Dated the 24 Mar 2015
तक्रार दाखल सुनावणी कामी आदेश
द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले ही महाराष्ट्रामध्ये ग्राहकांना विदयुत पुरवठा करणारी कंपनी आहे. तक्रारदार हे डोंबिवली येथील रहिवाशी आहेत. तक्रारदारांनी विजेचा अनधिकृत वापर केलेल्या बद्दल तक्रारदारांना पाठविलेल्या वीज बिलासंबंधी प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदार यांच्या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले यांनी विदयुत जोडणी दिलेली जागा केवळ दोनशे चौरसफुट क्षेत्रफळाची होती. त्याठिकाणी पुर्वी एक भाडेकरु रहात होते, व सदर विदयुत मापकाप्रमाणे महिना रु.500 ते 600/- च्या दरम्यान बील येत होते. तथापि अचानकपणे, डिसेंबर-2012 मध्ये रु.35,293/- इतके बील तक्रारदारांना दिले. सदर बील रिडींग पेक्षा जास्त असल्याने व सदरची रक्कम भरण्यास तक्रारदार असमर्थ असल्याने त्यांनी सदर बिलाची तक्रार सामनेवालेकडे केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या गाहाण्याकडे दुर्लक्ष करुन, माहे-डिसेंबर-2012 मध्ये तक्रारदाराचा विदयुत पुरवठा परमनन्टली खंडित केला. सदर कार्यवाही तक्रारदारांना कोणतीही पुर्वसुचना/नोटीस न देता केली होती, व यास सामनेवाले जबाबदार आहेत. विदयुत पुरवठा खंडित केल्यामुळे तक्रारदारांना खोली भाडयाने देता आली नाही व खोली भाडयाची महिना उत्पन्न रु.400/- न मिळाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय तक्रारदारांचा विदयुत पुरवठा खंडीत केल्यामुळे सामनेवाले यांनी त्यांना पाठविलेले रु.47,290/- चे बील तक्रारदारास मान्य नसल्याने ते भरणा करु शकत नाहीत. सदर रक्कम 7 दिवसांचे आंत भरणेस सांगितली असल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन, विदयुत पुरवठा पुर्ववत करावा. नुकसानभरपाई रु.96,000/- व कॉस्ट रु.50,000/- मिळावी अशा मागण्या केल्या आहेत.
3. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्राव्दारे दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन केले. त्यावरुन असे दिसुन येते की, दत्ता जोशी बिल्डींग, खोली नं.9 व विजय जोशी बिल्डींग, रुम नं.6, नवापाडा, डोंबिवली, या दोन खोल्यांसाठी 020012147521/2 व 020010042969/2 अशा स्वतंत्र दोन विदयुत जोडण्या दिल्या होत्या. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विदयुत देयकावरुन दिसुन येते की, ग्राहक क्रमांक 020012147521/2 ही जोडणी शशीमरा देवरुपा देवडिगा यांचे नांवे आहे. तर, ग्राहक क्रमांक 020010042969/2 ही जोडणी तक्रारदार विजय जोशी यांचे नांवे आहे.
4. श्री.शशीमरा देवडिगा यांचे नांवे असलेली 020012147521/2 ही विदयुत जोडणी रु.35,293/- इतकी रक्कम थकीत असल्यामुळे माहे-जानेवारी-2013 मध्ये कायमस्वरुपी खंडीत (Permanently Disconnected) करण्यात आली होती. सदर थकीत रक्कम अदा न केल्याने, ता.24.11.2014 पर्यंत व्याजासह थकीत रक्कम रु.47,290/- या रकमेची मागणी सामनेवाले यांनी तक्रारदारांकडे ता.25.11.2014 रोजीच्या नोटीसी अन्वये केली.
5. याशिवाय तक्रारदार विजय दत्तु जोशी यांनी खोली नं.6, च्या विदयुत जोडणी क्रमांक-020010042969/2 मधुन अनधिकृतरित्या अन्य इमारतीस/खोलीस विदयुत पुरवठा केल्याने, विदयुत कायदा-2003 मधील कलम-126 अन्वये, सप्टेंबर-2013 ते नोव्हेंबर-2014 पर्यंत 15 महिन्यांच्या कालावधीसाठी, 2482 युनिटचा वापर निर्धारित करुन, रु.11,960/- इतक्या रकमेचे देयक, तक्रारदारांना ता.24.11.2014 रोजी दिले. यानंतर तक्रारदार यांनी उपरोक्त दोन विदयुत देयकाच्या मागणी संदर्भात वाद उपस्थित करुन प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
6. तक्रारदारांच्या तक्रारी संदर्भात, असे नमुद करावेसे वाटते की, वीज जोडणी 20012147521/2 ही दत्ता जोशी बिल्डींग रुम नं.9 मधील श्री.शशीमरा सुरुपा देवडिगा यांचे नांवे दिली होती. डिसेंबर-2012 अखेरीस थकीत रक्कम रु.47,290/- वीज जोडणी धारकाने न भरल्यामुळे जानेवारी-2013 पासुन सदर विदयुत जोडणी खंडीत करण्यात आली. सकृतदर्शनी तक्रारदारांचा सदर विदयुत जोडणीशी कोणत्याही प्रकारे संबंध दिसुन येत नाहीच, शिवाय, तक्रारदारांनी या विदयुत जोडणीशी आपला कोणत्या प्रकारे संबंध आहे याबाबत तक्ररीमध्ये कोणतेही भाष्य केले नाही, शिवाय, याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रारीमधील या जोडणीच्या संदर्भातील कथने आणि मागण्या विचारात घेता येत नाहीत.
7. तक्रारदारावर बजावण्यात आलेल्या वीज जोडणी 020010042969/2 संदर्भातील रु.11,960/- च्या देयका संदर्भात असे नमुद करण्यात येते की, सदर देयक हे, तक्रारदारांनी त्यांच्या विदयुत जोडणीमधुन अनधिकृतरित्या, अन्य इमारतीस खोलीस विदयुत पुरवठा केल्याने, सामनेवाले यांनी विदयुत कायदा-2003 मधील कलम-126 अन्वये अनधिकृत वीजेचा वापर निर्धारित करुन 15 महिन्यांचे निर्धारित देयक तक्रारदारावर बजावण्यात आले आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने, “ यु.पी.पॉवर कार्पोरेशन विरुध्द अनीस अहमद ” या प्रकरणामधील अनधिकृत वीज वापराच्या देयकासंदर्भात असे नमुद केले आहे की, अनधिकृत वीज वापराचा संबंध ग्राहक संरक्षण कायदा-1986 अंतर्गत अनुचित अथवा प्रतिबंधीत व्यापारी प्रकाराशी येत नाहीच, शिवाय, कसुरदार सेवेशी ही संबंध येत नाही. तसेच घातक वस्तु पुरविण्याशी किंवा नमुद किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणी केल्याच्या संदर्भातही येत नाही. त्यामुळे, वीजेच्या अनधिकृत वापरा संबंधीची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 अंतर्गत येत नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायदा-1986 अन्वये तक्रार दाखल करता येत नाही.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-131/2015 खारीज करण्यात येते.
2. तक्रार क्रमांक-131/2015 खारीज केल्याने किरकोळ अर्ज क्रमांक-17/2015 निकाली
करण्यात येतो.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.24.03.2015
जरवा/