निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केली आहे.
अर्जदारची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदार हे मे.मनजित कॉटन प्रा.लि.रतनाळी, ता.धर्माबाद,जिल्हा नांदेड येथे जिनिंग व प्रेसिंग आहेत. सदर जिनिंगवर अर्जदाराचा व अर्जदाराचे कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालतो. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून विद्युत पुरवठा घेतलेला असून गैरअर्जदाराकडून अर्जदारास मीटर रिडींग युनीटप्रमाणे बील देण्यात येते. अर्जदारास महिन्याला विजेचे बील अंदाजे तीन लाख ते पाच लाख रुपयाचे दरम्यान येते. डिसेंबर,2014 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विद्युत बीलाचा भरणा केला. त्यानंतर दिनांक 2.03.2014 रोजी गैरअर्जदार यांचे फिरते पथक अर्जदाराचे जिनिंगवर जाऊन अर्जदारास आकारणेत आलेला विजेचा दर चुकीचा असल्याने अर्जदारास फरकाची रक्कम रु.18,07,637.81 इतक्या रक्कमेचे बील दिले. सदरील बील भरणा केला नाही तर अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे सांगितले. अर्जदाराने जिनींगसाठी कंटयूनिअस सप्लायचा गैरअर्जदार यांचेकडे कधीही अर्ज केलेला नव्हता किंवा टेरीफ चेंज करणेसही गैरअर्जदाराला कळविले नव्हते. त्यामुळे गैरअर्जदाराने दर आकारण्याचे फरकातील दिलेले देयक चुकीचे असून गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये सदरील बील रद्य करण्यात यावे व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रक्कम रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर ते वकीलामार्फत हजर झाले. त्यांनी लेखी निवेदन मंचासमोर दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील संपुर्ण कथन अमान्य केलेले असून गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने यापुर्वी अंतर्गत ग्राहक निवारण मंच विज कायदा,2003 अंतर्गत स्थापन झालेल्या मंचासमक्ष दाखल केलेल्या तक्रारीचे संपुर्ण कागदपत्रांचा संच गैरअर्जदार दाखल करीत आहे. त्यामुळे परिच्छेद क्रमांक 13 मध्ये यापुर्वी याबाबत कोणतीही तक्रार केली नाही असा जो उल्लेख आहे तो खोटा आहे.
दिनांक 26.03.2014 रोजी विज वितरण कंपनीच्या फिरते पथकाने धर्माबाद तालुक्यातील रतनाळी येथे गट क्र. 6 मध्ये स्थित असलेल्या मे.मनजित कॉटन प्रा.लि.रतनाळी या संस्थेस भेट दिली असता असे आढळून आले की, ज्या फिडरवर सदर ग्राहकास विजेची जोडणी देण्यात आलेली आहे त्या फिडरवर इतर कोणत्याही ग्राहकास विजेची जोडणी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सदर विद्युत पुरवठा हा सतत अखंडीत व अविरत स्वरुपाचा मिळत होता. जेकी, कंटीन्युअस स्वरुपाचे प्रकरण होते. एचटी ग्राहकांना जर सतत अखंडीत विद्युत पुरवठा दिला जात असेल तर त्याची वर्गवारी एचटी-1/सी या स्वरुपात होते त्यासाठी जे प्रचलित विज दर आहेत ते लावण्यात येतात. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराने सतत विद्युत पुरवठा वापरल्यामुळे अर्जदाराला एचटी-1/सी याच वर्गवारीनुसार विजेचे बील देणे गरजेचे होते ते विजेचे बील देण्यात आलेले आहे. तसेच अध्यक्ष, अंतर्गत ग्राहक निवारण कक्ष तथा कार्यकारी अभियंता कार्यालय,नांदेड यांनी अर्जदाराने यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर निकाल दिलेला असून सदरील बील योग्य असल्याने अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज केलेला आहे. अर्जदाराने घेतलेली विज जोडणी इंडस्ट्रीअल स्वरुपाची असल्याने ती औद्योगिक उपयोगासाठी वारलेली जाते. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा ,1986 च्या कलम 2(i) (d)( i i) अन्वये सदर व्यक्ती ग्राहक म्हणवून घेऊ शकत नाही. त्यामुळे अर्जदाराची तकार नामंजूर करावी अशी विनंती लेखी जबाबाव्दारे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी केली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी परिच्छेद क्रमांक 1 मध्ये अर्जदार ही जिनिंग व प्रेसिंग प्रा.लि. अशी कंपनी असून अर्जदाराने सदरील जिनिंग व प्रेसिंग करीता गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे ही बाब नमुद केलेली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये अर्जदारास दरमहा रक्कम रुपये 3 लाख ते रक्कम रु.5 पाच लाखाचे विद्युत बील येत असल्याचे मान्य केलेले आहे. यावरुन अर्जदार हा विद्युत पुरवठयाचा वापर व्यावसायीक कारणासाठी करीत असल्याचे सिद्ध होते. तसेच अर्जदाराने अंतर्गत ग्राहक निवारण मंच यांचेकडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा निकालाची प्रत गैरअर्जदार यांनी लेखी जबाबासोबत दाखल केलेली आहे.सदरील निकाल हा दिनांक 15.04.2015 रोजी दिलेला असून सदरील निकालामध्ये सर्व तांत्रिक बाबींची शहानिशा करुन अर्जदाराचा अर्ज खारीज केलेला असून गैरअर्जदाराने दिलेले देयक योग्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
अर्जदार हा व्यावसायीक कारणासाठी विजेचा वापर करीत असल्याने अर्जदार हा ग्राहक या व्याख्येत अंतर्भूत होत नाही असे मंचाचे मत आहे. वरील दोन्ही कारणावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.