(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या पिकाचे नुकसान भरपाईपोटी रु.2,90,000/- मिळावेत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च मिळावा, वरील सर्व रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.17 लगत म्हणणे, पान क्र.18 लगत प्रतिज्ञापत्र, सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.23 लगत लेखी म्हणणे व पान क्र.24 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेली आहेत.
अर्जदार व सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला क्र.1 यांनी खराब व दोषयुक्त बियाण्याचे उत्पादन करुन अवैध
व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय- नाही
3) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी सामनेवाला नं.1 यांचेवतीने पान क्र.25 लगत लेखी युक्तीवाद सादर करण्यात आलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.47 लगत लेखी पुरसीस दि.18/07/2011 रोजी देवून सामनेवाला क्र.1 यांचा लेखी युक्तीवाद स्विकारलेला आहे. अर्जदार यांचेवतीने पान क्र.48 लगत लेखी युक्तीवाद सादर करण्यात आलेला आहे. तसेच अर्जदार यांचेवतीने अँड.श्रीमती एस.एस.निफाडे यांनी युक्तीवाद केलेला आहे व सामनेवाला यांचेवतीने अँड.जे.यु.कोठारी यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादन केलेले फलॉवर बियाणे सामनेवाला क्र.2 यांचेकडून दि.12/07/2009 रोजी अर्जदार यांनी एकूण 13 पाकिटे एकूण रु.2470/- करीता खरेदी घेतलेली आहेत, ही बाब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांना दिलेली मुळ अस्सल पावती क्र.9553 रक्कम रु.2470/- करीता दि.12/07/2009 ची दाखल केलेली आहे. पान क्र.6 ची पावती व सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी ज्या फुलकोबी वाणाबाबत तक्रार केलेली आहे त्या वाणाची विक्री सामनेवाला यांनी अनेक कास्तकारांना केलेली आहे मात्र अन्य कोणाचीही तक्रार दाखल झालेली नाही. अर्जदार यांनी पिकाचे व्यवस्थापनात केलेल्या निष्काळजीपणामुळे कथीत नुकसान झाले असेल. पेरणीनंतर जवळपास 106 दिवसानंतर म्हणजे गोबी पिकाचे संपुर्ण वय झाल्यानंतर अर्जदार यांनी प्रथम तक्रार केलेली आहे. मात्र पीक कापणीकरीता आल्यानंतर किती पिकाची कापणी केली याचा उल्लेख केलेला नाही. तज्ञांचे कथीत अहवालामध्ये महत्वपुर्ण बाबींचा उल्लेख नाही. अर्जदार यांनी बियाण्याचे उगवणक्षमतेबाबत तक्रार केलेली नाही. यामुळे सखोल व तुलनात्मक पाहणी करुन तसेच तापमान, इतर नैसर्गिक बाबी यांचा अभ्यास करुन संबंधीत समितीने अहवाल देणे अपेक्षीत आहे. समिती अहवाल हा सविस्तर नाही. सामनेवाला यांनी सिड अँक्ट 1966 प्रमाणे वाणाचे परीक्षण करुनच वाण विक्रीस बाजारात आणलेले आहे. वाणामध्ये कोणतेही दोष नाहीत.” असा उल्लेख केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे जे कथन त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये केलेले आहे तशाच प्रकारचे कथन सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये केलेले आहे तसेच सामनेवाला क्र.2 यांनी सिलबंद बियाण्याचीविक्री केलेली आहे, सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली नाही असाही उल्लेख केलेला आहे.
अर्जदार यांनीच या कामी पान क्र.5 लगत वादग्रस्त बियाण्याची मुळ अस्सल पॉलिथीन बॅग दाखल केलेली आहे. या बँगचे पाठीमागील बाजुस बियाण्याची शुध्दता 98 टक्के, उगवण क्षमता 65 टक्के, मुळ शुध्दता(जेनेटीक प्युरीटी) 95 टक्के असा स्पष्ट उल्लेख आहे.
अर्जदार यांनी पान क्र.8 लगत जिल्हास्तरीय बियाणे चौकशी समिती भेटीचा दि.06/11/2009 रोजीचा अहवाल दाखल केलेला आहे. या अहवालामधील पाठीमागील बाजुस अनुक्रम 20 मध्ये इतर माहिती या ठिकाणी समितीतील सदस्यांनी जी माहिती लिहीली आहे त्यामध्ये कोठेही बियाणे दोषयुक्त होते किंवा बियाणे भेसळयुक्त होते याबाबतचा कोणताही उल्लेख केलेला नाही.
अर्जदार यांनी या कामी पान क्र.51 लगत पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.52 लगत साक्षीदार श्री.दशरथ खंडेराव गवांदे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. परंतु साक्षीदार श्री.गवांदे यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचे शेतीचे क्षेत्र किती आहे, किती क्षेत्रामध्ये कोणत्या तारखेस बियाण्याची लागवड केलेली होती व कोणत्या तारखेस पिकाची कापणी केलेली होती, पिक देखील व्यवस्थीत आले नाही म्हणजे नक्की कोणता प्रकार घडलेला होता याचा कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. म्हणजेच केवळ अर्जदार यांना मदत व्हावी या हेतुने साक्षीदार श्री.दशरथ गवांदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे असे दिसून येत आहे.
सामनेवाला यांनी सिड अँक्टनुसार पान क्र.5 चे बियाण्याचे पॉलीथीन पिशवीचे पाठीमागील बाजुस बियाण्याची शुध्दता किती आहे व बियाण्याची उगवणक्षमता किती आहे याचे प्रमाण दिलेले आहे. जर असे असूनही अर्जदार यांचे म्हणण्यानुसार निकृष्ठ प्रतीचे बियाणेमुळे त्यांचे नुकसान झालेले आहे तर बियाणे निकृष्ठ प्रतीचे होते हे स्पष्टपणे शाबित करण्याकरीता अर्जदार यांनी जिल्हास्तरीय बियाणे तक्रार चौकशी समिती यांचेकडील सर्व मुळ अस्सल कागदपत्र या मंचासमोर दाखल करणे गरजेचे होते तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार चौकशी समितीमधील कृषी अधिकारी किंवा शास्त्रज्ञ यांचे प्रतिज्ञापत्रही अर्जदार यांनी या कामी दाखल करणे गरजेचे होते.
सामनेवाला यांनी पान क्र.33 लगत महाराष्ट्र शासनाचे गुण नियंत्रक संचालक यांचे परिपत्रक व पान क्र.33 अ लगत कोबी लागवडीबाबतचे माहितीपत्रक दाखल केलेले आहे. पान क्र.33 चे परिपत्रक व पान क्र.33 अ ची कागदपत्रे या दोन्ही कागदपत्राबरोबर पान क्र.8 चे जिल्हास्तरीय बियाणे तक्रार चौकशी समिती भेटीचे अहवालामधील सर्व नोंदीची तुलना केली असता जिल्हास्तरीय बियाणे तक्रार चौकशी समिती यांचा दि.06/11/2009 चा अहवाल हा अपुर्ण आहे हे स्पष्ट होत आहे. समिती सदस्यांनी महाराष्ट्र शासनाचे गुण नियत्रंक यांनी दिलेले पान क्र.33 चे परिपत्रकानुसार भेट देवून योग्य ती पाहणी, तपासणी, शेजारील शेतक-यांचे जाबजबाब तसेच त्याच लॉटचे बियाणे ज्या अन्य शेतक-यांनी वापरले आहे त्या शेताची पाहणी करणे, त्यांचे जाबजबाब घेणे याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. याचा विचार होता पान क्र.33 चे परीपत्रक व पान क्र.33 अ लगतचे माहितीपत्रकाप्रमाणे पान क्र.8 चा जिल्हास्तरीय बियाणे तक्रार चौकशी समितीचा अहवाल अपुर्ण व अयोग्य आहे असे या मंचाचे मत आहे.
वास्तविक सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे सादर झाल्यानंतर म्हणजे दि.18/07/2011 नंतर अर्जदार यांनी योग्य तो जादा पुरावा, साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार चौकशी समिती यांचेकडील अर्जदार यांचे बाबतीतील सर्व मुळ अस्सल कागदपत्रे मागवण्याबाबत व या समितीवरील कृषी अधिकारी किंवा शास्त्रज्ञ किंवा अहवाल तयार करणारे योग्य ते कृषी अधिकारी यांचे प्रतिज्ञापत्रे मंचासमोर येण्याकरीता अर्जदार यांना संधी मिळूनही त्याबाबत अर्जदार यांनी कोणतीही पुर्तता केलेली नाही.
वरीलप्रमाणे सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 यांनी खराब व दोषयुक्त बियाण्यांचे उत्पादन केलेले नाही व त्यायोगे सामनेवाला यांनी अर्जदार यांचेबाबतीत अवैध व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही असे या मंचाचे मत आहे.
याकामी सामनेवाला यांचेवतीने पान क्र.26 ते पान क्र.32 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत.
1) 2(2005) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 94. सोनेकिरण ग्लॅडीओली ग्रोवर्स विरुध्द बाबुराम
2) 3(2006) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 269. खामगाव तालुका बागायतदार सह.संस्था विरुध्द बाबु कुट्टी डॅनियल
3) 1(2007) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 258. महाराष्ट्र स्टेट सिड कॉर्पोरेशन विरुध्द नरेंद्र मोतीरामजी बुर्डे
4) 2(2007) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.148. इंडो अमेरीकन हायब्रीड सिडस विरुध्द विजयकुमार शंकरराव
5) 2008(2) सि.पी.आर. राष्ट्रीय आयोग. पान क्र.193. द सेक्रेटरी विरुध्द द एरीया मॅनेजर
6) मा.राज्य आयोग मुंबई यांचेकडील प्रथम अपील क्र.466/10. निकाल ता.11/02/2011. मोन्सॅन्टो इं.लि. विरुध्द दत्तात्रय गणपती कदम
सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील व प्रस्तुतच्या तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे. यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेल्या निकालपत्रांचा आधार याकामी घेतलेला आहे.
मंचाचे वतीने या कामी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 1(2011) सि.पी.जे.महाराष्ट्र राज्य आयोग. पान 138. स्पॅरो ऑईल्झ प्रा.लि.विरुध्द दिनकर कृष्णाजी पाटील
2) III (2011) सि.पी.जे.राष्ट्रीय आयोग. पान 99. महिको सिडस् लि.विरुध्द जी.व्यंकटसुब्बा रेड्डी.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा तोंडी व लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांनी दाखल केलेली व आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे तसेच मंचाचे वतीने वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.