तक्रारदारांतर्फे - अॅड.श्रीमती. जयश्री कुलकर्णी
जाबदार - अॅड.श्री. गारसोळे
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 20/09/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे :-
तक्रारदार या शेतकरी मयत वामन कटके यांच्या पत्नी आहेत. त्यांनी शेतकरी विमा योजनेअंतर्गत शेतकरी अपघात विमा घेतला होता. दि 3/09/2010 रोजी रात्री 8.30 वाजता, भिवरी गाव, सासवड, कोंढवा रोड पुणे येथे अपघात झाला. त्या अपघातात शेतकरी वामन कटके हे गंभीर जखमी झाले. त्यांना कर्णे हॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले, याबद्दलची माहिती सासवड पोलीस स्टेशनला देण्यात आली. उपचारा दरम्यान दि. 25/10/2010 रोजी शेतकरी वामन कटके यांचा मृत्यू झाला. सर्व कागदपत्रे देऊन तक्रारदारांनी जाबदारांकडे क्लेम दाखल केला दि 14/1/2012 रोजी जाबदारांनी पोस्टमार्टम रिपोर्ट व इन्क्वेस्ट पंचनामा नाही, म्हणून तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जाबदारांनी हा क्लेम सेटल करण्यास विलंब लावला आणि चुकीच्या कारणावरुन क्लेम नाकारला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदारांकडून पॉलिसीची रक्कम 1,00,000/- 18 टक्के व्याजासहित, रक्कम रु. 50,000/- नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च रु. 5,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदाराचा क्लेम इन्क्वेस्ट, पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्ट नसल्यामुळे नाकारलेला आहे कारण मयत शेतकरी यांचा मृत्यू रोड ट्रॅफिक अॅक्स्डिेंटमध्ये झालेला आहे त्यास पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट पंचनाम्याची गरज असते, योग्य त्या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे, म्हणून तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी मागणी जाबदार करतात. जाबदारांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत शपथपत्र दाखल केले आहे.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. शेतकरी मयत वामन कटके यांचा मृत्यू अपघातात झाला होता. तक्रारदारांनी एफ्.आय्.आर. ची प्रत आणि फिर्यादी जबाबाची प्रत दाखल केला आहे, त्यानुसार तक्रारदारास मोटरसायकलने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून येते. त्यानंतर त्यांचा कर्णे हॉस्पिटल येथे उपचार चालू असतानाच मृत्यू झाला असल्यामुळे पोस्टमार्टम किंवा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झालेला नसून जवळपास 49 दिवसांनी त्यांचा मृत्यू दि. 21/10/2010 रोजी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पोस्टमार्टम चा प्रश्नच निर्माण होत नाही केवळ शेतकरी अपघात विमा योजना असल्यामुळे पोस्टमार्टम करावे असे होत नाही. पोलीसांची कागदपत्रे, एफ्.आय्.आर., जबाब, डेथ सर्टीफिकेट यावरुन तक्रारदार शेतक-याचा अपघाती मृत्यू झाला हे सिध्द होते. चुकीच्या कागदपत्रांची मागणी करुन जाबदारांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारला असे मंचाचे मत आहे म्हणून मंच जाबदारास असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदारास रक्कम रु.1,00,000/- 9 टक्के व्याजदराने अपघात झाल्याचे दिनांकापासून दयावेत. व्याजाची रक्कम देण्यात येत असल्यामुळे नुकसानभरपाईची रककम देण्यात येत नाही. तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- दयावेत.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदारांनी तक्रारदारास रककम रु.1,00,000/- (रक्कम रु. एक लाख फक्त) अपघात झाल्याचे दिनांकापासून म्हणजेच दि.03/09/2010 पासून 9 टक्के व्याजदराने या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
3. जाबदारांनी तक्रारदारास रककम रु.2,000/- (रक्कम रु. दोन हजार फक्त) तक्रार अर्जाच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.