निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा शेती व्यवसाय करुन आपली व आपल्या कुटूंबीयाची उपजिविका भागवतो. अर्जदाराने दुध व्यवसाय करण्यासाठी रक्कम रु. 30,000/- ची म्हैस विकत घेतली. दिनांक 09/11/2013 रोजी अर्जदार यांची म्हैस चरत जात असतांना रामराव यांचे शेतात गेली. पोलवरील विजेची तुटलेली वायर तिच्या पोटाला लागून ती लाईटच्या तुटलेल्या तारेस चिटकून मरण पावली. पोलीस स्टेशन लोहा ता. लोहा जि. नांदेड यांनी गुन्हा क्र. 5/2013 प्रमाणे गुन्हा नोंदविला. अर्जदाराची म्हैस मृत्युसमयी सुमारे 5 वर्षाची असून सदर म्हैशीची किंमत रक्कम रु. 30,000/- होती. म्हैसीचे आयुष्य 25 वर्षापर्यंत असून आणखी 20 वर्षापर्यंत म्हैस जिवंत राहिली असती. सदर शेतात विदयुत तार तुटून खाली पडली होती. लाईनमनने पाहणी करुन घेतली असती तर हा अपघात घडला नसता. त्यामुळे गैरअर्जदाराची याबाबत संपूर्ण जबाबदारी असतांनाही जाणून बुजून निष्काळजीपणा केल्याने सदरील घटना घडलेली आहे. अर्जदाराची म्हैस प्रत्येक दिवसाला सकाळी व संध्याकाळी मिळून 10 लिटर दुध देत होती. सदर दुध हे 40/- रुपये लिटर प्रमाणे प्रत्येक दिवसाला 400/- उत्पन्न खर्च वजा जाता निव्वळ नफा 200/- रुपये म्हैशी पासून मिळत होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 18/03/2014 रोजी जावून म्हैशीची किंमत व झालेली नुकसान भरपाई मागितली असता गैरअर्जदाराने ती देण्यास नाकारले म्हणून अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदाराची म्हैस लाईटच्या तुटलेल्या तारेला चिटकून मरण पावल्यामुळे रक्कम रु. 50,000/- दिनांक 09/11/2013 पासून 12 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्च म्हणून रक्कम रु. 5,000/- इतक्या रक्कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराने दाखल केलेला अर्ज न्याय मंचापुढे कायदेशीररित्या टिकणारा नसल्यामुळे फेटाळून लावण्यात यावा. अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (डी) नुसार ग्राहक होत नाही. अर्जदाराने म्हैसीच्या किंमतीबाबत कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सदरील अपघात हा गैरअर्जदारामुळे घडला नसून वादळवा-यामुळे विदयुत तार तुटून खाली जमिनीवर पडली जे की, नैसर्गिक आपत्तीमुळे हा अपघात घडला आहे त्यामुळे अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात यावा. तसेच अर्जदाराने गैरअर्जदारास रक्कम रु. 25,000/- दयावेत अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदाराच्या तक्रारीतील प्रमुख मागणी अशी आहे की, अर्जदाराच्या सदरील शेतामध्ये गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे लाईटची तार तुटून पडलेली होती. सदरील तुटलेल्या विदयुत वाहिनीला अर्जदाराच्या म्हैसीच्या पोटाला स्पर्श झाल्यामुळे अर्जदाराची म्हैस विदयुत शॉक लागून मरण पावलेली आहे. अर्जदारास सदर म्हैसी पासून सुमारे 200/- रुपये प्रतिदिवस एवढे उत्पन्न होत होते तसेच अर्जदाराच्या म्हैसीची किंमत रक्कम रु. 50,000/- होती त्यामुळे गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराची म्हैस मृत्यु पावलेली असल्याने गैरअर्जदार हे अर्जदाराच्या नुकसानीस जबाबदार आहेत. त्यासाठी अर्जदाराने तक्रारीसोबत घटनास्थळ पंचनामा, गुन्हयाच्या तपशीलाचा नमुना दाखल केलेला आहे. सदरील पंचनाम्याचे अवलोकन केले असता अर्जदाराच्या म्हैसीचा मृत्यु हा शेजारील शेतात चरत असतांना शेतातील पोलवरील तुटलेली विजेची वायर तिच्या पोटाला लागून शॉक लागल्यामुळे मृत्यु पावलेली आहे असे दिसून येते. तसेच म्हैसीचा शवविच्छेदन अहवाल अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. त्यामध्ये म्हैसीची अंदाजे किंमत 40 ते 50,000/- अशी नमूद केलेली असून पशुवैदयकीय अधिकारी यांनी सदरील म्हैसीचा मृत्यु हा इलेक्ट्रीक शॉकने झालेला असल्याचे मत नोंदवलेले आहे. अर्जदाराने सदरील घटनेची माहिती विदयुत निरीक्षक यांना दिलेली होती. त्यानुसार सब इंजिनिअर, लोहा यांनी असिस्टंट इलेक्ट्रीक इन्स्पेक्टर नांदेड यांना दिनांक 29/11/2013 रोजीचे पत्राद्वारे सदरील घटनेची तपासणी करुन मत मागवलेले होते परंतू सदरील विदयुत निरीक्षकाचे कुठलेही मत अर्जदाराने किंवा गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये सदरील वायर ही वादळवा-यामुळे जमिनीवर पडलेली असून सदरील अपघात हा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असल्याचे नमूद केलेले आहे. परंतू त्या काळामध्ये वादळ वारे होवून तारा तुटलेल्या होत्या या बद्दलचा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच गैरअर्जदाराने विदयुत निरीक्षकाकडे घटनेची चौकशी करुन अहवाल मागवलेला होता याबद्दलचा तपशीलही लेखी जबाबात नमूद केलेला नाही. याउलट अर्जदाराने शवविच्छेदन अहवाल, पोलीस स्टेशन लोहा यांनी केलेला घटनास्थळ पंचनामा व म्हैसीची विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला मंचासमोर दाखल केलेला आहे. सदरील कागदपत्राचे अवलोकन केले असता अर्जदाराच्या म्हैसीचा मृत्यु हा तुटलेल्या तारेचा विदयुत शॉक लागून झालेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांच्या हानीकारक अपघात (Fatal Accident) या परिपत्रकानुसार जनावराच्या मृत्युस रक्कम रु. 2,000/- नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार अर्जदार सदर अपघातामुळे म्हैशीच्या मृत्युसाठी गैरअर्जदार यांच्याकडून रक्कम रु. 2000/- मिळण्यास पात्र आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास म्हैसीच्या किंमतीची रक्कम रु.2,000/- आदेश
तारखेपासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीचा खर्चापोटी रक्कम रु. 1,500/- दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.