तक्रारदार - स्वत:
// निकालपत्र //
(Dictated in Open Court)
पारीत दिनांकः- 02/04/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुश, अध्यक्ष)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी सन 2006 मध्ये पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केली होती. तेव्हा त्यास पीडीएफ//2006/532 असा क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर मा. राज्य आयोगाच्या आदेशानुसार सदरहू तक्रार पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथून अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचामध्ये वर्ग करण्यात आली. तेव्हा त्यास एपीडीएफ/2008/399 असा क्रमांक देण्यात आला. दि.1/7/2011 रोजी तक्रारदारांनी स्वत: हजर राहून केस चालविणेबाबतचा अर्ज मंचापुढे दाखल केला. तक्रारदार दि.3/8/2011 पासून मंचात गैरहजर असले तरी त्यांनी दि.1/7/2011 रोजी मंचात दाखल केलेल्या अर्जाचा विचार करुन मंच आजरोजी यामध्ये आदेश पारीत करत आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीप्रमाणे :-
2. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे दि. 6/1/2006 रोजी शेल्फची मागणी नोंदविली होती, त्याची किंमत रु. 800/- ठरली होती. तक्रारदारांनी रककम रु.600/- जाबदेणारास आगाऊ दिले, त्याची पावती मंचात दाखल केली आहे. नोंदणी करुन, रककम देऊन, अनेकवेळा मागणी करुन, प्रत्यक्ष जाऊनही जाबदेणारांनी त्यांना शेल्फ दिला नाही. शेवटी दि.4/8/2006 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने त्यांना पत्र पाठविले ते जाबदेणारांना दि.8/8/2006 रोजी मिळूनही जाबदेणारांनी शेल्फही दिला नाही आणि रक्कमही परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारांविरुध्द ही तक्रार केली आहे. तक्रारदार रक्कम रु.600/-, त्यावरील व्याज रु. 54/-, प्रवास खर्च रु.90/-, मानसिक त्रासापोटी रु.100/-, दाव्याचा खर्च रु.130/- असे एकूण रु. 974/- जाबदेणारांकडून मिळावेत अशी मागणी करतात.
तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. मंचाने जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, जाबदेणारांना नोटीस मिळूनही ते मंचापुढे हजर राहिले नाहीत. म्हणून मंचाने दि.22/8/2011 रोजी त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला.
4. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांना शेल्फच्या एकूण रकमेपैकी म्हणजेच रक्कम रु.800/- पैकी रक्कम रु.600/- दिल्याचे व रक्कम रु. 200/- बाकी असल्याचे दिसून येते. ही रक्कम दि. 4/1/2006 रोजी दिली आहे. त्यानंतर दि. 20/10/2006 पर्यंत तक्रारदारांना जाबदेणारांनी रक्कमही परत केली नाही किंवा शेल्फही दिला नाही. अर्ध्याच्या वर रक्कम घेऊनही जाबदेणारांनी नोंदणी केलेला शेल्फ तक्रारदारास दिला नाही ही जाबदेणा-यांची सेवेतील त्रुटी ठरते. तसेच त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. तक्रारदार दि. 4/1/2006 पासून द.सा.द.शे. 9% दराने व्याज मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये रु.974/- इतकी किरकोळ रक्कम मागितली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमुद केलेली व्याजाची रक्कम रु.54/- एकूण रक्कम रु.974/- मधून वजा करण्यात येत आहे. उर्वरित रक्कम रु.920/- द.सा.द.शे. 9% व्याजदराने दि. 4/1/2006 पासून ते संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत जाबदेणारांनी तक्रारदारास दयावी असा मंच आदेश करत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रु.920/- (रक्कम रु. नऊशे वीस मात्र) द.सा.द.शे. 9% व्याजदराने दि. 4/1/2006 पासून ते संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत, या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.