(घोषित दि. 29.07.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून नुतन वसाहत जालना येथील घर क्रमांक 573/1 येथे ग्राहक क्रमांक 510030252525 द्वारे वीज जोडणी घेतलेली आहे. सदर वीज जोडणीचा डि.टी.सी क्रमांक 4406612 असा आहे. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्याचा डी.टी.सी.क्रमांक अनेक वर्ष 400406644 असा दाखविला. त्यामुळे मीटर रिडींग घेण्यास येणा-या कर्मचा-याला या क्रमांकाचे डी.टी.सी. न सापडल्याने त्यास मीटर बंद असल्याचे नमूद करुन देयके देण्यात आली. त्याने डी.टी.सी. क्रमांक दुरुस्त करण्याबाबत गैरअर्जदाराकडे वारंवार अर्ज दिले. परंतू गैरअर्जदाराने अनेक वर्ष त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही आणि त्यास अवाजवी व चुकीची देयके दिली. सन 2002 साली नुतन वसाहत भागात नगर पालीकेने अतिक्रमण हटवा माहिम राबविली होती. त्यावेळी या भागातील सर्व्हीस वायर कट झाल्याहोत्या आणि सन 2002 ते 2004 या दरम्यान सर्व्हीस वायर खंडीत करण्यात आले होते. त्यानंतर वायर जोडण्यात आल्या. असे असूनही या कालावधीत त्यास वीज देयके देण्यात आली. त्याबाबत त्याने गैरअर्जदाराकडे वारंवार तक्रारी दिल्या. परंतू काहीही उपयोग झाला नाही. त्याने अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर गैरअर्जदाराने चुकीचा डी.टी.सी क्रमांक बदलण्याबाबत अहवाल तयार केला. परंतू अहवालावर कोणतीही तारीख टाकली नाही आणि स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गैरर्जदारांनी त्यास देयक दुरुस्त करुन देणे आवश्यक होते. परंतू गैरअर्जदाराने देयक दुरुस्त केले नाही आणि दिनांक 05.01.2011 रोजी त्यास रक्कम रुपये 45,680/- चे देयक दिले. त्यामध्ये गैरअजदाराने थकबाकी दर्शविली. वास्तविक गैरअर्जदाराने चुकीचा डी.टी.सी. क्रमांक दिल्यामुळे योग्य मीटर रिडींग देण्यात आली नाही आणि ज्या काळात सर्व्हीस वायर कट केल्या होत्या त्या कालावधीसाठी अंदाजे वीज खपतीच्या आधारावर बेकायदेशीर देयक देण्यात आले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास देण्यात आलेले देयक क्रमांक 1032/- बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे आणि त्यास सेवेतील कमतरतेपोटी रुपये 5,000/- नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदाराने लेखी निवेदन दाखल केले. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, मीटर रिडींग घेण्यास येणा-या कर्मचा-यास डी.टी.सी. क्रमांक न सापडल्याने तक्रारदारास मीटर बंद असल्याच्या कारणांवरुन देयक देण्यात आल्याचे म्हणणे चुकीचे आहे.तक्रारदाराला प्रत्यक्ष वीज वापर केल्यानुसारच देयके देण्यात आलेली असुन, सर्व देयके योग्य व बरोबर आहेत. तक्रारदाराच्या डी.टी.सी क्रमांकाबाबत तांत्रिक चुक झाली होती आणि त्या तांत्रिक चुकीमुळे देयकावर कोणताही परीणाम झालेला नसून तक्रारदारास कोणतेही अतिरिक्त रकमेचे देयक दिलेले नाही. तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नसून त्याने देयकाचा भरणा करावा लागू नये म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड. एस.बी.देशपांडे आणि गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने त्यास गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने दिनांक 05.01.2011 रोजी दिलेले देयक रक्कम रुपये 45,680/- रद्द करावे अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने त्यास वीज वितरण कंपनीने दिलेले देयक चुकीचे असल्याचे सिध्द् करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सन 2002 ते 2004 या कालावधीत तो ज्या भागात राहतो त्या भागातील सर्व्हीस वायर खंडीत करण्यात आलेल्या होत्या तरी देखील वीज वितरण कंपनीने त्यास या कालावधीमध्ये देयके दिली. त्यामुळेच त्याच्याकडील थकबाकी पुढील देयकामध्ये दर्शविण्यात आली. सन 2002 ते 2004 या कालावधीतील देयकांबाबत 2011 मध्ये आक्षेप घेता येणार नाही. तक्रारदाराने कधीही नियमित देयके भरल्याचे दिसत नाही. त्याने सादर केलेले देयक नि. 3/2 पाहता त्याने दिनांक 18.01.2002 नंतर दिनांक 27.03.2006 रोजी देयकाची काही रक्कम भरली होती. त्यानंतर दिनांक 05.01.2011 रोजीचे देयक नि.3/1 पाहता त्याने दिनांक 19.07.2007 नंतर आतापर्यंत कोणतीही रक्कम गैरअर्जदाराकडे भरल्याचे दिसत नाही. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडील थकबाकी वाढलेली आहे. तक्रारदाराच्या देयकामध्ये दर्शविलेल्या चुकीच्या डी.टी.सी. क्रमांकामुळे त्यास चुकीची देयके देण्यात आली हे तक्रारदाराचे म्हणणे पटण्यासारखे नाही. तक्रारदार स्वत: देयके भरण्याबाबत नियमित नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिलेले देयक दिनांक 05.01.2011 चुकीचे असल्याचे दिसुन येत नाही आणि वीज वितरण कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी असल्याचे आम्हाला वाटत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |