ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1170/2009
दाखल दिनांक. 30/07/2009
अंतीम आदेश दि.23/01/2014
कालावधी 04 वर्ष, 05 महिने, 23 दिवस
नि. 11
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
दानिश अफजल भाट, तक्रारदार
उ.व.सज्ञान, धंदा – शिक्षण , (अॅड.योगेश पी.मेटकर)
रा. आंदल वाडी, ता.रावेर,जि. जळगांव.
विरुध्द
1. मालक/व्यवस्थापक, सामनेवाला
एम.के.इम्पोरटेड हाऊस, झोन, ई-149, तळमजला, (एकतर्फा)
मॉर्डन रोड, हेड पोस्ट ऑफिस जवळ,
भुसावळ.
2. व्यवस्थापक नोकिया कंपनी,
कुर्ला बांद्रा रोड, अंधेरी. (प)
मोनॅको बिस्कीट कंपनी जवळ, मुंबई
3. यश मोबाईल सर्व्हीसेस,
दुकान क्र. 4, रायसोनी चेंबर्स,
चित्रा चौक, जळगांव.
(निकालपत्र सदस्य, चंद्रकांत एम.येशीराव यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, त्याने दि. 09/09/2007 रोजी रु. 8200/- इतकी किंमत मोजून नोकिया 6233 हा मोबाईल सामनेवाला क्र. 1 कडून विकत घेतला. मात्र दि. 25/07/2008 रोजी म्हणजेच सुमारे 9 ते 10 महिन्यात तो बंद पडला. सामनेवाला क्र. 1 ने सर्व्हिस जॉब शिट बनवून तो दुरुस्तीसाठी इतर सामनेवाल्यांकडे पाठविला. त्यासाठी रु. 950/- इतका दुरुस्ती खर्च आकारण्यात आला. मात्र आजतागायत तो मोबाईल सामनेवाल्यांनी परत केलेला नाही. त्यामुळे त्यास दुसरा मोबाईल घ्यावा लागला. सामनेवाल्यांनी अशा रितीने सेवेत कमतरता केलेली आहे, असा दावा करत मोबाईल दुरुस्त करुन दयावा. तसेच मोबाईल दुरुस्तीचा खर्च रु. 950/- परत मिळावा, अशा मागण्या तक्रारदाराने केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल नसल्यामुळे मानसिक,शारीरीक व आर्थिक नुकसान झाले म्हणून रु. 50,000/- व अर्ज खर्च रु. 5000/- मिळावेत, अशी देखील तक्रारदाराची मागणी आहे.
03. आमच्या पुर्वाधिकारी मंचाने सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. सामनेवाला क्र. 3 यांचे दुकान बंद झाल्यामुळे त्यांना जाहीर नोटीस देण्याची परवानगी देखील तत्कालीन मंचातर्फे दि. 18/10/2010 च्या आदेशान्वये तक्रारदारास देण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर तक्रारदाराने कोणतीही स्टेप घेतलेली नाही. संपुर्ण केसचे रेकॉर्ड दर्शविते की, दि. 19/04/2011 रोजी पासून तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर आहेत. त्यामुळे आम्ही मागील तारखेस म्हणजेच दि. 19/09/2013 रोजी तक्रारदाराने योग्य त्या स्टेप घ्याव्यात अन्यथा प्रस्तुत केस ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम, 13 (2) सी अन्वये, फेटाळण्यात येईल अथवा उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर निर्णयीत करण्यात येईल, असे आदेश पारीत केले. आज देखील तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर आहेत. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केलेला असल्याने, आम्ही प्रस्तुत केस उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर निर्णयीत करीत आहोत.
04. तक्रारदाराने तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि. 5 लगत मोबाईल खरेदी केल्याचे बिल, मोबाईल दुरुस्ती साठी दिल्या बाबतचे सर्व्हिस जॉब शीट, सामनेवाला क्र. 1 यास दिलेली नोटीस, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
05. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? -- होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? -- नाही
3. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
06. तक्रारदारानेप्रतिज्ञापत्रा मध्ये शपथेवर सांगितले की, त्याने रु. 8,200/- इतक्या किंमतीस सामनेवाला क्र. 1 कडून नोकिया 6233 हा मोबाईल फोन विकत घेतला. त्यासाठी त्याने नि. 5/1 ला मोबाईल खरेदी केल्याच्या बिलाची झेरॉक्स प्रत पुरावा म्हणून दाखल केलेली आहे. वरील तोंडी व कागदोपत्री पुरावा सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी हजर होवून नाकारलेला नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहेत, ही बाब शाबीत होते. सामनेवाला क्र. 3 यास जाहीर नोटीस बजली किंवा नाही ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नसल्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष सामनेवाला क्र. 1 व 2 च्या बाबतीत होकारार्थी व क्र. 3 च्या बाबतीत नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
07. दि. 26/07/2008 रोजी तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला व आजतागायत त्याने तो दुरुस्त करुन दिलेला नाही, असे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्रात शपथेवर म्हणणे आहे. त्याने दस्तऐवज यादी नि. 5/2 ला सर्व्हिस जॉब शीटची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदाराचा मोबाईल केवळ सुमारे 10 महिन्यात खराब झाला, ही बाब समोर येते. त्या ऑर्डर शीट मध्ये मोबाईल डेड झालेला आहे. तसेच, पाण्यामुळे तो खराब झालेला आहे, असे नमूद करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ असा आहे की, मोबाईल पाण्यामुळे खराब झालेला आहे, असा तक्रारदाराचाच पुरावा आहे. दुरुस्तीसाठी आपण मोबाईल सामनेवाला क्र. 1 कडे दिला असे जरी तक्रारदाराचे म्हणणे असले तरी सर्व्हिस जॉब शिट मध्ये ‘I am satisfied with the Job carried out on my Handset and it is working’ या रकान्या खाली तक्रारदाराने सही केलेली दिसते. त्यामुळे दुरुस्त करुन मोबाईल तक्रारदाराकडे देण्यात आलेला आहे, ही बाब उघड होते. परिणामी सामनेवाल्यांनी सेवेत कमतरता केली, ही बाब तक्रारदार शाबीत करीत नाही असेच म्हणावे लागेल. यास्तव मुद्दाक्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
08. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार सामनेवाला क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे. मात्र दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल परत केलेला नाही, ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाहीत. माझया मोबाईल हॅण्डसेट वर करण्यात आलेल्या कामा बाबत मी समाधानी आहे, आणी तो व्यवस्थीत काम करीत आहे, या सर्व्हिस जॉब शीट नि. 5/2 वरील शे-या खालील तक्रारदाराची सही स्पष्ट करते की, सामनेवाल्यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. परिणामी, तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव मुद्दा क्र.3 चा निष्कर्षा पोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष