नि. 25
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्र.अध्यक्षा – सौ वर्षा नं. शिंदे
मा.सदस्या – सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 146/2011
तक्रार नोंद तारीख : 3/06/2011
तक्रार दाखल तारीख : 06/06/2011
निकाल तारीख : 13/02/2014
-------------------------------------------------
श्री राजू अंबुमल चावला
रा. सुखनिवास, 1531, गणेशनगर,
7 वी गल्ली, सांगली 416 416 ....... तक्रारदार
विरुध्द
1. मॅनेजिंग डायरेक्टर,
ओनिडा हाऊस, जी-1,
एम.आय.डी.सी. महांकाली कवेज रोड,
अंधेरी (वेस्ट), मुंबई 400 093
2. साहिल शॉपी तर्फे
श्री सुनिल नंदलाल अडवाणी (मालक)
जी-1, जी-2, भगवान लिला कॉम्प्लेक्स,
हरभट रोड, सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे – अॅड श्री एम.डी.भोसले
जाबदार तर्फे – अॅड श्री एस.के.केळकर
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : सौ मनिषा कुलकर्णी
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 11 व 12 अन्वये दाखल केलेली आहे. प्रस्तुतची तक्रार स्वीकृत करुन जाबदारांना नोटीसीचे आदेश पारीत झाले. जाबदार क्र.1 हे नोटीस लागू होऊनही मंचासमोर हजर नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब त्यांचेविरुध्द नि.1 वर ‘ एकतर्फा ’ आदेश पारीत करणेत आले. जाबदार क्र.2 मंचासमोर हजर होवून त्यांनी आपले म्हणणे नि.9 वर दाखल केले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी दि.29/2/09 रोजी जाबदार क्र.2 साहील शॉपी या ओनिडाच्या अधिकृत डिस्ट्रीब्युटर्सचे दुकानातून ओनिडा 21 लि.मायक्रो ओव्हन मॉडेल नं.21 सी.जे.9159 अनु.नं.209119477 रक्कम रु.6,044.44 पैसे व ओनिडा वॉशिंग मशिन नं.02638 रक्कम रु.5,777.77 पैसे अशा दोन्ही वस्तू रक्कम रु.13,300/- ला खरेदी केल्या होत्या. जाबदार क्र.2 यांनी त्यावेळी त्याची पावती सहीनिशी तक्रारदार यांना दिली होती व सदरचे ओव्हन व वॉशिंग मशिन हे अर्जदारांनी त्यांच्या पुणे येथे राहणा-या मुलीसाठी खरेदी केले होते.
सदरचा ओव्हन घरी आणलेनंतर सुरु झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदार क्र.2 कडे याबाबत तक्रार केली. जाबदार क्र.2 यांनाही ओव्हन सुरु करता आला नाही व तक्रारदारांनी ओव्हन बदलून देणेबाबत विनंती केली असता जाबदार क्र.2 यांनी अर्जदारना पूणे पिंपरी चिंचवड येथील सर्व्हिस सेंटरमध्ये दाखविण्यास सांगितले व पुणे पिंपरी चिंचवड येथे दाखविला असता ओव्हनचे दार खराब आहे, दुरुस्त करुन देतो असे सांगितले. दुरुस्तीनंतर दार दोनच दिवस व्यवस्थित चालले व त्यानंतर पुन्हा बंद पडले. शॅाक मारणे सुरु झाले. पुन्हा दुरुस्तीस दिला असता एक पार्ट खराब आहे व दुरुस्तीसाठी ठेवलेनंतर पार्ट बदलून देतो व तदनंतर ओव्हन ठेवणेसाठी गेले असता ‘ तुम्ही जेथून घेतला, तेथून ओव्हन बदलून घ्या ’ असे सांगण्यात आले.
तदनंतर ओव्हन जाबदार क्र.2 यांचेकडे बदलून घेणेसाठी गेले असता जाबदार क्र.2 यांनी ओव्हन मुंबई येथील कंपनीतून बदलून घेवून देतो असे सांगितले व अशी 4-5 महिने जाबदार क्र.2 हे आश्वासन देत होते व हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत होते. सबब तक्रारदारास जाबदार क्र.1 व 2 यांनी ओव्हनही दुरुस्त करुन दिला नाही अगर ओव्हनची बदली न करुन देवून सेवेत त्रुटी केली आहे व दूषित सेवा दिलेली आहे.
तसेच तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 व 2 यांना दि.18/8/2010 रोजी रजि.ए.डी.ने कायदेशीर नोटीस दिली असता जाबदार क्र.1 यांनी नोटीसीस उत्तर दिले व जाबदार क्र.2 यांनी साधे उत्तरही दिले नाही. सबब तक्रारदारास तक्रार दाखल करणे भाग पडले. तक्रारदाराने ओव्हन दुरुस्त होत नसलेने जाबदारांना नवीन ओव्हन देणेबाबत अगर ओव्हनची रक्कम रु.6,044 परत देणेबाबत आदेश करणेबाबत विनंती केली आहे. तसेच शारिरिक व मानसिक त्रास दिलेबद्दल नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,500/- दोन्ही जाबदारकडून अर्जदारास देणेत यावेत व अर्जाच खर्च रक्कम रु.2,000/- देणेत यावा असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
3. तक्रारदाराने आपले तक्रारअर्जाचे पुष्ठर्थ नि.19 वर शपथपत्र तसेच नि.3 सोबत 3 कागदपत्रांची फेरिस्त दाखल केली आहे, तसेच लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. जाबदार क्र. 1 व 2 यांनी नोटीसीचे आदेश होवूनही जाबदार क्र.1 हे मंचासमोर हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब. नि.1 वर त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. जाबदार क्र.2 यांनी आपले म्हणणे नि.9 ला दाखल केले आहे. त्यांचे म्हणण्यानुसार जाबदार क्र.2 यांना तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेली आरोपवजा कथने मान्य व कबूल नाहीत. तक्रारअर्ज कलम 1 मध्ये नमूद केलेला मॉडेल नंबरचा मायक्रोवेव्ह जाबदार क्र.2 यांनी विकलेला नाही. त्यामुळे तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी अर्जात नमूद केलेला मायक्रोव्हेहचा मॉडेल क्र. व पावतीवरील क्रमांक यात फरक आहे. तसेच जाबदारांनी दोषयुक्त सेवा दिल्याचे कथन खोटे आहे. ओव्हन सुरु नसल्याचे कथन तसेच सदरचा ओव्हन तक्रारदार व त्यांचे मुलीने पिंपरी-चिंचवड येथील सर्व्हिस सेंटरमध्ये दाखविल्याचे कथन मान्य व कबूल नाही. तसेच तक्रारदार यांचे कलम 4, कलम 5, 6, 7 मध्ये केलेले कथन जाबदार क्र.2 यांना मान्य व कबूल नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा अर्ज नामंजूर करणेत यावा व तक्रारदार यांनी जाबदारांना त्रास देणेच्या हेतूने खोटी तक्रार दाखल केली असलेने तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- द्यावेत व खर्चापोटी तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांना रक्कम रु.4,000/- द्यावेत असा हुकुम करणेत यावा असे कथन केले आहे.
6. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्याचे पुष्ठयर्थ नि.10 ला शपथपत्र दाखल केले आहे.
7. तक्रारदाराने दाखल केलेला तक्रारअर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार क्र.2 चे म्हणणे तसेच दाखल केलेला युक्तिवाद या सर्वांचे अवलोकन केल्यावर मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना देण्याच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? नाही.
3. काय आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
मुद्दा क्र.1
8. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे नि.3/1 ला दाखल केलेल्या पावतीवरुन ते जाबदार यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे ओनिडा 2,4 मायक्रोओव्हन मॉडेल 21 सीजे 51595 अ.नं.209179477 व ओनिडा वॉशिंग मशिन नं.02638 अनुक्रमे रक्कम रु.6044.00 व रु.5777.77 असे एकूण रक्कम रु.13,300/- किंमतीस खरेदी केलेचे दिसून येते. सबब तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा देणार व सेवा घेणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
मुद्दा क्र.2
9. तक्रारदार यांनी जाबदार नं.2 यांचेकडे साहिल शॉपी या ओनिडा डिस्ट्रीब्यूटर्सच्या दुकानातून ओनिडा 21 लि. मायक्रो ओव्हन मॉडेल नं.21, सी.जे.9159 अनु.नं.209119477 रक्कम रु.6,044.44 पैसे व ओनिडा वॉशिंग मशीन नं.02638 रक्कम रु.5,777.77 पैसे दोन्ही वस्तू रक्कम रु.13,3002/- ला खरेदी केल्या होत्या. जाबदार नं.2 यांनी त्यावेळी त्याची पावती सहीनिशी अर्जदारांना दिली होती. सदरचे खरेदी केलेले ओव्हन व वॉशिंग मशीन हे अर्जदारांनी त्यांच्या पुणे येथे राहणा-या मुलीसाठी खरेदी केले होते.
10. परंतु अर्जदारांनी ओव्हन घरी आणलेनंतर सुरु झाला नसलेने त्यांनी लगेचच जाबदार क्र.2 यांचेकडे त्याबाबत तक्रार केली व जाबदार क्र.2 यांनाही तो सुरु झाला नाही. तक्रारदारांनी ओव्हन बदलून देणेची विनंती केली असता जाबदार क्र.2 यांनी तो बदलूनही दिला नाही व सुरुही करुन दिला नाही व जाबदार क्र.1 यांना पुणे-पिंपरी चिंचवड येथील सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवि णेस सांगितले असता, तक्रारदारांनी व त्यांचे मुलीने तो पुणे- पिंपरी चिंचवड येथील सर्व्हिस सेंटरमध्ये दाखविला व ति थेही त्यांनी दार खराब असलेने दुरुस्त करुन देतो व त्यानंतर एक महिन्यांनी दाराचीही दुरुस्ती करुन दिली. परंतु ओव्हन एक दिवस चालून दुसरे दिवशी लगेच बंद पडला व तो शॉक मारत होता. पुन्हा दुरुस्तीस दिला असता त्याचा एक पार्ट खराब असलेने तो जाबदार क्र.1 यांनी बदलून दिला व त्यानंतरही ओव्हन चारच दिवस चालून तो बंद पडला व जाबदार क्र.1 यांनी पुन्हा ओव्हन जाबदार क्र.2 यांचेकडे बदलून देणेस तक्रारदारांना सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार जाबदार क्र.2 यांचेकडे सांगली येथील दुकानात ओव्हन बदलून घेणेकरिता आले असता, जाबदार क्र.2 यांनी सदरचा ओव्हन मुंबई येथील कंपनीतून बदलून देणेची हमी दिली व 4-5 महिने तक्रारदार यांना आश्वासने दिली व जाबदार यांनी दूषित सेवा दिली असे तक्रारदार यांनी प्रतिपादन केले आहे.
11. जाबदार क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या या सर्व गोष्टी मान्य व कबूल केलेल्या नाहीत. उलट जाबदार क्र.2 यांनी ओव्हनचा मॉडेल नंबर चुकीचा आहे असे कथन केलेले आहे व अर्जदारांनी सर्व्हिस सेंटरचे पत्र, सर्व्हिस सेंटरमधील तक्रार नंबर याबाबत कोणताही पुरावा याकामी सादर केलेला नाही. असा जाबदार क्र.2 यांनी आक्षेप घेतलेला आहे व तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करुन जाबदार क्र.2 यांनाच नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- व त्रासाच्या खर्चापोटी रु.4,000/- देणेचे हुकूम होणेवि षयी कथन केले आहे.
12. तक्रारदार यांनी आपले पुराव्याचे पुष्ठयर्थ नि.3/1 ला सांगली येथील साहील शॉपीची मायक्रो ओव्हन व ओनिडाचा वॉशिंग मशिन खरेदी केल्याची पावती हजर केलेली आहे. यावरुन त्यांनी या दोन्ही वस्तूंची खरेदी केली होती याबाबत उभय पक्षांमध्ये दुमत दिसून येत नाही. तसेच नि.3/2 वर तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 व 2 यांना रजि.ए.डी.ने वकीलांमार्फत नोटीस पाठविलेचे दिसून येते. याबाबतही उभय पक्षांमध्ये दुमत नाही तसेच नि.3/3 ला तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांनी त्यांचे वकीलांमार्फत पाठविलेल्या नोटीसीस उत्तर पाठविलेचे दिसून येते.
13. सदरचे दि.13 ऑक्टोबर 2010 च्या जाबदार क्र.1 च्या नोटीशीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी स्वतःचे वॉरंटी कार्ड, बिलाची कॉपी, कम्प्लेंट नंबर यापैकी कोणतीही कागदपत्रे जाबदार यांच्या सर्व्हिस सेंटरला जमा केलेली नसलेचे दिसून येते. तसेच सदरचे नोटीसीचे कलम 5 मध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांना आपले इन्स्पेक्शनसाठी तक्रारदार यांचा पत्ता, त्यांना योग्य असणारी तारीख आणि वेळ ही सात दिवसांचे आत कळविणे विषयी विनंती केलेचे दिसून येते. परंतु तक्रारदार यांनी दाखल पुराव्यावरुन कुठेही आपण लेखी याविषयी कळविलेचे दिसून येत नाही.
14. तक्रारदारांनी आपले पुराव्यात मायक्रोओव्हन दुरुस्तीसाठी दिली जाणारी साधी कच्ची पावतीही दाखल केलेली दिसून येत नाही. तक्रारदारास सर्व संधी उपलब्ध असताना देखील त्याने मंचासमोर आपले दुरुस्तीसाठी देत असलेल्या ओव्हनचा तज्ञांचा सल्ला (expert opinion) विषयीची मागणीही केलेचे दिसून येत नाही. तसेच जाबदार क्र.2 यांचेकडेही सदरचा ओव्हन दुरुस्तीसाठी दिला असलेबाबतचा एकही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांनी आपल्या पुणे येथे राहणा-या मुलीसाठी ओव्हनची खरेदी केली व तो दुरुस्तीस पुणे-पिंपरी चिंचवड येथे दिला असे कथन केलेले आहे. परंतु याबाबतचे तक्रारदार यांच्या मुलीचे शपथेवरील कथन कोठेही दिसून येत नाही व पुणे-पिंपरी चिंचवड येथे ओव्हन दुरुस्तीस दिलेबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, प्रस्तुतचा ओव्हन हा नादुरुस्त आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येवू शकत नाही.
वरील सर्व गोष्टींचे अवलोकन करता तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दि. 13/02/2014
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा नं. शिंदे )
सदस्या प्रभारी अध्यक्ष