रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रारक्रमांक 77/2011
तक्रार दाखल दि. 21/10/2011
न्यायनिर्णय दि.- 16/02/2015.
1. श्री. बाळाराम कानू थळी, (मयत) तर्फे वारस,
1अ. श्रीमती आनंदीबाई बाळाराम थळी,
1ब. श्री. वसंत बाळाराम थळी,
1क. श्री. राजेश ऊर्फ राजेंद्र बाळाराम थळी,
2. श्री. रघुनाथ बाळाराम थळी,
सर्व रा. मु. चाणजे, पो. करंजा,
ता. उरण, जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
1. कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि. कं. मर्यादित,
करंजा विभाग, करंजा, जि. रायगड.
2. उपकार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कं. मर्यादित,
उपविभाग उरण, जि. रायगड. ..... सामनेवाले
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. श्रीमती उल्का अं. पावसकर, सदस्या
मा. श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी, सदस्य
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. गोपी डंगर
सामनेवाले तर्फे अॅड. महेश घरत
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा.अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांस नियमानुसार विजेची जोडणी न करुन देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी सामनेवाले यांचेकडे शेती व्यवसाय आधुनिक पध्दतीने करण्यासाठी विहीरीवरील विद्युत पंपाचा वापर करुन शेतीसाठी पाणीपुरवठा करता यावा या हेतूने विद्युत सेवा घेण्यासाठी सन 1996 साली अर्ज केला होता. तक्रारदारांनी सदर सेवा सुविधेसाठी रक्कम रु. 1,670/- सामनेवाले यांना अदा केले. त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांस विजेची लाईन मंजूर होऊन देखील व तपासणी अहवाल व पावत्या सामनेवाले यांचेकडे जमा करुन देखील अद्याप विज पुरवठयाची सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी हजर होऊन लेखी जबाब दाखल केला. लेखी जबाबात सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदाराच्या शेतासमोरील शेतीचे मालक श्री. मोहन रामचंद्र पाटील यांनी लेखी हरकत घेतल्याने सामनेवाले यांना तक्रारदाराच्या शेतापर्यंत विज जोडणी करता आली नाही. असे कथन केले आहे. विज जोडणीसाठी उभे करावयाच्या खांबांच्या हरकतीबाबतचा वाद हा तक्रारदारांनी मिटवावा व त्यानंतर उर्वरित बाबींची पूर्तता करता येईल असे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी नमूद केले आहे. तक्रारदारांच्या मिळकतीमध्ये विहीर व कूपनलिका अस्तित्वात नसल्याने तक्रारदारास विज जोडणी देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांस कोणतीही सेवा सुविधा पुरविण्यात कसूर न केल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी केली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व उभयपक्षांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे
तक्रारदारास नियमानुसार विज जोडणी सेवा सुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिकपणे
तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अमान्य.
कारणमीमांसा -
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराने दि. 04/01/11 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेल्या अर्जास दि. 07/01/11 रोजी उत्तर देऊन NDBL योजनेअंतर्गत विज पुरवठा करतेवेळी जमिन मालकांनी हस्तक्षेप केल्याने व कामास प्रतिबंध केल्याने उर्वरित काम करता आले नाही, तसेच सामनेवाले यांनी जुन्या मंजूर पोलवर वायर टाकून सदर ग्राहकास विज पुरवठा टाकणेस सुरुवात केली असता, जमिन मालक श्री. मोहन डोंगरे यांने अडथळा निर्माण केल्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून द्यावे लागले आहे असे लेखी कळविले आहे. सदर पत्र तक्रारदारास प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराने वेळीच योग्य ती उपाययोजना करणे न्यायोचित होते. तरीदेखील तक्रारदाराने कोणतीही उपाययोजना न केल्याने व सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने उर्वरित काम पूर्ण केले नाही. उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन सामनेवाले क्र. 1 व 2 यांना कायदेशीर कामात त्रयस्थ व्यक्तीमार्फत हस्तक्षेप झाल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी उर्वरित काम पूर्ण केले नाही. सदर परिस्थितीमुळे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास सेवासुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याची बाब सिध्द होत नाही. असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी विज जोडणी घेतेवळी विज मार्गिके संबंधी उद्भवणा-या अडचणींचे निराकरण करणे आवश्यक होते. प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना अडचणींची माहिती देऊन देखील तक्रारदाराने सदरील अडचणींचे निराकरण न केल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांना प्रयत्न करुन देखील तक्रारदारांचे सहकार्य न मिळाल्याने विज जोडणी करता आली नाही ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास विज जोडणी देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात उद्भवलेली अडचण तक्रारदाराना लेखी स्वरुपात कळविली होती. त्याप्रमाणे तक्रारदारांनी सदरील अडचणींबाबत योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी सदरील बाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 विज जोडणीचे उर्वरित काम पूर्ण करु शकले नाहीत. तक्रारदारांनी विज मार्गिकेमधील अडचणी दूर न केल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 विज जोडणीची उर्वरित कामे पूर्ण करु शकले नाहीत. ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होत असल्याने सामनेवाले क्र. 1 व 2 तक्रारदारास नुकसानभरपाई देण्यास पात्र नाहीत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 77/2011 अमान्य करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी यांना तक्रारदारास विज जोडणीची सेवा सुविधा पुरविण्यात कसूर न केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 16/02/2015.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.