निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार हा विज ग्राहक म्हणून निवासी वापराकरिता विज घेत असतांना विजेची उपकरणे एक फॅन, एक पंखा, एक टयुब लाईटचा नित्य वापर करुन विज बिल देयकांचा भरणा करत होता. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना जानेवारी 2014 पासून अवाजवी रक्कमेचे देयक दिले. माहे 2014 ला रु.889/-, त्यानंतर 541 युनिट, माहे सप्टेंबर 2014 ला रक्कम रु. 4,581/-, माहे ऑक्टोंबर 1089 युनीट रक्कम रु. 11,666/-, माहे नोव्हेंबर 2014 विज बिल 654 युनिट रक्कम रु. 6,280/- प्रमाणे विज बिल देयके दिलेली आहेत. अर्जदाराच्या घरातील मिटर गैरअर्जदाराने काढून दिनांक 17/07/2014 रोजी लाईट खांबावर बॉक्समध्ये बसविण्यात आले तेव्हा मिटर रिडींग 1677 अशी होती. त्यानंतर विज बिल वाढीव युनिटचे देण्यात आलेले आहे. अर्जदाराचा वापर कमी असून सरासरी 100 युनिटच्या आत आहे. दिनांक 17/12/2014 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास नोटीस देवून रक्कम रु. 35,330/- चे बिल भरणा केले नाही तर विदयुत पुरवठा खंडीत करण्याची नोटीस दिली. अर्जदाराचे ग्राहक नाव डी.एम. धर्माधिकारी असतांना चुकीच्या नावाने म्हणजेच डी.एम. धर्मापुरीकर या नावाने विज बिल देयके देण्यात आलेली आहेत. अर्जदाराने वेळोवेळी विनंती करुनही गैरअर्जदाराने विज बिलात दुरुस्ती करुन दिलेली नाही. गैरअर्जदाराने अर्जदार यांना चुकीची देयके दिल्यामुळे अर्जदाराला मानसिक, शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरची तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार गैरअर्जदार यांच्याकडून विज बिल रक्कम रु. 48,910/- रद्द करुन मिळावे तसेच मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- इत्यादी बाबींची मागणी गैरअर्जदार यांच्याकडून केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथन अमान्य केलेले असून गैरअर्जदार यांचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने त्याच्या विज बिलाबाबत तक्रार केल्यानंतर तात्काळ दिनांक 17.01.2015 रोजी ग्राहकांच्या मिटरच्या बाबतीत स्थळ तपासणी करुन पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये सदर ग्राहकाच्या विज जोडणी मधील आऊट गोईंग मधून त्या वायरद्वारे पुढील 3 ग्राहकांच्या मिटरला विदयुत पुरवठा जोडण्यात आला होता त्यामुळे मिटरवर माहे ऑगस्ट 2014 ते जाने-2015 या कालावधीमध्ये 4399 इतकी रिडींग 4 ग्राहकांनी वापरलेली आहे त्यापैकी ग्राहक क्र. 550010151112 यांनी वापरलेले युनिट 634 तसेच ग्राहक क्र. 5500101119065 यांनी वापरलेले युनिट 1442 व ग्राहक क्र. 550010030889 यांनी वापरलेले युनिट 2123 असे तिन्ही ग्राहकांचे एकूण वापरलेले युनिट 1499 असल्याकारणाने अर्जदार यांचा वापर 200 युनिटचा झाला असल्याचे दिसून येते. या कालावधीमध्ये अर्जदार यांना 4399 युनिटचे रक्कम रु. 44,250/- विजेचे बिल देण्यात आले होते त्यापैकी अर्जदाराचा वापर 200 युनिटचा आढळल्याने त्यांना केवळ रक्कम रु. 1158/- रुपयाचे बिल देणे योग्य होते, म्हणून उर्वरीत रक्कम रु. 43,092/- या रक्कमेचे बिल रद्दल करण्यात आलेले आहे व तसे दुरुस्ती बिल अर्जदारांना देण्यात आलेले आहे. सदरील दुरुस्ती बिल अर्जदाराला मान्य आहे. त्यामुळे अर्जदाराच्या तक्रारीची पूर्तता अधीच झालेली आहे. बिलाच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही स्वरुपाचा वाद शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार अनिरुध्द पि. अरुण धर्माधिकारी यांची प्रमुख तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अवाजवी व जास्तीच्या रक्कमेची देयके दिलेली आहेत. गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार करुनही गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यासाठी अर्जदारास तक्रार दाखल करावी लागली. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केला व लेखी जबाबामध्ये अर्जदाराचे विजेचे बिल दुरुस्ती करुन दिलेले असल्याचे नमूद केलेले आहे. त्यासंबधाने गैरअर्जदार यांनी विज बिल दुरुस्ती केल्याचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर विज बिल हे दिनांक 19.02.2015 रोजी दुरुस्ती केलेले असल्याचे अहवालावरुन स्पष्ट होते. अर्जदार यांच्या तक्रारीतील कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदार हा सदरील बिल दुरुस्ती करुन दयावे म्हणून गैरअर्जदार यांच्याकडे दिनांक 07.08.2014, 10.12.2014, 30.12.2014 पासून लेखी अर्ज देत होता. सदरील अर्जावर गैरअर्जदार यांनी कोणतीही कार्यवाही न करता उलट दिनांक 17.12.2014 रोजी अर्जदारास नोटीस पाठवून विदयुत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. वास्तविक पाहता गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे अर्जदारास चुकीचे देयक दिले जात होते. ही बाब लेखी जबाबामध्ये गैरअर्जदार यांनी मान्य केलेली आहे व तक्रार दाखल केल्यानंतर अर्जदाराचे बिल दुरुस्त केलेले आहे. अर्जदाराचे बिल गैरअर्जदार यांनी त्वरीत दुरुस्ती न करता अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर म्हणजेच अर्जदाराने दिनांक 27.01.2015 रोजी तक्रार दाखल केलेली असून गैरअर्जदाराने अर्जदाराचे बिल दिनांक 19.02.2015 रोजी दुरुस्ती केलेले असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या ऑगस्ट मध्ये दिलेल्या अर्जावर त्वरीत कार्यवाही करुन बिल दुरुस्ती करुन देणे क्रमप्राप्त होते परंतू त्यासाठी अर्जदारास तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. गैरअर्जदार यांची ही कृती सेवेत कमतरता दर्शविणारी आहे. त्यामुळे निश्चितच अर्जदारास मानसिक त्रास झालेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विज बिल दुरुस्ती करुन दिलेले असल्याने अर्जदाराची विज बिल दुरुस्ती करुन देण्याची मागणी मान्य करता येत नाही. परंतू अर्जदारास मानसिक त्रास झालेला असल्याने मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,500/- व दावा खर्चापोटी रु.1,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.