निकालपत्र
( दिनांक 23-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार सय्यद महबूब हा गाडीपुरा, नांदेड येथील रहिवासी असून जेष्ठ नागरिक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून विदयुत पुरवठा घेतलेला होता. ज्याचा मिटर क्र. 9802908701 व ग्राहक क्र.550010121256 असा आहे. विदयुत पुरवठा घेतल्यापासून अर्जदाराने नियमितपणे विजेचे बिल भरलेले आहे. अर्जदारास प्रत्येक महिन्यात मिटरचे रिडींग घेवूनच विदयुत बिल दिले जात होते परंतू दिनांक 09.7.2014 ते 09.08.2014 या कालावधीसाठी रक्कम रु. 7,570/- रुपयाचे देयक अर्जदारास आले. सदर अवाजवी बिल रद्द करण्यासाठी अर्जदाराने सहाय्यक अभियंता यांच्याकडे दिनांक 29.9.2014 रोजी अर्ज केला. त्यावर सहाय्यक अभियंता यांनी रक्कम रु. 150/- चे बिल देवून सदर मिटर टेस्टींगसाठी पाठवले व दिनांक 29.01.2015 रोजी मिटर बदलून देवूत म्हणून रक्कम रु. 700/- ची आकारणी केली ती सुध्दा अर्जदार यांनी भरलेली आहे. त्याच प्रमाणे रिपेअरींग चार्जेस म्हणून रक्कम रु. 150/- दिनांक 19.12.2014 रोजी घेतले व मिटर दुरुस्ती करुन दिले. असे असतांनाही पुढील महिन्याचे बिल रक्कम रु. 32,550/- चे दिले. सदर बिल गैरअर्जदार यांच्याकडे नेवून तक्रार नोंदवली असता सप्टेंबर 2014 ते फेब्रुवारी 2015 पर्यंत सदर बिलाची दुरुस्तीकरुन फक्त रक्कम रु. 3,000/- भरण्यास अर्जदारास सांगितले. तेही अर्जदाराने भरणा केलेले आहे. दिनांक 23.01.2015 रोजी गैरअर्जदार यांनी पुन्हा टेस्टींग चार्जेसपोटी रक्कम रु. 150/- ची आकारणी केली. त्यानंतर देखील मिटर फास्ट चालत असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली असता मिटर बदलून देतो म्हणून दिनांक 29.1.2015 रोजी 700/- रुपयाच्या बिलाची आकारणी केली परंतू मिटर बदलून दिले नाही व पुढील महिन्यात अवाजवी बिल रक्कम रु. 37,840/- चे दिले. सदर बिलाची पाहणी केली असता त्यावर चालू रिडींग R.N.A. असे लिहिलेले आहे. अशाप्रकारे अवाजवी बिले देवून गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा व एकाधिकारशाहीचा वापर केलेला आहे म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले दिनांक 18.03.2015 रोजीचे अवाजवी व चुकीचे बिल रद्द करावे तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- ची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे. तसेच गैरअर्जदार यांनी Standard of performance चा अवलंब न केल्यामुळे गैरअर्जदार यांना दंड आकारावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदारास रक्कम रु. 7,570/- चे दिनांक 20.8.2014 रोजी दिलेले बिल हे योग्यच असून सदर बिल रद्द करण्याची विनंती ही चुकीची आहे. अर्जदाराचे म्हणणे की, मिटर रिपेअरींग चार्जेस म्हणून दिनांक 19.12.2014 रोजी अर्जदाराकडून रक्कम रु. 150/- घेतले व मिटर दुरुस्ती करुन दिले हे चुकीचे आहे कारण मिटर दुरुस्त केल्या जात नसते तर मिटर हे बदलल्या जात असते. अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 09.12.2014 ते दिनांक 09.01.2015 पर्यंतचे बिल रक्कम रु. 32,550/- ची आकारणी केली हे योग्य व बरोबर आहे. त्यात कोणतीही चुक नव्हती. अर्जदाराचे म्हणणे की, सदर बिल दुरुस्त करुन रक्कम रु. 3,000/- भरण्यास सांगितले हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. रक्कम रु. 3,000/- ही पार्टपेमेंटची रक्कम आहे व अर्जदाराला दिलेली ती सोय होती. त्याचा गैरफायदा अर्जदाराने हे प्रकरण दाखल करुन घेतलेला आहे. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदारास मिटर बदलून देतो म्हणून रक्कम रु. 700/- चे बिलाची आकारणी केली व पुढील महिन्यात रक्कम रु. 37,840/- चे अवाजवी बिल दिले हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदारास फार जुन्या काळापासून विजेचे मिटर देण्यात आलेले आहे व त्याचा अखंडीत वापर होत गेलेला आहे. दिलेले मिटर हे योग्य प्रकारे कार्य करीत आहे व त्यापूर्वीही कार्य करीत होते. दिनांक 27.8.2014 रोजी एकूण विजेचे बिल रक्कम रु. 7573.29 पैसे असतांना केवळ रु.1300/- चा अर्जदाराने भरणा केलेला आहे. ऑगस्ट 2014 मध्ये 311 युनिट, सप्टेंबर 2014 मध्ये 766 युनिट, ऑक्टोबर 2014 मध्ये 1127 युनिट व नोव्हेबर 2014 मध्ये 505 युनिट व डिसेंबर 2014 मध्ये 418 युनिट तसेच जानेवारी महिन्यात 388 युनिट्सचा वापर करण्यात आला परंतू कोणतीही रक्कम भरलेली नाही व एकूण बिल रक्कम रु. 32,548/- झाल्यानंतर त्यापैकी केवळ 3,000/- ची रक्कम पार्ट पेमेंट म्हणून भरण्यात आली तरीपण अर्जदाराचा विज पुरवठा सुरळीत चालू आहे. मिटर टेस्टींगसाठी अर्जदाराने पैसे भरल्यानंतर अर्जदाराला देण्यात आलेले विजेचे मिटर ज्याचा क्र.98/02908701 होते. ते तपासणीसाठी पाठवले व सदर तपासणीत मिटर चांगल्या परिस्थितीत आहे असे आढळून आले. सदर तपासणी अहवाल व ग्राहकाचा खातेउतारे मंचासमोर दाखल केलेले आहेत. त्यानंतर अर्जदाराचे मिटर बदलण्यात आले. बदलेल्या मिटरचा क्र. 98702906336 असा आहे. माहे मे-2015 चे सरतेशेवटी त्यावर 554 युनिटचा विजेचा वापर झालेला होता आणि जुने मिटरचे 434 युनिटस असे एकूण 998 युनिटचे बिल नवीन मिटरवर थकीत होते. नवीन मिटर बदलल्या बाबतची नोंद ग्राहकाच्या खाते उता-याला करण्यात आलेली आहे. ज्या कालावधीत विजेचे मिटर बदलल्या बाबतचा उल्लेख करण्यात आलेला नाही तेव्हा सरासरी देयक फेब्रुवारी 15 व मार्च-15 मध्ये देण्यात आले व प्रत्येकी 437 युनिटचे ते देयक होते. प्रत्यक्ष रिडींग उपलब्ध झाल्यानंतर ती सरासरी देयकाची रक्कम रु.7161.50 पैसे एकूण देयकातून कमी करण्यात आली ती रक्कम देखील ग्राहकाच्या खाते उता-यात दर्शविण्यात आलेली आहे. अर्जदारास दिलेले विजेचे बिल योग्य प्रकारे देण्यात आलेले आहे. अर्जदाराचे मिटर योग्य रिडींग दाखवत आहे. अर्जदाराला दिलेले विजेचे बिल प्रत्यक्ष उपभोगाचे आहे. असे असतांना देखील ते भरु नये या उद्देशापोटी प्रस्तुत प्रकरण दाखल केलेले आहे व असे करुन अर्जदाराने गैरअर्जदारास प्रस्तुत प्रकरणात बचाव करण्यास भाग पाडल्यामुळे अर्जदाराची तक्रार रक्कम रु. 25,000/- च्या खर्चासह खारीज करण्या योग्यतेची आहे व ते करावे अशी विनंती गैरअर्जदार यांनी मंचास केलेली आहे.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदाराने दाखल केलेल्या बिलावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराची मुख्य तक्रार ही आहे की, त्याचे मिटर अवाजवी रिडींग दाखवते व त्यास 37,840/- रुपये दिनांक 18.3.2015 रोजीचे अवाजवी बिल दिलेले आहे जे की, रद्द करण्यात यावे. यासाठी अर्जदाराने दिनांक 15.7.2014 पासूनची विज बिले दाखल केलेली आहेत. दिनांक 15.7.2014 चे देयक क्र. 1198 चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, चालू रिडींग RNA व मागील रिडींग 40 दर्शविलेले असून 79 युनिटचे सरासरी विज बिल दिलेले आहे. जे की, 370/- रुपयाचे आहे. त्यानंतरचे विज बिल हे दिनांक 20.8.2014 चे आहे. त्यात चालू रिडींग 351 व मागील रिडींग 40 असे दर्शविलेले आहे व विज वापर 311 युनीटचा आहे व ते 1310/- रुपये आहे. याचा अर्थ असा की, मागील रिडींग न घेतलेल्या युनिटचे बिल हे दिनांक 20.8.2014 च्या बिलात आपोआप समाविष्ट झालेले आहे. त्यानंतर दिनांक 19.9.2014 च्या बिलात चालू रिडींग ही 1170 युनीटस व मागील रिडींग ही 351 युनिटची असून विजेचा वापर 766 युनीटसचा झालेला आहे व त्या बद्दल 7570/- चे बिल देण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 19.1.2015 च्या बिलापर्यंत चालू रिडींग व मागील रिडींग हयाचा ताळमेळ योग्य असल्याचे दिसून येतो व दिनांक 19.1.2015 रोजीच्या बिलात अर्जदाराची मागील थकबाकी रु. 28,906.68 पैसे आहे. अर्जदाराने दिनांक 19.1.2015 रोजीचे थकबाकीसहीत बिल रु. 32,550/- चे भरलेले नसून गैरअर्जदाराकडे मिटर टेस्टींगचा अर्ज दिलेला आहे. गैरअर्जदाराने दिनांक 19.1.2015 च्या बिलावर 3,000/- रुपयाचे पार्टपेमेंट करण्याची अर्जदारास परवानगी दिलेली आहे. परंत त्यावर Subject to meter testing report असा शेरा दिलेला आहे. त्यानंतर मिटर बदललेले दिसून येते. परंतू दिनांक 20.2.2015 व दिनांक 18.3.2015 रोजी परत चालू रिडींग RNA दर्शवून दोन्ही बिले ही सरासरी 437 युनीटची दिलेली दिसून येते. गैरअर्जदार यांनी मिटर तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. त्यावरुन अर्जदाराचे मिटर सुस्थितीत असल्याचे दिसून येते. यावरुन हे स्पष्ट आहे की, अर्जदारास दिलेली बिले ही त्याच्या विज वापराप्रमाणे दिलेली असून ते भरण्याची त्याची जबाबदारी आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.