नि.20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 184/2010 नोंदणी तारीख – 2/8/2010 निकाल तारीख – 27/10/2010 निकाल कालावधी – 85 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री तुकाराम धोंडीराम कांबळे रा.घर नं. 83, डॉ बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था, जयसिंगपूर, ता.शिरोळ जि.कोल्हापूर ----- अर्जदार (अभियोक्ता श्री पी.आर.इनामदार) विरुध्द 1. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सातारा जिल्हा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. करिता श्री प्रदीप रामचंद्र शिंदे, अध्यक्ष 2. श्री सुभाष सुदाम सानप, उपाध्यक्ष 3. श्री मोहन गणपती नायकवडी, सचिव 4. श्री अरुण शामराव यादव, व्यवस्थापक सर्व रा.नं. 1 ते 4 गोडोली, स.नं.49/ब, प्लॉट नं.20, 27, 27, नवीन पुणे-बंगलोर महामार्ग, आनंदनगर, सातारा 415003 ----- जाबदार (अभियोक्ता श्री डी.एच.पवार) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक तसेच सभासद होते व आहेत. त्यांनी जाबदार यांचेकडे जमा केलेली शेअर्सपोटीची रक्कम, बिनपरतीची ठेव, वर्गणी, सुरक्षा निधीपोटीची रक्कम अशा रकमांची जाबदार यांचेकडे वेळोवेळी मागणी करुनही सदर रकमा अर्जदार यांना परत मिळालेल्या नाहीत. अर्जदार यांनी दिलेल्या सभासदत्वाचा राजीनामा अर्ज जाबदार यांनी मंजूर करुनही जाबदार यांनी वर नमूद रक्कम परत केलेली नाही. याबाबत अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे चौकशी केली असता अर्जदार यांना दि.3/1/2009 रोजीचे जाबदार यांनी अर्जदार यांना पाठविलेले पत्र मिळाले. सदरच्या पत्रामध्ये दि.31/3/2006 रोजीच अर्जदार यांना रक्कम अदा केलेबाबत कळविलेले आहे. अशा प्रकारे अर्जदारला रक्कम मिळालेली नसतानाही रक्कम अदा केलेबाबत जाबदार यांनी अर्जदार यांना खोटे पत्र दिले आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी अर्जदार यांना शेअर्सची रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे. सबब शेअर्सची रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 ते 4 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 चे कलम 164 अन्वये जाबदार यांना आगाऊ नोटीस दिलेली नाही. अर्जदारचा राजीनामा जाबदार यांनी दि.18/9/05 रोजी मंजूर केला आहे व त्याची रक्कमही दि.31/3/2006 रोजी अदा केली आहे. त्याबाबतचे व्हाऊचर अर्जदार यांनी सही करुन दिले आहे. परंतु अर्जदार हे पुन्हा तीच रक्कम चार वर्षानंतर मागत आहेत. अर्जदार हे जाबदार यांचे कधीही ग्राहक नव्हते. अर्जदार यांची मागणी ग्राहक या पात्रतेत येत नाही. अर्जदार यांचा अर्ज मुदतीत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 19 ला पाहिला. जाबदारतर्फे अभियोक्ता श्री पवार यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? नाही ब) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील मुख्य मागणी पाहिली असता असे दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून शेअर्सपोटीच्या रकमेची मागणी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे सभासद आहेत व जाबदार ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदींनुसार अस्तित्वात आलेली सहकारी संस्था आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये असे कथन केले आहे की अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक व सभासद आहेत. परंतु अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक कसे होतात, सहकारी संस्थेचा भागधारक सभासद हा ग्राहक कसा होतो याबाबत अर्जदार यांनी कोणताही सुस्पष्ट खुलासा त्यांचे तक्रारअर्जात केलेला नाही किंवा कोणताही तत्सम कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांना शेअर्सपोटी भरलेल्या रकमेचा परतावा मिळण्यासाठी या मंचामध्ये दाद मागता येणार नाही. सदरची बाब विचारात घेता अर्जदार व जाबदार यांचेमधील वाद हा सहकारी संस्थेचा सभासद व सहकारी संस्था यांचेदरम्यानचा वाद आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींप्रमाणे प्रस्तुतच्या वादविषयामध्ये अर्जदार हा जाबदार यांचा कोणत्याही प्रकारे ग्राहक होत नाही. सबब, अर्जदार यांचा तक्रारअर्ज चालविण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही. जरुर तर अर्जदार यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार यांचे कैफियतीतील मजकूर पाहता जाबदार यांनी असे कथन केले आहे की त्यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम दि.31/3/2006 रोजी अदा केलेली आहे. अर्जदार यांनीच नि.5/5 ला दाखल केलेल्या यासंदर्भातील कागदावर अर्जदार यांची सही दिसून येते. याउपरही अर्जदार यांना रक्कम मिळाली नाही असे अर्जदार यांचे म्हणणे असेल तर त्यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असे या मंचाचे मत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 27/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |