जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
ग्राहक तक्रार क्रमांक – २२५/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०२/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २२/०५/२०१४
राजेंद्र मुरलिधर नगरे - तक्रारदार
उ.व.४५, धंदा- व्यवसाय
रा.जमनालाल बजाज रोड,
गल्ली नं.८,ता.जि.धुळे
विरुध्द
महाराष्ट्र स्टेट इले.सिटी - सामनेवाले
डिस्ट्रीब्युशन कंपनी,
म.उप अभियंता,शहर उपविभाग,
ता.जि.धुळे
न्यायासन
(मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर.लोहार)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.एस.एम.शिंपी)
निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी अवास्तव वीज देयक देवून वीज पुरवठा खंडीत केला तो पूर्ववत करावा आणि तक्रारदाराने भरलेली जास्तीची रक्कम सामनेवाले यांनी व्याजासह परत करावी या मागणीसाठी, तक्रारदार यांनी या मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते सामनेवाले यांचे सन १९६५ पासून ग्राहक आहेत. तक्रारदार यांच्या मयत वडिलांच्या नांवे त्यांचे वीज मिटर आहे. त्याचा ग्राहक क्रमांक ०८००१००६४१५९ असा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तक्रारदार हे वीज वापर करीत आहेत. सुमारे ५ ते ६ वर्षापुर्वी तक्रारदार यांचे जुने मिटर काढून त्या जागी नवीन मिटर बसविण्यात आले. हे नवीन मिटर जलद गतीने फिरते असे तक्रारदार यांच्या निदर्शनास आले. त्यावरुन त्यांनी सामनेवाले यांचे कार्यालयात जावून माहिती दिली. मात्र सामनेवाले यांनी त्याची दखल घेतली नाही. दरम्यानचे काळात सामनेवाले यांनी अवास्तव आणि जादा रकमेचे वीज देयक दिल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता तक्रारदार यांचा वीजपुरवठा खंडीत केला. त्या बाबत तक्रारदार यांनी दि.३०-०३-२०११ रोजी सामनेवाले यांच्याकडे तक्रार नोंदविली. सामनेवाले यांनी केलेल्या मिटर तपासणीत तक्रारदार यांचे मिटर ६६.६६ टक्के जलद गतीने फिरत आहे असे निष्पन्न झाले. त्यामुळे सामनेवाले यांनी मिटर बसविल्यापासून ६६.६६ टक्के जास्तीची वीज देयके घेतली आहेत. ती रक्कम परत मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. या मागणीसाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे दि.२०-०६-११, दि.०७-०७-२०११ आणि दि.२५-०७-२०११ रोजी लेखी अर्ज दिले आहेत. त्यावर कार्यकारी अभियंता यांनी दि.०९-०९-२०११ रोजी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापपर्यंत रक्कम परत मिळालेली नाही, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. ही जास्तीची रक्कम १८ टक्के व्याजासह आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.२५,०००/- मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले यांच्याकडे नोंदविलेल्या तक्रारीची पावती, मिटर तपासणीची पावती, मिटर तपासणी अहवाल, सामनेवाले यांना दिलेले अर्ज, ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दिलेला अर्ज, कार्यकारी अभियंता यांचा आदेश, ऑगस्ट २०११ चे वीज देयक, ऑगस्ट २०१० चे वीज देयक, ऑगस्ट २००९ चे वीज देयक, सामनेवाले यांचे पत्र, मृत्यु दाखला आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले यांनी हजर होऊन आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदाराची तक्रार कायदेशीर नाही. त्यातील मागण्या ख-या नाहीत व सामनेवाले यांना मान्य नाहीत. सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन असे दिसते की, सुमारे पाच ते सहा वर्षापूर्वी सामनेवाले यांनी त्यांच्याकडे नवीन मिटर बसविले. मात्र दि.३०-०३-२०११ रोजी प्रथम लेखी अर्ज सामनेवाले यांना दिला आहे. या तारखेलाच तक्रारदार यांची मिटर जलद फिरते अशी तक्रार पहिल्यांदा आली आहे. या तक्रारीनंतर सामनेवाले यांनी कामकाजाच्या पध्दतीनुसार आवश्यक पुर्तता केली आहे मिटरच्या तपासणी अहवालावरून मिटर जलद फिरते ही बाब लक्षात आल्यानंतर, सामनेवाले यांनी नियमानुसार तीन वीज बिलांची दुरुस्ती करुन तक्रारदार यांना रक्कम रु.१,०१०/- जुलै २०११ च्या वीज बिलात वजावट करुन दिली आहे. यावरुन सामनेवाले यांनी निष्काळजीपणा व गैर जबाबदारपणा केलेला नाही हे दिसून येते. यामुळे नवीन मिटर बसविल्यापासून ६६.६६ टक्के जास्त रकमेचा भरणा केला या बाबतचे तक्रारदार यांचे कथन आणि मागणी चुकीची आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार रद्द करावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
(५) सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशा सोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
(६) तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले यांची कैफियत, शपथपत्र व दाखल कागदपत्रे आणि तक्रारदार यांचा लेखी युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)तक्रारदार हे नवीन मिटर बसविल्यापासून, त्यांनी भरलेली जास्तीची रक्कम परत मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून १९६५ पासून वीज जोडणी घेतली आहे, त्यांचा ग्राहक क्रमांक ०८००१००६४१५९ असा आहे. हा वीज पुरवठा तक्रारदार यांचे वडिलांचे नांवे आहे. वडिलांच्या मृत्यु नंतर तक्रारदार हे त्याचा वापर करीत आहेत. तक्रारदार हे सामनेवाले यांचे अधिकृत ग्राहक नाहीत असा मुद्दा सामनेवाले यांनी खुलाशात उपस्थित केला आहे. तथापि ग्राहक संरक्षण कायदयातील कलम २ (ब) (५) मध्ये ग्राहक या शब्दाची व्याख्या स्पष्ट केली आहे. वरील कलमात स्पष्टपणे नमूद केले आहे की, “ग्राहकाचा मृत्यु झाला असल्यास त्याचे कायदेशीर वारस किंवा प्रतिनिधी”. तक्रारदार हे त्यांच्या वडिलांचे कायदेशीर वारस आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील कलम २ (ब) (५) नुसार ते सामनेवाले यांचे “ग्राहक” ठरतात. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – जुने वीज मिटर बदलून नवीन मिटर बसविल्यापासून वीज बिल जास्तीचे येत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे दि.३०-०३-२०११ रोजी केली होती. या तक्रारीवर पाठपुरावा केल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या वीज मिटरची दि.२०-०४-२०११ रोजी तपासणी केली. त्याचा अहवाल तक्रारदार यांनी नि.नं.५ सोबत दाखल केला आहे. या अहवालात तक्रारदार यांचे मिटर ६६.६६ टक्के अधिक वेगाने फिरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सामनेवाले यांनीही हा अहवाल मान्य केला आहे. आपले मिटर बसविल्या दिनांकापासून अधिक वेगाने फिरत असून त्यामुळे बसविल्या दिवसापासून या मिटरच्या रिडींग प्रमाणे नियमित देयकात जास्तीची रक्कम आपल्याकडून वसुल करण्यात आली. ती परत मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मिटरबाबत दि.३०-०३-२०११ रोजी पहिली तक्रार केली. त्यामुळे त्यानंतरच्या तीन बिलांमध्ये दुरुस्ती करुन जुलै २०११ च्या वीज बिलात रु.१,०१०/- वजावट करण्यात आली आहे, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या मिटर बाबत दि.३०-०३-२०११ रोजी लेखी तक्रार केली असली तरी त्यापूर्वीही त्यांनी सामनेवाले यांच्याकडे अर्ज दाखल केला होता असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन सामनेवाले यांनी त्यांच्या मिटरची तपासणी केली. त्यावेळी ते मिटर ६६.६६ टक्के अधिक वेगाने फिरत असल्याचे निदर्शनास आले. याचाच अर्थ तपासणी करण्याच्या पूर्वीही सदर मिटर अधिक वेगाने फिरत होते, हे निदर्शनास येते. त्यामुळे केवळ तीन महिन्यांच्या वीज देयकात दुरुस्ती करणे योग्य होणार नाही, असे मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांचे वीज मिटर ६६.६६ टक्के अधिक वेगाने फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब सामनेवाले यांनाही मान्य आहे. मिटर तपासणी सामनेवाले यांनीच केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्याकडून सामनेवाले यांनी नवीन मिटर बसविल्यापासून अधिक रकमेची वसुली केलेली आहे हेही स्पष्ट होते. ज्या रकमेची सामनेवाले यांनी वसुली करणे आवश्यक नव्हते आणि जी रक्कम भरण्याची तक्रारदार यांची जबाबदारी नव्हती ती रक्कमही सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वसूल केली आहे. अशी जास्तीची वसूल केलेली रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या मागणी प्रमाणे त्यांना परत केली पाहिजे, आणि तक्रारदार यांना त्यांनी भरलेली जास्तीची रक्कम परत मिळाली पाहिजे असे मंचाचे मत बनले आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त मुद्यांचा सारासार विचार करता, तक्रारदार हे त्यांनी सामनेवाले यांच्याकडे भरलेली जास्तीची रक्कम परत मिळण्यास,त्याच बरोबरमानसिक व शारीरिक त्रासाबद्दल भरपाई, तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत, असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
(२) सामनेवाले यांनी सदर निकालाच्या तारखेपासून पुढील ३० दिवसांचे आत, तक्रारदार यांना पुढील प्रमाणे रकमा दयाव्यात.
(अ) तक्रारदार यांचेकडे नवीन वीज मिटर बसविल्याच्या दिनांकापासून मिटर तपासणी अहवालानुसार ६६.६६ टक्के जादा वसूल केलेली वीज देयकाची रक्कम वजावट करुन द्यावी.
(ब) तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी एकूण रक्कम रु.१,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.५००/- (अक्षरी रक्कम रुपये पाचशे मात्र) दयावेत.
(३) उपरोक्त आदेश कलम २ मधील अ व ब मध्ये उल्लेखीलेली रक्कम मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांक : २२-०५-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.