ORDER | ( पारित दिनांक :21/01/2015) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदाच्या कलम 12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, त.क. पेठ (अहमदपूर) तहसील - आष्टी, जि. वर्धा. येथील रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहे. त.क. हा मौजा चेकबंदी येथील शेत सर्व्हे नं.74/2 क्षेत्रफळ 0.40 हे.आर. चा मालक आहे व शेत सर्व्हे नं. 59 मौजा-चेकबंदी हे त्याला भूदान कडून मिळाले आहे व दोन्ही शेती तो स्वतः वहिती करतो. शासनाच्या योजनेप्रमाणे विदर्भ पॅकेज अंतर्गत 50 टक्के अनुदानावर त.क.ने दि. 14.06.2011 रोजी वि.प. 1 ने उत्पादित केलेले सोयाबीन बियाणे जे.एस.335 (सी.एफ.) प्रत्येकी 30 कि. वजनाचे दोन बॅग रुपये 1,176/- 50 टक्के अनुदान वगळता वि.प. 2 कडून पावतीप्रमाणे खरेदी केले. त्यामुळे त.क. हा वि.प. 1 व 2 चा ग्राहक झालेला आहे व तो ग्राहक या संज्ञेत मोडतो.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, त्याने त्याच्या शेतीची योग्य मशागत करुन सदर बियाणे दि. 25.06.2011 रोजी त्याच्या शेतात पेरणी केली. परंतु सदर बियाणे त.क.ने पेरणी केल्यानंतर ही ठराविक कालावधीत वि.प.ने सांगितल्याप्रमाणे व हमी दिल्याप्रमाणे उगविले नाही. त्यामुळे त्यांनी तालुका कृषी अधिकारी आष्टी यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरुन संबंधित अधिकारी त.क.च्या शेतावर येऊन मौका पाहणी व तपासणी केली व अहवाल तयार केला. त्या अहवालाप्रमाणे वि.प. 1 ने उत्पादित केलेले व वि.प. 2 ने त.क.ला विकलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे व सदोष असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. अशाप्रकारे वि.प. 1 व 2 यांनी संयुक्तपणे तक्रारकर्त्यास निकृष्ट, सदोष व कमी उगवण शक्ती असलेले बियाणे विक्री करुन त.क.ची फसवणूक केली आहे.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, सदरच्या शेतातून तो दरवर्षी कमीत-कमी 15 ते 20 क्वि. सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेत होता. विरुध्द पक्षाने निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविल्याने जवळपास रुपये 60,000/-चे नुकसान झालेले आहे. तसेच शेतात पेरणीकरिता रुपये 9,000/-, मशागतीवर व खतासाठी रुपये 10,000/- खर्च झालेला आहे. वि.प. 1 व 2 ने त.क.ला सदोष बियाणे विकून सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार केलेला आहे. म्हणून त.क.ने दि. 13.01.2012 रोजी वि.प.ला नोटीस देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.
- वि.प. 1 व 2 ला सदर नोटीस मिळाली परंतु त्यांनी नोटीसप्रमाणे कारवाई केली नाही. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार दाखल करुन वि.प.ने त.क.ला सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे जाहीर करावे व त्याला झालेल्या नुकसानीकरिता रुपये 50,000/-, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल 50,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5,000/-रुपये मिळावे अशी विनंती केलेली आहे.
- वि.प. 1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 11 वर दाखल केला असून, तक्रार अर्जास सक्त विरोध केला आहे. त्याचे म्हणणे असे की, त.क.ची जमीन सोयाबीन पिकाकरिता उपयुक्त व अनुकुल नाही. तसेच शेताचा 7/12 उतारा व तक्रारीतील कथन यात ताळमेळ दिसत नाही. त.क.ने बियाणे चुकिच्या साधनाच्या आधारे पेरलेले आहे व पेरणारे मजूर कुशल कामगार नसून त्यांना पेरणीबाबत अनुभव नव्हता. त.क.ने सदर बियाण्यांची पेरणी केली त्यावेळेस वातावरण व हवामान अनुकुल व पोषक नव्हते व पाऊस पुरेश्या प्रमाणात झालेला नव्हता.
- वि.प.1 ने पुढे असे कथन केले आहे की, लॉट नं. 446 मधील बॅग मधून इतर शेतक-यांना भरपूर उत्पादन झालेले आहे. वि.प. 2 ने दिलेल्या बिलावर खोडतोड करुन लॉट नं. टाकलेला आहे. त.क.ने दाखल केलेला तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती आष्टी यांचा अहवाल चुकिचा असून कायद्याने दिलेल्या बाबींची पूर्तता न करता दिलेला आहे त्यामुळे तो विश्वासार्ह नाही. तसेच बियाणे तक्रार निवारण समितीने महाराष्ट्र राज्य कृषी संचालनालय पुणे यांनी 24 मार्च 1992 रोजी शासकीय परिपत्रकात मार्गदर्शित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब न करता एकतर्फी पूर्णपणे बेकायदेशीर अहवाल दिलेला आहे. कृषिधिका-याने तयार केलेला चौकशी अहवाल सामूहिक व सामान्य परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यांनी स्पष्ट नमूद केले की, 24 जुन ते 15 जुलै च्या कालावधीत झालेल्या पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नव्हता. त्यांनी त.क.च्या शेताला प्रत्यक्ष भेट न देता त्याचा अहवाल तयार केला आहे. शेतामध्ये कोणकोणती पिके होती याचा उल्लेख अहवालात केलेला नाही. तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती आष्टी हे त्यांच्या अहवालातील नमूद निष्कर्षावर कशाच्या आधारावर पोहचले याबाबतचा काहीही उल्लेख केलेला नाही. त्याचबरोबर अहवालात हे सुध्दा स्पष्ट केले की, लॉट नं. 203 या लॉटच्या मौका तपासणीमध्ये 20 ते 25 टक्के उगवण होती. परंतु प्रयोग शाळेच्या बियाण्याच्या बाबतीत तपासणीत 30 ते 40 टक्के पर्यंत उगवण दिसून आली. काही शेतक-यांच्या शेतामध्ये याच लॉटची उगवण 50 ते 60 टक्के दिसून आली. त्यामुळे बियाणे कमी उगविण्या मागील स्पष्ट वस्तुस्थिती पेरणीच्या वेळी जमिनीच्या ओलाव्याचे कमी प्रमाण व शेतातील इतर परिस्थिती कारणीभूत आहे.
- तसेच वि.प. 1 ने पुढे असे कथन केले आहे की, अहवालावर फक्त कृषी अधिकारी, पंचायत समिती यांची स्वाक्षरी आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी त्यावर नंतर स्वाक्षरी केलेली आहे. सदर अहवाल प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन त.क.च्या शेतातील बियाणे उगवण्यासंबंधी नाही. कारण त.क. यांनी सोयाबीन बियाणे लॉट नं. ऑक्टोंबर 10-13-3201-246 चे बियाणे खरेदी केलेले आहे. कृषी अधिका-याच्या अहवालानुसार या लॉटच्या बियाण्याची उगवण शक्तीबाबत कोणतीही तक्रार कृषी खात्याकडे आलेली नाही. पंचायत समिती आष्टी यांनी अहवालासोबत सादर केलेल्या यादीमध्ये त.क.चे नांव व जाणीवपूर्वक शेवटी हस्तलिखित स्वरुपात टाकलेले आहे की, ज्याचा या अहवालाशी काहीही संबंध नाही. त.क.ने विकत घेतलेले बियाणे कमी उगवण शक्तीचे होते अशी कोणतीही तक्रार तालुकास्तरीय अथवा जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार केलेली नाही अथवा कोणत्याही संबंधित अधिका-याने त.क.च्या शेतावर जाऊन बियाण्याच्या उगवण शक्तीबाबत प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही व याबाबत कोणताही अहवाल रेकॉर्डवर नाही. दाखल केलेला अहवाल हा सामूहिक परिस्थिती संदर्भात आहे. त.क. ने वि.प. 1 कडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून खोटी तक्रार दाखल केलेली आहे, ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- वि.प. 2 यांना नोटीसची बजावणी होऊन सुध्दा ते हजर झाले नाही. म्हणून त्यांच्या विरुध्द सदर तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
- त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ नि.क्रं. 12 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले असून वर्णन यादी नि.क्रं. 3 प्रमाणे एकूण 7 कागदपत्रे दाखल केलेली आहे. तसेच नि.क्रं. 18 प्रमाणे अहवालाची नक्कल दाखल केलेली आहे. वि.प.1 ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ नि.क्रं. 17 वर नरसिंह पांडूरंग खांडेकर यांचे शपथपत्र दाखल केले. वर्णन यादी नि.क्रं. 13 प्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहे.
- त.क. व वि.प. यांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही. त.क. व वि.प. 1 चे अधिवक्ता यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | वि.प.क्रं.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास निकृष्ट, सदोष सोयाबीन बियाण्याची विक्री करुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय? | नाही | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | नाही |
: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1, 2 बाबत ः- त.क. ने वि.प. 1 उत्पादित सोयाबीनचे बियाणे जी.एस. 335 (सी.एफ.)/3201/246 ची दि. 14.06.2011 रोजीची पावती क्रं. 201, 202 प्रमाणे 2 बॅग अनुदानाची रक्कम वगळून रुपये 1,176/- मध्ये वि.प. 2 कडून खरेदी केली हे वादीत नाही. तसेच त.क.ने सदर बियाणे त्याच्या शेतात पेरणी केली हे सुध्दा वादीत नाही. त.क.ने दाखल केलेल्या 7/12च्या उता-यावरुन असे दिसून येते की, त.क.ला भूदान संघटनेकडून मिळालेल्या गट क्रं. 74/2 मौजा चेकबंदी, ता. आष्टी यात 0.40 आर क्षेत्रामध्ये पेरणी केली असे दिसून येते.
- त.क.ची तक्रार अशी आहे की, सदरील बियाणे त्यानी त्यांच्या शेतामध्ये दि. 25.06.2011 रोजी पेरणी केली. परंतु पेरणी केल्यानंतर ही योग्य त्या ठराविक कालावधीत वि.प. ने सांगितल्याप्रमाणे व हमी दिल्याप्रमाणे उगविले नाही. म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी आष्टी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन तक्रार निवारण समितीने त.क.च्या शेतास भेट देऊन पाहणी करुन अहवाल तयार केला व त्या अहवालाप्रमाणे वि.प. 2 ने वि.प. 1 उत्पादित त.क.ला विकलेले सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे व सदोष असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यामुळे त.क. च्या उत्पन्नात घट होऊन रुपये 60,000/-चे नुकसान झालेले आहे. म्हणून वि.प. 1 उत्पादित, वि.प. 2 ने त.क.ला विकलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे होते काय हे पाहणे जरुरीचे होते. त.क.ने त्याच्या तक्रार अर्जात व शपथपत्रात वि.प.कडून घेतलेल्या बियाण्याची उगवण न झाल्यामुळे त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली व त्या वरुन तालुका कृषी अधिकारी यांनी त.क.च्या शेतास मौका पाहणी केली व बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण झाली नाही असा अहवाल दिला. परंतु त.क.ने त्यानी तालुका कृषी अधिकारी, ता. आष्टी यांच्याकडे दाखल केलेली तक्रार मंचासमोर दाखल केलेली नाही. तसेच त.क.च्या तक्रारीवरुन कृषी अधिकारी त.क.च्या शेताला भेट देऊन पाहणी केली यासंबंधी सुध्दा कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही. त.क.ने फक्त कृषी अधिका-याने दिलेल्या अहवालावरच अवलंबून राहून ही तक्रार दाखल केलेली आहे. सदरील अहवाल त.क. त्याचबरोबर वि.प. 1 ने मंचासमोर दाखल केलेले आहे. त्या अहवालाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, विदर्भ पॅकेज अंतर्गत सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा वि.प. 1 ने केलेला आहे. विदर्भ पॅकेज अंतर्गत 50 टक्के अनुदानावर वाटप सोयाबीन बियाणेच्या पेरणी नंतर प्राप्त तक्रारीची तालुकास्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात आली. चौकशी समितीतील सदस्यांनी प्रत्यक्ष शेतावर मौका पाहणी करुन कमी उगवणीबाबत निष्कर्ष काढलेले आहे. तसेच त्या अहवालावरुन असे दिसून येते की, चौकशी समितीच्या सदस्यांनी 24 जुन ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये सरासरी पाऊसाची नोंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच सदरील अहवालाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प. 1 ने पुरवठा केलेल्या काही 13 लॉटचे नमुने काढून तपासणीकरिता बीज परीक्षण प्रयोग शाळा नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यापैकी 4 लॉटचे नमुने उगवण शक्तीत अप्रमाणित असून एक नमुना शुध्दतेत अप्रमाणित आहे. उर्वरित 8 नमुने प्रमाणित झालेले आहे. तसेच असे सुध्दा नमूद केलेले आहे की, अप्रमाणित लॉट पैकी लॉट क्रं. ऑक्टोंबर -10-13-3201-246 च्या 55 तक्रारी आलेल्या होत्या. मौका तपासणीत सदर लॉट बियाण्यांची उगवण 15 ते 20 टक्के दिसून आली व प्रयोगशाळेत उगवण 15 टक्के आली. परंतु सदरील अहवालामध्ये ऑक्टों-10-13-3201-245 या लॉटचे बियाण्याचा नमुना प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आला व तो उगवण शक्ती अप्रमाणित होता असे नमूद केलेले नाही. जर बीज परीक्षण प्रयोगशाळा नागपूर यांच्याकडे सदरील लॉटचे बियाणे पाठविले असते तर निश्चितच त्याचा अहवाल समितीकडे आला असता. परंतु मंचासमोर दाखल केलेल्या अहवालात लॉट नं. 246 चे बियाणे अप्रमाणित होते, निकृष्ट दर्जाचे होते व उगवण शक्ती नव्हती असे कुठेही नमूद केलेले नाही.
- तसेच त.क.च्या अधिवक्त्याने अहवालासोबत तालुका कृषी अधिका-याने ज्या शेतक-यांची नांवे वि.प.1कंपनीकडे पाठविली त्याकडे मंचाचे लक्ष वेधून त्या यादीमध्ये त.क.चे नांव नमूद असल्याचे सांगून कृषी अधिका-यानी त.क.ला सोयाबीन बियाण्याची शक्ती न झालेल्या शेतक-यांच्या नुकसानी अहवालात नमूद केलेले आहे. त्या यादीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तालुका कृषीधिकारी आष्टी यांनी 103 शेतक-यांचे नांव व त्यांनी खरेदी केलेल्या बियाण्याचे लॉट नं. नमूद करुन त्यांनी वाटप केलेल्या बियाण्याची उगवण शक्ती झालेली नाही ते नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे असे वि.प. 1 ला कळविले आहे. परंतु सदरील यादीमध्ये त.क.चे नांव हे शेवटी हस्ताक्षराने लिहिलेले आहे व त्यावर कृषी अधिका-याची सही आहे.
- विरुध्द पक्ष क्रं.1 ने त्याच्याकडे कृषी अधिका-याने पाठविलेल्या शेतक-याची यादी मंचासमोर दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन केले असता, त्या यादीमध्ये फक्त 101 शेतक-यांचे नांव नमूद केलेले आहे. त.क.चे नांव त्या यादीमध्ये नमूद करण्यात आलेले नाही. जर कृषी अधिका-याने त.क.चे नांव त्या यादीत नमूद करुन वि.प. 1 कडे पाठविले असते तर निश्चितच त.क.चे नांव त्या यादीमध्ये आले असते. यावरुन दिसून येते की, त.क.चे नांव त्या यादीमध्ये वि.प.ला पाठविल्यानंतर नमूद करण्यात आलेले आहे. तसेच त.क.चे नांव नमूद करुन पुन्हा दुसरी यादी वि.प. 1 कडे पाठविली असे त.क.चे म्हणणे नाही व तसा पुरावा सुध्दा मंचासमोर आलेला नाही. तसेच त्या यादीचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे दिसून येते की, लॉट नं. 246 मधील बियाणे खरेदी केलेल्या शेतक-याचे नांव नमूद केलेले नाही. फक्त त.क. च्या नांवा समोरच लॉट नं. 246 लिहिण्यात आला आहे. इतर लॉट नं. खरेदी केलेल्या शेतक-यांचे परसोडा गांव व इतर गांवाचे नांव त्या यादीमध्ये लिहिलेले नाही. त.क. हा चेकबंदी या गांवा रहिवासी असून त्या गांवात लॉट नं. 246 हे बियाणे एकाही शेतक-याला दिलेले आहे असे नमूद नाही. फक्त एक शेतक-याचे नांव चेकबंदी गांवाचे नांव नमूद करण्यात आले आहे. परंतु त्याने दुस-या लॉटचे बियाणे खरेदी केले होते. त्यामुळे लॉट नं. 246 चे सोयाबीन बियाणे हे निकृष्ट दर्जाचे, सदोष व उगवण शक्ती नसलेले असल्या संबंधीचा कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही. म्हणून त.क.ने ज्या लॉट मधून खरेदी केलेले बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते असे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे त.क. चे नुकसान झाले हे सुध्दा सिध्द होत नाही. म्हणून त.क. हा लाभ मिळण्यास पात्र नाही. तसेच वि.प. 1 व 2 यांनी सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही. म्हणून वरील मुद्दयाचे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1) तक्रारकर्ता यांची तक्रार खारीज करण्यात येते. 2) उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्वतः सोसावे. 3) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 4) निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात. | |