जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 819/2010
तक्रार दाखल तारीखः- 10/06/2010
तक्रार निकाल तारीखः-15/01/2013
1. श्रीमती.विमल प्रल्हाद बढे, ..........तक्रारदार
उ व- 42, धंदा- शेती,
2. श्री.प्रमोद प्रल्हाद बढे,
उ व 30 धंदा शेती.
नं. 2 व 3 रा.खानापुर ता.रावेर जि.जळगांव.
3. सौ.दिपाली भ्र.राजू झोपे,
उ व 32 धंदा शेती,
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि, .........विरुध्दपक्ष
तर्फे कार्यकारी अभियंता,
रा.सावदा विभाग, सावदा ता.रावेर जि.जळगांव.
2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि,
स्थानिक रा.दिक्षीतवाडी, मटन मार्केट मागे,जळगांव.
कोरम –
श्री.डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.आर.व्ही.कुळकर्णी.
अड.यु.आर.कुलकर्णी
विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे अड.ए.जे.पाटील (विना खुलासा)
विरध्दपक्ष क्र.2 एकतर्फा..
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने सेवेत कसूर केला म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी आपल्या शेतातील गट नं.312/अ मध्ये असलेल्या विहिरीवर विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी (यापुढे संक्षिप्ततेसाठी महावितरण असे संबोधण्यात येईल) यांचे कडून विज पुरवठा घेतलेला आहे. त्यांचा ग्राहक क्र.114220003979 आहे. ( त्यांनी सन 2006/2007 रोजी तक्रारदार क्र. 1 चा मुलगा हेमंत प्रल्हाद बढे हा इलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याच्या हाताचा स्पर्श विद्युतभारीत लोखंडी पेटीला झाला व विजेचा धक्का बसून तो मयत झाला. सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यु क्रृ.30/2007 अन्वये घेण्यात आली व पंचनामा करण्यात आला. तसेच मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले.
3. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, सदर विजेचा धक्याने झालेल्या अपघाती मृत्युची चौकशी विद्युत निरिक्षक यांनी केलेली आहे व त्यांनी दिलेल्या अहवालात सदर अपघातास महावितरण जबाबदार आहे असे नमुद केले आहे. महावितरणने सर्व्हीस वायर चांगली ठेवली असती तर सदरचा अपघात झाला नसता. मावितरणने आपली विज वितरण सामुग्री व्यवस्थीत न ठेवून सेवेत कसूर व निष्काळजीपणा केला त्यामुळेच हेमंत प्रल्हाद बढे यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास महावितरण जबाबदार आहे.
4. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार क्र.1 ही हेमंतची आई आहे व हिंदू वारस कायद्यानुसार ती एकमेव वारस आहे. परंतु वारस दाखल्यात भाऊ व बहीण यांचीही नांवे असल्यामुळे त्यांना तक्रारदार म्हणुन सामील केलेले आहे. परंतु नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदार क्र. 1 यांना देण्यास तक्रारदार क्र. 2 व 3 यांची समंती आहे.
5. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, मयत हेमंतची जन्म तारीख 05/06/1981 होती. अपघात समयी त्याचे वय 26 वर्षे होते. तो आय.टी.आय. प्रशिक्षीत होता. त्यास इलेक्ट्रीक संदर्भात संपूर्ण माहीती होती व त्याची कामे तो करत होता. त्याच बरोबर आपल्या शेताचे कामही तो पाहत असे. त्याला एम.को.ट्रान्स जळगांव यांचे वरद इलेक्ट्रीकलकडून दरमहा रु.5,000/- पगार मिळत होता व शेतातून सरासरी रु.1,000/- उत्पन्न मिळत होते तो सदर व्यवसाय पुढील 50 ते 60 वर्षे करु शकला असता. त्याच्या कमाईतुन स्वतःसाठी 1/3 रक्कम खर्च करुन उर्वरीत रककम तक्रारदारांसाठी खर्च केली असती. त्यामुळे मोटार अपघात कायद्यातील कोष्टक विचारात घेतले तर नुकसान भरपाई खालील प्रमाणे काढता येईल.
6000/- x 12 = 72,000/- – 1/3 रक्कम = 48,000/- त्याला 12 ने गुणल्यास रु.8,64,000/- होतात व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- अत्यंविधी खर्च रु.30,000/- असे रु.9,44,000/- होतात. सदर रक्कम मिळणेस तक्रारदार पाप् आहेत व सदर रक्कम देण्यास महावितरण जबाबदार आहे.
6. तक्रारदार यांनी शेवटी महाविरणकडून रक्कम रु.9,44,000/- व त्यावर दि.03/07/2007 पासुन रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज तसेच मानिसक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.25,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
7. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.4 वर शपथपत्र तसेच नि.6 वरील यादीनुसार 19 कागदपत्रे दाखल केली आहेत.
8. महावितरणने हजर होऊन नि.9 वर खुलासा दाखल करणेसाठी मुदत मिळावी अशी विनंती केली होती. सदर अर्ज मंजूर करण्यात आला. परंतु त्यानंतर महावितरणने आपला खुलासा सादर केला नाही. त्यामुळे नि.12 वर प्रकरण विना खुलासा चालवण्याचा आदेश करण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 2 हे नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
9. तक्रारदार यांची तक्रार व लेखी युक्तीवाद पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार महावितरणचे ग्राहक आहेत काय? होय.
2. तक्रारदार यांचे विज कनेक्शनची यंत्रणा
सदोष ठेवून महावितरणने सेवेत त्रुटी केली
आहे काय? होय.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे? अंतीम आदेशाप्रमाणे.
4. आदेश काय? खालीलप्रमाणे.
10. मुद्या क्र. 1 –तक्रारदार यांनी आपल्या शपथपत्रात त्यांनी महावितरणकडुन गटनं.312/अ मध्ये असलेल्या विहीरीवर मोटर पंपासाठी विज पुरवठा घेतला आहे व त्यांचा ग्राहक क्र.1147720003979 आहे. ते महावितरणचे ग्राहक आहेत. महावितरणने खुलासा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांना सदर म्हणणे मान्य आहे असे दिसुन येते.
आम्ही तक्रारदार यांनी नि.6/7 ते नि.6/13 वर दाखल केलेल्या विज बीलांचे अवलोकन केले आहे. त्यावर प्रल्हाद विठठल बढे यांचे नांव आहे. सदर बिलावर वीज पुरवठा केल्याचा दि.15/11/1983 दर्शवला आहे. तकारदार हे त्यांचे वारस आहेत. त्यावरुन तक्रारदार हे महावितरणचे ग्राहक आहेत या मतास आम्ही आलो आहोत. म्हणुन मुद्या क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
11. मुद्या क्र. 2 –तक्रारदार यांनी आपल्या शपथपत्रात म्हटले आहे की, त्यांनी सन 2006-07 त्यांनी आपल्या शेतातील गट नं.312/अ मध्ये असलेल्या विहिरीवर विरुध्दपक्ष महावितरणकडून विज पुरवठा घेतलेला आहे. त्यांचा ग्राहक क्र.114220003979 आहे. तक्रारदार क्र. 1 चा मुलगा हेमंत प्रल्हाद बढे हा इलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याच्या हाताचा स्पर्श विद्युतभारीत लोखंडी पेटीला झाला व विजेचा धक्का बसून तो मयत झाला. सदर घटनेची नोंद पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यु क्रृ.30/2007 अन्वये घेण्यात आली व पंचनामा करण्यात आला. तसेच मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. विजेच्या धक्याने झालेल्या अपघाती मृत्युची चौकशी विद्युत निरिक्षक यांनी केली आहे व त्यांनी दिलेल्या अहवालात सदर अपघातास महावितरण जबाबदार आहे असे नमुद केले आहे. महावितरणने सर्व्हीस वायर चांगली ठेवली असती तर सदरचा अपघात झाला नसता. मावितरणने आपली विज वितरण सामुग्री व्यवस्थीत न ठेवून सेवेत कसूर व निष्काळजीपणा केला त्यामुळेच हेमंत प्रल्हाद बढे यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास महावितरण जबाबदार आहे.
12. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या आकस्मात मृत्युची खबर,घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले आहे. घटनास्थळ पंचनाम्यामध्ये मयत हा अजा दि.03/07/2007 रोजी सकाळी 10.00 वाजताचे सुमारास पत्री पेटीपर्यंत इलेक्ट्रीक स्टार्टर सुरु करण्यास गेला असता त्यास इलेक्ट्रीक शॉक लागुन फेकला असुन मयत झाल्याचा उल्लेख आहे. तसेच सदर घटनेची विद्युत निरिक्षक यांनी चौकशी केल्यानंतर दिलेला अहवाल नि.6/20 वर दाखल आहे. त्यांचा निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.
दि.03/07/2007 रोजी श्री. हेमंत प्रल्हाद बढे (बाहय व्यक्ती) हे खानापुर शिवारातील शेतातील शेतीपंपाची इलेक्ट़्रीक मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांच्या हाताचा स्पर्श विद्युतभारीत लोखंडी पेटीला झाल्यामुळे विद्युत धक्का बसुन प्राणांतिक विद्युत अपघात झाला.
घटनास्थळी म.रा.वि.वि.कं. च्या इलेक्ट्रीक पोलवरुन सर्व्हिस वायरद्वारे लोखंडी पेटीमध्ये जी.आय.पाईप पोस्टमधुन वीज पुरवठा केलेला होता. सदरची सर्व्हीस वायर जी.आय.पाईप पोस्टमधुन लोखंडी पेटीमध्ये जोडलेली होती व सदरची सर्व्हीस वायरचे इन्शुलेशन (वेस्टन) खराब होऊन त्यामधील विजवाहक तारांचा स्पर्श जी.आय.पाईप पोस्टशी होऊन लोखंडी पेटी विद्युतभारीत झाली होती. सदरील अपघातास म.रा.वि.वि.कं.लि.जबाबदार आहे.
13. वरील फिर्याद, घटनास्थळ पंचनामा व विद्युत निरिक्षक जळगांव यांचे निष्कर्षावरुन महावितरणने सर्व्हीस वायर व्यवस्थीत न ठेवल्यामुळे सदर अपघात घडल्याचे दिसुन येते. महावितरणने तक्रारदार यांचे सर्व्हिस वायर नियमीत तपासुन ते सुस्थीतीत ठेवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी निष्काळजीपणा केल्याचे दिसुन येते. या संदर्भात आम्ही खालील न्यायिक दृष्टांताचा आधार घेत आहोत.
1. मा.राष्ट्रीय आयोग, (IV (2012)CPJ 805, प्रकाश गजेंद्रभाई देसाई व इतर विरुध्द मध्य गुजरात विज कंपनी.
2. मा.राष्ट्रीय आयोग IV (2012) CPJ 197, सज्जन सचदेव व इतर विरुध्द पंजाब स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड व इतर.
वरील विवेचन व वरील न्यायीकदृष्टांतामध्ये दिलेली तत्वे पाहता महावितरणने तक्रारदार यांची सर्व्हीस वायर सुस्थीतीत न ठेवून मयत हेमंत बढे यांच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याचे दिसुन येते, त्यामुळे आम्ही मुद्या क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
14. मुद्या क्र. 3 - तक्रारदार यांनी म्हटले आहे की, मयत हेमंतची जन्म तारीख 05/06/1981 होती. अपघात समयी त्याचे वय 26 वर्षे होते. तो आय.टी.आय. प्रशिक्षीत होता. त्यास इलेक्ट्रीक संदर्भात संपूर्ण माहीती होती व त्याची कामे तो करत होता. त्याच बरोबर आपल्या शेताचे कामही तो पाहत असे. त्याला एम.को.ट्रान्स जळगांव यांचे वरद इलेक्ट्रीकलकडून दरमहा रु.5,000/- पगार मिळत होता व शेतातून सरासरी रु.1,000/- उत्पन्न मिळत होते तो सदर व्यवसाय पुढील 50 ते 60 वर्षे करु शकला असता. त्याच्या कमाईतुन स्वतःसाठी 1/3 रक्कम खर्च करुन उर्वरीत रककम तक्रारदारांसाठी खर्च केली असती. त्यामुळे मोटार अपघात कायद्यातील कोष्टक विचारात घेतले तर नुकसान भरपाई खालील प्रमाणे काढता येईल.
6000/- x 12 = 72,000/- – 1/3 रक्कम = 48,000/- त्याला 12 ने गुणल्यास रु.8,64,000/- होतात व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- अत्यंविधी खर्च रु.30,000/- असे रु.9,44,000/- होतात. सदर रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व सदर रक्कम देण्यास महावितरण जबाबदार आहे.तक्रारदार यांनी महाविरणकडून रक्कम रु.9,44,000/- व त्यावर दि.03/07/2007 पासुन रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज तसेच मानिसक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.25,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
15. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.6/5 वरील शाळा सोडल्याच्या दाखल्याचे अवलोकन केले आहे. त्यावर हेमंतची जन्म तारीख दि.05/06/1981 असल्याचे दिसुन येते. तसेच मृत्युची तारीख दि.03/07/2007 आहे. त्यावरुन मृत्यु समयी त्याचे वय 26 वर्षे होते हे स्पष्ट आहे. तसेच नि.6/21 वर वरद इलेक्ट्रीकल यांचे प्रमाणपत्र आहे, त्यावर हेमंतला रु.5,000/- पगार होता असा उल्लेख आहे. तसेच नि.6/1 वर 7/12 उतारा आहे त्यावर हेमंतचे नांव आहे. त्यावरुन मयताला दरमहा रु.6,000/- उत्पन्न होते हे मान्य करणे भाग आहे. तक्रारदार यांनी सदर उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा स्वतःसाठी ठेवून कुटुंबासाठी रु.4,000/- खर्च करत होता व पुढील 50 ते 60 वर्ष त्यांने खर्च केले असते असे म्हटले आहे. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने विचार करता 18 चे गुणकानुसार रु.8,64,000/- ची त्यांनी मागणी केली आहे.
16. या संदर्भात तक्रारदार क्र. 1 यांना मयत हेमंत व प्रमोद ही दोन मुले होती असे दिसुन येते. तसेच मयत हेमंतचे लग्न झाल्यानंतर तक्रारदार यांना मिळणा-या उत्पन्नात घट आली असती याचा विचार केल्यास 18 चे गुनक योग्य ठरणार नाही असे आम्हास वाटते. त्या ऐवजी 12 चे गुनक वापरणे योग्य ठरेल. त्यानुसार वार्षीक नुकसानीची रक्कम रु.4,800 x 12 वर्षे = 5,76,000 होतात. सदर रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/-मिळणेस पात्र आहेत.
17. मुद्या क्र.4 – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश.
1. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणुन रक्कम रु.5,76,000/- (रु.पाच लक्ष श्याहत्तर हजार फक्त) व त्यावर तक्रार दाखल तारीख दि.10/06/2010 पासुन द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आतं द्यावेत.
2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने तक्रारदार यांना मानसीक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आतं द्यावेत.
(सौ.एस.एस.जैन) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.