जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 148/2011 तक्रार दाखल तारीख – 16/09/2011
तक्रार निकाल तारीख– 30/04/2013
प्रकाश पिता प्रभाकरराव मुळे,
रा.टाकरवण ता.माजलगांव जि.बीड. ... अर्जदार
विरुध्द
1) मा.कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या.
बीड ता.जि.बीड.
2) मा.कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या.
तालखेड सबडिव्हीजन ता.माजलगांव
जि.बीड. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड,एन.एम.कुलकर्णी,
गैरअर्जदारातर्फे – एकतर्फा.
निकाल
दिनांक- 30.04.2013
(द्वारा- श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे टाकरवन ता.माजलगाव येथील रहिवासी असून त्यांचा व्यवसाय शेती आहे. त्यांनी शेतीसाठी दोन वीज कनेक्शन घेतली होती. त्यापैकी एक कनेक्शन तक्रारदार यांचे नावे असून त्यांचा ग्राहक क्रमांक 585550001983 असा आहे, तर दुसरे कनेक्शन भाऊ प्रमोद मुळे यांचे नावावर असून त्याचा ग्राहक क्रमांक 585550002572 असा आहे.
(2) त.क्र.148/11
महाराष्ट्र शासनातर्फे 2004 मध्ये कृषी संजीवनी योजना राबवली होती त्या आधारे 1/3 थकीत बिलाची रक्कम जमा केल्यावर इतर बिल माफ करण्यात येणार होते. तक्रारदार यांनी या योजनेचा लाभ घेऊन वरील दोन ही कनेक्शनच्या थकीत रकमेच्या 1/3 रक्कम जमा केली. दि.25.01.2004 रोजी पावती क्रमांक 2887452 अन्वये रु.14,800/- (ग्राहक क्रमांक 585550001983) व पावती क्रमांक 2887451 नुसार रु.14,100/- जमा केले होते, तेव्हा गैरअर्जदार यांनी दोन ही कनेक्शन वरील बाकी जमा झाल्याचे कळवले होते.
त्यानंतर लगेचच तक्रारदार यांनी विहीरीस पाणी नसल्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी अर्ज दि.17.03.2004 ला दिला परंतू कनेक्शन बंद करण्यात आले नाही. नंतर तक्रारदारांनी वेळोवेळी अर्ज दिले. अचानक मार्च 2010 मध्ये त्यांना रु.82,310/- चे बिल आले. चौकशी केली असता त्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराच्या नावे असलेल्या वीज कनेक्शनची रक्कम प्रभाकर मुळे यांच्या नावावर तर प्रभाकर मुळे यांच्या नावावर असलेल्या वीज कनेक्शनची रक्कम तक्रारदार यांचे नावावर संबंधित कर्मचा-याच्या चुकीमुळे जमा झाली. त्यामुळे तक्रारदार यांचे नावावरील रक्कम थकीत बिलाच्या 1/3 पेक्षा कमी झाली तर प्रभाकर मुळे यांच्या नावावर 700/-रु. जास्तीचे जमा झाले. या नजरचुकीमुळे सदर योजनेचा लाभ तक्रारदार यांना मिळाला नाही.
गैरअर्जदार यांच्या स्थानिक कर्मचा-यांनी 2010 मध्ये पुन्हा 5000/-रु.जमा करण्यास सांगितले ते जमा केल्यानंतरही झालेली चुक दुरुस्त झाली नाही व पुन्हा तक्रारदार यांना 82,310/- रु.चे बिल आले व ते न भरल्यास वीज कनेक्शन बंद करण्याची धमकी गैरअर्जदारांनी दिली.
नाईलाजाने दि.28.03.11 ला गैरअर्जदारांनी तक्रारदारांना नोटीस पाठवली. ती मिळाल्यानंतर तालखेड येथील सब इंजिनिअर यांनी दि.08.04.11 रोजी पत्र देवून तक्रारदाराकडच्या पावत्या मागवल्या, परंतू तक्रारदाराने पावत्या देवून देखील बिलात दुरुस्ती केलेली नाही, म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे. त्याने तक्रारीसोबत 14,100/-रु. व 14,800/-रु. भरल्याच्या पावत्या, गैरअर्जदाराला वेळोवेळी पाठवलेली पत्रे, 82,310/-रु.चे बिल, 5,000/- रु.भरल्याची पावती इत्यादी गोष्टी दाखल केल्या आहेत.
(3) त.क्र.148/11
गैरअर्जदार म.रा.वि.मं. मंचासमोर हजर झाले नाही, सबब त्यांच्या विरुध्द ‘एकतर्फा’ हुकूम करण्यात आला.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.एन.एम.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन दि.25.01.2004 रोजी तक्रारदारांनी 14,100 व 14,800 अशा दोन पावत्यांद्वारे बिल भरले आहे. त्यानंतर दि.25.01.2004, 17.03.2004, 04.08.2005, 11.09.2007 रोजीचे चार पत्रे आहेत. ज्याद्वारे तक्रारदारांनी वेळोवेळी विद्युत देयक दुरुस्त करुन विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत विनंती केली आहे. दि.30.09.2009 रोजीचे 82,310/- रुपयांचे विद्युत देयक आहे. दि.28.03.2011 रोजीची कायेदशिर नोटीस व त्याला मिळालेले उत्तर आहे. वरील कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी रु.14,800/- चे बिल भरले होते, तरी देखील त्यांना “कृषी संजीवनी योजना-2004” चा लाभ देण्यात आला नाही. तसेच वारंवार विद्युत पुरवठा बंद करण्याची लेखी विनंती करुनही गैरअर्जदारांनी त्यांचे मीटर बंद केले नाही. आणि अचानक त्यांना 82,310/- रुपयांचे बिल पाठवले हे स्पष्ट दिसते.
गैरअर्जदार वीज वितरण कंपनी हे संधी देवूनही मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे अर्जदारांनी दिलेली तक्रार व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे यावरच मंचाला विसंबून रहावे लागत आहे. वरील कारणमिमांसेवरुन तक्रारदाराला कृषी संजीवनी योजनेचा लाभ मिळावयास हवा होता व तो दिला गेलेला नाही हे स्पष्ट होते व असा लाभ दिला न गेल्यामुळे व वारंवार विनंती करुनही वीज कनेक्शन बंद न केल्यामुळेच वादग्रस्त 82,310/- रुपयाचे चुकीचे बिल देण्यात आले आहे असे दिसते. अशा परिस्थितीत तक्रारदाराला कृषी संजीवनी योजनेचा लाभ देऊन त्याला दिलेले 82,207/- रुपयांचे बिल रदद करणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते. तसेच अर्जदारास झालेल्या शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1000/- तसेच तक्रारदाराला सदर तक्रारीचा खर्च रु.1000/- देणे न्याय ठरेल असे मंचाला वाटते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(4) त.क्र.148/11
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराला कृषी
संजीवनी योजनेचा लाभ द्यावा व 82,310/- रुपयांचे वादग्रस्त देयक
रदद करण्यात यावे.
3) गैरअर्जदारांनी तक्रारदारास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी
रु.1000/- द्यावेत.
4) गैरअर्जदारांनी तक्रारदारास सदर तक्रारीचा खर्च रु.1000/- द्यावा.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड