरासरी वाचनानुसार वजावट दिली व हे वाचन तक्रारकर्त्याला अवगत करुन दिले होते कां ? खतावणीद्वारे ( Consumer Personal Ledger ) स्पष्ट होत नाही. याउलट तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, त्यांचे घरात चार पंखे, चार सी.एफ.एल. बल्ब व एक टी.व्ही. एवढीच उपकरणे आहेत. विरुध्दपक्षाने याबद्दलचा तपासणी अहवाल दाखल केला नाही. दाखल Consumer Personal Ledger वरुन तक्रारकर्त्याचा सरासरी विदयुत वापर हा 190 युनिट प्रमाणे आहे असे दिसून येते. तक्रारकर्त्याने वादातील बिलापोटी रु. 15,000/- विरुध्दपक्षाकडे भरले आहे, ही बाब विरुध्दपक्षास कबूल आहे. तक्रारकर्ते यांनी वादातील बिल दुरुस्त करण्याबाबत तक्रार केली होती, ही पण बाब विरुध्दपक्षास कबूल आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे ऑक्टोबर 2015 रु. 59,850/- चे वीज देयक रद्द करण्यात येऊन त्याऐवजी विरुध्दपक्षाने संबंधित कालावधीकरिता 190 युनिट प्रमाणे बिल आकारुन, नवीन बिल, त्यात दंड, विलंब शुल्क न आकारता दयावे, तसेच तक्रारकर्त्याने या बिलापोटी भरलेली रक्कम समायोजित करावी. तसेच सेवेतील न्युनतेपोटी रु. 3,000/- व प्रकरण खर्च रु. 2,000/- तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाने दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात. सबब, अंतिम आदेश पारित केला, तो येणेप्रमाणे.
- अंतिम आदेश -
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिलेले ऑक्टोबर 2015 चे वीज देयक रु. 59,850/- रद्द करुन त्याऐवजी संबंधित कालावधीकरिता 190 युनिट प्रमाणे, देयक आकारुन, नवीन सुधारित देयक तक्रारकर्त्यास देवून त्यात कोणतेही दंड शुल्क, विलंब शुल्क आकारु नये. तसेच तक्रारकर्त्याने या कालावधीतील बिलापोटी भरलेली रक्कम समायोजित करावी.
3) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास सेवेतील न्युनतेपोटी शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाई म्हणून रु. 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रु. 2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) दयावा.
4) तक्रारकर्ते यांच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
5) वरील आदेशाचे पालन हे आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावे अन्यथा नुकसान भरपाई रकमेवर दर साल दर शेकडा 9 टक्के व्याज हे आदेश दिनांकापासून देय राहील किंवा तक्रारकर्ता वसूल करण्यास पात्र राहील.
6) उभयपक्षकारांना सदर आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्या.