निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार शेख शायद पि. शेख इसाक हा वाजेगांव येथील रहिवाशी असून तो गैरअर्जदार यांच्या ग्राहक आहे. अर्जदाराचा ग्राहक क्र. 550010747678 असा आहे. सदर ग्राहक क्रमांकावर सुरुवातीस एक मीटर बसविण्यात आलेले होते नंतर ते बदलून दुसरे मिटर बसविण्यात आले. अर्जदार हा अतिशय गरीब आहे. अर्जदाराच्या घराच्या भिंतीवर मिटर बसविण्यात आले आहे त्याचा विदयुत वापर अतिशय कमी आहे. असे असतांना देखील अर्जदारास अतीशय जास्त रक्कमेचे बिल देण्यात आले ज्याचा क्र. 11 असून दिनांक 04/09/2012 असा आहे. गैरअर्जदाराने बेकायदेशीररित्या कोठलीही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता अर्जदाराचे मिटर काढून नेले. अर्जदार हा विदयुत वापराप्रमाणे बिल भरण्यास तयार असतांना देखील त्याची गैरअर्जदार यांनी दखल घेतली नाही. विदयुत कायदयाच्या कलम 56 नुसार जोडणी खंडीत करण्यापूर्वी 15 दिवसांची कायदेशीर लेखी नोटीस थकबाकीदाराला देणे बंधनकारक आहे. अर्जदार गेल्या एक ते दीड वर्षापासून कुटूंबासह अंधारात जीवन कंठीत आहे. अर्जदाराने अनेकवेळा विनंती करुन देखील त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार मंजूर करुन त्याला गैरअर्जदार यांनी दिलेले रक्कम रु. 30,010/- चे बिल क्र. 11 रद्द करुन विजेच्या वापरावरुन बिल देण्याचे आदेश गैरअर्जदार यांना करावे तसेच विदयुत जोडणी पुन्हा सुरु करुन देण्याचा आदेश कारावा. बेकायदेशीररित्या विदयुत जोडणी खंडीत केल्याबद्दल दरमहा रक्कम रु. 3,000/- विदयुत जोडणी खंडीत केल्या तारखेपासून देण्याबाबत आदेश व्हावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराने तक्रार अर्जात मागीतलेली मागणी अतीशय असंबध्द असून त्यात नेमकेपणा नाही. अशा असंबध्द तक्रारीची दखल घेण्यात येवू नये. अर्जदाराचा विज वापर अतिशय कमी आहे हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे. अर्जदाराने तक्रार दिनांक 28/08/2013 रोजी दाखल केलेली आहे. अर्जदाराने स्वतः तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 29/06/2010 रोजी घडल्याचे मान्य केले आहे. जेव्हा की ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे दोन वर्षाचा कालावधी नमूद केलेला आहे. त्यामुळे तक्रार ही मुदतबाहय आहे या कारणास्तव फेटाळण्यात यावी. प्रस्तुत प्रकरणात ग्राहकाचा विज पुरवठा फेब्रुवारी, 2011 मध्ये मिटर बदलल्यानंतर पाहिला असता त्याची रिडींग 1123 युनीट्स इतकी आढळली होती म्हणजेच 1122 युनीटचा वापर झालेला आहे. परंतू डिसेंबर 2011 मध्ये मिटर बदलण्यात आले त्याची रिडींग 2292 युनीटस 7 महिन्यात आली. सी.पी.एल. ची पाहणी केली असता ग्राहकाचा सरासरी विज वापर 220 युनीटस प्रतीमहा इतका झालेला आहे. प्रत्यक्ष उपाभोगाची विज मिटर वरील नोंद घेतल्यानंतर ग्राहकाचे विज देयक दुरुस्त करुन 6698/- चे विज देयक कमी करण्यात आले. सतत बिल न भरल्यामुळे भली मोठी रक्कम थकबाकीत गेली आहे. अर्जदारास जुलै ते नोव्हेंबर 2012 पर्यंत दिलेल्या सरासरी बिलातून रु. 12,157.81 पैसे म्हणजेच 19,920/- चे होते. ही रक्कम अर्जदारास देणे बंधनकारक आहे. अर्जदाराला जी मागणी हवी होती त्यासर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली असल्यामुळे अर्जदाराची कोणतीही तक्रार शिल्लक राहिलेली नाही. गैरअर्जदार यांनी मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या बिलावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या ग्राहक क्र. 550010747678 च्या दिनांक 01/07/2008, 18/07/2008, 01/09/2008 व दिनांक 16/09/2008 च्या पावत्यावरुन हे स्पष्ट आहे की, सदर रक्कम अर्जदाराने भरलेली आहे. नंतर माहे फेब्रुवारी 2011 ते जुन 2012 या काळातील काही बिले अव्हरेज मासीक वापराच्या अधारे दिलेली होती परंतू त्यानंतर गैरअर्जदार यांनी हिशोबाचा तपशील देवून सदर एकूण बिलामधून 12,157.81 कमी केलेले आहेत व अर्जदारास दुरुस्त बिल रक्कम रु. 19,920/- चे देण्यात आलेले आहे. अर्जदाराने स्वतः मंचासमोर येवून सदरचे बिल एकदाच भरणे शक्य नसल्याने त्याचे हाप्ते पाडून दिल्यास ते भरण्यास तयार असल्याचे म्हटलेले आहे. अर्जदार हा दोन वर्षापासून अंधारात रहात असल्याचे म्हटलेले आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या दुरुस्त बिलाची रक्कम रु. 19,920/- ही चार समान मासिक हप्ता म्हणजेच प्रतिमहा 4980/- प्रमाणे चार महिन्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे भरावी.
3. अर्जदाराने पहिला हप्ता रक्कम रु. 4,980/- गैरअर्जदार यांच्याकडे भरणा केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विदयुत पुरवठा त्वरीत पूर्ववत करुन दयावा.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.