जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १०१/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०६/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १८/११/२०१३
श्री. विलास बळीराम पाटील
उ.व.५१, धंदा – नोकरी
राहणार – प्लॉट नं.५३, क्षीरे कॉलनी
ता.जि. धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
१. एम.एन.एम. ट्रेडींग सोल्युशन प्रा.लि.
स्टा सी.जे. नेटवर्क इंडिया प्रा.लि.
११२ आणि ११९ इंडियन कार्पोरेशन
मुंबई-नासिक हायवे गुंडावली
तालुका भिंवडी जिल्हा ठाणे ४२१ ३०२.
२. टेककेअर इंडिया प्रा.लि.
१५ के.एम.स्टोन पैठण रोड चितेगाव
तालुका पैठण. जि. औरंगाबाद.४३११०५
३. इलेक्ट्रोलेक्स सर्व्हीसिंग सेंटर
दुकान नं.४३, पांडव प्लाझा स्टेशनरोड
धुळे ता.जि. धुळे. ------------ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.दीपक जोशी)
(जाबदेणार नं.१ तर्फे – एकतर्फा)
(जाबदेणार नं.२ तर्फे – सचिन शंकर कडडे्, प्रतिनिधी)
(जाबदेणार नं.३ तर्फे – प्रदिप रामराव पाटील, प्रतिनिधी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
१. जाबदेणार यांनी सदोष वस्तू दिली, सेवेत त्रुटी केली. ती सदोष वस्तू बदलून मिळावी यासाठी तक्रारदार यांनी न्यायमंचात कलम १२ प्रमाणे सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी जाबदेणार क्रमांक १ यांनी दिलेल्या जाहिरातीच्या अनुशंगाने दि.२०/०७/२०११ रोजी इलेक्ट्रोलक्स कंपनीचे मायक्रोओव्हन खरेदीसाठी ऑनलाईन आर्डर दिली. त्यावेळी जाबदेणार १ यांनी तक्रारदाराला सांगितले की, धुळे येथे माल पोहोचविण्याची कंपनीची व्यवस्था नाही. परंतु जळगाव येथे माल पोहोचविता येईल. जळगाव येथे कोणी नातेवाईक असल्यास त्यांचा पत्ता दयावा. म्हणून तक्रारदाराने जळगाव येथील नातेवाईक श्री.दिगंबर पाटील यांचा पत्ता दिला. त्यावरून जाबदेणार नं.१ यांनी दि.२३/०७/२०११ रोजी इलेक्ट्रोलक्स कंपनीचे मायक्रोओव्हन मॉडेल इके२३-जीएसएल-३ ची जळगाव येथे दिगंबर पाटील यांना डिलेव्हरी दिली. त्याचे बिल रूपये ५९९०/- तक्रारदाराने अदा केले. मालाची डिलेव्हरी दिगंबर पाटील यांच्या नावाने असल्याने बिलही त्याच नावाने आहेत.
तक्रारदार यांनी पार्सल धुळे येथे आणल्यावर जाबदेणार नं. १ यांचे प्रतिनिधी डेमो देण्यासाठी आले तेव्हा मायक्रोओव्हनचे पॉवर बटन काम करीत नसल्याचे लक्षात आले. ही बाब लगेच जाबदेणार नं.१ यांना कळविण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी जाबदेणार नं.१ यांच्या कस्टमर केअरकडे दोन वेळा तक्रारी केल्या. त्यांचा तक्रार क्रमांक टीपीयूएन-२६०७११०१२४ आणि टीपीयूएन ०९०८११००९४ असा आहे. त्यानंतर जाबदेणार नं.३ हे तक्रारदाराकडे येवून मशीन पाहून गेले. त्यांनी जाबदेणार नं.२ यांच्याशी संपर्क साधून मशीनबाबत माहीती दिली. त्यांनतर तक्रारदार यांनी जाबदेणार नं.२ यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला. मशीन बदलवून देण्याची मागणी केली. परंतु त्याबाबत नुसतीच चालढकल करण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराला न्याय मंचात तक्रार दाखल करावी लागली. जाबदेणार यांनी मायक्रोओव्हन बदलून दयावे अशी तक्रारदार यांची मागणी आहे.
३. न्यायमंचाची नोटीस मिळूनही जाबदेणार नं.१ हजर झाले नाहीत किंवा त्यांनी मुदतीत खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या विरूध्द ‘एकतर्फा’ चा आदेश करण्यात आला. जाबदेणार नं.२ यांच्यातर्फे सचिन शंकरराव कडडे् मंचात हजर होवून त्यांनी खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मायक्रोओव्हन इलोक्ट्रोलक्स कंपनीचे असून त्याची सर्व्हीस टेककेअर इंडिया प्रा.लि. ने नोव्हेंबर २०१० पासून इलेक्ट्रोलक्स कंपनीकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे या तक्रारीचा जाबदेणार नं.२ यांच्याशी संबंध नाही. त्यामुळे ही तक्रार इलेक्ट्रोलक्स कंपनीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जाबदेणार नं.३ यांच्यातर्फे प्रदीप रामदास पाटील हे मंचात हजर झाले. त्यांनी आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, सदर मायक्रोओव्हनचे पॅनल दुरूस्त करून ते पॅनल घेवून दोन वेळा ग्राहकाकडे जावून आलो. पहिल्यांदा गेलो तेव्हा ते बाहेरगावी गेले होते. दुस-यावेळी ते लग्नाला गेले होते. त्यांनतरही तक्रारदाराने सर्व्हीस सेंटरशी संपर्क साधला नाही. त्यांनतरही एकदा त्यांना भेटून पॅनल बसवून देतो असे सांगितले. मात्र त्यांनी पॅनल बसवून घेण्यास नकार दिला.
४. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दि.०४/०४/२०१२ रोजी पाठविलेली नोटीस, मालाचे डिलेव्हरी चलन, बिल दाखल केले आहे. जाबदेणार यांनी कोणताही दस्तऐवज दाखल केलेला नाही.
५. तक्रारदाराची तक्रार, जाबदेणार नं.२ आणि नं.३ यांनी दाखल केलेला खुलासा पाहता आणि तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकता न्यायमंचासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे जाबदेणार यांचे
ग्राहक आहेत काय ? होय
ब. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे का ? होय
क. तक्रारदार हे मशीन बदलवून मिळण्यास
किंवा त्याची किंमत मिळण्यास पात्र आहेत का ? होय
ड. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
६. मुद्दा ‘अ’- वरील सर्व मुद्दे, दाखल कागदपत्रांवरून आणि तक्रारदाराने दाखल केलेल्या बिलांवरून तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून ऑनलाईन वस्तू खरेदी केली. त्याचे बिल तक्रारदार यांचे नातेवाईक दिगंबर पाटील यांच्या नावावर आहे. जाबदेणार हे नोटीस मिळूनही मंचात हजर झाले नाहीत किंवा खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या ‘ग्राहक’ असण्यावर जाबदेणार यांना हरकत नाही, हे स्पष्ट होते. म्हणूनच तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक ठरतात. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहेात.
७. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या वस्तूत दोष आहे हे जाबदेणार नं.१ यांना माहीत होते. जाबदेणार नं.१ यांच्या प्रतिनिधीने प्रात्यक्षिक देतांनाच ती बाब लक्षात आली होती. जाबदेणार नं.१ यांचे अधिकृत सर्व्हीस सेंटर जाबदेणार नं.३ यांनी ही त्याबाबत तपासणी करून जाबदेणार नं.२ यांना कळविले होते. त्याचबरोबर तक्रारदार यांनी जाबदेणार नं.१ यांच्या कस्टमर केअरशी दोन वेळा संपर्क साधून तक्रार नोंदविली असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. मशिनचे पॅनल बदलून देण्यासाठी दोन वेळा जाबदेणार नं.३ तक्रारदार यांच्याकडे गेले; मात्र ते घरी नव्हते. त्यानंतर तक्रारदार यांनी सर्व्हीस सेंटरशी संपर्क साधला नाही, असे जाबदेणार नं.३ यांचे म्हणणे आहे. यावरून जाबदेणार यांच्याकडून तक्रारदार यांना अपेक्षित व्यवस्थित आणि दोषरहीत सेवा मिळाली नाही हे दिसून येते. यावरून तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत जाबदेणार यांनी कसूर केली असे न्यायमंचाचे मत बनले आहे. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
८. मुद्दा ‘क’- जाबदेणार नं.३ यांनी दाखल केलेल्या खुलाशावरून तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मशिनमध्ये दोष होता हे स्पष्ट होते. त्याबाबत जाबदेणार नं.३ यांनी कंपनीकडून पॅनल दुरूस्त करून मागविले होते. ते बसविण्यासाठी तक्रारदाराकडे गेले मात्र ते घरी नव्हते. असे जाबदेणार नं.३ चे म्हणणे आहे. त्यानंतर पुन्हा जाबदेणार नं.३ हे तक्रारदार यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी पॅनल बसवून घेण्यास नकार दिला असेही जाबदेणार नं.३ यांनी खुलाशात म्हटले आहे. मात्र त्याबाबत तक्रारदाराचे कोणतेही लेखी दाखल केलेले नाही. यावरून जाबदेणार नं.१ यांनी तक्रारदारांना दिलेली वस्तू सदोष होती हे पुन्हा सिद्ध होते. त्या वस्तूमधील दोष स्पष्ट झाल्यानंतर तो दोष कायमचा दूर करणे किंवा ती वस्तू बदलून देणे जाबदेणार नं.१ यांचे कर्तव्य होते. मात्र ते त्यांनी पार पाडले नाही, असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सदोष वस्तू बदलवून मिळणे किंवा त्याचे पैसे परत मिळणे ग्राहकाचा हकक आहे. म्हणूनच मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
९. मुद्दा ‘ड’- वरील सर्व विवेचनाचा विचार करता जाबदेणार नं.१ यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत कसूर केल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार नं.२ टेककेअर इंडिया प्रा.लि. कडील सर्व्हीस नोव्हेंबर २०१० पासून इलेक्ट्रोलक्स कंपनीकडे वर्ग करण्यात आली असल्याचे जाबदेणार नं.२ यांचे म्हणणे आहे. या तक्रारीचा टेककेअर इंडिया प्रा.लि. शी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी खुलाशात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणी दोषी धरता येणार नाही असे न्यायमंचाला वाटते. जाबदेणार नं.३ यांचे सर्व्हीस सेंटर आहे. त्यांनी दोन वेळा तक्रारदार यांच्या मशिनचे सदोष पॅनल बदलवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु तक्रारदारने पॅनल बसवून घेण्यास नकार दिला आहे. जाबदेणार नं.१ यांनी सांगितलेली सर्व्हीस देणे किंवा दुरूस्ती करणे एवढीच त्यांची मर्यादित जबाबदारी आहे असे मंचाला वाटते. त्यामुळे या प्रकारणात त्यांनाही दोषी धरता येणार नाही, असे न्याय मंचाचे मत बनले आहे. वरील सर्व मुद्दयांचा विचार करता न्याय मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशता मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदेणार नं.१ यांनी आदेशापासून ३० दिवसांच्या आत तक्रारदार यांचे मायक्रोओव्हन बदलून द्यावे किंवा त्यांनी अदा केलेली बिलाची रक्कम रू.५९९०/- दिनांक २३/०७/२०११ पासून ६ टक्के व्याजासह परत करावी.
३. जाबदेणार नं.१ यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १०००/- व तक्रारीचा खर्च रू.५००/- दयावा.
४. मायक्रोओव्हन बदलवून मिळाल्यानंतर किंवा त्याच्या बिलाची रक्कम मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या ताब्यातील मायक्रोओव्हन जाबदेणार नं.१ यांना परत करावा.
५. जाबदेणार नं.२ व जाबदेणार नं.३ यांच्या विरूध्द कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दि.१८/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.